Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र शासनाने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात स्टार्टअप क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘नवीन स्टार्टअप व नाविन्यता धोरण २०२६’ जाहीर केले असून पुढील पाच वर्षांत ५० हजार स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या धोरणाची माहिती नवउद्योजकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी जनजागृती व मार्गदर्शन मोहीम राबविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात, पुणे शहर व जिल्ह्यातील नवउद्योजकांना शासनाच्या विविध उद्योग योजनांची माहिती व्यापक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, असे आश्वासन उद्योग राज्यमंत्री नाईक यांनी दिले आहे.
पुणे जिल्हा हा औद्योगिक, शैक्षणिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने विकसित होत असून मोठ्या प्रमाणावर युवक-युवती, महिला तसेच ग्रामीण भागातील नागरिक उद्योग व स्वयंरोजगाराकडे वळत आहेत. मात्र, शासनाच्या विविध योजनांची पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक इच्छुक उद्योजक या संधींपासून वंचित राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा उद्योग केंद्राच्या (DIC) माध्यमातून पीएमईजीपी (PMEGP), मुद्रा योजना, महिला उद्योजकता योजना आणि स्टार्टअप इंडिया यांसारख्या योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले अनुदान, बँक कर्ज, तांत्रिक सहाय्य आणि परवानगी प्रक्रियेबाबत एकाच ठिकाणी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला आहे.
महिला बचत गट आणि महिला उद्योजकांसाठी विशेष प्रशिक्षण व अनुदान कार्यक्रम राबविणे, तसेच ग्रामीण व शहरी भागात मार्गदर्शन शिबिरे आणि कार्यशाळा आयोजित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय सोशल मीडिया, स्थानिक वृत्तपत्रे आणि एफएम रेडिओच्या माध्यमातून योजनांची माहिती व्यापक प्रमाणात प्रसारित करण्याचे सुचविण्यात आले आहे.
शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी एकात्मिक हेल्पडेस्क उभारणे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाइन मार्गदर्शन व अर्ज प्रक्रियेस सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. या उपक्रमांमुळे पुणे जिल्ह्यातील युवक-युवती, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



Recent Comments