Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांच्या सूने वैष्णवी हगवणेच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. वैष्णवीने आत्महत्या केली, असा दावा केला जात असतानाच तिच्या कुटुंबीयांनी तिला आत्महत्या करायला लावण्यात आले नसून तिचा खून करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.
दरम्यान, वैष्णवी हगवणेची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. या ऑडिओमध्ये वैष्णवी म्हणते, “लग्न करून मी चूक केली. ताई म्हणाली की मी तुझी सगळीकडे बदनामी करते, जे केलं नाही तेही सगळ्यांना सांगते. शशांकसोबत तू कधी लॉयल नव्हती, असंही तिने मला सुनावलं. ताई मला ‘फालतू, घणेरडी’ अशा शब्दांत बोलली.”
पुढे वैष्णवी सांगते, “मला मारताना दाजी बघत होते, आणि त्यांनीही माझ्यावर हात उचलला. त्यांनाही ते खरं वाटतंय. त्यामुळे मी त्या माणसाला घटस्फोट देणार आहे, असं मी पप्पांना सांगितलं. पप्पांनीही आपण यावर विचार करू, असं सांगितलं होतं.”
या क्लिपमधून वैष्णवीवर सासरच्या मंडळींकडून झालेला मानसिक आणि शारीरिक छळ स्पष्ट होत असल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसून सुनियोजित खून आहे, असा त्यांचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात शशांक हगवणे, त्याची आई लता आणि बहीण करिष्मा यांना अटक केली असून, राजेंद्र हगवणे व त्यांचा मुलगा सुशील सध्या फरार आहेत.
पोलिस तपास सुरू असून, ऑडिओ क्लिपच्या सत्यतेचीही चौकशी केली जात आहे.


Recent Comments