Newsworldmarathi sambhajinagar : पोलिसांनी हेल्प लाईन तातडीने मदत मिळवण्यासाठी दिली आहे, मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये हेल्प लाईनवर फोन करुन मदत मागणाऱ्या एका व्यक्तीलाच पोलिस स्टेशनमध्ये नेऊन पोलिसांनी चोप दिल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिक नगर पोलीस स्टेशनमधील ही १८ मे रोजी घडलेली घटना आहे. जालन्याहून पुण्याला माल वाहतूक करणाऱ्या एका ट्रक चालकाचा चारचाकी गाडीने पाठलाग केला आणि धक्का लागल्याचं सांगत नुकसान भरपाईची मागणी केली. भयभीत झालेल्या ट्रक चालकाने पोलिसांच्या मदतीसाठी ११२ आपत्कालीन मदत क्रमांकावर संपर्क केला असता पोलिसांनी दोन्ही गाड्या पोलिस स्टेशनला नेल्या आणि त्यानंतर जे घडलं ते मदत मागणाऱ्या ट्रक चालकाला मदतीऐवजी संकटात टाकणारं होतं.
१८ मे रोजी गोरक्ष मिसाळ हे ट्रक चालक जालन्याहून पुण्याला अवजड माल घेऊन जात होते. रस्त्याने रात्री साडे ११ च्या सुमारास एका चारचाकी गाडीला त्यांची अवजड मालाची वाहतूक करणारी गाडी घासली आणि त्यानंतर ट्रक अडवली गेली. चार चाकी गाडीमध्ये चार ते पाच जण होते आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाईची मागणी करत शिवीगाळही करण्यात आली. गोरक्ष मिसाळ यांनी मारहाणीच्या भीतीपोटी ११२ या संपर्क क्रमांकावर फोन करुन पोलिसांना बोलावून घेतलं. पण पोलिसांनी मदत करण्याऐवजी भलतंच केलं. पुंडलिक नगर पोलीस स्टेशनचे पीएसआय रेशिम कोळेकर यांनी नुकसान भरपाई दे अन्यथा तुझ्यावर गुन्हा दाखल करु अशी धमकी दिली. गोरक्ष मिसाळ यांनी विनंती केली की साहेब मी तुम्हाला मदत मागितली आहे आणि उलट माझ्यावरच गुन्हा का दाखल करताय. संबंधित गाडीचे नुकसान झाले असेल तर ती नुकसान भरपाई देण्याची माझी तयारी आहे आणि इन्शुरन्स कंपनीकडून ही भरपाई दिली जाईल याची हमी मी स्वतः घेतो. मात्र तू जास्त बोलतोय असं म्हणत गोरक्ष मिसाळ यांना मारहाण करण्यात आली, शिवाय ते दारु पिलेले आहेत, असा आरोपही संबंधीत पोलीस उपनिरीक्षकाने केला. चालकाने मारहाण झाल्यानंतर घाटी रुग्णालय गाठलं आणि अल्कोहोल चाचणी करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांच्या परवानगीशिवाय आम्ही दारु प्यायला आहात की नाही हे तपासू शकत नाही, असं स्पष्टीकरण डॉक्टरांकडून करण्यात आलं. मदत मागितल्यानंतर अडचणीत सापडलेल्या गोरक्ष मिसाळ यांनी आता या प्रकरणाची थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
गोरक्ष मिसाळ यांच्याविरोधात चारचाकी चालवणाऱ्या व्यक्तीने तक्रार केली असून मिसाळ यांनी घाटीमध्ये मारहाणीनंतर उपचार घेतले आहेत. दारु प्यायल्याची चाचणी करण्यासाठी आजही माझी तयारी आहे, मात्र संबंधित पोलीस उपनिरीक्षकावरती कारवाई करावी आणि पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासावं, अशी विनंती तक्रार अर्जाद्वारे संबंधित ट्रक चालकाने पोलीस आयुक्तांकडे केली आहे. याशिवाय गोरक्ष मिसाळ यांची ट्रकही गेल्या तीन दिवसांपासून अडवून ठेवण्यात आली आहे. ही ओव्हरलोडची केस असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र ओव्हरलोडवर कारवाई करण्याचा अधिकार मोटर वाहन कायद्यानुसार संबंधित प्रादेशिक परिवनह अधिकाऱ्याकडे आहे. काटा केल्यानंतर वाहनावर ओव्हरलोडची कारवाई केली जाते. मात्र पोलिसांनी अवैधपणे गाडी अडवून मौल्यवान मालाचं नुकसान केलं जात असल्याचा आरोप चालकाने केलाय.


Recent Comments