Newsworldmarathi Mumbai: राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘कृषी मॉल’ उभारण्यात येणार आहेत, अशी मोठी घोषणा कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. हे मॉल सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उभारले जाणार आहेत.
दक्षिण सोलापूरच्या धर्तीवर ‘कृषी मॉल’ – शेतकऱ्यांसाठी नवा बाजारपेठ पर्याय
कृषिमंत्री म्हणाले की, “सोलापूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या कृषी भवन व बाजार मॉलच्या धर्तीवर राज्यातील इतर जिल्ह्यांतही कृषी मॉल उभारले जातील. येथे शेतकरी त्यांचा माल विकू शकतील आणि शेतीसाठी लागणारे साहित्य, बियाणे, खते, औषधे आदी खरेदीही करू शकतील.”
या मॉलमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचणार, तसेच त्यांना नवीन बाजारपेठ मिळणार, आणि ग्राहकांनाही थेट शेतमाल माफक दरात उपलब्ध होणार आहे.
‘एक गाव, एक पीक’ संकल्पनेवर विचार
कोकाटे यांनी यावेळी स्पष्ट केले की, ‘एक गाव – एक पीक’ ही संकल्पना विकसित करण्यासाठीही विचार सुरू आहे, जेणेकरून विविध भागांतील कृषी उत्पादनांचे प्रमाण, गुणवत्ता आणि ब्रँडिंग सुधारू शकेल.
सांगलीच्या अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयासाठी तात्काळ निधी वितरीत करा – मंत्री कोकाटे
या बैठकीत कृषिमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, पेठ येथील कामांबाबतही आदेश दिले. “या महाविद्यालयाचे काम तात्काळ सुरू करा. निधी वितरणात कोणतीही दिरंगाई होऊ देऊ नका,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.


Recent Comments