Newsworldmarathi Banglur : आयपीएल २०२५ चे जेतेपद पटकावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या विजयी मिरवणुकीत एक भीषण दुर्घटना घडली. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर निर्माण झालेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी झाली, ज्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे RCBच्या ऐतिहासिक विजयाला मोठे गालबोट लागले आहे.
घटना कशी घडली?
४ जून रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास RCB च्या विजयोत्सवासाठी हजारो चाहते चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमले होते. मिरवणुकीसाठी नियोजित ‘ओपन बस रॅली’ रद्द करण्यात आली, परंतु चाहत्यांचा ओघ थांबला नाही. गेट नंबर ३ जवळ अफवांचा गोंधळ, अकार्यक्षम व्यवस्था आणि गर्दीच्या नियंत्रणाचा अभाव यामुळे संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली. या भीषण घटनेत एका लहान मुलासह ११ जणांचा मृत्यू झाला असून जखमींवर बोवरिंग व व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
RCB संघाची भावनिक प्रतिक्रिया
या दुर्घटनेनंतर RCB संघाने अधिकृत निवेदन जारी करत शोक व्यक्त केला. त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, “बंगळुरूमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे आम्ही हादरलो आहोत. लोकांच्या सुरक्षिततेला आमच्याकडून नेहमीच प्राधान्य देण्यात येते. मृतांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही मनःपूर्वक शोकसंवेदना व्यक्त करतो. परिस्थिती समजताच आम्ही आमचे संपूर्ण वेळापत्रक बदलले आणि प्रशासनाच्या सल्ल्याचे पालन केले.”
१८ वर्षांनंतरचा विजय… आणि नियोजनातील त्रुटी
RCB ने १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलचे जेतेपद पटकावले. यामुळे संपूर्ण कर्नाटकात उत्सवाचे वातावरण होते. RCB आणि राज्य सरकारने बेंगळुरूमध्ये विजयी मिरवणुकीचे भव्य आयोजन केले होते. मात्र, योजनांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अपेक्षित खबरदारी घेतली गेली नव्हती, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.


Recent Comments