Newsworldmarathi Pune : हिंजवडीतील ‘द क्राऊन ग्रीन’ सोसायटीच्या २१ व्या मजल्यावरून उडी घेत एका २५ वर्षीय आयटी अभियंता तरुणीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना ३१ मेच्या पहाटे घडली.
मृत तरुणीचे नाव अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे असून, तिने जीवन संपवण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत तिने लिहिले आहे
“सॉरी, मला माफ करा. मी हे स्वच्छेने करत आहे. माझी आता जगायची इच्छा संपली आहे…”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा पहाटे ४.३० वाजता दुचाकीवरून सोसायटीमध्ये आली आणि लिफ्टने थेट २१ व्या मजल्यावर गेली. ४.४२ वाजता तिने इमारतीवरून उडी घेत आपले जीवन संपवले.
शवविच्छेदन अहवालात तिच्या महत्त्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, कोणताही घातपात अथवा संशयास्पद बाब आढळली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पोलीस तपासात नैराश्यामुळे जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.


Recent Comments