Newsworldmarathi Pune : जोपर्यंत मी महायुतीत आहे, तोपर्यंत “लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, हे लक्षात ठेवा. मी पैसे खिशात घेऊन बसतो का? पैशांचं सोंग करता येत नाही,” अशा स्पष्ट आणि खरमरीत शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी विरोधकांवर निशाणा साधला.
बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत आणि विरोधकांच्या आरोपांवर स्पष्ट भूमिका मांडली.
अजित पवार म्हणाले, “विरोधक आरोप करतात की, लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला. पण प्रत्यक्षात सामाजिक न्याय विभागाचा निधी यंदा अर्थसंकल्पात ४१ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे हा आरोप निराधार आहे. हे सगळं राजकारणापुरतं आहे, पण पैशाचं सोंग करता येत नाही.”
ते पुढे म्हणाले, “शेतकरी, कामगार, तरुण आणि महिलांच्या कल्याणासाठीच आमचं सरकार कार्यरत आहे. लोकांचे खरे प्रश्न सोडवणे आणि विकासकामांना गती देणे हेच आमचं ध्येय आहे. मी मंत्री असेपर्यंत ‘लाडकी बहीण’ योजना कोलमडू दिली जाणार नाही, याची मी हमी देतो.”
राजकीय समीकरणांबाबतही स्पष्टता
राजकीय समीकरणावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. आम्ही भाजपसोबत का गेलो, असा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र आजतागायत आम्हाला एकहाती बहुमत मिळालं नाही. त्यामुळे काँग्रेससोबत आणि शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झालो. केंद्रातही अनेक पुरोगामी नेते भाजपसोबत होते – मग आम्ही का नाही? पण विचारांशी तडजोड झाली नाही आणि होणारही नाही.”
जातनिहाय जनगणनेची गरज स्पष्ट
विशिष्ट समाजासाठी किती निधी द्यायचा, हे ठरवताना आवश्यक आकडेवारी महत्त्वाची असते. यासाठी केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. “सर्व घटकांना न्याय देण्यासाठी अशी गणना आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
आगामी निवडणुकांमध्ये तरुणांना संधी
कार्यक्रमात अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. “तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाईल. पक्षात नवा उत्साह आणण्यासाठी तरुण नेतृत्वाची गरज आहे,” असे ते म्हणाले.


Recent Comments