Newsworldmarathi sambhajinagar: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राणे विरुद्ध महाजन असा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मनसे नेते प्रकाश महाजन आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद आता केवळ शाब्दिक न राहता थेट धमकी आणि आंदोलनाच्या पातळीवर गेला आहे.
नारायण राणे यांनी “पुन्हा आमच्याविरुद्ध बोललात, तर उलट्या करायला लावीन” अशी तीव्र प्रतिक्रिया दिल्यानंतर प्रकाश महाजन यांनीही थेट पलटवार करत गंभीर आरोप केले आहेत. “माझा अपघात झाला तर त्याची जबाबदारी राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर असेल,” असा इशारा देत त्यांनी पोलिसांत तक्रार केली असून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी याची दखल घ्यावी, अशी मागणीही केली.
पोलिसांचा हस्तक्षेप, आंदोलनाला ब्रेक
महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, आंदोलनाच्या आधीच पोलिसांनी त्यांच्या घरी भेट देत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. “राणे समर्थकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत,” असा दावा महाजनांनी केला असून, “पोलिसांकडे फोन केला तरी कोणी उचलत नाही,” असा आरोपही त्यांनी केला.
वादाचा उगम – नितेश राणे यांचे वक्तव्य
वादाची ठिणगी राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या विधानामुळे पडली. त्यांनी मनसे-शिवसेना (ठाकरे गट) युतीच्या चर्चांवर उपहासात्मक टीका करताना म्हणाले, “एक पक्ष २० आमदारांचा, दुसऱ्याचा एकही नाही, तरी आम्हाला घाम फुटतो!” यावर प्रत्युत्तर देताना महाजनांनी नितेश राणे यांच्यावर “वैचारिक खोली नाही” अशी जहरी टीका केली.
राणेंचा पलटवार; “लायकीपेक्षा जास्त बोलतोस”
या टीकेनंतर नारायण राणे यांनी फेसबुकवरून महाजनांवर तुटून पडत “नीलेश, नितेश आणि मी दूरच, पण आमची वैचारिक उंची मोजणारे तुम्ही कोण?” असा सवाल केला. “लायकीपेक्षा जास्त बोलतोस, पुन्हा काही बोललास तर उलट्या करायला लावीन,” असा थेट इशाराही दिला.
राजकीय वादात तणाव वाढण्याची चिन्हं
या शाब्दिक चकमकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप वाढत आहेत. पुढे काय वळण घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


Recent Comments