Newsworldmarathi Gujrat: Air India Plane Crash : गुजरातमधील अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात गुरुवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत विमान मेडिकल कॉलेज परिसरात कोसळले.
या भीषण दुर्घटनेत २६५ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर विमानाने पेट घेतल्याने अनेक मृतदेह जळून खाक झाले. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आणि विमानाचे तुकडे यामुळे घटनास्थळी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पसरले होते.
मात्र, या दुर्दैवी घटनेनंतर काहींच्या अमानवी कृत्याने माणुसकीला काळिमा फासला. एका महिला प्रवाशाचे रक्ताळलेले शीर रस्त्यावर पडलेले असताना, काहींनी त्यासोबत सेल्फी काढली, तर काहींनी व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केले. या संतापजनक कृतीमुळे नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “माणुसकी कुठे गेली?” असा सवाल उपस्थित करत अनेकांनी या अमानुष वर्तनाचा निषेध केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. विमानाचे तुकडे आणि पंखांचे अवशेष सर्वत्र पसरलेले दिसले. सध्या या अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.


Recent Comments