Newsworldmarathi Mumbai: Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा जोर धरला आहे. महाराष्ट्रात पुढील 24 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असून, रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातही जोरदार पावसाची शक्यता असून, या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पालघर, जळगाव, अहिल्यानगर, सांगली, संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांसह राज्याच्या इतर भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. हवामान खात्याने नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. काळजी घ्या, सुरक्षित रहा!
राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळपासूनच राज्यभर अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली.
ढगफुटीसदृश पावसाचे चित्र
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली असून काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश पावसाचे दृश्य दिसत आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुण्यात पावसाचा जोर कायम
गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सायंकाळी पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला. पिंपरी-चिंचवड भागात 46 मिमी, तर शिवाजीनगर भागात 26.5 मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी(15 जून) साठी पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर भारतात उष्णतेचा कहर, दक्षिणेत मुसळधार पावसाने हाहाकार
देशाच्या उत्तर आणि दक्षिण टोकांमध्ये हवामानाची स्थिती एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. उत्तर भारतात तापमानाने उच्चांक गाठताना, दक्षिण भारतात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
उत्तर भारतात उष्णतेची लाट
राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि दिल्लीसह अनेक भागांत तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः हरियाणामधील ९ जिल्ह्यांमध्ये तापमान ४८ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दक्षिण भारतात पावसाचा कहर
तेलंगणामधील आदिलाबाद जिल्ह्यात वीज पडल्याने ६ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ५ महिला आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
हवामानाच्या या टोकाच्या स्थितीमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. उत्तर भारतात उष्माघाताचा धोका वाढला असून, दक्षिण भारतात पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे.


Recent Comments