Newsworldmarathi Pune: महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकाऱ्यांना 2022 साठीचे केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान करण्यात आले. शुक्रवारी (13 जून 2025) पुण्यातील पोलीस संशोधन केंद्रात आयोजित समारंभात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते या अधिकाऱ्यांना पदके आणि प्रशस्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. 2018 ते 2022 या कालावधीत राज्यातील 54 पोलीस अधिकाऱ्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी
कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त, मुंबई: विधानसभा निवडणुकीदरम्यान सोलापूर ग्रामीणमधील पंचायत समिती सचिवाच्या खुनाचा तांत्रिक पुराव्यांद्वारे उलगडा करून तीन आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा मिळवून दिली.
प्रमोद तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कुर्ला: वाशी येथील अज्ञात महिलेच्या खुनाचा डीएनए आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 20 दिवसांत उलगडा.
मनोज पवार, सहायक पोलीस निरीक्षक, सोलापूर ग्रामीण: अडीच वर्षांच्या मुलीच्या अपहरण आणि खुनाचा फॉरेन्सिक आणि सीसीटीव्हीच्या साहाय्याने तपास करून आरोपीला फाशीची शिक्षा.
दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, कोल्हापूर: लोणावळ्यातील 66 लाखांच्या दरोड्याचा 7 दिवसांत छडा लावून 20 आरोपींना अटक.
अशोक विरकर, पोलीस अधिक्षक, दहशतवाद विरोधी पथक: सांगलीतील 7 वर्षीय मुलीच्या खुनाचा तपास करून अल्पवयीन आरोपीला 12 वर्षांची शिक्षा मिळवून दिली.
अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर: अहिल्यानगरमधील महिलेच्या खुनाचा 2 दिवसांत तांत्रिक तपासाद्वारे उलगडा.
राणी काळे, सहायक पोलीस निरीक्षक, नवी मुंबई: 73 लाखांचा 377 किलो गांजा जप्त करून दोन आरोपींना 13 वर्षे कारावास.
दिपशिखा वारे, पोलीस निरीक्षक, मुंबई: कोविड लसीकरण फसवणुकीच्या प्रकरणात 11 आरोपींना अटक, 2259 पानांचे दोषारोपपत्र सादर.
सुरेशकुमार राऊत, पोलीस उपअधिक्षक, लातूर: बँक दरोड्यातील 2.51 कोटींचा मुद्देमाल जप्त करून सर्व आरोपींना अटक.
जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मिरा-भाईंदर: सराफा दुकान दरोड्यातील 1.54 कोटींचा मुद्देमाल जप्त, मोक्का अंतर्गत कारवाई.
समीर अहिरराव, पोलीस निरीक्षक, वसई विरार: ज्वेलर्स शॉप खुनाचा तपास करून सशस्त्र हल्लेखोरांना अटक.
पुरस्कार निवड प्रक्रिया
राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभाग, विशेष महानिरीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने अर्जांची कसून पडताळणी करून 22 अधिकाऱ्यांची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली. यापैकी 11 अधिकाऱ्यांची अंतिम निवड झाली.
या कार्यक्रमाला अतिरिक्त महासंचालक सुनिल रामानंद, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष महानिरीक्षक डॉ. राजेंद्र डहाळे, उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली, अधीक्षक पल्लवी बर्गे, सौरभ आग्रवाल, पी. आर. पाटील, वैशाली माने यांच्यासह पदक विजेत्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे यशस्वी तपास करून महाराष्ट्र पोलिसांचा गौरव वाढवला.


Recent Comments