Newsworldmarathi Pune: पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने थैमान घातले. दिवे घाट परिसरात ढगफुटी झाल्याने धबधबे रौद्र रूपात वाहताना दिसले. घाटातून मोठ्या प्रमाणात पाणी खाली उतरल्याने सखल भाग जलमय झाले.
शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, आयबी गेस्ट हाऊससारख्या महत्त्वाच्या शासकीय इमारतीतही पाणी शिरले. गेस्ट हाऊसमध्ये आमदार, माजी आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वास्तव्याची सोय असून, जिन्यापर्यंत पाणी साचल्याने मोठा गोंधळ उडाला.
पिंपरी चिंचवडमध्ये चऱ्होलीतील ओढा ओसंडून वाहत गेल्याने चार ते पाच वाहने प्रवाहात वाहून गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने क्रेनच्या सहाय्याने वाहने बाहेर काढली.
हिंजवडी आयटी पार्क परिसरात देखील मुसळधार पावसाचा फटका बसला. अवघ्या तासाभरात झालेल्या पावसाने रस्ते नद्यांमध्ये रूपांतरित झाले. गुडघाभर पाण्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आणि अनेक दुचाकी, चारचाकी वाहने पाण्यात अडकली. गेल्या आठवड्यात नालेसफाई करण्यात आली असली तरी पुन्हा एकदा पाणी साचल्यामुळे प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
प्रशासनावर प्रश्नचिन्ह
हिंजवडीत अवघ्या तासाभराच्या पावसाने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले. गेल्या आठवड्यातील पाणी साचण्याच्या घटनेनंतर प्रशासनाने नालेसफाई केली असली, तरी पावसाळ्यापूर्वीच्या कामात सुधारणा आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक वाहने पाण्यात अडकली, तर काही ठिकाणी पाण्याची पातळी गुडघ्यापर्यंत पोहोचली.


Recent Comments