Newsworldmarathi Mumbai : महाराष्ट्रात जनतेला स्वस्त आणि मुबलक वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाला हरित ऊर्जा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी कालबद्ध नियोजन आणि वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पीएम सुर्यघर: मोफत वीज योजनें अंतर्गत सर्व शासकीय इमारतींचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी महाऊर्जाने सर्वेक्षण त्वरित पूर्ण करावे, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.
मॉडेल सोलर व्हिलेजसाठी महाऊर्जा आणि महावितरणने संयुक्तपणे काम करावे, तसेच गती शक्ती योजनेच्या धर्तीवर सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वीज गळती कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या थकबाकी वसुलीची योजना आणि जनजागृतीवरही भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हायड्रोजन परिसंस्थेच्या विकासासाठी संशोधन, कौशल्य विकास आणि शाश्वत योजनांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यावेळी ऊर्जा विभागातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे (दूरदृश्यप्रणालीद्वारे), राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments