Newsworldmarathi kolhapur: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेत राजकीय घडामोडींनी जोर धरला आहे. काँग्रेसला मोठा झटका देत तब्बल 35 पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या रविवारी (22 जून 2025) मुंबईत होणाऱ्या या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी तयारी सुरू असून, काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांच्यासह 12 प्रमुख नेते पहिल्या टप्प्यात दाखल होणार आहेत.
शिवसेनेचा बालेकिल्ला मजबूत
कोल्हापूर हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असून, शिंदे गट निवडणुकीत भगवा फडकावण्यासाठी जोमाने कामाला लागला आहे. शिंदे यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांना काँग्रेस नेत्यांना गळाला लावण्याची जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये दोन माजी महापौर, उपमहापौर आणि माजी नगरसेवकांचा समावेश असलेली 35 जणांची यादी तयार झाली असून, टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार आहे.
देशमुखांचा मोठा निर्णय
काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी नुकतीच शिंदे यांची भेट घेतली असून, त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. रविवारी होणाऱ्या सोहळ्यात देशमुख यांच्यासह 12 नेते शिवसेनेत दाखल होतील, तर पुढील टप्प्यात इतर पदाधिकारीही प्रवेश करणार आहेत. या हालचालींनी कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ माजली असून, काँग्रेसला मोठं भगदाड पत्करावं लागणार आहे.
पुण्यातील फायरब्रँड महिला नेत्याची शिंदे गटात एन्ट्री
महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश सचिव सोनाली मारणे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज दुपारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत. पक्षातील अंतर्गत कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.


Recent Comments