Homeपुणेमुळशी खोरे स्वराज्य आणि स्वातंत्र्यासाठी लढणारी प्रेरणाभूमी: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे...

मुळशी खोरे स्वराज्य आणि स्वातंत्र्यासाठी लढणारी प्रेरणाभूमी: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गौरवोद्गार

Newsworldmarathi Pune: “तथाकथित अभ्यासक राज्याच्या इतिहासाची मोडतोड करत असताना डॉ. आ. ह. साळुंखे व डॉ. जयसिंगराव पवार या विचारवंतांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला,” असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी बुधवारी भूगांव येथील कार्यक्रमात बोलताना येथे काढले. मुळशी खोरे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत आणि स्वातंत्र्य चळवळीतही प्रेरणा देणारी एकमेव भूमी होती, असेही पवार यांनी नमूद केले.

सह्याद्री प्रतिष्ठान मुळशीच्या वतीने ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे व इतिहास संशोधक, विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार यांना शरद पवार यांच्या हस्ते ‘शिवस्वराज्यभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, मेघडंबरीतील शिवरायांची मूर्ती आणि मावळा पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती श्री शाहु महाराज होते. खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, सौ. वसुधा जयसिंगराव पवार, प्रविण गायकवाड, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रशांत जगताप, डॉ. श्रीमंत कोकाटे, रविकांत वर्पे, शांताराम इंगवले, महादेव कोंढरे, आयोजक सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्राचा इतिहास मांडला जात असताना काही तथाकथीत विचारवंतांकडून मोडतोड होत होती. अशावेळी काहीजण वास्तव इतिहास मांडण्याचे काम करत होते. त्यामध्ये आजच्या दोन्ही सत्कारमूर्तींचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर ठेवला. त्यांचा सन्मान शिवाजी महाराजांच्या वंशजांकडून व तोही स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान असलेल्या मुळशीच्या भूमीत ही फार मोठी गोष्ट आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे काम करत असताना मुळशी सत्याग्रहाचे स्मरण ठेवले हे चांगले आहे.”

स्वराज्याच्या धामधुमीत हेच मुळशी खोरे अग्रेसर होते, अगदी सेनापती बापटांच्या मुळशी सत्याग्रहापर्यंत स्वातंत्र्याच्या चळवळीशीही ही भूमी जोडली गेली आहे, असे त्यांनी सांगितले. पवार यांनी आपल्या भाषणात छत्रपतींचे स्वराज्य हे भोसल्यांचे नव्हते किंवा महाराष्ट्रात राज्य करणाऱ्या विविध सुलतानांसारखे एका व्यक्तींचे नव्हते, तर ते रयतेचे राज्य होते, असे मत व्यक्त केले. राजे रजवाडे अनेक होऊन गेले, लोक आता त्यांना विसरले. पण हिंदवी स्वराज्य लोकांच्या हृदयावर आजही राज्य करीत आहे, असेही पवार म्हणाले.

डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, “हे स्वराज्य फक्त हिंदुंचे आहे, असे छत्रपती शिवाजी महाराज कधीही म्हणाले नाहीत. ते सर्वांचे आहे, असेच ते म्हणत. तत्कालीन काळातील जगात सर्वत्र धार्मिकतेवर आधारित राज्य होती हे लक्षात घेतल्यावर शिवाजी महाराजांच्या ‘हे राज्य रयतेचे’ या विचारांचे महत्व लक्षात येते. म्हणूनच शिवाजी महाराजांचे, म्हणजेच राजेशाहीचे नाव आपण लोकशाहीतही घेतो. कारण त्यांनी दाखवलेला सर्वधर्मसमभाव हा आपल्या घटनेचा प्राण आहे.” देशाला सध्या धर्मवादाचा धोका आहे, अशा परिस्थितीत सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला गरजेचा आहे, असेही त्यांनी नमूद केले. शाहू महाराजांविषयीच्या चरित्रग्रंथाचा जगभरातील २५ पैकी १२ भाषांत अनुवाद करण्यात यश आले आहे, अशी माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.

डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, “हा पुरस्कार म्हणजे मोठी जबाबदारी आहे. ती आम्ही पार पाडू. हा क्षण गौरवाचा आहे.” शिवरायांनी राज्यभिषेकानंतर केलेल्या दक्षिण स्वारीत डच लोकांशी स्थानिक लोकांना गुलाम म्हणून खरेदी-विक्री न करण्याच्या केलेल्या कराराची आठवण आपल्या भाषणात करुन देताना साळुंखे यांनी शिवरायांच्या कर्तृत्वाचे गुणगान केले.

अध्यक्षीय भाषणात शाहु महाराज म्हणाले, “अशा कार्यक्रमांमधून राज्यातील देशातील युवकांना स्फूर्ती मिळेल. शिवरायांपासून स्फूर्ती घेऊन सह्याद्री प्रतिष्ठान काम करत आहेत. आजच्या एकूण परिस्थितीला दिशा देण्याचे काम हा कार्यक्रम करेल. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे पुरोगमित्त्व राखण्यासाठी अशा विचारवंतांचा गौरव होणे गरजेचे आहे.” खासदार सुळे नुकत्याच परदेशाचा दौरा करून आल्या. तिथे त्यांनी भारताची बाजू प्रभावीपणे मांडली. त्या आता पक्षाचे नेतृत्व करतील, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, अशा शब्दांमध्ये शाहु महाराज यांनी खासदार सुळे यांचे कौतुक केले.

शिवविचारांचा जागर करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा चित्रफीतीद्वारे घेण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अनिल पवार यांनी प्रास्ताविक केले. दोन्ही सत्कारमूर्तींच्या मानपत्राचे वाचन व सूत्रसंचालन चेतन कोळी यांनी केले. महेश मालुसरे यांनी आभार मानले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments