Newsworldmarathi Pune: ऑर्केस्ट्रा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे, ज्येष्ठ सॅक्सोफोन वादक आणि ‘दरबार बँड’ चे संस्थापक-संचालक इक्बाल दरबार (वय ७७) यांचे शनिवारी (२८ ऑक्टोबर) निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
महाराष्ट्रात ऑर्केस्ट्रा संकल्पनेला रुजवणाऱ्या मोजक्या कलावंतांमध्ये इक्बाल दरबार यांचा उल्लेख अत्यंत आदराने केला जातो. त्यांच्या वादनाचे चाहतावर्ग केवळ पुणे-मुंबईपर्यंतच मर्यादित नव्हते, तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही त्यांच्या वादनाने मंत्रमुग्ध झाले होते. एक प्रसंग आठवतो, जेव्हा पुणे महानगरपालिकेच्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा सन्मान करण्यात आला होता, त्या वेळी ‘मधुबन में राधिका नाचे रे’ हे गीत दरबार यांनी सॅक्सोफोनवर सादर केले. त्यांच्या या सादरीकरणाने दिलीप कुमार इतके प्रभावित झाले की, त्यांनी उभे राहून त्यांना दाद दिली आणि ‘वन्स मोअर’ची मागणी केली.
दरबार यांचे कार्य संगीताच्या क्षेत्रापर्यंतच सीमित नव्हते. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सेवाभाव ही त्यांच्या कार्यशैलीची विशेष वैशिष्ट्ये होती. दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात त्यांच्या ‘दरबार बँड’द्वारे सादर केलेल्या आरतीनेच होत असे. त्यांनी सीमेवर जाऊन आपल्या वादनाने भारतीय जवानांची मने जिंकली आणि त्या कार्यक्रमातून मिळालेला निधी सैनिकांना कृतज्ञता म्हणून दिला. त्याचप्रमाणे, भोई फाउंडेशनच्या पुण्याजागर उपक्रमासाठीही त्यांनी कृतज्ञता निधी दिला. ‘मोहम्मद रफी आर्ट फाउंडेशन’च्या माध्यमातून गरजू कलाकारांना वैद्यकीय व आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी ते सतत कार्यरत होते. तसेच, भोई प्रतिष्ठानमध्ये ते समन्वयक म्हणून देखील कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे कला आणि संगीत क्षेत्रात एक मोठा शोक आहे.


Recent Comments