Newsworldmarathi Pune: राज्यात उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांकाची आणि आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ मुदत संपल्याने (ऑगस्टअखेर) शासनाने बरखास्त केलेले आहे. तर प्रशासकपदी राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांनी सोमवारी (दि.१) मुंबई बाजार समितीच्या प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला आहे.
रसाळ यांनी पदभार स्वीकारताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे, सहसचिव महेंद्र म्हस्के, उपसचिव डॉ. एम. वही. साळुंखे आदींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.
केंद्र सरकारच्या बहुचर्चित राष्ट्रीय कृषी बाजार करण्याच्या धोरणाचा राज्यात अंमल करण्यासाठी ही सुरुवात असल्याचे बोलले जात आहे. राज्यांमध्ये ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील उलाढाल सर्वाधिक आहे, अशा पाच बाजार समित्या राष्ट्रीय कृषी बाजारात समाविष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आग्रही आहेत. त्यामध्ये मुंबई बाजार समितीचा अग्रक्रम लागतो. या बाजार समितीची राष्ट्रीय बाजारात समावेश करून अन्य बाजार समित्यांनाही त्यामध्ये घेतले जाण्याची चर्चा आता वाढली असून गणेशोत्सवानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले


Recent Comments