Newsworldmarathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील नगरसेविका वर्षा भिमराव साठे आणि भाजप अनुसूचित जाति मोर्चाचे अध्यक्ष भिमराव साठे यांच्या वतीने महिलांसाठी आणि बालकांसाठी पोषण अभियान २०२५ हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम नगरसेविका वर्षा साठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडला.
या अभियानाचा प्रमुख उद्देश महिलांमध्ये आणि बालकांमध्ये पोषणाबाबत जागरूकता निर्माण करणे, संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देणे तसेच कुपोषण निर्मूलनासाठी ठोस उपाय राबवणे हा आहे. महिलांना व बालकांना योग्य पोषण मिळाले तरच कुटुंब आणि समाज आरोग्यदायी राहील, या विश्वासातून हा उपक्रम हाती घेण्यात आला.
“या उपक्रमाचा लाभ परिसरातील प्रत्येक महिलेला घ्यावा आणि पोषणयुक्त आहाराबाबत जनजागृती पुढे नेण्यात यावी,” असे आवाहन नगरसेविका वर्षा साठे यांनी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अरुणा पवार यांनी महिलांना दैनंदिन आहारातील पोषणतत्त्वांची गरज समजावून सांगितली. प्रमुख मार्गदर्शन आरोग्य अधिकारी मृदाला होळकर यांनी केले. महिलांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांनी कुपोषण टाळण्यासाठी घरगुती पातळीवर सहज करता येणारे उपायही सांगितले.
या उपक्रमात सुनिता ओव्हाळ, माधुरी रणसिंग, सुनिता करंडे, रेखा परदेशी, रेखा कांबळे, स्वाती कंक, मानसी वाडेकर, वंदना दिवटे, सरोजा जाधव, दिपाली परदेशी, भाग्यश्री कोळी, श्वेता कांबळे, मंगल वेताळ, स्वाती नागटिळक, इंदुबाई डोळसे, स्वाती पाथरे, सुधा सरकाळे, कुसुम घोग आणि अनेक स्थानिक महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या.
या अभियानातून महिलांना पोषणमूल्ययुक्त आहाराचे फायदे आणि मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी संतुलित आहाराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक करत, त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात नवे शिखर गाठल्याचे मत भाजप अनुसूचित जाति मोर्चाचे अध्यक्ष भिमराव साठे यांनी व्यक्त केले.


Recent Comments