Newsworldmarathi Pune: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून विकास आराखड्याअंतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यासाठी मंदिर तीन महिने भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे. या निर्णयामुळे राज्यासह देशभरातील भाविकांचे लक्ष वेधले गेले असून यासंदर्भात प्रशासनाकडून पुढील प्रक्रिया सुरू आहे.
भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट, स्थानिक ग्रामस्थ तसेच संबंधित विभागांच्या प्रतिनिधींमध्ये याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सोयीसुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच मंदिराच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या कामांचा समावेश विकास आराखड्यात करण्यात आला आहे. ही कामे सुरळीत व सुरक्षितरीत्या पूर्ण करण्यासाठी मंदिर काही कालावधीसाठी बंद ठेवणे आवश्यक असल्याचे बैठकीत मांडण्यात आले.
या संदर्भात झालेल्या बैठकीचा सविस्तर अहवाल तसेच भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. या अहवालाच्या आधारे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मंजुरीनंतर आणि आदेश निर्गमित झाल्यानंतरच मंदिर बंद करण्याची अधिकृत घोषणा केली जाईल. प्रशासनाकडून भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मंदिर बंद असताना विकासकामे जलदगतीने पूर्ण करून भाविकांसाठी अधिक सुरक्षित व सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
दरम्यान, मंदिर बंद करण्याबाबतचा अंतिम आदेश कधी जारी होणार, तसेच बंद कालावधीची अचूक तारीख काय असेल, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments