Homeभारतसंजय राऊतांनी हिंदुत्वाबद्दल ऊर बडवणे थांबवावे; भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन...

संजय राऊतांनी हिंदुत्वाबद्दल ऊर बडवणे थांबवावे; भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची टीका

Newsworldmarathi pune: वंदनीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार केला. उद्धव ठाकरेंनी अजान स्पर्धा, नमाज पठण स्पर्धेचे आयोजन केले, मुंबईत मराठी भवन बाजूला उर्दू भवन निर्मिती करणे, राशिद मामूला पक्षात प्रवेश दिला हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. मतांसाठी इतकी लाचारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी आता हिंदुत्वाबद्दल ऊर बडवणे थांबवावे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठी माणसाला बेदम मारहाण करणे, खिचडी घोटाळ्यासारखे असंख्य घोटाळे करणे, पत्रा चाळ घोटाळा करून मराठी माणसाला बेघर करणे हे राऊतांचे हिंदुत्व आहे का असा प्रहारही बन यांनी केला.

यावेळी बन म्हणाले की, भाजपाचे हिंदुत्व हे सर्वांनी पाहिले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदुत्वाचा गजर आणि त्यासोबतच विकास या धोरणानुसार काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने राम मंदिर बांधले, 370 कलम हटवून दाखवले. सामान्य माणसाला हिंदुत्वाचे रक्षण कोण करत आहे हे चांगलेच ठाऊक आहे.

नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुका यांच्या निकालानंतर संजय राऊत यांनी पराभवाच्या भीतीतून रोज उठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर तथ्यहीन आरोप करणे सुरू केले असून त्यांच्या अस्वस्थतेचा हा स्पष्ट पुरावा आहे अशी बोचरी टीकाही श्री. बन यांनी केली. भाजपासोबत युतीत असलेले लोकंच भाजपाचा पराभव करण्यास इच्छुक असल्याचे बिनबुडाचे वक्तव्य करणा-या राऊतांना लक्ष्य करत बन यांनी संजय राऊतांना खडे बोल सुनावले.

नगर पालिका, नगर पंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी उबाठा गटाचे पानीपत केले आहे. याच निवडणुकीत भाजपा आणि संपूर्ण महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पाठीशी राज्यातील 14 कोटी जनतेचे कायम आशीर्वाद आहेत. कोणी कितीही बाष्कळ आरोप केले तरी मुंबईचा विकास फडणवीस आणि महायुती सरकारच करू शकते हा विश्वास जनतेला असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा, महायुतीचाच विजय होईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

गुंडांची भाषा राऊतांना शोभत नाही असा घणाघात करत बन म्हणाले की जे स्वत: गुंडागर्दी,दहशतवाद, यंत्रणेचा गैरवापर करत होते, रोज 100 कोटींची वसुली करत होते, गुंडांना अभय देत होते तेच आज वायफळ बडबड करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये गुंडगीरीला थारा नाही. आरोपींना कठोर शासन होते. देवेंद्रजींचे हे सरकार आहे, कुणाचाही मुलगा फरार असेल किंवा कुणावरही गुन्हा दाखल असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होईल. हे कायद्याच राज्य आहे आणि कायदा सर्वांसाठी समान आहे हेच भाजपा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे धोरण असल्याचेही त्यांनी नमूद केले .

राऊतांनी महाराष्ट्र पोलीसांचा अपमान केला“पोलीस यंत्रणा ही खाकी वर्दीतली भाजपाची टोळी आहे” या राऊतांच्या आरोपाचा समाचार घेत श्री. बन म्हणाले की राज्यातील जनतेचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अहोरात्र कार्यरत असतात त्या पोलीसांचा राऊतांनी घोर अपमान केला आहे .पोलीसांचा हा अपमान जनताही विसरणार नाही. उद्धव ठाकरे यांनीही पोलीसांना याआधी घरगडी संबोधले होते याचीही आठवण बन यांनी करून दिली

राऊत हेच नशाबाज आणि दगाबाजनशेबाजी आणि दगाबाजीचा इतिहास हा उबाठा गटाचा आणि राऊतांचा आहे असा प्रहार बन यांनी केला. रोज सकाळी उठून नशा चढल्यागत बाष्कळ बडबड, आरोप पत्रकारांसमोर केले जातात. 2019 साली भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून दगाबाजी कोणी केली हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे नशेबाजीवर बोलण्याचा नैतिक अधिकार उबाठाला नाही अशी बोचरी टीका बन यांनी केली.

सातारा प्रकरणात एकनाथ शिंदेंचा संबंध नाही
चौकशीअंती सातारा प्रकरणामध्ये मध्ये कुठेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संबंध आढळला नाही. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टपणे सांगितले आहे की या प्रकरणात शिंदेचा काहीही संबंध नाही तरीही बादरायण संबंध जोडून एकनाथ शिंदे यांची बदनामी केली जात आहे. ‘खोटे बोला आणि रेटून बोला’ या धोरणानुसार बिनबुडाचे आरोप करत राजकीय खेळी खेळली जात असल्याची टीका बन यांनी केली.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments