Newaworldmarathi Pune: पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी रविवारी (ता. २८) संध्याकाळनंतर जाहीर होण्याची शक्यता असतानाच, त्याआधीच शहरातील आमदार आणि खासदारांना धक्का देणारी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीत आमदार व खासदारांनी त्यांच्या मुला-मुलींसाठी तसेच जवळच्या नातेवाईकांसाठी केलेल्या शिफारशींना उमेदवारी दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लावून प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मोठा झटका बसल्याचे चित्र आहे.
पुणे महापालिकेच्या १६५ जागांसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी तब्बल २३०० हून अधिक इच्छुकांनी अर्ज सादर केले असून, त्यामुळे पक्षांतर्गत स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय, इतर पक्षांतील दहापेक्षा अधिक माजी नगरसेवकांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्याने उमेदवारी मिळवण्यासाठीची चुरस आणखी तीव्र झाली आहे. परिणामी, काही प्रभागांत मूळ भाजप कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणार नाही, अशीही चर्चा सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील काही आमदार आणि खासदारांनी आपल्या मुला-मुलींसह नातेवाईकांना उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार लॉबिंग केल्याची माहिती आहे. मात्र, पक्षाने स्पष्ट भूमिका घेत आमदार-खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय कळवला आहे. तथापि, एखादा नातेवाईक पूर्वीपासून भाजपमध्ये सक्रिय असून संघटनात्मक कामाचा अनुभव असल्यास, अशा इच्छुकाचा स्वतंत्रपणे विचार केला जाऊ शकतो, असेही वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
उमेदवार निवडीत पक्षाची शिस्त, संघटनात्मक काम आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता या निकषांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेत मिळत असून, त्यामुळे पुण्यातील भाजपच्या अंतर्गत राजकारणाला चांगलाच वेग आला आहे.


Recent Comments