Newaworldmarathi Pune: अमली पदार्थ राक्षस आता अगदी आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचला असून हा शत्रू दिसत नसल्यामुळे तो जास्त घातक आणि गंभीर आहे. पूर्वी तरुण पिढीला लक्ष्य करणारा हा राक्षस आता शालेय पिढीला लक्ष करत आहे त्यामुळे या विरोधात लढण्यासाठी पोलीस, प्रशासन, प्रसार माध्यमे, स्वयंसेवी आणि शैक्षणिक संस्था, पालक ,शिक्षक, समुपदेशक, मित्रपरिवार या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असून या लढायला आता व्यापक स्वरूप येण्यासाठी तो सर्वसमावेशक होणे आवश्यक आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ,भोई प्रतिष्ठान आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांनी या दृष्टी ने समाजासमोर स्तुत्य आदर्श उभा केला आहे. महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स अशा वाटचालीत नेहमीच अग्रेसर राहील असे प्रतिपादन महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स च्या पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत यांनी व्यक्त केले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भोई प्रतिष्ठान पुणे , महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने से नो टू ड्रग्स अँड से येस टू लाइफ या अमली पदार्थ विरोधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .त्याच्या उद्घाटन प्रसंगी शारदा राऊत बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की या प्रश्नावर लढण्यासाठी सर्वांचा हातभार आवश्यक आहे आणि या दृष्टीने ही कार्यशाळा पथदर्शी प्रकल्प ठरेल.
याप्रसंगी महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस उप महानिरीक्षक श्री प्रवीण पाटील, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक श्री अभिराम घड्याळ पाटील , भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद भोई, जाधवर इन्स्टिट्यूट चे प्रा. डॉ. सुधाकर जाधवर, ऍड. शार्दुल जाधवर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत कृष्णन श्रीनिवासन, पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड प्रताप परदेशी, जेष्ठ समुपदेशक डॉ. प्रिया निघोजकर आदी मान्यवर उपस्थित होते.



Recent Comments