Newsworld Pune : पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (वय 55) यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सतीश वाघ यांना हडपसरमधील शेवाळेवाडी चौकातून चार ते पाच लोकांनी जबरदस्तीने गाडीत बसवून अपहरण केलं.
काल संध्याकाळी पुण्यातील निर्जन स्थळी त्यांचा मृतदेह सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भाजप आमदाराशी संबंधित असल्याने तिचं गांभीर्य अधिक वाढलं आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींच्या उद्देशांबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.
या घटनेमुळे शहरात असुरक्षेची भावना वाढली असून, राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
योगेश टिळेकर काय म्हणाले?
मामाच्या खून प्रकरणावर योगेश टिळेकर यांची प्रतिक्रिया: ‘पोलीस लवकरच सुगवा लावतील. भाजप आमदार योगेश टिळेकर यांनी त्यांच्या मामांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. टिळेकर म्हणाले, काल सकाळी अपहरण आणि खून झाला. पोलीस यंत्रणा सक्षमपणे काम करत असून लवकरच आरोपींचा शोध लागेल. आमच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
ते पुढे म्हणाले, पोलीस आपल्या जबाबदारीचं काम करतात, आणि त्यांच्यावर आमची पूर्ण विश्वास आहे. सरकार आणि वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे. आमदाराचा मामा असला तरी यावर राजकारण करणं योग्य नाही.
या घटनेमुळे पुण्यात खळबळ माजली असली, तरी टिळेकर यांनी पोलिसांवर विश्वास व्यक्त करत या प्रकरणात त्वरित न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.