राज्यात पुन्हा पावसाचा इशारा; पुढील तीन-चार दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
Newsworldmarathi Pune : राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून आकाशात अवकाळी पावसाचे ढग घोंगावत आहेत. आता हवामान विभागाने (IMD) पुन्हा नवा इशारा दिला असून, पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता अधिक आहे. या भागांतील शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे काही भागात शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
या पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम मध्य प्रदेश आणि आसपासच्या भागावर समुद्रसपाटीपासून 1.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या हवामान बदलामुळे उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे या भागातही हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
हवामानातील या बदलामुळे राज्यातील विविध भागांमध्ये अचानक पावसाचे सत्र सुरू होऊ शकते. यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, गरज नसताना बाहेर पडू नये, तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Ahilyanagr Crime : पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडीतील घटना; आरोपी ठाण्यात हजर
Newsworldmarathi Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात एक खुनाची घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा निघृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे शुक्रवारी (दि. ९) पहाटे उघडकीस आली. राणी सतीश खेडकर (वय २९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती सतीश भास्कर खेडकर (वय ३३) याला पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती सतीश खेडकर याने घरगुती वादातून रागाच्या भरात पत्नी राणीच्या पाठीत आणि गळ्यावर कात्रीने वार केले. त्यात ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपी सतीश खेडकर स्वतःहून पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. खेडकर याला दोन मुले असून ते सात आणि पाच वर्षांची आहेत. घटनेची माहिती मिळताच पाथर्डीचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये, शिवाजी तांबे व पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. मृत मुलीचे वडील सुखदेव आप्पाजी ढाकणे (रा. हसनापूर ता. शेवगाव) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात सतीश भास्कर खेडकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांत तालुक्यात महिलांच्या खुनांच्या दोन घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
आमचे पंतप्रधान पळपुटे, मोदींचे नाव घेण्याची त्यांच्यात हिंमत नाही; पाकचे खासदार संतापले
Newsworldmarathi Delhi: India Pakistan Tension | पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताकडून ठोस प्रत्युत्तर दिले जात आहे. भारतीय सैन्याच्या कारवाईचे तीव्र पडसाद पाकच्या संसदेत उमटताना दिसत आहेत. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे पळपुटे असून त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेण्याची हिंमत दाखवली नाही, अशा शब्दांत पाकच्या खासदाराने टीका केली आहे.
भारताला प्रत्युत्तर देण्यात पाकचे सैन्य कमी पडत असल्यामुळे देशाचे खासदार पंतप्रधानांवर तीव्र रोष व्यक्त करीत आहेत. पाकचे खासदार शाहिद अहमद खट्टक हे नॅशनल असेम्ब्लीत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर तुटून पडले. भारताच्या आक्रमक कारवाईवर शाहबाज यांनी कोणतेही निवेदन दिले नाही, असं ते म्हणाले.
मला टिपू सुलतान यांचे एक वक्तव्य आवडते. ज्यात एका लष्कराचा सरदार वाघ असेल व त्याच्या सोबतीला कोल्हे असतील तर तो वाघासारखा लढतो. पण जर वाघांच्या लष्कराचा सरदार हा कोल्हा असेल तर तो लढू शकत नाही. परिणामी युद्धात पराभव अटळ असतो, अशा शब्दांत खट्टक यांनी संताप व्यक्त केला.
सध्या सीमेवर भारताविरुद्ध लढणारा आपला जवान पंतप्रधानांकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहे. म्हणून पंतप्रधान राजकीयदृष्ट्या तेवढाच खमक्या असावा. शत्रूचा सामना करण्याची त्याच्यात ताकद असावी. मात्र, जेव्हा आपले पंतप्रधान शाहबाज शरीफ पळपुटेपणा दाखवत असतील. ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव उच्चारण्याची हिंमतही दाखवू शकत नाहीत. तर मग तुम्ही सीमेवर प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या जवानांना काय संदेश देत आहात ? असा जळजळीत सवाल खासदार खट्टक यांनी केला. या सर्व घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; ७०१ कोटींचा आराखडा तयार
Newsworldmarathi Pune : प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभर पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जागतिक दर्जाचे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ज्ञानपीठाच्या उभारणीबाबत माहिती दिली. या वेळी हभप शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुरेकर, आमदार उमा खापरे, शंकर जगताप, बाबाजी काळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, योगी निरंजन नाथ, ॲड. रोहणी पवार, पुरुषोत्तम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी नमूद केले की, “ज्ञानपीठ उभारण्याचे कार्य आपल्या हातून घडत आहे, ही ईश्वराची योजना असावी आणि त्याचे समाधानही यातच असावे.” या भव्य प्रकल्पासाठी ७०१ कोटी रुपयांचा विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे. या ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय अध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात पोहोचवण्याचा हेतू आहे.
याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी तयार केलेल्या विकास आराखड्याची माहितीही दिली. हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून, लवकरच त्यास मंजुरी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या योजनेद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिकेसह ३९ गावांचे सांडपाणी शुद्ध करून इंद्रायणी नदीत सोडले जाईल. यामुळे नदीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पुजनीय बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली.
पाकिस्तान नरमला; अखेर भारत-पाक युद्धाला पूर्णविराम
Newsworldmarathi Delhi : गेल्या आठ दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थितीला अखेर विराम मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिल्यानंतर भारत सरकारनेही यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलं आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
मिस्री यांनी स्पष्ट केलं की, आज सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा शस्त्रसंधी लागू होत आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील सीमारेषेवर मोठा तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर भारताने 7 मे रोजी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.
या कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये गोळीबार आणि हवाई हल्ल्यांची मालिका सुरू झाली होती. सीमारेषेवर सतत गोळीबार सुरु असतानाच, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काही भागांत नागरिकांना स्थलांतरही करावं लागलं. युद्धजन्य परिस्थितीने आणखी गंभीर रूप धरण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
मात्र, अमेरिका, संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय शक्तींनी केलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांमुळे अखेर दोन्ही देशांमध्ये शांततेचा मार्ग निवडण्यात आला आहे. शस्त्रसंधीच्या घोषणेमुळे आता सीमारेषेवर आणि दोन्ही देशांमध्ये सामान्य स्थिती परतण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
मोठा निर्णय…! वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षेचा आढावा
Newsworldmarathi Mumbai: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. वर्षा निवासस्थान, मुंबई येथे घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली.
संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर देत मुख्यमंत्री यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. दरम्यान, राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री यांनी दिलेले काही प्रमुख निर्देश पुढीलप्रमाणे:
मॉकड्रिल आणि वॉर रूम्स: प्रत्येक जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मॉकड्रिल आयोजित करा. यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन करा.
ब्लॅकआऊट तयारी: हॉस्पिटलसोबत समन्वय ठेवून ब्लॅकआऊटवेळी आवश्यक ती सेवा सुरू राहील, याची व्यवस्था करा. गडद रंगाचे पडदे/काचा वापरून बाह्य प्रकाश पूर्णपणे रोखा.
जनजागृती आणि माहिती: ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, याचे व्हिडीओ विद्यार्थ्यांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागरण मोहीम राबवा.
युनियन वॉर बुक आणि प्रशिक्षण: केंद्र सरकारच्या युनियन वॉर बुकचा सखोल अभ्यास करा आणि प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना याची माहिती द्या.
सायबर देखरेख आणि कारवाई: पोलिसांच्या सायबर सेलने सोशल मीडियावर नजर ठेवावी. पाकिस्तानसमर्थक अथवा देशद्रोही पोस्ट करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा.
आपत्कालीन निधी: प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन खर्चासाठी निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. महत्वाचे प्रस्ताव एका तासात मंजूर केले जातील.
महापालिका आणि सोसायट्यांचा समावेश: MMR परिसरातील सर्व महापालिकांची बैठक घेऊन त्यांना ब्लॅकआऊटसंदर्भात जागरूक करा. सोसायट्यांनाही सहभागी करा.
सुरक्षा यंत्रणांची अधिक दक्षता: पोलिसांनी गस्त वाढवावी, कोंबिंग ऑपरेशन्स तीव्र करावीत. देशविरोधी कारवायांवर कठोर नजर ठेवा.
सैनिकी हालचालींचे चित्रिकरण प्रतिबंधित: सैनिकी हालचालींचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित करणे गुन्हा असून अशा प्रकरणांवर तात्काळ गुन्हे दाखल करा.
सागरी सुरक्षा उपाय: गरजेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घेऊन सागरी सुरक्षा बळकट करा.
अधिकृत माहिती वितरण: नागरिकांपर्यंत अचूक, वेळेवर आणि प्रामाणिक माहिती पोहोचवण्यासाठी शासनाने माध्यम व्यवस्था उभारावी.
सायबर ऑडिट: विद्युत, पाणीपुरवठा यांसारख्या महत्वाच्या पायाभूत सुविधांवर सायबर हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन तात्काळ सायबर ऑडिट करून घ्या.
संघटनांमधील समन्वय: मुंबईतील लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख तसेच कोस्टगार्ड यांना पुढील बैठकीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी करा.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द : राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रभारी मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक, प्रधान सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गिनीज रेकॉर्ड होल्डर मनस्वीच्या पाठीवर खासदार सुप्रिया सुळे यांची शाबासकीची थाप
Newsworldmarathi Pune: कोंढवा बुद्रुक येथील अवघ्या सात वर्षे वयाच्या हिंदरत्न कु. मनस्वी विशाल पिंपरे हिने स्केटिंग खेळात जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. इतक्या लहान वयात शंभरावर सुवर्ण पदकासह अनेक पदकांवर आपले नाव कोरत तिने गिनीज रेकॉर्ड केले आहे. तिच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत खासदार सुप्रिया सुळे यांनी तिला पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुमारे दीड लाखाचे स्केटिंग किट भेट दिले.
मनस्वी हिने काल आपल्या पालकांसह खासदार सुळे यांची भेट घेतली. तिने स्केटिंगमध्ये अनेक जागतिक किर्तीचे विक्रम केले आहेत. ती सर्वात लहान गिनिज वर्ल्ड रेकाॅर्ड होल्डर आहे. आत्तापर्यंत तिने वेगवेगळ्या स्केटिंग स्पर्धांत तब्बल ११४ सुवर्ण पदक, १६ रजत आणि १४ ब्राँझ मेडल पटकावली आहेत. याशिवाय ती नॅशनल स्केटिंग चॅम्पियन देखील आहे. मनस्वीला हिंदरत्न या पुरस्कारासह १७ विविध पुरस्कार मिळाले आहेत.
मनस्वी हिने नुकतेच सलग ३० किलोमीटर स्केटिंग करत अनोखा विक्रम प्रस्थापित केला असून युवा पिढीला खेळाचा एक सकारात्मक संदेश दिला आहे. मनस्वीला २०२६ साली राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रासाठी सुवर्ण पदक जिंकायचे आहे. यासाठी ती प्रशिक्षक विजय मलजी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. याचबरोबर तिला एशियन गेम्स, ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिंपिक सारख्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे. तिच्या या स्वप्नांना बळ देण्यासाठी पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने खासदार सुळे यांच्या हस्ते इनलाईन स्केट किट भेट देण्यात आले. तसेच आजवरच्या कामगिरीबद्दल मनस्वी हिचे पालक आणि प्रशिक्षक यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्या.
मोठी बातमी…! पाकिस्तानच्या गोळीबारात आयुक्त राज कुमार थापा यांचा मृत्यू
Newsworldmarathi Delhi : India vs Pakistan War : जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथे पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात कर्तव्य बजावताना अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थप्पा यांचा मृत्यू झाला आहे. ही दुःखद बातमी राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज सकाळी शेअर केली.
त्यांनी लिहिले, “राजौरीहून दुःखद बातमी. आपण जम्मू आणि काश्मीर प्रशासकीय सेवेतील एक समर्पित अधिकारी गमावला आहे. कालच ते उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्याचा दौरा करत होते आणि माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीला उपस्थित होते.”
या घटनेने धक्का बसलेल्या मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी लिहिले की, “आज पाकिस्तानने राजौरी शहराला लक्ष्य करून केलेल्या गोळीबारात आमचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थप्पा यांचा मृत्यू झाला. या भयानक जीवितहानीबद्दल माझे दुःख आणि धक्का व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”
ओमर अब्दुल्ला यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “पूंछ, राजौरी, उरी, तंगधार आणि इतर अनेक ठिकाणे नष्ट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व शस्त्रास्त्रांसाठी आयएमएफ पाकिस्तानला परतफेड करेल तेव्हा उपखंडातील सध्याचा तणाव कसा कमी होईल असे ‘आंतरराष्ट्रीय समुदायाला’ वाटते हे मला माहित नाही.”
Virat kohli : रोहित पाठोपाठ विराटची मोठी घोषणा; कसोटी क्रिकेटमधून घेणार निवृत्ती
Newsworldmarathi Mumbai : भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतची माहिती त्याने बीसीसीआयला दिली आहे. काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मानेही कसोटी फॉरमॅटला अलविदा केला होता. आता विराटच्या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींना दुसरा मोठा धक्का बसला आहे.
कोहलीच्या या निर्णयामुळे तो आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी संघात सहभागी होणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. मात्र बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कोहलीला निवृत्तीचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे निवड समिती काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये कोहली शेवटचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत खेळला होता. पर्थ कसोटीत त्याने शानदार शतक झळकावले, मात्र त्यानंतर त्याची कामगिरी फारशी प्रभावी ठरली नाही. या मालिकेत भारताला 1-3 असा पराभव पत्करावा लागला.
दरम्यान, 7 मे रोजी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत केली होती. तो एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार असला तरी, वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने टी-20 फॉरमॅटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. या दोन दिग्गजांच्या निवृत्त्यांमुळे भारतीय कसोटी संघात मोठा बदल अपेक्षित आहे.
Ind Vs Pak : ताजमहालच्या सुरक्षेत वाढ; आग्र्यात हाय अलर्ट जारी
Newsworldmarathi Delhi : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे ताजमहालची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सायरन वाजवून जनतेला सतर्क केले जाईल.
या संदर्भात, मॉक ड्रिल देखील सुरू करण्यात आली आहे. अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत. लष्करी क्षेत्रात खूप खबरदारी घेतली जात आहे. मिश्र लोकसंख्या असलेल्या भागात गुप्तचर संस्था सक्रिय आहेत. पोलिस आयुक्त दीपक कुमार यांनी बुधवारी दुपारी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना सूचना दिल्या.
पोलिसांनी मिश्र लोकवस्ती असलेल्या भागात गस्त घातली आणि लोकांशी बोलून त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली. सोशल मीडिया सेलला २४ तास सक्रिय राहण्यास सांगण्यात आले आहे. ज्यांचे नातेवाईक पाकिस्तानात राहतात त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश एलआययूला देण्यात आले आहेत. एवढेच नाही तर ज्यांचे नातेवाईक पाकिस्तानात राहतात त्यांनाही असे कोणतेही व्हिडिओ त्यांच्या नातेवाईकांसोबत शेअर करू नका असे सांगण्यात आले ज्यामुळे त्यांच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.
व्हायरल व्हिडिओ आणि संदेशांवर विशेष लक्ष केंद्रित करा
सोशल मीडिया सेलला व्हायरल व्हिडिओ आणि मेसेजवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कोणत्याही लष्करी हालचालीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नये. मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी माहिती दिली की नऊ ठिकाणी अग्निशमन केंद्रे आहेत. इदगाह, संजय प्लेस, ताजनगरी, शास्त्रीपुरम, एतमादपूर, बह, फतेहाबाद, खेरागड आणि किरवली येथे अग्निशमन केंद्रे आहेत. प्रत्येक मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन दलाची टीम सहभागी असते.

