दहावी निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती; बोर्डाने केली मोठी घोषणा
Newsworldmarathi Pune : बारावीचा निकाल लागल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. अद्याप महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (महाराष्ट्र बोर्ड) दहावीच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, पुढील दोन आठवड्यांत निकाल लागण्याची शक्यता आहे. त्याआधीच बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची माहिती दिली आहे, जी अकरावीच्या प्रवेशाशी संबंधित आहे.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये धावपळ सुरू होते. या प्रक्रियेत कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून यंदा अकरावीचा प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात बोर्डाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली आहे.
दहावीचा निकाल हाती लागताच, विद्यार्थी आपल्या गुणांनुसार योग्य कॉलेजची निवड करू लागतात. याच पार्श्वभूमीवर प्रवेशप्रक्रिया सुलभ व्हावी आणि वेळ वाचावा, यासाठी ऑनलाईन प्रवेशाचे पाऊल उचलण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे, जेणेकरून प्रवेशाशी संबंधित सूचना आणि तारखा लक्षात येतील.
ही प्रणाली विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार असून, प्रवासाची गैरसोय न होता घरबसल्या अर्ज करता येणार आहे. बोर्डाचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा ठरणार आहे.
भाजपने वेळ, काळ आणि मर्यादेचे भान ठेवावे : प्रथमेश आबनावे यांचा टोला
Newsworldmarathi Pune: देश सीमेपलीकडील तणावाच्या पार्श्वभूमीवर एकतेच्या धाग्यांनी बांधला जात असताना, पुण्यातून वातावरण दूषित करणारे राजकारण करणे ही खेदजनक बाब आहे, अशी तीव्र टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी केली आहे.
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेस व भाजपच्या कालखंडाची तुलना करत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्याला उत्तर देताना आबनावे यांनी भाजपवर वेळ, काळ आणि मर्यादेचे भान न ठेवता भेदभावाचे बीज पेरत असल्याचा आरोप केला.
“केंद्रीय मंत्रिपदाच्या शपथेसोबत जबाबदारीची जाणही लाभावी, ही सहज अपेक्षा आहे. मात्र सध्याच्या नाजूक स्थितीत वैयक्तिक स्वार्थासाठी मतभेदांच्या राखेत ठिणगी टाकणे ही नीतिमत्तेची नव्हे तर संवेदनशीलतेचीही विफलता आहे,” असे आबनावे म्हणाले.
“देश सजग आहे, संसद एकमताने सज्ज आहे आणि जनतेच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत आहे. अशा काळात द्वेषाचे राजकारण करणे अयोग्यच नव्हे, तर अशोभनीय आहे. अटलजींच्या ‘राजकारण ही राष्ट्रसेवा’ या विचारांची आज पुन्हा आठवण करून देण्याची वेळ आहे,” असेही ते म्हणाले.
राजकारण करताना संयम राखणे, समाजात फूट न पाडता ऐक्याचे वातावरण ठेवणे हीच खरी देशसेवा असल्याचे आबनावे यांनी स्पष्ट केले.
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित
Newsworldmarathi Delhi : भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर, इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे.
धर्मशाळामध्ये पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेला सामना जम्मू आणि पठाणकोटजवळ हवाई हल्ल्याचा इशारा मिळाल्यामुळे अर्धवट थांबवण्यात आला होता. त्यामुळे सुरक्षेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून BCCI ने हा मोठा निर्णय घेतला.
शुक्रवारी झालेल्या तातडीच्या बैठकीनंतर BCCI ने अधिकृतपणे IPL स्थगितीची घोषणा केली. “देश युद्धसदृश स्थितीत असताना क्रिकेट खेळणं योग्य नाही,” असं मत BCCI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने PTI शी बोलताना व्यक्त केलं.
या निर्णयामुळे कोलकात्यात २५ मे रोजी होणारा अंतिम सामना आणि उर्वरित सर्व सामने सध्या अनिश्चिततेत अडकले आहेत.
IPL अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी सुरुवातीला ९ मे रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना नियोजित वेळापत्रकानुसार होईल असं सांगितलं होतं. मात्र, परिस्थिती अधिक गंभीर झाल्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला.
धुमाळ यांनी स्पष्ट केलं की, “परिस्थिती सतत बदलते आहे. पुढील निर्णय केवळ सरकारी यंत्रणांच्या सल्ल्यानुसार आणि लॉजिस्टिक परिस्थिती विचारात घेऊनच घेतला जाईल.” IPL पुढील आदेश येईपर्यंत स्थगित राहील.
Operation Sindoor: भारतीय लष्कराचं जोरदार प्रत्युत्तर; पाकिस्तानचे ५० हून अधिक ड्रोन नेस्तनाबूत
Newsworldmarathi shrinagar: पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरुद्ध ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या लष्करी कारवाईनंतर घाबरून पाकिस्तानने गुरुवारी १५ भारतीय शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय हवाई संरक्षण प्रणाली एस-४०० आणि आकाशने पाकिस्तानचे ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमाने उधळून लावली.
शुक्रवारी, अतिरिक्त महासंचालक (एडीजी) सार्वजनिक माहिती यांनी सांगितले की ड्रोन हल्ले प्रभावीपणे निष्क्रिय करण्यात आले आणि युद्धबंदी उल्लंघनांना (एलओसी) योग्य प्रतिसाद देण्यात आला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी यशस्वी प्रत्युत्तर दिल्याची माहितीही एडीजी पीआय यांनी दिली.
ते म्हणाले, जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण तुकड्यांनी दोन पाकिस्तानी ड्रोन पाडले. सेक्टरमध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. सूत्रांनी एएनआयला सांगितले की, पाकिस्तानने विविध ठिकाणी भारतीय हद्दीत अनेक झुंड ड्रोन पाठवण्याचे अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर भारतीय लष्कराने ही कारवाई सुरू केली.
त्याच वेळी, शुक्रवारी सकाळी जम्मू शहरात स्फोटांचे आवाज ऐकू आले, ज्यामुळे तात्काळ वीजपुरवठा खंडित झाला. सीमावर्ती भागातील लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानी सैन्याचा प्रयत्न भारताने उधळून लावल्यानंतर काही तासांतच ही घटना घडली. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले आहेत.
पहाटे ४ च्या सुमारास स्फोटांचे आवाज ऐकू आले.
सायरन वाजल्यानंतर पहाटे ३:५० ते ४:४५ च्या दरम्यान स्फोटांचे आवाज ऐकू आले. सुरक्षा दलांनी हा धोका निष्प्रभ केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. व्हिडिओमध्ये आकाशात उडणाऱ्या वस्तू आणि शस्त्रे निष्क्रिय करताना स्फोट होताना दिसत आहेत. रात्रभर युद्धबंदीचे उल्लंघन झाल्याचे वृत्तही आले.
पाकिस्तानी सैन्याने पूंछ, राजौरी आणि जम्मू जिल्ह्यात गोळीबार आणि तोफांचा मारा केला आणि भारतीय सैन्याने त्यांना प्रत्युत्तर दिले. X वरील एका पोस्टमध्ये, जम्मूच्या उपायुक्तांनी रहिवाशांना शांतता राखण्याचे आवाहन केले. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या भागातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद करण्यात आली आहेत.
भारत-पाकिस्तान संघर्ष तीव्र; अरबी समुद्रातील हालचालींमुळे घुसखोरीची शक्यता
Newsworldmarathi Delhi: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरुवार रात्रीपासून जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हवाई हल्ला केला होता. मात्र, भारतीय लष्कराने वेळेवर प्रत्युत्तर देत हे सर्व हल्ले परतवून लावले आणि पाकिस्तानमध्ये घुसून शत्रूच्या ठिकाणांचा यशस्वीपणे नाश केला. भारतीय सैन्याने वायूदल, नौदल आणि पायदळ अशा तिन्ही आघाड्यांवर ताकद दाखवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.
या कारवाईमुळे पाकिस्तान सध्या अडचणीत असून, आता तो पुन्हा एकदा छुप्या मार्गाने भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण काही तासांपूर्वीच पाकिस्तानने अरबी समुद्रातील गुजराती मच्छिमारांच्या बोटी ताब्यात घेतल्या आहेत. या मच्छिमारांना जिवंत सोडण्यात आले असले तरी बोटी मात्र पाकिस्तानच्या ताब्यात आहेत.
ही घटना लक्षात घेता, 26/11 च्या मुंबई हल्ल्यासारखी घुसखोरी पुन्हा समुद्री मार्गाने होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताने आपली समुद्रसीमा अधिक सजगपणे पहार्यावर ठेवावी, अशी मागणी सुरक्षाविशेषज्ञांकडून होत आहे. पाकिस्तानच्या या हालचालींमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
राज्यातील अनधिकृत स्कूल बसवर कारवाई? परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
Newsworldmarathi Mumbai: सध्या राज्यभरात ४० हजार स्कूल बस सेवा देत आहेत. मात्र याव्यतिरिक्त अनेक अनधिकृत स्कूल बस विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक करत आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये या स्कूल बस चालक-मालकांनी संबंधित प्रादेशिक मोटरवाहन कार्यालयात दंडात्मक रक्कम भरून आपली स्कूल बस अधिकृत करून घ्यावी.
अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. तसेच स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी नियमावलीत सुधारणा केल्या जाणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.
सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे स्कूल बस असोसिएशन व पालक असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी सरनाईक म्हणाले, शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासास परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
नियमावलीत सुधारणा करताना वाहनचालक आणि पालक संघटनांच्या भावना आणि अडचणींचाही विचार केला जाईल. नियमांचे पालन हे फक्त कायद्याच्या भीतीपोटी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या भावनेतून व्हावे. स्कूल बस वाहतूक नियमावलीत सुधारणा करताना कोणावर अन्याय होणार नाही, पण नियमही शिथिल होणार नाहीत.
शरद पवार-अजित पवार एकत्र येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Newsworldmarathi Mumbai: आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत जावे, असा एक मतप्रवाह पक्षात असल्याची कबुली खुद्द शरद पवार यांनीच एका इंग्रजी वृत्तपत्रास दिलेल्या एका मुलाखतीत दिली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांच्या पक्षातून यासाठी दबाव येत आहे. यातून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. तसे झाल्यास सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दाखवल्याचे समजते.
अजित पवार आणि सुप्रिया यांची विचारधारा एकच आहे. पक्ष वाढला तेव्हा हे सगळे एकत्रच होते. त्यामुळे आता पुन्हा एकत्र येण्याबाबत सुप्रिया आणि अजित यांनी बसून निर्णय घ्यावा, असे पवार म्हणाले. त्यांनी ठरवल्यास भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात.
तसे झाल्यास आपल्याला आश्चर्य वाटणार नाही, असेही पवार यांनी म्हटले आहे. आपण मात्र या निर्णय प्रक्रियेपासून खूप दूर आहोत. पक्षात फेरबदल करण्याचा अधिकार जयंत पाटलांना आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
तुम्हाला कुठे जायचे आहे? इंडिया आघाडीसोबत राहाणार की पर्याय खुले ठेवायचे आहेत? या प्रश्नावर विरोधी पक्षात काम करून भाजपला एक विश्वासार्ह पर्याय निर्माण केला पाहिजे, अशी भूमिका पवार यांनी मांडली.
तुमच्या स्वतःच्या पक्षाचे भविष्य तुम्हाला कसे दिसते? असा प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, आमच्या पक्षात दोन मते आहेत. एक म्हणजे आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुन्हा एकत्र येऊन भाजपसोबत सत्तेत जावे, असे एका गटाचे म्हणणे आहे.
दुसऱ्या गटाला वाटतं की, आम्ही प्रत्यक्ष वा किंवा अप्रत्यक्षपणे भाजपसोबत न जाता इंडिया आघाडीतच राहून या आघाडीची पुनर्रचना करावी, इंडिया आघाडी आज सक्रिय नाही. आता आम्हाला आमच्या पक्षाची पुनर्रचना करून पुनर्बाधणी करावी लागेल, तरुणांना त्यात सामील करावे लागेल.
Devendra Fadnavis : सायबर क्षेत्रात अधिक परिणामकारक काम करणार : देवेंद्र फडणवीस
Newsworldmarathi Mumbai : Devendra Fadnavis : सायबर सुरक्षेसाठी देशातील अत्याधुनिक सुविधा महाराष्ट्रात आहेत. या माध्यमातून सायबर गुन्हे, सायबर फसवणूक व मानवी तस्करीपासून लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील काळातही सायबर फसवणूक टाळण्यासाठी अधिक परिणामकारकपणे काम करणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सायबरच्या आर्टिफिशियल इंटिलिजन्स बॉट व सायबर जागरुकता माहितीपट या नाविन्यपूर्ण नागरिक केंद्रीत उपक्रमांचे अनावरण सह्याद्री अतिथिगृहात करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र सायबरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव, पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे, पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, अभिनेता शरद केळकर, अभिनेत्री अमिषा पटेल, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते. या वेळी सायबर सुरक्षाविषयक माहितीपट दाखवण्यात आला.
मराठी आणि हिंदी भाषेत असलेल्या या माहितीपटात शरद केळकर, अमिषा पटेल यांनी काम केले आहे. या माध्यमातून सायबर गुन्हेगारी, सायबर फसवणूकसंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे.
तसेच महाराष्ट्र सायबरच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅट बॉटचे सादरीकरण करण्यात आले. हा चॅट बॉट महाराष्ट्र सायबरच्या १९४५ या हेल्पलाइनशी जोडले गेले आहे. तक्रार कशी करावी, यासंबंधीची माहिती मिळणार आहे. मानवी तस्करीमध्ये लोकांना वाईट पद्धतीने वागवले जाते. यासारखे अमानुष प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र सायबरने जनजागृती करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
पुणे विमानतळावर तेरा उड्डाणे रद्द; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम
Newsworldmarathi Pune : पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम आता देशांतर्गत विमान सेवा व्यवस्थेवरही दिसून येत आहे. पुणे विमानतळावर गुरुवारी एकूण तेरा उड्डाणे रद्द करण्यात आली असून, या निर्णयामागे संरक्षण विषयक गरजा कारणीभूत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रद्द झालेल्या उड्डाणांमध्ये इंडिगो आणि स्पाइसजेट या दोन प्रमुख विमान कंपन्यांच्या सेवा असून, इंडिगोच्या ११ आणि स्पाइसजेटच्या २ उड्डाणांचा समावेश आहे. रद्द झालेल्या मार्गांमध्ये अमृतसर, कोची, चंडीगड, हैदराबाद, राजकोट, जोधपूर, सुरत, भावनगर व जयपूर हे प्रमुख गंतव्यस्थान आहेत.
प्रवाशांना याची माहिती देण्यात येत असून, संबंधित विमान कंपन्यांकडून पूर्ण रकमेची परतफेड किंवा पर्यायी उड्डाणांची सुविधा दिली जाणार आहे. प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यकतेनुसार निर्णय घेतले जातील, असेही सांगण्यात आले.
ऑपरेशन सिंदूर’नंतर गृहमंत्री ‘अमित शाहांनी सैनिकांना दिले ‘हे’ आदेश
Newsworldmarathi Delhi: पाकसोबत युद्धाचा भडका उडण्याच्या शक्यतेमुळे भारतीय निमलष्करी दल जवानांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सशस्त्र दलाने मध्यरात्री उशिरा हवाई हल्ल्याद्वारे पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केले. यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीवर गेलेल्या जवानांना पुन्हा तैनातीसाठी बोलावले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व निमलष्करी दलाच्या प्रमुखांना सुट्टीवर गेलेल्या जवानांना परत बोलविण्यास सांगितले आहे. तसेच शाह सातत्याने जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत संपर्कात आहेत.
सीमावर्ती भागातील सामान्य लोकांना सुरक्षा सुनिश्चित करण्यास त्यांनी सांगितले आहे. आपत्कालीन स्थितीमध्ये सामान्य नागरिकांच्या आश्रयासाठी बंकर तयार ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. देशातील अंतर्गत सुरक्षा स्थितीचा आढावाही शाह यांनी घेतला. सोबतच सुरक्षा अधिकाऱ्यांना सतर्क आणि कडा पहारा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

