Mumbai BEST Bus Real Time : मुंबईकरांचा बेस्ट प्रवास होणार सुलभ, बसेसचा रिअल-टाईम आता गुगल मॅपवर
Newsworldmarathi Pune : Mumbai BEST Bus Real Time: बेस्ट बस स्टँडवर कधी येणार याची वाट पाहत बसावं लागतं. बेस्टच्या वेळा या ठरलेल्या असतात मात्र ट्रॅफिकमुळं आणि काही कारणास्तव बेस्ट कधीकधी उशिरा येतात. मात्र प्रवाशांना स्टँडवरच ताटकळत वाट पाहत बसावे लागते. मात्र, आता तुमची बस कुठपर्यंत पोहोचली याची वेळ तुम्हाला रिअल टाइमने समजणार आहे. त्यामुळं प्रवाशांच्या वेळेची बचत तर होणारच आहे पण त्याचबरोबर प्रवासही सुलभ होणार आहे.
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि गुगल यांच्यातील सहकार्यामुळे आता बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार आहे. प्रवाश्यांच्या वेळेची बचत करुन त्यांच्या सुलभ प्रवाशांच्या दृष्टीने ही एक उपयुक्त सुविधा उपलब्ध होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गुगल मॅपवर बसमार्गाची माहिती या प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना यांच्यासह संबंधित उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या वेळी कोणती बस उपलब्ध होईल, ती बस मिळण्याची अचूक वेळ या गोष्टी सहजतेने आता उपलब्ध असणार आहेत, ज्यामुळे प्रवाश्यांच्या वेळेची बचत होईल आणि सोयीस्कर प्रवास करणे त्यांना शक्य होणार आहे.
बेस्ट आणि गुगल मॅप यांच्यातील हे सहकार्य मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या गुणवत्तापूर्ण सुविधेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुविधेमुळे ‘बेस्ट’च्या ग्राहकांच्या संख्येतही वाढ होईल.
प्रवाश्यांना या सुविधेचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी प्रत्येक बसस्थानकावर या सुविधेबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध करुन द्यावी,असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
ऑपरेशन सिंदूर’ ; पुणे विमानतळावरून पाच उड्डाणे रद्द
Newsworldmarathi Pune:’ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील काही शहरांवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशातील काही महत्वाच्या विमानतळांवरील नागरी उड्डाण सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम पुणे विमानतळावरून होणार्या पाच उड्डाणांवर झाला असून, त्या मार्गांवरील सेवा बुधवारी (दि.07) रद्द करण्यात आल्या आहेत, यासंदर्भातील माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.
पुणे विमानतळ प्रशासनाने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार पाच मार्गावरील विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे अनेक प्रवासी प्रभावित झाले असून, त्यांना याची कल्पना देण्यासाठी विमानतळ प्रशासन, विमान कंपन्या व अन्य संबंधित यंत्रणा तत्पर झाल्या आहेत.
प्रवाशांना त्यांच्या बुकिंगनुसार वैयक्तिकरित्या संपर्क साधण्यात आला असून, घोषणा वाहिन्यांद्वारे तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही सतत अद्ययावत माहिती दिली जात आहे. प्रभावित प्रवाशांबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात आले आहे. प्रवाशांना पूर्ण रकमेची परतफेड अथवा अन्य पर्यायी उड्डाणाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
सध्याची स्थिती ही पूर्णपणे संरक्षणविषयक गरजांमुळे उद्भवलेली असून, प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. आम्ही प्रवाशांच्या सोयीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. प्रवाशांनी त्यांच्या तिकीट बुकिंग संबंधित प्रश्नांसाठी थेट संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.
…रद्द झालेली उड्डाणे
1) पुणे – अमृतसर
2) पुणे – चंदीगड
3) पुणे – किशनगढ
4) पुणे – राजकोट
5) पुणे – जोधपूर
माजी सैनिकांच्या मागण्या-अडीअडचणी सोडविण्यासाठी 13 मे रोजी जिल्हाधिकारी यांचा सैनिक दरबार
Newsworldmarathi pune: जिल्हयातील सेवारत व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी व सेवारत सैनिकांसाठी १३ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक दरवार आयोजित करण्यात येणार आहे.
तरी जिल्हयातील सेवारत व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता,वीरपिता, वीरपत्नी यांनी आपले अर्ज सैन्य नंवर, पद, नाव, पत्ता, मोबाईल नंबर व स्पष्ट विषयांसह तीन प्रतीमध्ये घेऊन अर्जदार यांनी आपले अर्ज ०९ मे २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे जमा करावेत व स्वतः १३ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपस्थित राहावे असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘मॉक ड्रिल’ : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती
Newsworldmarathi Pune: केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेण्याच्यादृष्टीने विधानभवन, मुळशी पंचायत समिती, तळेगाव नगरपरिषद, वनाज औद्योगिक वसाहत, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी आज दुपारी चार वाजता ‘मॉक ड्रिल’घेण्यात आलं मॉक ड्रिलची गांर्भियता लक्षात घेता सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने काम केले या ठिकाणी आपण पुणे विधान भवन या ठिकाणची काही प्रात्यक्षिके पाहिली.
युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचविण्यासाठी खबरदारी घेण्याच्यादृष्टीने दक्षता म्हणून मॉक ड्रील घेण्यात आले. यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्यादृष्टीने विविध प्रात्यक्षिके केली गेली.
केंद्रीय संरक्षण दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य, अग्निशमन दल, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरु युवा केंद्राचे समन्वयक यांचा या मॉक ड्रीलमध्ये सहभागी होता.
रिपब्लिकन पक्ष (आठवले) ची पुणे शहर कार्यकारणी बरखास्त
Newsworldmarathi Pune: रिपब्लिकन पक्ष (आठवले) ची पुणे शहरातील विशेष कमिटीची बैठक शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. सदरच्या बैठकीमध्ये पुणे शहर कार्यकारणी बरखास्त करण्यात आली. संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच फेरनिवड करण्यात येणार आहे.
आगामी महानगरपालिका निवडणूक डोळयासमोर ठेवून संघटनात्मक बांधणी करण्याकरीता एकमताने निर्णय घेण्यात आला असून येत्या पंधरा दिवसात नवीन कार्यकारणीची निवड करण्यात येणार आहे, असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
या बैठकीस परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, बसवराज गायकवाड, शाम सदाफुले, रफिक दफेदार, महेंद्र कांबळे, भगवान गायकवाड, वसंत बनसोडे, हिमाली कांबळे, महादेव दंदी, बाळासाहेब जगताप, विरेन साठे, संदिप धांडोरे आदि उपस्थित होते.
Pratap Sirnaik : एसटीच्या ताफ्यात पाच वर्षांत २५ हजार बस : प्रताप सरनाईक
Newsworldmarathi Mumbai : एसटीची सेवा आणखी वगेवान करण्यासाठी पुढील पाच वर्षांत २० ते २५ हजार बस येणार असून याच महिन्यात कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी बैठक घेऊन त्यांचे प्रश्न आणि विविध मागण्या मार्गी लागतील, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या ५७ वे महाअधिवेशन माणगावमध्ये झाले. त्यावेळी ते बोलत होते.
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिन्ही नेते अत्यंत संवेदनशील आहेत. एसटी चिरकाल टिकली पाहिजे. त्यासाठी सरकार म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदेशांद्वारे शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी खा. सुनील तटकरे, रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, एसटी कामगार संघटनेचे संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संदीप शिंदे, सुभाष केकाणे, रायगड जिल्हा अध्यक्ष विलास खोपटे, विभागीय सचिव गणेश शेलार, युवासेना जिल्हाध्यक्ष विपुल उभारे उपस्थित होते.
मुंबई, पुण्यासह राज्यातील १६ शहरांत ‘मॉ ड्रिल’; राज्य सरकार ‘अलर्ट मोड’वर
Newsworldmarathi Mumbai: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी दिनांक ७ मे रोजी विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील १६ ठिकाणी सिक्युरिटी ड्रिल घेण्यात येणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत देशभरातील २४४ जिल्हा नागरी संरक्षण केंद्रांची स्थिती तपासण्यात आली. यामध्ये निवारा केंद्रे, इशारा देणारी यंत्रणा आणि समन्वय सुविधा कार्यरत आहेत की दुरुस्तीची गरज आहे, याचे मूल्यमापन करण्यात आले. या ड्रिलचा महत्त्वाचा भाग म्हणजे सामान्य नागरिकांना प्रशिक्षण देणे असणार आहे.
गृह मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या मॉक ड्रिलमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरन आणि ब्लॅकआऊट (वीज बंदी) परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यावा, यावर विशेष भर दिला जाणार आहे. नागरिकांना त्यांच्या घरी वैद्यकीय कीट, अतिरिक्त औषधे, टॉर्च आणि मेणबत्त्या ठेवण्याचे निर्देश दिले जाणार आहेत.
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार
प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की, अशा परिस्थितीत मोबाईल उपकरणे आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी ठरू शकतात. अशा परिस्थितीत तोंड देण्यासाठी आवश्यक ती रोख रक्कम जवळ ठेवावी. गृह मंत्रालयाने देशभरातील २४४ जिल्ह्यांमध्ये १०० हून अधिक संवेदनशील ठिकाणांची निश्चिती केली आहे. या मॉक ड्रिलमध्ये अनेक उपाययोजना समाविष्ट असणार आहेत. त्यामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवणे, नागरिकांना नागरी संरक्षणाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण देणे, शत्रूच्या संभाव्य हल्ल्याच्या वेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणे, तसेच बंकर आणि खंदकांची स्वच्छता व तपासणी करणे यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर
केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने हायअलर्ट जारी केला आहे. राज्य प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने अंतर्गत स्तरावर हालचालींना गती दिली असून, सर्व पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना संबंधित प्रशासनाशी सातत्याने संपर्कात राहण्याचे आदेश दिले आहेत. उद्या राज्यातील १६ ठिकाणी मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट होणार आहे.
महाराष्ट्रात १६ ठिकाणी मॉकड्रिल
मुंबई, उरण-जेएनपीटी, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मिशन सिंदूर’चा विजयोत्सव: श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर महाआरती
Newsworldmarathi Pune: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय सेनेनं पाकिस्तानमधील अतिरेक्यांच्या तळांवर यशस्वी कारवाई केली. या ‘मिशन सिंदूर’च्या यशाचा उत्सव पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महाआरती करून साजरा करण्यात आला. “वंदे मातरम”, “भारत माता की जय” आणि “नरेंद्र मोदी यांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते श्रीमंत गणपतीची महाआरती करण्यात आली. या वेळी माजी नगरसेवक धनंजय जाधव, विशाल धनवडे, प्रमोद कोंढरे, महिला पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरतीनंतर बोलताना आमदार रासने म्हणाले की, “27 निरपराध पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या दिवशीच नरेंद्र मोदी परदेशातून आणि अमित शहा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ठामपणे सांगितले होते की, याचे उत्तर दिले जाईल. आजच्या कारवाईतून हे उत्तर मिळालं आहे.”
ते पुढे म्हणाले, “मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत शांतता आणि विकासाकडे वाटचाल करत असताना, कोणीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला ठोस प्रत्युत्तर दिलं जाईल. पहलगाम हल्ल्यातील 27 पर्यटकांच्या मृत्यूला ही खरी आदरांजली आहे. ‘मिशन सिंदूर’ हे केवळ लष्करी कारवाई नव्हे, तर देशाच्या अस्मितेचं आणि वीर जवानांच्या शौर्याचं प्रतीक आहे.” या कार्यक्रमाद्वारे पुणेकरांनी भारतीय सेनेच्या पराक्रमाला सलाम करत श्रद्धांजली अर्पण केली.
या मोहिमेला दिलेले नाव योग्य : शरद पवार
Newsworldmarathi Pune : भारत सरकारने केलेल्या मोहिमेला दिलेले ऑपरेशन सिंदूर हे नाव योग्य आहे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. त्यांनी कारवाईला पाठिंबा दर्शवला असून, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेला निर्णय समर्थनीय असल्याचे सांगितले. राष्ट्रीय एकात्मतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्वपक्षीय सहकार्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. “हा संपूर्ण निर्णय योग्य प्रकारे घेतला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. काल रात्री भारताने केलेल्या कारवाईनंतर आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
पवार यांनी सांगितले की, या विषयात राजकारण न आणता सर्वपक्षीय बैठक झाली आणि त्या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. “या मुद्यावर आम्ही सर्वजण एकत्र आहोत,” असे सांगत त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर एकीचे महत्त्व अधोरेखित केले.
पवार यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिक्रियांवरही भाष्य केले. “अमेरिका, जपान आणि अनेक देशांनी भारताच्या कारवाईला पाठिंबा दिला आहे, मात्र काळजीची बाब म्हणजे चीनने अजूनही अशी कोणतीही भूमिका घेतलेली नाही,” असे ते म्हणाले. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले.
पाकिस्तानच्या भूमिकेवर भाष्य करताना पवार म्हणाले, “आपल्याला माहित नाही की पाकिस्तान काय करेल, पण त्यांना स्वतःची ताकद आणि भारताची ताकद याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहावे लागेल.”
ते पुढे म्हणाले की, “पाकिस्तानची आर्थिक कोंडी कशी करता येईल, हे पाहण्याचे धोरण चुकीचे नाही. आणि या मोहिमेला दिलेले नाव योग्य आहे.” अशा शब्दांत पवार यांनी देशाच्या भूमिकेचे समर्थन करत सर्वपक्षीय सहकार्याची भावना अधोरेखित केली.
भारतात सर्व यंत्रणा अलर्टमोडवर; पुढील आदेशापर्यंत ‘हे’ विमानतळे तात्पुरती बंद
Newsworldmarathi Delhi: भारत प्रशासित काश्मीरमध्ये आणि सीमावर्ती राज्यांमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अनेक विमान वाहतूक कंपन्यांनी आपल्या उड्डाणांमध्ये बदल केले आहेत. जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंडीगड आणि राजकोटसारख्या ठिकाणांवरील उड्डाणे रद्द करण्यात आली असून काही विमानांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
एअर इंडियाने जाहीर केल्यानुसार, वरील सर्व ठिकाणांसाठीची उड्डाणं आज दुपारी १२ वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. अमृतसरकडे जाणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय विमानांचे मार्ग वळवून त्यांना दिल्लीकडे पाठवण्यात आले आहे.
स्पाइसजेटने देखील धर्मशाला, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर भारतातील अनेक विमानतळ बंद झाल्याची माहिती दिली असून, त्यामुळे त्यांच्या उड्डाणांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
इंडिगो एअरलाइन्सनेही सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, बदलत्या हवाई परिस्थितीमुळे काही शहरांमध्ये जाणाऱ्या व येणाऱ्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे.
दरम्यान, हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने लाहोर आणि कराची या प्रमुख शहरांचे हवाई क्षेत्र बंद करण्याची घोषणा केली आहे

