“सडेतोड उत्तर दिलं जाईल”; भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा संताप : पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची तीव्र प्रतिक्रिया

Newsworldmarathi Team: भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया दिली असून, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या कारवाईला “युद्धाची कृती” (Act of War) म्हटले आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांनी सांगितले की, “शत्रूने पाकिस्तानच्या पाच ठिकाणांवर भ्याड हल्ला केला आहे. भारताच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार पाकिस्तानला आहे. आणि आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देत आहोत.” ते पुढे म्हणाले की, “संपूर्ण पाकिस्तान लष्करासोबत उभा आहे आणि आमचं मनोधैर्य मजबूत आहे. पाकिस्तान आणि त्याचं सैन्य शत्रूशी कसा मुकाबला करायचा हे जाणून आहे. आम्ही शत्रूच्या कोणत्याही वाईट हेतूला यशस्वी होऊ देणार नाही.” या हल्ल्यांबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आरोप केला की, भारताने दहशतवादी छावण्यांच्या नावाखाली सामान्य नागरिकांवर आणि धार्मिक स्थळांवर हल्ले केले आहेत. ते म्हणाले, “या हल्ल्यात एका लहान मुलाचा आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या अद्याप स्पष्ट नाही. सात लक्ष्यांपैकी दोन काश्मीरमध्ये आणि पाच पाकिस्तानमध्ये आहेत.” ख्वाजा आसिफ यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांना पाकिस्तानमध्ये येऊन परिस्थितीची सर्व बाजूंनी तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.

‘मिशन सिंदूर’ हे नाव वाचून डोळ्यात पाणी आलं : जगदाळे कुटुंबाची प्रतिक्रिया

Newsworldmarathi Pune : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपला पती गमावलेल्या प्रगती जगदाळे यांनी भारतीय सेनेच्या ‘मिशन सिंदूर’ या कारवाईवर प्रतिक्रिया देताना भावना व्यक्त केल्या. “मिशन सिंदूर” हे नाव अतिशय योग्य असून, हे वाचून डोळ्यात पाणी आलं, असं त्यांनी सांगितलं. पहलगम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्रगती जगदाळे यांचे पती संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. “दहशतवाद्यांनी माझं सिंदूर पुसलं होतं. आज भारतीय सेनेनं त्या प्रत्येक बहिणीच्या वेदनेचा बदला घेतला आहे. या मोहिमेला ‘सिंदूर’ हे नाव दिलं गेलं, हे आमच्यासाठी फार मोठं आहे,” असं प्रगती जगदाळे म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितलं, “हे नाव केवळ एका मोहिमेचं नाही, तर प्रत्येक आई-वडिलांच्या दु:खाचं आणि शौर्याचं प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमच्या वेदनेची जाणीव आहे, याचा विश्वास वाटतो.” भारतीय सेनेच्या कारवाईबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करताना म्हटलं की, “हे फक्त टार्गेट्स नष्ट करणं नाही, तर प्रत्येक शहीदासाठी उगवलेलं नवसंजीवन आहे. ‘मिशन सिंदूर’ हा फक्त हल्ला नाही, तर आमच्या अश्रूंना मिळालेली किंमत आहे.” ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर बॉम्ब टाकले आहेत, ज्यामुळे संपूर्ण पाकिस्तान हादरला आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारतीय हवाई दल आणि लष्कराचे ऑपरेशन होते. एकीकडे, आयएएफच्या लढाऊ विमानांनी हवाई हल्ले केले, तर दुसरीकडे, लष्कराने क्षेपणास्त्रांचा वापर देखील केला. भारतीय सैन्याच्या हल्ल्यांची ताकद इतकी प्रचंड होती की पाकिस्तानी हवाई दलाला भारतीय हवाई दलाने क्षेपणास्त्रे डागल्याचे लक्षातही आले नाही.

ऑपरेशन सिंदूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ॲापरेशन मॅानिटर करत होते

Newsworldmarathi Delhi: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत, भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानातील विविध ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला भारताच्या हद्दीत राहून करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात हा हवाई हल्ला पाकिस्तानच्या सुमारे 100 किमी आत केला गेला. या ऑपरेशनदरम्यान एकूण 9 टार्गेट्स निश्चित करण्यात आले होते आणि सर्व 9 च्या 9 टार्गेट्स यशस्वीरित्या उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या टप्प्याटप्प्याने पार पडलेल्या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांना मोठा फटका बसला असून, अनेक दहशतवादी छावण्या नष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. या महत्त्वाच्या कारवाईदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः संपूर्ण ऑपरेशनवर नजर ठेवून होते. त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले. भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या संयुक्त कारवाईत उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत नियोजनबद्ध आणि अचूक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे भारताने पुन्हा एकदा आपली दहशतवादविरोधी ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. ही कारवाई केवळ प्रतिशोध नव्हे, तर भविष्यातील अशा घटनांना आळा घालण्यासाठीचा इशाराही मानला जात आहे.

मध्यरात्री दीड वाजता भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; ९ दहशतवादी तळ केले उद्ध्वस्त!

Newsworldmarathi Team : पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारतात तीव्र संताप व्यक्त केली जात होती. पाकिस्तानला धडा शिकवला जावा, अशी मागणी केली जात होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील भारताला समर्थन मिळत होतं. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठका होत असताना लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याचं उत्तर आता मिळालं असून भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईक केला आहे. या मोहिमेला भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव देण्यात आलं आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी ठिकाणांवर जोरदार हल्ला चढवला. बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबादमधील नऊ ठिकाणे उद्धस्त करत, भारताने दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले. या कारवाईत ३ जणांचा मृत्यू आणि १२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

काश्मीर हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या जिल्ह्यातच नोकरी द्यावी : खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Newsworldmarathi Pune : काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील, विशेषतः पुणे व इतर भागांतील काही निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या हानीची भरपाई कोणत्याही प्रकारे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर, संबंधित कुटुंबातील एका पात्र सदस्याला त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. राज्य सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अशा कुटुंबातील पात्र सदस्यांना नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे ही समाधानाची गोष्ट आहे असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. या कुटुंबातील सदस्यांची नियुक्ती त्यांच्या मूळ जिल्ह्याच्या ठिकाणीच करण्यात यावी अशी मागणी खासदार सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे. जेणेकरून त्यांना कुटुंबाची काळजी घेता येईल आणि मानसिक आधार मिळेल. यासंदर्भात स्व. संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी यांचे उदाहरण देण्यात आले असून, त्या उच्चशिक्षित असून पुणे महानगरपालिकेत त्यांच्या अर्हतेनुसार नियुक्ती देता येऊ शकते, असे ही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

शेतकरी सेनेच्या जिल्हाध्यक्षांचे घर, बाग पेटवली

Newsworldmarathi Paranda: महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या जिल्हाध्यक्षांच्या शेतात आग लावल्याने घरासह चिकूची बाग, ठिबक संच, केबल जळून भस्मसात झाले. ही दुर्घटना परंडा तालुक्यातील करंजा शिवारात रविवारी घडली आहे. या घटनेत शेतकऱ्याचे ४ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुदीप मोरे यांची करंजा शिवारात शेती आहे. अज्ञात व्यक्तीने रविवारी सकाळी त्यांच्या शेतातील घरासह आंबा व चिक्कूच्या बागेला आग लावली. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. आगीत बीएसएनएलचे केबल, चार एकरसाठी आणलेले ठिबक सिंचनचे पाईप तसेच शेतातील घर, इतर साहित्य, आंबा व चिक्कू बाग जळून खाक झाली. शेजारचे शेतकरी व लोकांनी आग आटोक्यात आणली. तोपर्यंत मोरे यांचे जवळपास ४ लाख रुपयाचे नुकसान झाले. याबाबत अॅड. पवन मोरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी मोरे यांनी केली आहे.

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात मंत्रिमंडळाची बैठक; फडणवीस सरकारचे १० महत्त्वाचे निर्णय

Newsworldmarathi Nagar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आज चौंडी येथे राज्याच्या मंत्रिमंडळाची अभूतपूर्व बैठक पार पडली. इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मंत्रिमंडळाने ग्रामीण भागात एकत्र येत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ऐतिहासिक बैठकीत ११ मोठे निर्णय घेण्यात आले, जे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांना नवी दिशा देणारे आहेत. मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय १. अहिल्यादेवींच्या जीवनावरील चित्रपट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनचरित्रावर आधारित एक भव्य, व्यावसायिक आणि बहुभाषिक चित्रपट साकारला जाणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ या प्रकल्पाची अंमलबजावणी करेल. यासाठी लागणारा निधी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून उपलब्ध करून दिला जाईल. २. आदिशक्ती अभियान आणि पुरस्कार राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘आदिशक्ती पुरस्कार’ देऊन महिलांचा गौरव केला जाईल. हे अभियान महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांवर समाजात जागरूकता निर्माण करेल. कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू कमी करणे, शिक्षण वाढवणे, बालविवाह रोखणे, हिंसाचारमुक्त समाज निर्माण करणे आणि महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देण्यात येतील आणि यासाठी १०.५० कोटी रुपये खर्च केले जातील. ३. ‘यशवंत विद्यार्थी योजना’ धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी असलेल्या योजनेला आता ‘राजे यशवंतराव होळकर यांचे नाव’ देण्यात आले आहे. ‘यशवंत विद्यार्थी योजना’ अंतर्गत दरवर्षी १०,००० विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल. आतापर्यंत यासाठी २८८.९२ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. राजे यशवंतराव होळकर यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा हा गौरव आहे. ४. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना’ धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतिगृहे बांधली जाणार आहेत. या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना’ असे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक वसतिगृहात १०० मुलांसाठी आणि १०० मुलींसाठी निवास व्यवस्था असेल. नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे ही वसतिगृहे उभारली जातील. नाशिकमध्ये काम सुरू असून, पुणे आणि नागपूरमध्ये लवकरच सुरू होईल. ५. ऐतिहासिक जलस्त्रोतांचे जतन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या घाट, विहिरी आणि पाणीवाटप प्रणालीचे सर्वेक्षण करून त्यांच्या जतनासाठी विशेष योजना राबविली जाईल. राज्यात असलेले ३ ऐतिहासिक तलाव, १९ विहिरी, ६ घाट आणि ६ कुंड यांची दुरुस्ती, गाळ काढणे, पुनरुज्जीवन आणि सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यासाठी ७५ कोटी रुपये खर्च केले जातील. ६. अहिल्यानगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर जिल्ह्यात १०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन केले जाईल. या महाविद्यालयाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ असे नाव असेल. यासाठी ४८५.०८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा आणि मनुष्यबळ यासाठी वापरले जाईल. ७. मंदिर विकास आराखडे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या मंदिर पुनर्निर्माण कार्याला आदरांजली म्हणून ५५०३.६९ कोटी रुपयांचे भव्य मंदिर विकास आराखडे तयार करण्यात आले आहेत. यात चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचे जतन व संवर्धन (६८१.३२ कोटी), अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार (१४७.८१ कोटी), श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा (१८६५ कोटी), श्री क्षेत्र ज्योतीबा मंदिर विकास आराखडा (२५९.५९ कोटी), श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा (२७५ कोटी), श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा (१४४५.९७ कोटी) आणि श्री क्षेत्र माहूरगड विकास आराखडा (८२९ कोटी) यांचा समावेश आहे. ८. अहिल्यानगरमध्ये महिलांसाठी आयटीआय अहिल्यानगर येथे खास मुली आणि महिलांसाठी नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) सुरू करण्यात येणार आहे. ९. राहुरीत दिवाणी न्यायालय अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

धक्कादायक…! बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या; पाचोरा गावावर शोककळा

Newsworldmarathi pachora: पाचोरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे नैराश्यात असलेल्या एका विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना पाचोरा येथे सोमवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भावेश प्रकाश महाजन (वय-१९, रा. एरंडोल) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल येथील भावेश महाजन या विद्यार्थ्याने बारावीची परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर तो गेल्या १५ दिवसांपासून पाचोरा येथील राजीव गांधी कॉलनीत राहत असलेल्या बहिणीकडे आला होता. ४ मे रोजी त्याची बहीण व मेव्हणे हे लग्नासाठी पुणे येथे गेले असल्यामुळे भावेश हा घरी एकटाच होता. सोमवारी सकाळच्या सुमारास भावेश रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या मेव्हण्यांच्या दुकानावर गेला. दरम्यान, ५ मे रोजी बारावीचा निकाल असल्यामुळे तो दुपारी दुकान बंद करून घरी निघाला. दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यामध्ये भावेशला ४२ टक्के गुण मिळाल्याने तो नैराश्यात गेला. त्यातूनच भावेशने दुपारच्या सुमारास गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करत त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अमेरिकेच्या परवानगीची भारत वाट पाहत आहे का? प्रकाश आंबेडकर आंबेडकरांचा सवाल

Newsworldmarathi Pune: पाकिस्तानवर केंद्र सरकारकडून सध्या जी कारवाई केली जात आहे, ती केवळ पोकळ असून ठोस कारवाईची गरज आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पाकिस्तानवरील पार्श्वभूमीवर कडक कारवाईची मागणी केली जात असताना भारताकडून अमेरिकेच्या सल्लागाराच्या परवानगीची वाट पाहत आहे का? असा सवाल माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकर म्हणाले की, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये सल्लागार राहिलेल्या जेसन मिलर यांना पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारकडून लॉबिंगसाठी नेमल्याची माहिती समोर येत आहे. या नेमणुकीनुसार जेसन मिलर यांना दर महिन्याला तब्बल १ लाख ५० हजार अमेरिकी डॉलर्स इतके मानधन देण्यात येणार आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. भारतासारख्या सार्वभौम राष्ट्राला स्वतःचे परराष्ट्र खाते असताना, अशा परदेशी व्यक्तीची लॉबिंग करण्याची गरज का भासते ? भारत सरकारने याबाबत पारदर्शकता दाखवून स्पष्टीकरण द्यावे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्पष्टपणे सांगावे की, जेसन मिलर यांची नेमणूक केंद्र सरकारच्या वतीने झाली आहे का? आणि जर झाली असेल, तर ती कोणत्या कारणास्तव करण्यात आली? याची माहिती देशातील जनतेला देण्यात यावी, असंही आंबेडकर यांनी म्हटले. पुढे म्हणाले, जेसन मिलर यांच्याकडून परवानगी आल्याशिवाय भारत सरकार कोणतीही कारवाई करणार नाही का? असा गंभीर सवाल उपस्थित करत अॅड. आंबेडकर यांनी भारत सरकारकडून या प्रकरणावर त्वरित आणि विश्वासार्ह उत्तर मागितले आहे. जेसन मिलर हे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम केले आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

‘चलो मुंबई’ची घोषणा करताच सरकारकडून कारस्थाने सुरू; मनोज जरांगेंचा आरोप

Newsworldmarathi sambhajinagar : मराठा आरक्षणासाठी चलो मुंबई अशी घोषणा करत, मुंबईत जावून आंदोलन करण्याचे जाहीर केल्यानंतर सरकारकडून मला बदनाम करण्याचे कट-कारस्थान सुरू झाले आहे. माझे खोटे व्हिडीओ बनवण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यावेळी रुग्णालयात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, यापूर्वीही माझे खोटे व्हिडिओ तयार करण्यात आले होते. तसाच प्रकार आताही सुरू केला आहे. तसेच आरक्षण मिळावे, समाजातील लेकरांचा फायदा व्हावा, यासाठी २९ ऑगस्टला आम्ही मुंबईला जाणार आहोत. या आंदोलनात सर्वांनी सहभागी होवून आपली ताकद दाखवावी. यावेळी मागच्या पेक्षा चार पट जास्त मराठे मुंबईत येतील, असा विश्वासही मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. राज्यात आदिवासी समाजाची संख्या कमी असली तरी, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. ओबीसीमध्ये साडेतिनशे जाती आहेत, पण एकच माणूस पुढे जातो. निवडणुकीपुरते आदिवासी, ओबीसींचा उल्लेख होतो, त्यामुळे लोकांनी भावनिक होऊ नये, असे आवाहानही मनोज जरांगे यांनी केले.