हिंदुंची हत्या करत कायद्याला विरोध म्हणजे संविधानाचा अपमान; आशिष शेलार यांची टीका
Newsworldmarathi Mumbai : संविधानाच्या चौकटीत राहून, लोकशाही मुल्यांनुसार, नियमानुसार लागू केलेल्या वक्फ कायद्याचा विरोध करायचा तर लोकशाही पद्धतीने करा, न्यायालयाचा दरवाजा ठोठावा. पण पश्चिम बंगालमध्ये धार्मिक भावना भडकावून हिंसा, हिंदुंची हत्या करत कायद्याला विरोध म्हणजे संविधानाचा अपमान आहे, अशी टीका शनिवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केली.
पश्चिम बंगालमधील हिंदू नरसंहाराविरोधात भारतीय जनता पक्षाच्या बंगाली प्रकोष्ठच्या वतीने प्रदेश कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ नेते विजय तथा भाई गिरकर, बंगाली प्रकोष्ठचे संयोजक रंजन चौधरी, सुभागत दास, सरचिटणीस निरंजन बोस, मीरा रोडच्या प्रकोष्ठच्या महिला अध्यक्ष मंजुला बसक, रहिम दत्ता आदी उपस्थित होते. प. बंगालमध्ये हिंदुंच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी भाजप बंगाली प्रकोष्ठच्या वतीने या वेळी करण्यात आली.
या वेळी अॅड. शेलार म्हणाले की, ममता सरकार हिंदूंवर करत असलेल्या निघृण अत्याचाराविरोधात भाजप उभी आहे. आतंकवादाला धर्म नसतो असे म्हणतात, पण मग दहशतवादी हल्ल्यात एका विशिष्ट धर्माचे लोकच का असतात ? असा सवाल त्यांनी केला. प. बंगालमधील ममता सरकारच्या लांगूलचालनाच्या राजकारणामुळे कट्टरतावादी शक्तींना प्रोत्साहन मिळत असून, तेथे राजरोसपणे हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मुर्शिदाबाद घटना अत्यंत निंदनीय आहे. तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि हिंदुंना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी शनिवारी भाजप बंगाली प्रकोष्ठच्या वतीने आंदोलनावेळी करण्यात आली.
खळबळजनक…! अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार; गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघडक
Newsworldmarathi Mumbai : मुंबईच्या नेरूळमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या नात्यातील अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गरोदर राहिलेली पीडित मुलगी प्रसूत झाली आहे. या घटनेनंतर नेरूळ पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात बलात्कारासह पॉक्सो कलमाखाली गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. यामुळे अल्पवयीन मुलाचे पीडित मुलीच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. गतऑगस्ट महिन्यामध्ये अल्पवयीन मुलगा पीडितेच्या घरी गेला होता. त्यावेळी घरामध्ये पीडित मुलगी एकटी असल्याची संधी साधून अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केले.
त्यानंतरदेखील या अल्पवयीन मुलाने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली, मात्र याबाबतची माहिती पीडित मुलीने आपल्या घरच्यांपासून लपवून ठेवली होती. चार दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या पोटात दुखत होते. त्यानंतर ती गरोदर असल्याचे तिच्या कुटुंबीयांना समजले. त्यामुळे कुटुंबीयांकडून पीडित मुलीला सोलापूर येथील आपल्या मूळगावी नेण्यात आले.
त्यानंतर पीडित मुलगी प्रसूत झाली. पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा मुलगा हा नातेवाईकच असल्याचे समजल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पंढरपूर शहर पोलिसांनी सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी नेरूळ पोलिसांकडे वर्ग केला आहे. त्यानुसार नेरूळ पोलिसांनी याप्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
Mumbai Crime : शरीरसंबंधासाठी अल्पवयीन मुलीची हत्या; मृतदेह फेकला डोंगरात
Newsworldmarathi Mumbai : मुंबईतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शिरवणे एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने शरीरसंबंधासाठी १२ वर्षीय मुलीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. बेपत्ता मुलीचा मृतदेह गुरुवारी उशिरा एमआयडीसीतील डोंगराळ भागात सापडला. त्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी तपास करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी आणि मृतक अल्पवयीन मुलगी शिरवणे एमआयडीसीतील एकाच भागात राहण्यास आहेत. त्यामुळे या दोघांची चांगली ओळख होती. अल्पवयीन मुलाने डोंगराळ भागात मुलीकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र, नकार दिल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादानंतर झालेल्या भांडणात मुलाने रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात दगड घालून हत्या केली.
त्यानंतर त्याने मुलीचा मोबाईल सोबत घेऊन त्या ठिकाणावरून पळ काढला. मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, मात्र ती न सापडल्याने तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या तक्रारीवरून तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला होता. या शोधमोहिमेदरम्यान रात्री मोबाईल परत देण्यासाठी गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
अल्पवयीन मुलाने हत्या केलेल्या मुलीचा मोबाईल रस्त्यावर भेटल्याचे सांगून तिच्या कुटुंबीयांना रात्री आणून दिला. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व मुलीच्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केला. या तपासात मुलगा खोटी माहिती देत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने हत्या केल्याची कबुली दिली.
‘वेळ आलीय एकत्र येण्याची… ‘ ठाकरेंच्या शिवसेनेची सूचक पोस्ट; उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना साद…
Newsworldmarathi Mumbai : मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे. शिवसैनिक यासाठी तयार आहेत, अशी समाजमाध्यमावर पोस्ट करत ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेला पुन्हा एकदा साद घातली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची जोरात सुरू झालेली चर्चा ठाकरे बंधूंच्या परदेश दौऱ्यामुळे काहीशी थंडावलेली दिसत होती. मात्र, ही पोस्ट करत शिवसेनेने (ठाकरे) पुन्हा एकदा हवा भरल्याचे दिसत आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या समाजमाध्यमावरील अधिकृत अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या फोटोसह शेअर केलेल्या या फोटोमध्ये ‘वेळ आलीय, एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी,’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकजूट होऊन काम करण्याचा निर्धार शिवसैनिकांचा (ठाकरे) असल्याचे सांगणाऱ्या या पोस्टद्वारे उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना युतीसाठी निमंत्रण दिले असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. असे असले तरी एकत्र येण्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वापुढे आमच्यातील भांडण आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. ते बाजूला ठेवून एकत्र राहणे ही फार काही कठीण गोष्ट नाही. महाराष्ट्राच्या कल्याणाच्या मार्गात माझा अहंकार आडवा येऊ देणार नाही. परंतु हा विषय माझ्या एकट्याच्या इच्छेचा नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत एकत्र काम करण्याची तयारी दर्शवली होती.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील तत्काळ त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राज ठाकरे यांचा प्रस्ताव स्वीकारताना महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास सहमती दर्शवली होती. माझे कधीही मतभेद नव्हते. तरीही मी सर्व वाद बाजूला ठेवत एकत्र येण्यास तयार असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलं होत. त्यानंतर शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Ajit Pawar News : परभणीत अजित पवारांच्या ताफ्यावर फेकला चुना; नेमकं काय घडलं? घ्या जाणून
Newsworldmarathi Parbhani : ‘एक रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला’ या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करीत महाराष्ट्र राज्य किसान सभा, युवक काँग्रेस आणि भाकपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी जाताना त्यांच्या ताफ्यावर चुना फेकल्याची घटना घडली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक रुपयात पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांत तीव्र संताप निर्माण झाला आहे. पवार यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी व पीक विमा घोटाळ्यात सहभागींवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी चुना फेक आंदोलन करण्यात आले.
पोखर्णी नृसिंह येथे दर्शन घेऊन उपमुख्यमंत्री पवार जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी येत होते. तेव्हा आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर त्यांच्या ताफ्यासमोर चुन्याच्या डब्या फेकल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करीत युवक काँग्रेसचे अमोल जाधव, किसान सभेचे शिवाजी कदम, काँग्रेसचे रोहिदास बोबडे, सीपीआयचे शेख अब्दुल, स्वराज्य इंडियाचे गोविंद गिरी, यांना ताब्यात घेतले.
सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, सोयाबीनला ६ हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीच महाराष्ट्राच्या मतदारांना चुना लावला आहे. वास्तविक पाहता पीक विमा कंपन्यांनी मागील पाच वर्षांत ५० हजार कोटी रुपयांची कमाई केली. महाराष्ट्रात दररोज पाच ते सहा शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अर्थ मंत्रालयाने सामाजिक न्याय विभागाचा निधी कपात करून राज्यातील मागासवर्गीय समुदायाला चुना लावला आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
Mumbai Crime : वाढदिवशीच मुलीची हत्या करून आईची आत्महत्या; घटनेने परिसरात खळबळ
Newsworldmarathi Mumbai : तळोजा फेस- १ मध्ये विवाहितेने आपल्या ४ वर्षीय मुलीची उशीच्या सहाय्याने तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मानसिक तणावामुळे आलेल्या नैराश्यातून विवाहितेने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. गंभीर बाब म्हणजे या घटनेतील मुलीचा गुरुवारी वाढदिवस होता. तळोजातील मृत विवाहितेचे नाव सोनम अभिषेक केणी वय-३०) असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोनम, पती अभिषेक केणी व मुलीसोबत पेठाली गावात राहत होती. सोनम गुरुवारी दुपारी जेवण केल्यानंतर बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेली होती. मुलीच्या वाढदिवसाची तयारी करण्यासाठी अभिषेक दुपारी बाहेर गेला होता. याच कालावधीत सोनमने आपल्या मुलीची उशीने तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर तिनेदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली.
सायंकाळी सोनमच्या पतीने मोबाईलवर वारंवार संपर्क साधला. मात्र, ती फोन उचलत नसल्याने त्याने घरी धाव घेतली. त्यानंतर त्याने बंद असलेले बेडरुम उघडून पाहणी केली असता, सोनम गळफास घेतलेल्या स्थितीत, तर मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्यामुळे त्याने तत्काळ दोघांना रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी दोघांना दाखलपूर्व मृत घोषित केले.
दरम्यान, काही महिन्यापूर्वी सोनम गरोदर असताना, तिच्या मुलीचा जन्मताच मृत्यू झाला होता. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली आली होती. तसेच तिच्यावर उपचारसुद्धा सुरू होते. मात्र, मानसिक तणाव वाढल्याने गुरुवारी दुपारी तिने नैराश्यातून मुलीची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सोनमने हे कृत्य करण्यापूर्वी चिट्ठी लिहून ठेवली असून, त्यात तिने मला माफ करा, असा मजकूर लिहून ठेवला आहे.
आता शहरी परिवहन सेवा एकाच छत्राखाली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
Newsworldmarathi Mumbai: नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’साठी शहरी परिवहन व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आवश्यक असल्याचे स्पष्ट करत, यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण (युनि फाईड मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट ॲथॉरिटी) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत या प्राधिकरणाच्या कायद्यासाठी जनतेकडून सूचना व हरकती घेण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अॅथॉरिटी (UMTA) बिल, 2025’च्या संदर्भात आढावा बैठक पार पडली.
राज्यातील महानगरांच्या शहरी क्षेत्रातील वाहतूक प्रकल्पांचे नियोजन, नियमन आणि बजेट तयार करण्याच्या पद्धतीमध्ये यूएमटीएची स्थापना एक परिवर्तनकारी पाऊल असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बऱ्याच कालावधीपासून शहरी वाहतूक व्यवस्था अनेक वेगेवेगळ्या भागांमध्ये विखुरलेल्या आहेत. यासंदर्भात महानगरपालिका, राज्य परिवहन महामंडळ, मेट्रो आणि रेल्वे यांनी स्वतंत्रपणे आपापल्या व्यवस्था स्थापित केलेल्या आहेत. अनेक यंत्रणांच्या या बहुविविधतेमुळे अनेकदा जबाबदाऱ्यांमध्ये समन्वय, आव्हाने आणि प्रकल्प अंमलबजावणीत विलंब होतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या वेगवेगळ्या महानगरांमध्ये विविध यंत्रणांमार्फत कार्यरत असलेल्या परिवहन सेवा एकत्रित व सुसूत्र करण्यासाठी हे प्राधिकरण उपयुक्त ठरणार आहे. त्यात ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ स्वतंत्र पद असावे तसेच महापौर, मनपा आयुक्त यांच्याही त्यात समावेश असावा. या प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध सेवा एकाच भाड्यात उपलब्ध होतील आणि नियोजन एकसंध राहील. हे करताना राज्य व केंद्र सरकारच्या नियमांचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
शहरातील सुरू असलेल्या प्रकल्पांना वेग देणे, एकच नियामक यंत्रणा तयार करणे आणि ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ सुनिश्चित करणे या प्राधिकरणाच्या कामाचे केंद्रबिंदू असतील. प्रत्यक्ष अंमलबजावणी महापालिकेकडे राहील, तर नियोजन आणि सल्लागार भूमिका हे प्राधिकरण पार पाडेल, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्यात एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार; दिग्गज नेत्यांसह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश
Newsworldmarathi Akole : अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजातील युवा नेते मारूती मेंगाळ यांच्या समवेत भाजपा, राष्ट्रवादी व कॉग्रेससह इतर पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी, भाजपाला खिंडार पाडत शिवसेना भक्कम होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढणार आहे.
मेंगाळ यांच्यासोबत अकोले तालुक्यातील अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायतसमिती सदस्य, काही माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आज दुपारी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असून मारुती मेंगाळ हे शेकडो वाहनांचा ताफा घेऊन ठाण्याकडे रवाना झाले आहेत. मेंगाळ यांच्या शिवसेना प्रवेशाने अकोले तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेनेला मोठी ताकद मिळणार आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेत हा प्रवेश सोहळा झाल्यास तालुक्यातील मोठा राजकीय भूकंप ठरणार आहे. मारुती मेंगाळ हे तालुक्यातील आदिवासी भागातील ठाकर समाजाचे नेतृत्व असले तरी त्यांची बहुजन समाजावरही छाप असल्याने बहुजन समाज त्यांच्या पाठीमागे कायम उभा राहत असतो. ते अकोले पंचायत समितीचे उपसभापती असताना उल्लेखनीय काम केले असल्याने उपसभापती नावानेच त्याची ओळख झाली आहे.
हळदीच्या पेटंट विरुद्धचा भारताचा यशस्वी लढा
Newsworldmarathi Special : भारतीय संस्कृतीत हळद केवळ एक मसाल्यामध्ये गणला जाणारा पदार्थ नसून हळद आरोग्य, सण-समारंभ, आणि उपचारपद्धतींमधील एक अविभाज्य भाग आहे. मात्र एकेकाळी हीच हळद परदेशात पेटंटच्या वादात सापडली होती. परंतु भारत सरकारच्या सजगतेमुळे आणि वैज्ञानिक समुदायाच्या प्रयत्नांमुळे भारताने या पेटंटवर यशस्वीपणे शिक्कामोर्तब करून घेतला. हे प्रकरण केवळ हळदीपुरतं मर्यादित नाही राहिले तर भारताच्या प्राचीन ज्ञानाच्या संरक्षणासाठी टर्निंग पॉइंट ठरले आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
सन १९९५ मध्ये अमेरिकेतील University of Mississippi Medical Center ने हळदीचा जखमा भरून येण्यासाठी वापर यावर अमेरिकेच्या पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडून (USPTO) पेटंट घेतले. त्यांचं असं म्हणणं होतं की हळदीचा असा उपयोग करणे हा एक नवीन शोध आहे.
परंतु भारतात हळदीचा वापर हजारो वर्षांपासून आयुर्वेदात आणि घरगुती उपचारांमध्ये जखमांवर, सर्दी-खोकल्यावर, आणि त्वचारोगांवर केला जात आहे. त्यामुळे, हळदीचा हा उपयोग पारंपरिक ज्ञानाचा भाग आहे आणि त्यावर वैयक्तिक किंवा संस्था स्तरावर पेटंट मिळणे हे चुकीचे आहे.
भारत सरकारचा निर्णायक आक्षेप
भारतीय वैज्ञानिक संस्था Council of Scientific and Industrial Research (CSIR) ने या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी US Patent Office मध्ये आक्षेप नोंदवला आणि सांगितले की हळदीचा औषधी वापर हा काही नवीन नाही, तर पारंपरिक आहे. यासाठी त्यांनी साहित्यपुरावे, आयुर्वेदिक शास्त्रातील उल्लेख, आणि प्राचीन ग्रंथांतील माहिती देखील सादर केली. ‘शारंगधर संहिता’, ‘चरक संहिता’ आणि ‘सुश्रुत संहिता’ या ग्रंथांमध्ये हळदीचा उपयोग अनेक आजारांवर झाल्याचे स्पष्ट उल्लेख आहेत.
भारताच्या बाजूने ऐतिहासिक निकाल
या पुराव्यांच्या आधारे, १९९७ मध्ये अमेरिकेच्या पेटंट कार्यालयाने ते पेटंट रद्द केले. हे पेटंट रद्द होणं म्हणजे भारताच्या प्राचीन ज्ञानासाठी आणि बौद्धिक संपदेच्या संरक्षणासाठी मिळालेले ऐतिहासिक यश होते.
‘Traditional Knowledge Digital Library’ (TKDL) ची स्थापना
या प्रकरणानंतर भारताने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले, ते म्हणजे पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी (TKDL) ची स्थापना. CSIR आणि AYUSH मंत्रालयाच्या पुढाकाराने तयार झालेली या डिजिटल लायब्ररीमध्ये आजघडीला 2 लाखांहून अधिक पारंपरिक औषधांच्या फॉर्म्युलेशनची माहिती पाच आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे भविष्यात कुणीही चुकीचे पेटंट घेण्याचा प्रयत्न केला, तर सादर करण्यासाठी भारताकडे त्वरित प्रमाणित पुरावे असतील.
हळदी प्रकरणानंतर भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर अन्य विजय
हळदी प्रमाणेच भारताने नीमच्या किटकनाशक गुणधर्मांवर घेतलेले पेटंट आणि बासमती तांदळाच्या जातीवर केलेले दावे यावरही यशस्वी लढा दिला आहे.
हळदीच्या पेटंट लढ्यात सहभागी प्रमुख व्यक्ती व संस्था
1. डॉ. रघुनाथ माशेलकर (Dr. Raghunath Mashelkar)
लढ्याच्या या काळात ते CSIR चे महासंचालक होते.
त्यांनी पेटंट रद्द करण्यासाठी जागतिक स्तरावर पुरावे गोळा करून USPTO मध्ये सादर करण्याचे नेतृत्व केले.
त्यांचा दृष्टीकोन होता की पारंपरिक ज्ञानाला वैज्ञानिक व कायदेशीर पाठबळ देऊन जागतिक संरक्षण दिले पाहिजे.
2. CSIR – Council of Scientific and Industrial Research
ही भारत सरकारची प्रमुख वैज्ञानिक संस्था असून, त्यांनी या केसचा पूर्ण कायदेशीर व वैज्ञानिक अभ्यास केला.
CSIR च्या बौद्धिक संपदा विभागाने पेटंटविरोधातील औपचारिक आक्षेप अर्ज तयार केला.
3. Dr. V.K. Gupta
CSIR च्या पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी (TKDL) प्रकल्पाचे मुख्य.
त्यांनी हळदीसारख्या औषधी वनस्पतींचा पारंपरिक वापराचे दस्तऐवजीकरण करून जागतिक स्तरावर सादर करण्यासाठी दिशा दिली.
4. Legal Experts and Patent Attorneys (CSIR टीम अंतर्गत)
अमेरिकेच्या पेटंट कार्यालयात युक्तिवाद करण्यासाठी खास कायदेतज्ज्ञ आणि पेटंट अॅटर्नी नेमण्यात आले.
त्यांनी भारतीय पुरावे (जसे की आयुर्वेदिक ग्रंथ, दस्तऐवज) पेटंट ऑफिससमोर प्रभावीपणे मांडले.
5. TKDL (Traditional Knowledge Digital Library)
या लायब्ररीमुळे भारताला हजारो पारंपरिक उपचार पद्धतींचा वैज्ञानिक पुरावा दाखवता आला.
हळदीच्या पेटंट प्रकरणाने एक गोष्ट ठामपणे सिद्ध केली ती म्हणजे भारताचे प्राचीन ज्ञान हा केवळ वारसा नसून, ती आपल्या भारत देशाची बौद्धिक संपदा आहे आणि ती जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असावी आणि संरक्षित ठेवली जावी. भारताने विज्ञान, संस्कृती आणि कायद्याचा योग्य मेळ घालून यशस्वी लढा दिला आणि जगाला दाखवून दिले की भारतीय पारंपरिक ज्ञान मूल्यवान तर आहेच आहे पण वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध देखील आहे.
लेखक – अक्षय बनकर
वाल्मिक कराडला पॅनिक अटॅक; डॉक्टरांकडून तपासणी
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. वाल्मिक कराड हा बीड मध्यवर्ती कारागृहात अटकेत आहे. सीआयडीकडे त्याच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्याचा मुक्काम पुढचे अनेक दिवस जेलमध्ये राहणार असल्याची शक्यता आहे. असं असताना त्याच्याबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे. वाल्मिक कराड याला जेलमध्ये पॅनिक अटॅक आल्याची माहिती. त्याला पॅनिक अटॅक आल्याने डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आहे.
वाल्मिक कराड याला दुपारच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागलं. त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्याची तपासणी केली असता त्याला पॅनिक अटॅक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केल्याची माहिती आहे.
त्याची प्रकृती बिघडल्यानंतर साहजिकच डॉक्टरांकडून त्याला योग्य तो औषोधपचार दिला जाईल. वाल्मिक कराडच्या पॅनिक अटॅकच्या वृत्तावर कुणाकडून काही नवीन माहिती दिली जाते का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.

