Homeस्पेशलहळदीच्या पेटंट विरुद्धचा भारताचा यशस्वी लढा

हळदीच्या पेटंट विरुद्धचा भारताचा यशस्वी लढा

Newsworldmarathi Special : भारतीय संस्कृतीत हळद केवळ एक मसाल्यामध्ये गणला जाणारा पदार्थ नसून हळद आरोग्य, सण-समारंभ, आणि उपचारपद्धतींमधील एक अविभाज्य भाग आहे. मात्र एकेकाळी हीच हळद परदेशात पेटंटच्या वादात सापडली होती. परंतु भारत सरकारच्या सजगतेमुळे आणि वैज्ञानिक समुदायाच्या प्रयत्नांमुळे भारताने या पेटंटवर यशस्वीपणे शिक्कामोर्तब करून घेतला. हे प्रकरण केवळ हळदीपुरतं मर्यादित नाही राहिले तर भारताच्या प्राचीन ज्ञानाच्या संरक्षणासाठी टर्निंग पॉइंट ठरले आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी
सन १९९५ मध्ये अमेरिकेतील University of Mississippi Medical Center ने हळदीचा जखमा भरून येण्यासाठी वापर यावर अमेरिकेच्या पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडून (USPTO) पेटंट घेतले. त्यांचं असं म्हणणं होतं की हळदीचा असा उपयोग करणे हा एक नवीन शोध आहे.

परंतु भारतात हळदीचा वापर हजारो वर्षांपासून आयुर्वेदात आणि घरगुती उपचारांमध्ये जखमांवर, सर्दी-खोकल्यावर, आणि त्वचारोगांवर केला जात आहे. त्यामुळे, हळदीचा हा उपयोग पारंपरिक ज्ञानाचा भाग आहे आणि त्यावर वैयक्तिक किंवा संस्था स्तरावर पेटंट मिळणे हे चुकीचे आहे.

भारत सरकारचा निर्णायक आक्षेप

भारतीय वैज्ञानिक संस्था Council of Scientific and Industrial Research (CSIR) ने या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी US Patent Office मध्ये आक्षेप नोंदवला आणि सांगितले की हळदीचा औषधी वापर हा काही नवीन नाही, तर पारंपरिक आहे. यासाठी त्यांनी साहित्यपुरावे, आयुर्वेदिक शास्त्रातील उल्लेख, आणि प्राचीन ग्रंथांतील माहिती देखील सादर केली. ‘शारंगधर संहिता’, ‘चरक संहिता’ आणि ‘सुश्रुत संहिता’ या ग्रंथांमध्ये हळदीचा उपयोग अनेक आजारांवर झाल्याचे स्पष्ट उल्लेख आहेत.

भारताच्या बाजूने ऐतिहासिक निकाल

या पुराव्यांच्या आधारे, १९९७ मध्ये अमेरिकेच्या पेटंट कार्यालयाने ते पेटंट रद्द केले. हे पेटंट रद्द होणं म्हणजे भारताच्या प्राचीन ज्ञानासाठी आणि बौद्धिक संपदेच्या संरक्षणासाठी मिळालेले ऐतिहासिक यश होते.

Traditional Knowledge Digital Library’ (TKDL) ची स्थापना

या प्रकरणानंतर भारताने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले, ते म्हणजे पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी (TKDL) ची स्थापना. CSIR आणि AYUSH मंत्रालयाच्या पुढाकाराने तयार झालेली या डिजिटल लायब्ररीमध्ये आजघडीला 2 लाखांहून अधिक पारंपरिक औषधांच्या फॉर्म्युलेशनची माहिती पाच आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे भविष्यात कुणीही चुकीचे पेटंट घेण्याचा प्रयत्न केला, तर सादर करण्यासाठी भारताकडे त्वरित प्रमाणित पुरावे असतील.

हळदी प्रकरणानंतर भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर अन्य विजय

हळदी प्रमाणेच भारताने नीमच्या किटकनाशक गुणधर्मांवर घेतलेले पेटंट आणि बासमती तांदळाच्या जातीवर केलेले दावे यावरही यशस्वी लढा दिला आहे.

हळदीच्या पेटंट लढ्यात सहभागी प्रमुख व्यक्ती व संस्था

1. डॉ. रघुनाथ माशेलकर (Dr. Raghunath Mashelkar)

लढ्याच्या या काळात ते CSIR चे महासंचालक होते.

त्यांनी पेटंट रद्द करण्यासाठी जागतिक स्तरावर पुरावे गोळा करून USPTO मध्ये सादर करण्याचे नेतृत्व केले.

त्यांचा दृष्टीकोन होता की पारंपरिक ज्ञानाला वैज्ञानिक व कायदेशीर पाठबळ देऊन जागतिक संरक्षण दिले पाहिजे.

2. CSIR – Council of Scientific and Industrial Research

ही भारत सरकारची प्रमुख वैज्ञानिक संस्था असून, त्यांनी या केसचा पूर्ण कायदेशीर व वैज्ञानिक अभ्यास केला.

CSIR च्या बौद्धिक संपदा विभागाने पेटंटविरोधातील औपचारिक आक्षेप अर्ज तयार केला.

3. Dr. V.K. Gupta

CSIR च्या पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी (TKDL) प्रकल्पाचे मुख्य.

त्यांनी हळदीसारख्या औषधी वनस्पतींचा पारंपरिक वापराचे दस्तऐवजीकरण करून जागतिक स्तरावर सादर करण्यासाठी दिशा दिली.

4. Legal Experts and Patent Attorneys (CSIR टीम अंतर्गत)

अमेरिकेच्या पेटंट कार्यालयात युक्तिवाद करण्यासाठी खास कायदेतज्ज्ञ आणि पेटंट अ‍ॅटर्नी नेमण्यात आले.

त्यांनी भारतीय पुरावे (जसे की आयुर्वेदिक ग्रंथ, दस्तऐवज) पेटंट ऑफिससमोर प्रभावीपणे मांडले.

5. TKDL (Traditional Knowledge Digital Library)

या लायब्ररीमुळे भारताला हजारो पारंपरिक उपचार पद्धतींचा वैज्ञानिक पुरावा दाखवता आला.

हळदीच्या पेटंट प्रकरणाने एक गोष्ट ठामपणे सिद्ध केली ती म्हणजे भारताचे प्राचीन ज्ञान हा केवळ वारसा नसून, ती आपल्या भारत देशाची बौद्धिक संपदा आहे आणि ती जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असावी आणि संरक्षित ठेवली जावी. भारताने विज्ञान, संस्कृती आणि कायद्याचा योग्य मेळ घालून यशस्वी लढा दिला आणि जगाला दाखवून दिले की भारतीय पारंपरिक ज्ञान मूल्यवान तर आहेच आहे पण वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध देखील आहे.

लेखक – अक्षय बनकर

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments