आरोग्याची काळजी घेणारे ते देवदूतच : संदीप खर्डेकर

0
Newsworldmarathi Pune : मशाल संस्थेच्या माध्यमातून वस्ती विभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे देवदूतच आहेत असे गौरवोदगार क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी काढले.आज मशाल संस्थेच्या आरती भोर आणि कविता तडवी यांना ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणी साठी सात (7) रक्तदाब तपासणी यंत्र भेट देताना कर्तव्यपूर्तीचे समाधान आहेच पण भविष्यात देखील त्यांना अधिकाधिक सहाय्य करणार असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले. यावेळी ट्रस्ट चे सदस्य सारंग राडकर, सोशल वर्कर आणि मशाल च्या कम्युनिटी ऑफिसर आरती भोर, कविता तडवी, वंशिका ट्रस्ट चे विशाल सातपुते इ मान्यवर उपस्थित होते. मशाल संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करणाऱ्या व त्यांना औषधोपचार उपलब्ध करून देणाऱ्या आरती भोर व कविता तडवी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्यात हाडांचा ठिसूळपणा, रक्तदाब, मधुमेह इ आरोग्याच्या समस्या वाढल्या असून परिस्थिती मुळे ते दुखणं अंगावर काढतात असे सांगितले. त्यावर संदीप खर्डेकर यांनी “ग्लोबल ग्रूप, वेस्टर्न इंडिया फोर्जिंग, नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट” या सह अनेक दानशूर अश्या कार्याला मदत करत असतात त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला जी मदत लागेल ती उपलब्ध करेन असे वचन दिले.

सेवाधर्म हाच मानव धर्म : मोहन भागवत

0
Newsworldmarathi Pune : हिंदू धर्म हा शाश्वत धर्म असून, या चिरंतन व सनातन धर्मातील आचार्य सेवाधर्माचे पालन करतात, हा सेवा धर्म म्हणजेच मानव धर्म आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काढले. हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेच्या वतीने शिक्षण प्रसारक मंडळीच्या महाविद्यालयाच्या मैदानात हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या २२ डिसेंबर पर्यंत हा महोत्सव सुरु आहे. हिंदू संस्कृती, संस्कार आणि सामाजिक सेवाकार्याची माहिती सादर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक देवस्थाने, सामाजिक, धार्मिक संस्था, मठ मंदिरांच्या सेवाकार्याचा त्यात सहभाग आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वामी गोविंददेवगिरी महाराज, ज्योतिष तज्ञ लाभेश मुनीजी महाराज, इस्कॉनचे गौरांग प्रभू, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड.एस. के जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, हिंदू सेवा महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा आदी मान्यवर उपस्थित होते. सरसंघचालक डॉ. भागवत पुढे म्हणाले की, सेवा करताना कायम प्रसिद्धी पासून दूर राहण्याचा आपला स्वभाव असतो. दिखाव्यासाठी सेवा न करता ती निरंतर करत राहणारे सेवेची कामना करतात.सेवेचा धर्म सांभाळताना अतिवादी न होता त्याचा मध्यम मार्ग आपण देशकाल परिस्थितीनुसार स्वीकारायला हवा. मानव धर्म हाच विश्वाचा धर्म असून तो सेवेतून प्रकट व्हावा. आपण विश्वशांतीसाठी घोषणा देतो मात्र अल्पसंख्यांकांची काय अवस्था इतरत्र आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तीन हजार वर्षापेक्षा अधिक परंपरा असलेले शस्त्र, वाचन, इतिहास,स्वभाव आपले आहे. ते पाहणे आणि अंगीकारणे, पुढील पिढ्यांना त्यातून प्रेरणा देणे यासाठी असे हिंदू सेवा महोत्सवासारखे उपक्रम आहेत. पोट भरण्यासाठी आवश्यक ते केलेच पाहिजे पण गृहस्थाश्रमापलीकडे आपण जे जे मिळाले आहे ते सेवा रूपाने दुप्पट द्यायला हवे. जग आपले प्रतिपालक आहे.उपभोगाची वस्तू नाही हि भावना असेल तर परिवार समाज, गाव देश, राष्ट्र यांची मुक्त सेवा करण्याची प्रेरणा आणि अनुकरण आपण करावे. यासाठी अशा महोत्सवातून सेवाव्रत घेऊन चालूया असा संदेशही त्यांनी दिला. यावेळी स्वामी गोविंद देव गिरी महाराज म्हणाले की, भूमी समाज परंपरा यातून राष्ट्र बनते.पुण्याच्या भूमीची सेवा छ. शिवाजी महाराजांनी केली असून राजमाता जिजाऊ यांनी पुण्यभूमीत गणेशाची स्थापना केलेली आहे.सर्व संस्कारांचे शिखर सेवा असून सेवा हि पूजा आहे. दानाचा अर्थ माझ्याजवळ जे आहे त्यातील दान हे शेअरिंग असून उपकार नाही.नव्या पिढीत भाव जागरणाचे काम या हिंदू सेवा महोत्सवातून होणार आहे. इस्कॉनचे प्रमुख गौरांग प्रभू यांनी हिंदू सनातन धर्माअंतर्गत परोपकार, आचारविचार आणि साक्षात्कार हे ३ मुद्दे येतात. ते एकमेकांशी एकरूप झाले की आत्मसाक्षात्कारातून आपण त्यावर प्रभुत्व मिळवू शकतो. हिंदू, जैन, बौद्ध, शीख यातील कोणीच वेगळे नाही सर्व एकच आहेत.असे सांगितले. तर लाभेश मुनी महाराज यांनी आपल्या गौरवशाली धर्माचा आत्मा एकच असून सेवाकुंभ सुरु झाला आहे.येणाऱ्या पिढ्यांना संस्कृतीची परिभाषा सांगताना हिंदू सेवा महोत्सव अग्रस्थानी असेल. असेही ते म्हणाले. यावेळी गुणवंत कोठारी यांनी देशभरात सुरु असणाऱ्या हिंदू सेवा महोत्सव आणि त्याची गरज याविषयी माहिती दिली. कृष्णकुमार गोयल यांनी प्रास्ताविक केले. हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा यांनी स्वागत केले. सुनंदा राठी आणि संजय भोसले यांनी प्रास्ताविक केले. पसायदानाने उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली. यावेळी मूक बधीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर केल्या.

शाळेतील स्नेहसंमेलनात हृदयविकाराच्या झटक्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

0
Newsworldmarathi Pimpri : राजगुरुनगरमधील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थिनी स्नेहा एकनाथ होले हिचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यूची घटना हृदयद्रावक आहे. सकाळच्या वेळी शाळेत स्नेहसंमेलन कार्यक्रमादरम्यान अस्वस्थ वाटत असल्याने तिला चक्कर आली. शिक्षकांनी तत्काळ तिला खाजगी रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. लहान वयातील शाळकरी मुलीच्या अशा अचानक मृत्यूमुळे राजगुरुनगर शहरात शोक व्यक्त केला जात आहे.

पराभूत उमेदवारात सापडला भाजपला ‘राम’

Newsworldmarathi Nagpur : कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे रोहित पवार यांना निवडणुकीत दमछाक करायला लावणाऱ्या राम शिंदेना पराभूत होऊन देखील भाजपकडून विधानपरिषदेचे सभापती म्हणून संधी देण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड ही भारतीय जनता पक्षासाठी आणि महायुतीसाठी महत्त्वाची राजकीय कामगिरी मानली जाते. महाविकास आघाडीने उमेदवार न उभा केल्याने ही निवड बिनविरोध झाली. राम शिंदे यांची निवड युतीतील एकत्रित संख्याबळाचे प्रदर्शन ठरले आहे, ज्यामुळे विधानपरिषदेतही युतीचा प्रभाव अधिक बळकट होईल. राम शिंदे हे भाजपमधील वरिष्ठ नेते असून, त्यांचा अनुभव आणि नेतृत्व क्षमता लक्षात घेता त्यांना सभापतीपदासाठी निवडण्यात आले आहे. ही निवड महायुतीच्या राजकीय धोरणांमध्ये स्थिरता आणि गती आणण्यास महत्त्वपूर्ण ठरेल. राम शिंदे यांनी केली एक्सवर पोस्ट : आमदार राम शिंदे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये जे आभार व्यक्त केले आहेत, त्यात त्यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत महायुतीच्या सर्व नेत्यांचे विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, अमित शहा, जे पी नड्डा आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले. हे आभार राम शिंदे यांच्या विधानपरिषद सभापतीपदी उमेदवारी जाहीर झाल्यानंतरचे आहेत, आणि या नेत्यांच्या समर्थनामुळे त्यांना या पदासाठी अधिक मजबुती मिळाली आहे. हे आभार व्यक्त करत असताना, राम शिंदे यांनी महायुतीच्या एकजुटीचा उल्लेख केला आहे, जो त्यांच्या निवडीसाठी महत्त्वपूर्ण ठरला. त्यांच्या या पोस्टमध्ये एकजुटीचा आणि भाजप-महायुतीच्या समर्पणाचा संदेश आहे. कोण आहेत राम शिंदे? राम शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू सहयोगी मानले जाते. 2014 मध्ये विधानसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. 2019 मध्ये कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांच्याकडून पराभव झाल्यानंतर भाजपने त्यांना विधानपरिषद सदस्यपदी निवडले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांना रोहित पवार यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला, पण या पराभवाचे कारण फडणवीस आणि शिंदे यांची रणनीती त्याच्याकडे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, विधानपरिषद सभापती म्हणून त्यांच्या निवडीमुळे राम शिंदे यांची राजकीय उंची आणि प्रभाव अधिक वाढला आहे.राम शिंदे आता या विधान परिषदेचे सभापती म्हणून कसे काम करणार विरोधकांना पण न्याय देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

लवकरच जयंत पाटील योग्य निर्णय घेणार का?

0
नागपूर विधानभवन परिसरात महाविकास आघाडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्रासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याविरोधात तीव्र आंदोलन केले. शिवसेना (उद्धव गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), आणि काँग्रेसचे प्रमुख नेते व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. मात्र, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची या आंदोलनातील अनुपस्थिती विशेषतः चर्चेचा विषय ठरली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अमित शहांच्या वक्तव्याला महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान ठरवून निषेध व्यक्त केला. Lअमित शहांनी केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकीय तणाव वाढला आहे. महाविकास आघाडीने राज्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी एकत्र येत भाजपविरोधात लढा देण्याचे ठाम संकेत दिले. जयंत पाटील यांची अनुपस्थिती का चर्चेत? जयंत पाटील हे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असून, त्यांच्या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फुटले आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते, जयंत पाटील यांची अनुपस्थिती पक्षांतर्गत मतभेद किंवा वैयक्तिक कारणांमुळे असू शकते. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्यांपैकी एक असून, त्यांच्या अनुपस्थितीने पक्षाच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आंदोलनावेळी उपस्थित इतर महत्त्वाच्या नेत्यांनी मात्र आपापल्या भूमिकांवर ठाम राहत अमित शहांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. जयंत पाटील यांच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीत अंतर्गत विसंवादाच्या शक्यतेवर चर्चा होत असून, आगामी काळात त्याची अधिक स्पष्टता होईल. योग्य वेळेला योग्य निर्णय घेतो, असे म्हणणाऱ्या जयंत पाटलांची जोरदार चर्चा सुरू झाली. जयंत पाटील काही निर्णय घेणार का? याची राजकीय चर्चा सुरू झाली.

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पाटणा पायरेट्स संघाची बंगाल वॉरियर्सवर मात

0
Newsworldmarathi Pune : पाटणा पायरेट्स संघाने बंगाल वॉरियर्सवर ४१-३७ अशी मात केली आणि प्रो कबड्डी स्पर्धेत प्ले ऑफ मध्ये प्रवेश केला.मध्यंतराला पाटणा संघाने १९-१८ अशी आघाडी घेतली होती श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन स्पर्धेत पाटणा संघाने यंदाच्या मोसमात झालेल्या वीस सामन्यांपैकी आठ सामने जिंकले होते तर तेलुगु टायटन्स संघाने आतापर्यंत २० सामन्यांमध्ये अकरा विजय मिळवले होते. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी हे दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करीत असल्यामुळेच आजचा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा होता. दोन्ही संघांनी सुरुवातीपासून आघाडी घेण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न केले मात्र पाटणा संघाच्या खेळाडूंनी केलेल्या चुकांमुळे तेलुगु संघाने त्यांच्यावर पहिला लोण चढविला. हा लोण स्वीकारल्यानंतरही पाटणा संघाची जिद्द कायम होती. त्यामुळेच त्यांनी पिछाडी भरून काढीत मध्यंतराला एक गुणाची नाममात्र आघाडी मिळवली होती.‌ उत्तरार्धात सुरुवातीलाच त्यांनी लोण चढविला आणि सामन्यातील रंगत वाढवली.‌ शेवटची दहा मिनिटे बाकी असताना त्यांच्याकडे तीन गुणांची आघाडी होती. त्यांचा भरवशाचा खेळाडू देवांक याने खोलवर चढाया करीत आपल्या संघास अधिकाधिक गुण मिळवून दिले. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना पाटणा संघाने ३८-३१ अशी आघाडी घेतली होती. ही आघाडी कमी करण्यासाठी बंगालच्या संघाने केलेले प्रयत्न अपुरे ठरले

आयटी कर्मचाऱ्यांसाठी मेट्रोची खास भेट: नेहा पंडित यांची घोषणा

Newsworldmarathi Pune : हिंजवडी आणि खराडी या दोन प्रमुख आयटी पार्कांना जोडण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. या प्रस्तावित मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दळणवळण अधिक सोयीस्कर होण्याची शक्यता आहे. असे पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयटीसीएमआरएल) च्या संचालक नेहा पंडित यांनी सांगितले. पुण्याच्या श्रमिक पत्रकार संघाच्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वाहतूक समस्या कमी होणार: हिंजवडी आणि खराडी या दोन्ही आयटी हबमधील दळणवळण सुधारण्यासाठी प्रस्तावित मेट्रो लाईन महत्त्वपूर्ण ठरेल. सध्या या दोन भागांदरम्यान प्रवासासाठी खासगी वाहने किंवा बसेसवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे वाहतुकीचा ताण आणि ट्रॅफिक जाम मोठ्या प्रमाणावर होतो. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. जिथे सध्या 1-2 तास लागतात, तिथे मेट्रोमुळे 30-40 मिनिटांत पोहोचणे शक्य होईल. हिंजवडी ते खराडी मेट्रो जोडल्याने आयटी तील तरुण तरुणीना मोठा फायदा होणार आहे. वाहतूक कोडी कमी होण्याचीही शक्यता आहे. नवीन रोजगार संधी: हिंजवडी आणि खराडी या दोन प्रमुख आयटी पार्कांना मेट्रोद्वारे जोडल्यामुळे या क्षेत्रांतील व्यवसाय वाढीस चालना मिळेल. दोन्ही आयटी हबमध्ये कार्यक्षम आणि सोयीस्कर दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाल्याने अधिक कंपन्या या भागात गुंतवणूक करतील, ज्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल. आयटी हबशी संबंधित सेवा जसे की, हॉटेल्स, कॅफे, वाहतूक सेवा, प्रशिक्षण केंद्रे, आणि इतर सहयोगी उद्योगांना मागणी वाढेल, ज्यामुळे रोजगार वाढ होईल. हा उपक्रम पुण्यातील आयटी क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देईल. हिंजवडी-खराडी मेट्रो कनेक्टिव्हिटी लवकरात लवकर प्रत्यक्षात येईल, अशी आयटी कर्मचाऱ्यांची आणि पुणेकरांची अपेक्षा आहे. मेट्रोने प्रवास करण्यास नागरिकांनी प्राधान्य द्यावे : पुणे मेट्रोसाठी दोन वेगवेगळ्या कंपनी काम करत असून त्यांच्यात समन्वय आहे. मेट्रो कामात तंत्रज्ञान महत्वाचे असते. परदेशाप्रमाणे रिमोटवर चालणाऱ्या आमच्याकडे स्वयंचलित ट्रेन आहे. थर्ड रेल तंत्रज्ञानद्वारे ओव्हर हेड वायर मेट्रोला न देता करंटवर ट्रेन चालेल, त्यामुळे वायर जंजाळ दिसणार नाही. तसेच मेट्रो दरवाजा यांना केवळ अर्धी काच बाहेर पाहण्यासाठी न ठेवता, संपूर्ण काचेचे दरवाजा करण्यात येणार आहे. मेट्रो प्रवास करण्यास नागरिकांनी प्राधान्य दिले पाहिजे, असे मत पुणे आयटी सीटी मेट्रो रेल लिमिटेडचे संचालक नेहा पंडित यांनी व्यक्त केले.

संघाचा इतिहास संग्रहालयामुळे नव्या पिढीसमोर येईल : भागवत

0
Newsworldmarathi Pune : योग्य गोष्टी समाजापुढे मांडल्या गेल्या नाहीत, तर अयोग्य गोष्टी समाजापुढे येतात. या पार्श्वभूमीवर संघाच्या घोषाचा समग्र इतिहास एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या घोष अभिलेखागाराचे महत्त्व खूप मोठे आहे. अभिलेखागारामुळे घोषाचा योग्य इतिहास नव्या पिढीसमोर येईल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय घोष संग्रहालयाचे उद्घाटन डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. संघाच्या पुण्यातील ‘मोतीबाग’ कार्यालयात घोष संग्रहालय आणि अभिलेखागार (अर्काइव) हा प्रकल्प साकारला असून संघाच्या घोषासंबंधीची विस्तृत माहिती आणि वाद्ये येथे संग्रहित करण्यात आली आहेत. घोषासंबंधीचे ग्रंथ, पुस्तके, लेख आणि विविध प्रकारची सामग्री येथे मांडण्यात आली आहे. घोष विषयाच्या अभ्यासकांना तसेच या विषयातील तज्ज्ञांना येथे संशोधन तसेच अध्ययनही करता येणार आहे. संघाच्या घोष विभागाचा इतिहास नव्या पिढीला माहिती होणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळात घोष विभाग कसा होता आणि तो कसा विकसित होत गेला याची माहिती एकाच ठिकाणी संग्रहित असणे आवश्यक होते. हे काम येथील अभिलेखागारामुळे झाले आहे, असे डॉ. भागवत म्हणाले. प्रांगणीय संगीताची परंपरा भारतातून लुप्त झाली होती. हे प्रांगणीय संगीत भारतीय संगीताच्या दालनात पुन्हा संघामुळेच आले. प्रांगणीय किंवा मैदानी संगीताचे पुनरुज्जीवन ही संघाच्या घोषाची विशेषता आहे, असेही डॉ. भागवत यांनी सांगितले. अभिलेखागार प्रमुख मोरेश्वर गद्रे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. संघाच्या पश्चिम क्षेत्राचे शारीरिक शिक्षण प्रमुख सुनील देसाई यांची यावेळी प्रमुख उपस्थती होती. सुहास धारणे यांनी सूत्रसंचालन केले.

चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांना तेजस्विनी पुरस्कार

0
Newsworldmarathi Pune : प्रशासकीय सेवेत प्रदीर्घकाळ प्रामाणिकपणाने दिलेल्या योगदानाबद्दल चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने पुणे महापालिकेच्या उपायुक्त आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्कार देऊन आज विशेष सन्मान करण्यात आला. गणेश कला क्रीडा मंदिरात रंगलेल्या सोहळ्यामध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्यात आला. माजी आमदार अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते शाल, मोत्याची माळ, ज्ञानेश्वरी, श्रीफळ आणि जिजाऊ-शिवबा यांचे शिल्प असलेले विशेष स्मृतीचिन्ह देऊन आशा राऊत यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार मा. अश्विनीताई जगताप, ऐश्वर्या रेणुसे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलासराव मडगिरी, उद्योजक नवीनशेठ लायगुडे, नगरसेवक राजेंद्रजी जगताप, वरिष्ठ पत्रकार व लेखक पराग पोतदार, विलासराव भणगे, भास्कर शेटे, सचिनजी डिंबळे, मुख्याध्यापिका शर्मिला पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यानी मल्लखांब प्रात्यक्षिकासह विविध नृत्यांतून कलागुण सादर केले. उपस्थितांना संबोधित करताना अश्विनीताई जगताप म्हणाल्या, तेजस्विनी पुरस्काराने आज ज्यांना सन्मान केल्या त्या आशाताई राऊत यांचे काम खरोखरीच उल्लेखनीय आहे. अत्यंत प्रामाणिकपणे आणि जिद्दीने त्यांनी आजवरची वाटचाल केलेली आहे. तेजस्विनी पुरस्काराच्या निमित्ताने मुलांचा उत्साह पाहताना जाणवते की हा आनंदाचा महोत्सव आहे. मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहताना थक्क व्हायला होत होते. मुलांना माझे हेच सांगणे आहे, की खूप मोठे व्हा पण आपल्या आई वडिलांना आणि गुरुजनांना कधीही विसरू नका. आपल्या घडवणारे आणि आपल्यावर प्रेम करणारे तेच असतात. त्यांना मान द्यायला शिका आणि आपल्या देशाचे नाव मोठे करा. सत्काराला उत्तर देताना आशाताई राऊत म्हणाल्या, १९९८ पासून मी प्राथमिक शिक्षिका म्हणून काम केले आहे. २००८ पासून मी प्रशासनात विविध जबाबदाऱ्यांवर काम करते आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. तो पुरस्कार मला मिळाला याचा आनंद आहे. अशा पुरस्कारांतून प्रेणा मिळते. अधिक जोमाने काम करण्याचे बळ मिळते आणि जबाबदारीचे भानही येते. त्याच भावनेतून मी या पुरस्काराचा स्वीकार करते आहे. एक आगळावेगळा आनंद देणारा आजचा कार्यक्रम होता.

परदेशी मालमत्ता व उत्पन्न स्वयंघोषित करावे : सतीश शर्मा

0
Newsworldmarathi pune : “केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना जागरूक करण्यासाठी, तसेच ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुधारीत प्राप्तिकर विवरण परतावा (आयटीआर) भरून परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता स्वयंघोषित करण्यासाठी जागरूकता कार्यक्रम हाती घेतला आहे. काळा पैसा कायदा (ब्लॅकमनी ऍक्ट) परदेशी मालमत्ता आणि उत्पन्न भारतात परत आणण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आला आहे. त्यामुळे काळा पैसा कायद्यातील कठोर तरतुदी समजून घ्यायला हव्यात. जागरूकतेच्या अभावामुळे अनेक करदात्यांना परदेशी मालमत्ता आणि उत्पन्न न घोषित केल्यामुळे दंड आणि कारवाईला सामोरे जावे लागते,” असे प्रतिपादन प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त व महासंचालक (अन्वेषण) सतीश शर्मा यांनी केले. आर्थिक पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि काळा पैसा कायद्याच्या पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण संचालनालय व दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने ‘परदेशी मालमत्ता आणि उत्पन्नाची घोषणा’ यावर आयोजित आउटरीच प्रोग्रॅमच्या उद्घाटनावेळी सतीश शर्मा बोलत होते. ही मोहिम सरकारच्या पारदर्शक आणि जबाबदार कर प्रणालीच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, करदात्यांनी स्वेच्छेने आपल्या मालमत्तेची घोषणा करून दंडात्मक कारवाई टाळावी व आपल्या देशाच्या आर्थिक अखंडतेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही सतीश शर्मा यांनी केले. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी प्राप्तिकर (अन्वेषण) विभागाचे प्रधान संचालक मोहित जैन, ‘आयसीएआय’च्या विभागीय समिती सदस्य सीए ऋता चितळे, आयसीएआय पुणेचे उपाध्यक्ष सीए सचिन मिणियार, सचिव सीए ऋषिकेश बडवे, कार्यकारिणी सदस्य सीए प्रितेश मुनोत, सीए प्रणव आपटे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला २५० पेक्षा अधिक सनदी लेखापाल, प्रमुख व्यापारी, करतज्ञ, करदाते उपस्थित होते. प्राप्तिकर (अन्वेषण) विभागाचे अतिरिक्त संचालक सुधांशु शेखर, प्राप्तिकर (अन्वेषण) विभाग-१चे उपसंचालक महादेव धारूरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काळा पैसा कायद्यासंबंधी सखोल माहिती दिली. दोन्ही वक्त्यांनी कायद्यातील तरतुदी, त्याची व्याप्ती आणि लागू होणारे नियम यावर सुस्पष्ट माहिती दिली. परदेशी मालमत्तेतून पैसा निर्माण करण्याची, तसेच तो भारतात आणण्याची प्रक्रिया, बँकांची कार्यप्रणाली, कोणत्या बँकेत खाते असावे, याविषयी महादेव धारूरकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. सीए ऋता चितळे यांनी या कार्यक्रमातून आपल्याला परदेशी मालमत्ता कशी तयार केली जाते व त्याचा आपल्या देशाला कसा फायदा होतो याबद्दल जाणून घेता आल्याचे नमूद केले. कार्यक्रमात उपस्थितांना परदेशी मालमत्तेतील विविध घटकांची माहिती देण्यात आली. ज्यात परदेशी बँक खाते, समभाग व कर्ज, व्याज, इतर व्यवसाय/संस्था मध्ये वित्तीय व्याज, चल-अचल मालमत्ता आणि परदेशी मालमत्तेत लाभकारक हक्क यांचा समावेश आहे. तसेच, परदेशी उत्पन्नामध्ये व्याज, लाभांश, एकूण प्राप्ती, आणि विमोचन यांचा समावेश केला आहे. या सर्व गोष्टींच्या घोषित न करण्याचे गंभीर परिणाम, जसे की काळा पैसा कायदा २०१५ अंतर्गत मूल्यांकन, दंड, व्याज आणि कारवाई यावर चर्चा करण्यात आली. कायदेशीर कामांबद्दल अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्यासह त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी ही एक उत्तम संधी असल्याचे सीए सचिन मिणियार यांनी स्वागत-प्रास्ताविकात सांगितले. सीए प्रितेश मुनोत यांनी सूत्रसंचालन केले. सीए ऋषिकेश बडवे यांनी आभार मानले.

शिवाजीनगरमधील आरोग्य व्यवस्था सुधारा, नाहीतर राष्ट्रवादी युवक रस्त्यावर उतरेल

0
Newsworldmarathi Pune : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आरोग्यविषयक समस्या आणि पुणे महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. डॉ. होमी भाभा दवाखाना येथे रक्त व लघवी संकलन केंद्र आणि तपासणी सुविधा सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. तसेच,दळवी हॉस्पिटल, वाकडेवाडी येथे औषध पुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दलही आवाज उठवला गेला. यासाठी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी निना बोराडे यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनावेळी अॅड. स्वप्निल जोशी (अध्यक्ष), केतन ओरसे (कार्याध्यक्ष), आणि रमीज सय्यद हे उपस्थित होते. या विषयाकडे प्रशासनाने त्वरीत लक्ष न दिल्यास पुढील तीव्र आंदोलनाचा इशाराही राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे.

मुंबईच्या समुद्रात प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली

Newsworldmarathi Mumbai : मुंबई: मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील (Gateway Of India Boat Accident) समुद्रात एक प्रवासी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. ही बोट बुडाली तेव्हा त्यामध्ये अनेक प्रवास होते. ही बोट बुडाली तेव्हा त्यामध्ये अनेक प्रवासी होते. यामध्ये जवळपास 20 ते 25 जण अडकल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली होती. पण आता या अपघातामध्ये तीन प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये जवळपास 80 प्रवासी होते. त्यापैकी 77 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. एकूण 130 जणांची क्षमता या बोटीची होती. सध्या या बोटीतील उर्वरित सर्व प्रवाश्यांचं बचावकार्य पूर्ण झालं आहे. तसेच जी स्पीड बोट या प्रवासी बोटीला धडकली ती नेव्हीची होती, असंही म्हटलं जातंय. या बोटीमध्ये लहान मुलं, अनेक कुटुंब होती.

सतीश गुप्ता यांना दि पूना मर्चेंट्स चेंबरचा आदर्श व्यापारी पुरस्कार घोषित

0
Newsworldmarathi Pune : दि पूना मर्चेंट्स चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिल्या जाणारा आदर्श व्यापारी पुरस्कार २०२४-२५ जाहीर करण्यात आले आहेत. चेंबरच्या सभासदांमधून दिला जाणारा पुरस्कार मे. पुरणचंद अॅन्ड सन्स्चे संचालक सतीश पुरणचंद गुप्ता यांना घोषित करण्यात आला आहे. राज्यसभा खासदार व सुप्रसिद्ध हिरे व्यावसायिक गोविंद ढोलकिया यांच्या हस्ते सतीश गुप्ता यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराची घोषणा चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी केली. या वेळी उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, प्रवीण चोरबेले उपस्थित होते सतीश गुप्ता हे पुण्यातील प्रमुख हॉटेल व्यवसायिक व नामांकित शैक्षणिक संस्थांना खाद्य सामग्री पुरवठा करणारे प्रतिष्ठित व्यापारी आहेत. त्यांनी १७व्या वर्षी किराणा मालाच्या व्यवसायात पाऊल ठेवले आणि आज एक नावाजलेले व्यवसायिक म्हणून ते ओळखले जातात. वक्तशीरपणा, सचोटी आणि समाजसेवेसाठी सतीश गुप्ता हे प्रसिद्ध आहेत. आज त्यांच्याकडे विविध व्यवसायाच्या माध्यमातून २५०० पेक्षा जास्त कामगारांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. पुरस्कार वितरण समारंभ २० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता जयराज स्पोर्ट्स अँड कन्वेन्शन सेंटर, क्रोम बॅक्वेट, कोंढवा, पुणे येथे होणार आहे.

कै. अरविंद देशपांडे स्मृतिप्रित्यर्थ मंगळवारी ‌‘स्वरगंध‌’ मैफलीचे आयोजन

0
Newsworldmarathi Pune : कै. अरविंद देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मंगळवारी ‌‘स्वरगंध‌’ या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मैफल मंगळवार, दि. 24 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता एमईएसचे बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी येथे होणार आहे. सुरुवातीस इटावा घराण्यातील आठव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शाकिर खान यांचे सतार वादन होणार असून त्यांना अमित कवठेकर तबला साथ करणार आहेत. मैफलीच्या उत्तरार्धात पंडित कुमार गंधर्व यांचे नातू आणि मुकुल शिवपुत्र यांचे चिरंजीव भुवनेश कोमकली यांचे गायन होणार असून त्यांना संजय देशपांडे तबला तर सुयोग कुंडलकर संवादिनी साथ करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

भाजपा हीच माझी ओळख : रवींद्र चव्हाण

0
Newsworldmarathi Pune : यावेळी मंत्रिमंडळात अनेक नविन प्रॉमिसिंग चेहऱ्यांना संधी देताना काही अनुभवी, मातब्बर नेत्यांना मात्र वगळण्यात आलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या २-३ दिवसांपासून नाराजीनाट्य सुरु आहे. याला भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी कुठलाही पक्ष याला अपवाद नाही. उदाहरणच सांगायचं झालं तर सुधीर मुनगंटीवार, संजय कुटे, छगन भुजबळ, तानाजी सावंत, नरेंद्र भोंडेकर अशी अनेक नावं सांगता येतील. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी एकसंध असणाऱ्या महायुतीमध्ये आता मंत्रिमंडळ आणि खातेवाटपावरून भूकंप होतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परंतु या नाराजीनाट्याला अपवाद ठरले आहेत ते देवेंद्र फडणवीस यांचे राइट हँड म्हणून ओळखले जाणारे रविंद्र चव्हाण ! सरकारमधील असो किंवा पक्ष संघटनेच्या दृष्टीने, गेल्या काही वर्षांतील रविंद्र चव्हाण यांची कामगिरी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा जो ऐतिहासिक विजय झाला, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या खालोखाल रविंद्र चव्हाण यांचं योगदान आहे, अशी चर्चा झाली. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतीनेच भाजपमधील जी नावं चर्चेत होती, त्या नावांमध्ये रविंद्र चव्हाण यांचं नाव आघाडीवर होतं. मुख्यमंत्रीपदी फडणवीसच हे निश्चित झालं, तेव्हा फडणवीस यांच्या ‘सुपर कॅबिनेट’ मधील एक निश्चित नाव म्हणून रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण त्यांना मंत्रिमंडळात कोणतंही स्थान देण्यात आलेलं नाही आणि तरीही रविंद्र चव्हाण यांच्याकडून कुठल्याही प्रकारे नाराजीचा सूर उमटला नाही. नागपूर येथील विधान भवन परिसर, भाजपा विधीमंडळ कार्यालय येथे अनेक मंत्री, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत रविंद्र चव्हाण अतिशय खेळीमेळीने वागत आहेत. विशेष म्हणजे एरवी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी सतत संपर्कात असणाऱ्या रविंद्र चव्हाण यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील कोणतीही नाराजी दिसून आली नाही. अतिशय शांततेत आधीचा बायो बदलून त्याजागी ‘MLA (आमदार), डोंबिवली शहर’ इतकंच बायो ठेवण्यात आलं आहे. त्यामुळेच त्यांची ही शांत, संयत भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. छगन भुजबळ यांनी “मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का?” असं म्हणत मनातील खदखद उघडपणे बोलून दाखवली. सुधीर मुनगंटीवार “मी नाराज नाही” असं म्हणत असले तरीही नितीन गडकरी यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. डॉ. संजय कुटे यांनी सोशल मिडियावर भावनिक पोस्ट टाकत अपमान झाल्याची भावना अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे. शिवसेना नेते विजयबापू शिवतारे यांनी “अडीच वर्षांनी मंत्रीपद दिलं तरी ते घेणार नाही” अशी टोकाची भूमिका घेतली. नरेंद्र भोंडेकर यांनी तर शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तानाजी सावंत यांनी आपल्या फेसबुकच्या डीपिमधून धनुष्यबाण हे चिन्ह काढून टाकलं आहे. मात्र या सगळ्यात रविंद्र चव्हाण समर्थकांनी मात्र कोणतीही भूमिका न घेता शांत राहण्याची भूमिका उठून दिसते आहे. नेत्यांसोबतच त्यांचे समर्थक देखील आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. ठिकठिकाणी आपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, निषेध आंदोलने केली जात आहेत. छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारत जोडे मारो आंदोलन केल्याचं देखील पाहायला मिळालं. कुटे यांच्या समर्थकांनी जाब विचारण्यासाठी फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी धडकण्याचा निर्धार केला. याउलट रवींद्र चव्हाण समर्थकांच्या मनात काहीशी नाराजी असली तरीही कुठलीही आक्रमक प्रतिक्रिया दिसली नाही. त्यामुळे स्वतःसोबतच समर्थकांची समजूत काढण्यात देखील रविंद्र चव्हाण यशस्वी झाल्याचं दिसतं. सध्याच्या काळात पक्षनिष्ठा, तत्त्वनिष्ठा, समाजकारणाचं व्रत या गोष्टी दुर्मिळ होत असल्या तरीही आपल्या या भूमिकेतून चव्हाण यांनी आपण अपवाद असल्याचं दाखवून दिलं आहे. “भाजपा ही माझी ओळख आहे” हे चव्हाण यांचं विधान निवडणुकीच्या काळात चर्चेत आलं होतं, आता या भूमिकेतून हेच वाक्य अधोरेखित झालं आहे. “राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” असं भाजपची विचारधारा सांगते. सध्याच्या काळात संयम बाळगत रविंद्र चव्हाण यांनी आपण या विचारधारेचे बिनचूक पालन करत असल्याचे दाखवून दिले आहे.

अजित पवार माझे मंत्रीपद कट करतील एवढी त्यांची पोच नाही : शिवतारे

0
मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीतील नाराजी वाढताना दिसत आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार विजय शिवतारे यांनी नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशन सोडून आपल्या मतदारसंघात परतल्याने या नाराजीला आणखी धार मिळाली होती. “आम्ही नेत्यांचे गुलाम नाही,” असे म्हणत त्यांनी आपल्या रोषाची उघडपणे अभिव्यक्ती केली होती. मात्र, मतदारसंघातील कार्यक्रमांदरम्यान आणि त्यानंतरच्या वक्तव्यात त्यांनी शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याविषयी सकारात्मक सूर लावला आहे, ज्यामुळे त्यांचा राग काहीसा शांत झाल्याचे संकेत मिळत आहेत. परंतु, विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करत आपला रोष दाखवला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा समोर आला आहे. विशेषतः मंत्रिमंडळ विस्तारात अपेक्षाभंग झालेल्या नेत्यांमधील नाराजीचा परिणाम सत्ताधाऱ्यांवर कसा होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विजय शिवतारे यांनी आपल्या मंत्रिपद न मिळाल्याबद्दलची खंत व्यक्त करतानाच त्यांच्या भावनांचा सुस्पष्टपणे उल्लेख केला आहे. त्यांना मंत्रिपद वैयक्तिक स्वार्थासाठी नको होतं, तर राज्याच्या विकासात योगदान देण्यासाठी ते महत्त्वाचं होतं, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांनी सांगितलं की, जर दोन दिवस आधीच त्यांना मंत्रिपद न मिळणार असल्याची कल्पना दिली असती, तर त्यांना एवढा धक्का बसला नसता. परंतु त्यांच्या कुटुंबीयांसह मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने नागपूरला येऊन अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, आणि त्या पूर्ण न झाल्याने त्यांना अस्वस्थता जाणवली. तथापि, त्यांनी आपले कार्यकर्ते आणि समर्थकांना समजावून सांगितलं असून, एकनाथ शिंदे यांच्याविषयी कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. “शिवसेना माझं कुटुंब आहे,” असे म्हणत त्यांनी पक्षाविषयीची आपली निष्ठाही जाहीर केली आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराच्या निर्णयांमुळे निर्माण झालेली नाराजी आणि तणाव महायुती सरकारसाठी आव्हानात्मक ठरू शकते. विजय शिवतारे यांनी अजित पवारांविषयी थेट टिप्पणी करत त्यांच्यावर टोलाही लगावला आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट करण्यात अजित पवारांचा हात आहे का, यावर त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की, “अजित पवार यांची एवढी ताकद नाही. एकनाथ शिंदे असे कोणाचे ऐकून निर्णय घेत नाहीत.” त्याचबरोबर, त्यांनी आपल्या राजकीय ताकदीचा उल्लेख करत सांगितलं की, “अनेक जण वाईटावर असताना आम्ही २७ हजारांचे मताधिक्य मिळवले.” यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना त्यांच्यापेक्षा कमी ताकदवान नेते म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या विधानांमुळे महायुतीतील अंतर्गत तणाव आणि आरोप-प्रत्यारोप अधिकच तीव्र झाल्याचं दिसतं. शिवतारे यांनी एकनाथ शिंदेंविषयी निष्ठा व्यक्त केली असली, तरी अजित पवारांवरील त्यांच्या टीकेमुळे महायुतीतील संबंध अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्याचा आराखडा संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल : संतोष पाटील

0
Newsworldmarathi Pune : पुणे जिल्ह्याचे भौगोलिक व औद्योगिक क्षेत्र, वाढते नागरीकीकरण तसेच आपत्तीच्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी त्यानुसार असणारा जलद प्रतिसाद याकरीता लागणारी साधने याबाबींचा सर्वांगिण विचार करता सर्व विभागाचा सहभाग घेत राज्याकरीता दिशादर्शक ठरेल, यास्वरुपाचा आदर्श आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्माण करावा, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्मितीबाबत कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक संजय गिरी, सिड्स टेक्निकल सर्व्हिसेसचे अभिजित घोरपडे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतूदीनुसार जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्माण करणे आवश्यक आहे, याकरीता पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्ह्यातील सर्वसंबंधित विभाग, विविध सामाजिक संस्था यांना सहभागी करुन घ्यावे. जिल्ह्यात औद्योगिक सुरक्षा, आरोग्य विभागाचे आराखडेही यामध्ये समावेश करण्यात यावे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यामदतीने सर्व संबंधित विभागानी आपल्या विभागाचे आराखडे तात्काळ तयार करावे, अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या. घोरपडे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि युएनडीपी यांच्या संयुक्त विद्यमाने सिड्स टेक्निकल सर्व्हिसेस यासंस्थेच्या मदतीने जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्मितीचे काम सुरु आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने विभागाने सूचना कराव्यात, असे आवाहन घोरपडे यांनी केले. या कार्यशाळेत सर्व विभागातील अधिकारी व विभाग प्रमुखांनी सहभाग नोंदवला तसेच संभाव्य आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने गटकार्याच्या माध्यमातून आरखडे तयार करून सादरीकरण करण्यात आले.

परभणी व बीड प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक करा: रमेश बागवे

0
Newsworldmarathi Pune परभणी येथील दलित तरुण सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण तसेच बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी करा तसेच यामागील मुख्य सूत्रधारास अटक करा अशी आग्रही मागणी मातंग एकता आंदोलनाचे नेते व माजी मंत्री रमेश बागवे यांनी केली आहे. Bआज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग एकता आंदोलनाच्या वतीने तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसात शासनाने निर्णय घ्यावा अन्यथा मातंग समाज राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करेल असा इशारा बागवे यांनी दिला. या दोन्ही घटनेचा राज्यशासनाच्या वतीने गांभीर्याने विचार करून यातील संबंधित आरोपीवर जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी असे यावेळी मातंग समाजाच्या विविध कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली . मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत द्यावी व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये रुजू करून घेण्यात यावे. संबंधित परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक व पोलिस अधिकारी यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पाठीमागे जे मुख्य सूत्रधार आहेत ते बीड जिल्ह्यातील एक गुंड व राजकीय पाठबळ असलेल्या व्यक्तीवर दबावापोटी गुन्हा दाखल होत नाही तरी त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या आंदोलनाचे आयोजन कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी केले होते. यावेळी अंकल सोनवणे,अरुण गायकवाड, रमेश सकट, विठ्ठल थोरात,मिलिंद अहिरे, दयानंद अडागळे,राजश्री अडसूळ,रवी पाटोळे, सुरेखा खंडाळे व पुणे शहरातील व जिल्ह्यातील मातंग एकता आंदोलनाचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते .

सरपंच खून प्रकरणात चर्चेत आलेले वाल्मिक कराड कोण आहे?

Newsworldmarathi Mumbai : बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि खून प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 च्या सुमारास संतोष देशमुख हे चुलत भावासोबत कारने जात होते. या वेळी स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या सहा जणांनी त्यांच्या गाडीला अडवून जबरदस्तीने त्यांचे अपहरण केले. संतोष देशमुख हे केवळ एक युवा सरपंचच नव्हे, तर समाजासाठी कार्यशील व्यक्तिमत्व होते. त्यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात चर्चेत आलेले नाव म्हणजे वाल्मिक कराड. वाल्मिक कराड हे महाराष्ट्रातील परळी मतदारसंघातील एक प्रभावशाली राजकीय व्यक्तीमत्व आहेत. ते परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राहिले आहेत आणि सध्या राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मागील दहा वर्षांपासून, परळी मतदारसंघातील प्रशासन आणि राजकीय कार्याचा मुख्य कारभार ते पाहत असल्याचे बोलले जाते. परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला असून परळी नगरपालिकेचे कामकाज पाहिले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला झाल्यानंतर, ते धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली काम करू लागले. धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत, परळी मतदारसंघातील समस्या सोडविण्यात त्यांची भूमिका असते. वाल्मिक कराड यांचे नाव आक्षेपार्ह गुन्हेगारी प्रकरणांमध्ये जोडले गेले आहे: 307 (खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा) यासारखे गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवला गेला होता. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात कराड यांचे नाव समोर आले आहे. केज पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याच्याशी त्यांचे संबंध असल्याचा आरोप केला जातो. विष्णू चाटे हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. संतोष देशमुख खून प्रकरणानंतर, धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांच्यावरही जोरदार राजकीय टीका होत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी, हा प्रकरण राजकीय षड्यंत्राचा भाग असल्याचे काहींनी म्हटले आहे. वाल्मिक कराड यांची ओळख परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे नेते अशी आहे, परंतु त्यांचे नाव वारंवार गुन्हेगारी प्रकरणांत येत असल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्यावरून मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.

गदिमांच्या ‌‘संगीत युद्धाच्या सावल्या‌’ नाटकाचे प्रभावी अभिवाचन

0
Newsworldmarathi Pune : आधुनिक वाल्मिकी, शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर लिखित ‌‘संगीत युद्धाच्या सावल्या‌’ या नाटकातील ग्रामीण भाषेचे सौंदर्य दाखवत त्यातील गोडवा अन्‌‍ डौल, वेगवेगळ्या पदांमधून आणि अभिवाचनातून पुणेकर रसिकांना अनुभवायला मिळाला. ‌‘संगीत युद्धाच्या सावल्या‌’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला 80 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्टतर्फे सांगीतिक नाट्यवाचनाचे श्रीराम लागू रंगअवकाश येथे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील संगीत नाटकांच्या दरबारामध्ये ग. दि. माडगूळकर यांनी साकारलेल्या या नाटकाने स्वत:चे वेगळेपण जपले आहे. यातील नाट्यपदे, संवाद वेगळ्या धाटणीचे असून त्या काळातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील एक तरुण युद्धभूमीवर मर्दुमकी गाजविण्यासाठी आतूर झालेला असून त्याच्या परिवाराचे तसेच गावातील इतर वातावरणाचे वर्णन गदिमांनी अतिशय चपखलपणे दर्शविलेले जाणवते. सामाजिक विषयावर आधारित असलेल्या या नाटकामधून त्या काळातील समाजव्यवस्था, एकोपा, वर्णव्यवस्था, शिक्षण, कौटुंबिक रचना तसेच सावकारी पाशानी पिचलेला समाज या वास्तवतेचे अनुरूप दर्शन घडते. या नाट्यविषयाला समर्पक असलेली ‌‘मनात माझ्या बहुरुनी आले शिवार हिरवे शब्दांचे‌’ ही नांदी प्रभावीपणे सादर करून निनाद जाधव यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. सूत्रधाराच्या भूमिकेत असलेल्या वर्षा जोगळेकर यांनी नाटकाचे कथानक गोष्टी रूपाने उलगडत नेले. ‌‘खेळीमेळीने करू न्याहरी‌’, ‌‘परतल्या घरट्याला पक्षीणी‌’, ‌‘त्या ओढ्याच्या पैलथडी एक असावी झोपडी‌’, ‌‘सुटला गं सांजवारा‌’, ‌‘परतेल शिपाई माझा‌’, ‌‘हरि तुझे नाम गायीन अखंड‌’, ‌‘उजळले भाग्य आता‌’ ही पदे भाग्यश्री काजरेकर आणि निनाद जाधव यांनी सुमधूर आवाजात सादर केली. सुदीप सबनीस, भाग्यश्री काजरेकर, वर्षा जोगळेकर, सयाजी शेंडकर, डॉ. ऋतुपर्ण पिंगळे, आदित्य जोशी, विद्यानंद देशपांडे, संजय गोगटे आणि निनाद जाधव अभिवाचन यांनी अभिवाचन केले तर संजय गोगटे, विद्यानंद देशपांडे, स्वाती मेहेंदळे यांची संगीत साथ लाभली. नाटकातील पदांच्या मूळ चाली उपलब्ध न झाल्याने निनाद जाधव यांनी पदांना नव्याने समर्पक चाली लावल्या आहेत. या अनोख्या सांगीतिक नाट्य अभिवाचनाच्या प्रयोगाला पुणेकर रसिकांनी आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांनी भरभरून दाद दिली.