पुण्यातून पहिली कुंभमेळा विशेष गाडी रवाना
Newsworldmarathi Pune : कुंभमेळ्यासाठी पुण्यातून पहिली विशेष रेल्वे गाडी उत्तर प्रदेशातील प्रयागराजसाठी रवाना करण्यात आली. यावेळी ढोल ताशांच्या गजरात, प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. आयआरसीटीसी मार्फत भारत गौरवची विशेष रेल्वे पुण्याहून कुंभमेळ्यासाठी बुधवारी (दि.15) सोडण्यात आली. हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सायंकाळी सात वाजून 50 मिनिटांनी कुंभमेळा विशेष रेल्वे गाडी प्रयागराजच्या दिशेने रवाना झाली.
ज्येष्ठ प्रवाशांच्या हस्ते फीत कापून या गाडीचे उद्घाटन करण्यात आले. केंद्र शासनाच्या ‘देखो अपना देश’ या योजनेअंतर्गत भारतगौरव ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. ही गाडी पुणे, वाराणसी, प्रयागराज, आयोध्या, पुणे अशी धावणार आहे. यावेळी रेल्वेच्या पुणे विभागाचे झोनल मॅनेजर गुरूराज सोन्ना व अन्य उपस्थित होते.
रेल्वे गाडीत विशेष सुविधा : पुण्यातून कुंभमेळ्यासाठी विशेष गाडीचे नियोजन केले आहे. या गाडीमध्ये प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. गाडीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक, सीसीटिव्ही, जेवणाची व्यवस्था असणार आहे. तसेच, कुंभमेळ्याच्या ठिकाणी राहण्यासाठी टेंटसिटीची व्यवस्था करण्यात आली आहे. येथेही प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. प्रथमोपचार सुविधा देखील असणार आहे.
बारामतीच्या विकासाने पंकजा मुंडे भारवल्या
Newsworldmarathi Mumbai : बारामतीत विविध विकासकामांच्या उद्घाटनांच्या निमित्ताने आलेल्या राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बारामतीच्या विकासाची पाहणी केली. बारामती शहरासह मतदारसंघात झालेल्या सर्वांगीण विकासाने त्या अक्षरशः भारावून गेल्या. बारामतीच्या प्रत्येक विकासकामाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. दादांच्या व्यक्तिमत्त्वातील काटेकोरपणा, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा, नियोजनबद्धता, झपाटून काम करण्याची पद्धत यांसह खूप काही गोष्टी अजितदादांकडून शिकण्यासारख्या असल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तोंडभरून कौतुक केले. बारामतीच्या धर्तीवरच आपल्या स्वतःच्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने त्यांनी बारामती शहरासह बारामती तालुक्यातील विविध विकासकामांना भेट देऊन त्यांची सविस्तर माहिती घेतली. बारामतीच्या विकासाबद्दल भरभरून बोलताना त्या म्हणाल्या, “एका वेगळ्या विकासाच्या दृष्टीतून बारामती आणि बारामतीचा विकास बघण्याचा आज योग आला. बारामती मतदारसंघात झालेली विविध विकासकामे, त्यांचा दर्जा हा अत्यंत सुंदर आहे. बारामती मतदारसंघातील प्रत्येक कामावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळेच त्याचे प्रतिबिंब बारामतीतील प्रत्येक विकासकामांमध्ये दिसत आहे.
काटेकोरपणा, वक्तशीरपणा यांसह उपमुख्यमंत्री अजित दादांच्या अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. बारामतीच्या विकासाशी अजितदादांचे वेगळे नाते निर्माण झाले आहे, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवासह अनेक वर्षे सत्तेत असल्याचा फायदा बारामतीच्या विकासात निश्चित झालेला आहे. बारामतीत झालेल्या विकासकामांच्या धर्तीवरच माझ्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन,” असा निर्धार यावेळी व्यक्त करत मंत्री पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बारामतीच्या विकासाचे विशेष कौतुक केले.
आमदारांनो साधे राहा, प्रतिमा जपा : नरेंद्र मोदी
Newsworldmarathi Mumbai : सामान्य जनता बोलत नाही, पण तिचे तुमच्या कारभारावर बारीक लक्ष असते, तेव्हा चांगली प्रतिमा जपा, बडेजाव नको; साधे राहा. बदल्यांच्या फायली घेऊन फिरत बसू नका. महायुतीचा धर्म पाळून पुढे जा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी महायुतीचे सर्व आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत दिला.
आयएनएस सभागृहात झालेल्या दोन तासांच्या संवादात मोदी यांनी विकासविषयक काही आमदार, मंत्र्यांची मते जाणून घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते. फडणवीस यांनी प्रास्ताविकात महायुतीचे मोठे यश आणि सरकारची भविष्यातील वाटचाल यावर मत व्यक्त केले.
मोदी यांनी त्यांच्या भाषणात तिन्ही पक्षांच्या मंत्री, आमदारांशी भावनिक संवाद साधताना काही कठोर मतेही व्यक्त केली. पैसा नाही तर चांगली प्रतिमा महत्त्वाची आहे.
बदल्यांच्या फायली घेऊन फिरू नका, या शब्दात त्यांनी सगळ्यांचे कान टोचले. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना बदल्यांच्या अनेक फायली यायच्या, मी ते बंद केले होते, असेही ते म्हणाले.
महायुतीच्या तीन पक्षांमधील समन्वय खाली गावांपर्यंत गेला पाहिजे. तिन्ही पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या कार्यक्रम, सभांना जायला हवे. डबे पार्टी करा, असा सल्लाही मोदी यांनी
फडणवीसांचा ‘देवाभाऊ’ असा उल्लेख
मुख्यमंत्री फडणवीस यांचा उल्लेख ‘देवाभाऊ’ असा करत त्यांच्या नेतृत्वात चांगले सरकार सक्षमपणे चालेल, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
निःस्पृहपणे जनसेवा कशी करायची हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिकायला हवे. संघकार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे, अशी भावनाही मोदी यांनी बोलून दाखविली.
देश मी पंतप्रधान होण्याआधी पाहून झालेला होता. मला या गोष्टीचा खूपच फायदा झाला. तुम्हीही फिरले पाहिजे, खेड्यात मुक्कामी राहिले पाहिजे, संवाद वाढविला पाहिजे, अशा अपेक्षा मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या.
देवयानी पवार करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे नेतृत्व
Newsworldmarathi Pune : बारामतीतील देवयानी पवार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. २० ते २४ जानेवारी दरम्यान स्वित्झर्लंड येथील दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीसाठी तरुण उद्योजक व ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या बारामती हबच्या सदस्या देवयानी पवार यांची निवड करण्यात आली आहे.
ग्लोबल शेपर्स कम्यूनिटीच्या जगभरातील ५० प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासाठी निवडलेल्या २ भारतीयांमध्ये देवयानी पवार यांचा समावेश आहे. ग्लोबल शेपर्स कम्युनिटी हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक उपक्रम असून या अंतर्गत जगभरातील युवक हे आपापल्या भागातील स्थानिक, प्रादेशिक यांबरोबरच जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्रितपणे काम करतात
या निवडीबाबत बोलताना देवयानी पवार म्हणाल्या, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची मिळालेली संधी ही मी माझा सन्मान समजते. दावोसच्या या भेटीमध्ये मला जागतिक नेत्यांसोबतच सकारात्मक काम करीत समाजात बदल घडविणाऱ्या अनेकांना भेटण्याची आणि त्यांसोबत नेटवर्किंग करण्याची संधी मिळेल. याबरोबरच या परिषदे दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक असलेले क्लॉस श्वाब यांसोबत होणाऱ्या एका विशेष सत्रासाठी देखील मी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
या व्यासपीठाचा उपयोग स्थानिक पातळीवर भारतासाठी आणि माझ्या सहकारी हब्ससाठी नव्या कल्पना आणि प्रगतीशील उपक्रम राबवण्यासाठी मी करणार असल्याचे देवयानी पवार यांनी सांगितले.
दरवर्षी जानेवारी महिन्यात दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक आयोजित करण्यात येत असते. जागतिक व्यवसाय, विविध देशांतील सरकारे, मीडिया आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींचे गट सध्याच्या काळातील गंभीर समस्या सोडवण्यासाठी आणि त्यावरील उपायांवर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात. कोलॅबोरेशन फॉर दी इंटेलिजन्स एज ही या वर्षीच्या वार्षिक सभेची संकल्पना आहे.
धुक्यात हरवली वाट
Newsworldmarathi Pune : पुणे शहरात सध्या कधी कडाक्याची थंडी कधी ऊन तर कधी पावसाचा खेळ सुरु आहे. पण आज सकाळी पहाटेच्या वेळी शहरात अनेक ठिकाणी कात्रज, सातारा रोड, बिबवेवाडी स्वारगेट या परिसरात दाट धुक्यानी महामार्गावरील व अंतर्गत रस्त्यावरील वाटा हरवून गेले होते. गडद धुक्यामुळे सर्व वातावरण धूसर बनले होते. ‘वाट एक जुनी, हरवली दाट धुक्यात लपलेले दवबिंदू कुठे चमकतात पानात’, या कवितेसारखे आल्हाददायक चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. या धुक्यामुळे सकाळी नऊपर्यंत सूर्यदर्शन देखील झाले नव्हते. सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी गडद धुक्याची अनुभूती घेतली.
‘मॉर्निंग वॉक’ला दाट धुक्याची अनुभूती
‘सकाळ’च्यावेळी मॉर्निंग वॉकला जात असलेल्या नागरिकांना शनिवारी पडलेल्या दाट धुक्यामुळे निसर्गातील सौंदर्य पाहायला मिळाले. अचानक पडलेल्या या धुक्याने मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्यांना सुखद अनुभव घेता आला. दाट धुके पडल्याने त्याचा आनंद घेतला. गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल होऊन रात्री कडाक्याची थंडी पडत असून सकाळच्यावेळी धुक्याची झालर पाहायला मिळत आहे.शिवाय अचानक पाऊस देखील हजेरी लावत आहे. काळी शाळेला जाणारी मुले बोचऱ्या थंडीने कुडकुडत होती. पुणे-मुंबई महामार्गावरदेखील प्रचंड धुके पसरले होते. पहाटे साडेपाचपासून जाणवणाऱ्या धुक्यात वाढ होत असल्याचेही अनेकांनी सांगितले.
पहाटे धुक्याची चादर
पुणे शहरात आज पहाटे धुक्याची चादर पसरली होती. पहाटे पाचपासून धुके दाटले ते सकाळी साडे आठपर्यंत कायम होते. दाट धुक्यामुळे पुढील व्यक्ती दिसणेही अवघड झाले. त्यामुळे १५ ते २० फुटावरील दृश्य पाहण्यास देखील अडचण निर्माण झालेली होती. सकाळी पडलेल्या धुक्याचे क्षण अनेकांनी आपल्या घराच्या खिडकी, गॅलरी, गच्चीवरून मोबाइलमध्ये टिपले
धनंजय मुंडेच सरपंच संतोष देशमुखचे खरे खुनी; आरोपामुळे राज्यात खळबळ
Newsworldmartahi Mumbai : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. या अत्यंत क्रूर हत्येमुळे गावकऱ्यांमध्ये आणि देशमुख कुटुंबीयांमध्ये दु:ख आणि संताप आहे. या प्रकरणी तपास करताना आरोपी वाल्मिक कराडवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मकोका दाखल केल्याने या प्रकरणाचा तपास अधिक तीव्रतेने होईल आणि गुन्हेगारांना कडक शिक्षेसाठी मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आहे. देशमुख कुटुंब आणि मस्साजोग गाव न्यायाच्या प्रतीक्षेत असून प्रशासनावर या प्रकरणी कारवाई करण्यासाठी प्रचंड दबाव आहे.
वाल्मिक कराडवर मकोकाचा गुन्हा दाखल झाल्याने परळीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन दिवस कडकडीत बंद केलाय. सर्वत्र वातावरण पेटलेलं असताना मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी खळबळजनक आरोप केला आहे.
वाल्मिक कराड सुटायला नको, बीडची केस अंडर ट्रायल चालवण्यात यावी. बीड मधील हत्या धनंजय मुंडे यांनी करायला लावली असा आम्हाला संशय आहे. खंडणीतून झालेल्या खून मध्ये धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आम्हाला संशय आहे.
दरम्यान, खंडणीतले आरोपी, खुनातील आरोपी यांनी कोणाला फोन केले, कोणाला भेटले हे सगळे चार्जशीट मध्ये यायला पाहिजे असे देखील जरांगे पाटील म्हणालेत. ना जातीचं देणे घेणे नाही, फक्त पैसे पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी खंडणी आणि खुनातील सगळ्या आरोपींवर मकोका आणि ३०२ कलम लावला असे म्हणत हे पाप धनंजय मुंडेंचं आहे, पाप झाकण्यासाठी धनंजय मुंडे ओबीसींना मध्ये घेतोय असा हल्लबोल जरांगे यांनी मुंडे यांच्यावर बीड प्रकरणावरून केला आहे.
पुणे विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल
Newsworldmarathi Pune : गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) येथे मेट्रोच्या दुमजली उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. हे बदल १५ जानेवारी २०२५ पासून लागू होणार असून, पुढील आदेश येईपर्यंत ते कायम राहतील.
वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी यासंबंधी आदेश जारी केले आहेत. या बदलामुळे वाहनचालकांना होणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी खालील पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
गणेशखिंड रस्ता टाळून वाहनचालकांनी पाषाण रस्ता, बावधन मार्ग, किंवा अन्य पर्यायी रस्त्यांचा उपयोग करावा. विद्यापीठ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एकतर्फी वाहतूक मार्ग तयार केला जाईल.रस्त्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून वाहतुकीवरील ताण कमी करावा. बांधकाम काळात वाहतूक सुरळीत ठेवणे आणि कोंडी टाळणे यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे सर्व वाहनचालकांसाठी आवश्यक आहे.
वाहतूकीत पुढील प्रमाणे असतील बदल
बाणेरकडून शिवाजीनगर कडे जाणारी वाहतूक –
बाणेरकडून येणारी वाहतूक औंध रस्त्यावर वळविण्यात येणार आहे. राजभवन समोरून (पंक्चर) वाहनांनी वळून पुन्हा गणेशखिंड रस्त्यावर यावे. तेथून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त झेंडे यांनी केले आहे.
शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहतूक –
शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहने विद्यापीठ चौकातून सरळ औंध रस्त्याने इच्छितस्थळी जातील.
औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक –
औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहने चतु:शृंगी पोलीस ठाण्याजवळील विद्यापीठाच्या मिलिनयम गेटमधून वळविण्यात येणार आहे. तेथून बाहेर पडणारी वाहने विद्यापीठाच्या आवारातून इच्छितस्थळी जातील.
नागरीकांनी वरील मार्गाचा वापर करावा तसेच वाहतुक कर्मचारी तथा स्वयंसेवक यांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अजितदादा घेणार मोठा निर्णय? धनंजय मुंडेच्या अडचणीत वाढ
अजित पवार यांनी केलेलं “चुकीची माणसं बाजूला करावी लागतात” हे विधान सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय बनलं आहे. विशेषतः, धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील ही वक्तव्यं असल्याचं मानलं जातंय.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप आणि त्यांचं राजकीय भविष्य यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. काहींनी असा अंदाज वर्तवला आहे की, लवकरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सुपूर्द होऊ शकतो. यामुळे अजित पवार गटाच्या अंतर्गत हालचालींवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
हे वक्तव्य पवारांच्या नेतृत्वाखालील गटातील शिस्त आणि जबाबदारी कायम ठेवण्याचा इशारा असू शकतो. मात्र, या वक्तव्यामुळे राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरतील.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराडला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल केल्यानंतर आणि त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांसह काही सत्ताधारी नेतेही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोरदारपणे करत आहेत.
अशा परिस्थितीत, अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर स्पष्ट भूमिका घेतली, ज्यामुळे मुंडेंना मोठा धक्का बसल्याचं दिसतंय. अजित पवार यांनी यापूर्वी मुंडेंची पाठराखण केली होती, परंतु आता त्यांच्या “चुकीची माणसं बाजूला करावी लागतात” या वक्तव्यामुळे संकेत मिळतात की, पवार गटाने याप्रकरणी आपली भूमिका कठोर केली आहे.
या घटनाक्रमामुळे मुंडेंच्या मंत्रीपदाचे भवितव्य धोक्यात आले असून, सत्ताधारी गटात अंतर्गत दबाव आणि अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. पुढील निर्णयांवर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.
नेमक अजितदादा काय म्हणाले?
वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आल्यानंतर माध्यमांनी अजित पवारांना घेरले. यावेळी त्यांनी पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रश्न उपस्थित केला. त्यावर बोलताना अजित पवारांनी स्पष्ट भुमिका मांडली. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार…कुणाकडे काही पुरावे असतील त्यांनी आम्हाला द्यावे, त्यांच्यावर आम्ही कारवाई करु, मी पण शेतकरी आहे. शेतकरी म्हणूनच बोलतोय. चुकीची माणसं असतील तर बाजूला करावे लागते. आम्ही चौकशी कर…कोणालाही पाठीशी घालणार नाही, अस पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.
बीड जिल्ह्याची लेक करणार भारताचं नेतृत्व
Newsworldmarathi Beed : आपल्या बीड जिल्ह्यातील मौजे कळंबअंबा, ता-केज येथील सुकन्या कु. प्रियंका हनुमंत इंगळे हिची खो – खो वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील एका कन्येने देशाचे नेतृत्व करण्याचा मान मिळवणं ही गोष्ट खूपच अभिमानास्पद आहे………..!!
बीडच्या केज तालुक्यातील कळमअंबा येथील मूळ रहिवासी असलेल्या प्रियंका हनुमंत इंगळे या युवतीची “खो-खो ” च्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झालीय. आज 13 पासून सुरू होणाऱ्या खो-खो वल्डकप स्पर्धेत प्रियंका ही भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे.
आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी प्रियंका इंगळेची निवड करण्यात आली आहे. तिच्या निवडीबद्दल तालुक्यातील सर्वच क्षेत्रातून तिचे अभिनंदन केले जात आहे.
तालुक्यातील कळंबआंबा येथील हनुमंत इंगळे हे मागील काही वर्षांपासून रोजगाराच्या निमित्ताने भोसरी (जि. पुणे) येथे स्थायिक झाले. वडील हनुमंत इंगळे व आई सविता इंगळे या दाम्पत्याला प्रियंका व प्रणय अशी दोन मुले आहेत. शालेय शिक्षण घेत असताना प्रियंकाला खेळाची आवड निर्माण झाली. त्यामुळे तिची खेळातील आवड विचारात घेऊन त्यांनी तिला राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षक अविनाश करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खो-खो प्रशिक्षण दिले. तिने निवडलेल्या क्षेत्रात मेहनत व सराव करून खो-खो सारख्या क्रीडा प्रकारात नैपुण्य संपादन केले. त्यामुळे तिला सात वेळा खो-खो च्या राष्ट्रीय संघात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या मिळालेल्या संधीचे सोने करत तिने भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात आपले योगदान दिले. तिच्या या उत्कृष्ट कामगीरीची दखल घेऊन तिला यापूर्वी क्रीडा क्षेत्रातील राणी लक्ष्मीबाई व राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 12 ते 19 जानेवारी 2025 याकालावधीत नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टडियमवर होणार्या खो-खोच्या विश्वकपसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मुलीच्या संधाची कर्णधार म्हणून प्रियंका हनुमंत इंगळे हिची निवड झाली आहे. सध्या दिल्लीत खो-खो च्या वर्ल्डकपची जोरदार तयारी सुरू आहे. भारतीय खो -खो संघाचे अध्यक्ष सुधांगु मित्तल यांच्या नेतृत्वाखाली गेल्या एक महिन्यापासून खेळाडू सराव करत आहेत.
खो-खो स्पर्धेत जगभरातील चोवीस देशांचे खो-खो संघ सहभागी होत आहेत. कर्णधारपद प्रियंका इंगळे हिला मिळाले आहे. तिच्या या संघात आश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निरमला भाटी, निता देवी, चैत्रा आर, सुभाश्री सिंग, मगाई माजी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, मसरीन शेख, मिनू, मोनिका व नाझिया या खेळाडूंचा भारतीय खो-खो संघात समावेश आहे. प्रशिक्षकपदी प्राची वाईकर यांची निवड झाली आहे. सव्वीस वर्षीय प्रियंका इंगळेने आतापर्यत खो-खोच्या 17 राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या प्रियंका खेळाडूंच्या कोट्यातून पुणे येथे क्रीडा अधिकारी पदावर नुकतीच सेवेत रूजू झाली आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राबवा : निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम
Newsworldmarathi Pune : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या बर्न्ट मेमरी, मायक्रो कंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवा, असे निर्देश श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी दिले.
यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव कनिष्क कुमार, पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जितेंद्र डूडी यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे (बीईएल) अभियंता उपस्थित होते.
श्री. चोक्कलिंगम यावेळी म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होती. त्याबाबत न्यायालयाने सुनावण्या घेऊन, पक्षकारांचे म्हणणे ऐकून ईव्हीएम पूर्णतः विश्वसनीय असल्याचा निकाल दिला. याबरोबरच लोकांच्या ईव्हीएममधील मायक्रोकंट्रोलर चीपबाबत ज्या तक्रारी, शंका आहेत त्या देखील दूर व्हाव्यात यासाठी यंत्रणा निर्माण करावी, असे न्यायालयाने भारत निवडणूक आयोगाला निर्देशित केले. त्यादृष्टीने आयोगाने बीईएलच्या साहाय्याने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या बर्न्ट मेमरी, मायक्रो कंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसाठी तांत्रिक प्रमाणित कार्यपद्धती तयार केली आहे.
ते पुढे म्हणाले, निवडणुकीनंतर या चीपमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप करून निकालात बदल (मॅनीप्युलेशन) करण्यात आलेले नाही या बाबत नागरिकांची खात्री करणे यादृष्टीने या कार्यपद्धतीला महत्त्व आहे. लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहावा यासाठी ही कार्यपद्धती राबवायची आहे. त्यामुळे ही तपासणी व पडताळणी प्रक्रिया व्यवस्थितरित्या राबविण्याची मोठी जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर आहे. ही नवीन पद्धती असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी समजून घ्यावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. चोक्कलिंगम म्हणाले.
किरण कुलकर्णी म्हणाले, राजकीय पक्ष आणि उमेदवारांमधील संभ्रम दूर व्हावा या उद्देशाने या कार्यपद्धतीबाबत संक्षिप्त माहिती देणे ही जिल्हा निवडणूक अधिकारी यांची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने पक्ष आणि उमेदवारांसोबत बैठक आयोजित करण्यात यावी, असेही ते म्हणाले.
यावेळी बीईएलच्या अभियंत्यांनी या तांत्रिक कार्यपद्धतीबाबत सादरीकरण केले तसेच ईव्हीएमच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मांडलेल्या विविध शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले.

