Newsworldmarathi Pune : गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) येथे मेट्रोच्या दुमजली उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. हे बदल १५ जानेवारी २०२५ पासून लागू होणार असून, पुढील आदेश येईपर्यंत ते कायम राहतील.
वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी यासंबंधी आदेश जारी केले आहेत. या बदलामुळे वाहनचालकांना होणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी खालील पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
गणेशखिंड रस्ता टाळून वाहनचालकांनी पाषाण रस्ता, बावधन मार्ग, किंवा अन्य पर्यायी रस्त्यांचा उपयोग करावा. विद्यापीठ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एकतर्फी वाहतूक मार्ग तयार केला जाईल.रस्त्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून वाहतुकीवरील ताण कमी करावा. बांधकाम काळात वाहतूक सुरळीत ठेवणे आणि कोंडी टाळणे यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे सर्व वाहनचालकांसाठी आवश्यक आहे.
वाहतूकीत पुढील प्रमाणे असतील बदल
बाणेरकडून शिवाजीनगर कडे जाणारी वाहतूक –
बाणेरकडून येणारी वाहतूक औंध रस्त्यावर वळविण्यात येणार आहे. राजभवन समोरून (पंक्चर) वाहनांनी वळून पुन्हा गणेशखिंड रस्त्यावर यावे. तेथून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त झेंडे यांनी केले आहे.
शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहतूक –
शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहने विद्यापीठ चौकातून सरळ औंध रस्त्याने इच्छितस्थळी जातील.
औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक –
औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहने चतु:शृंगी पोलीस ठाण्याजवळील विद्यापीठाच्या मिलिनयम गेटमधून वळविण्यात येणार आहे. तेथून बाहेर पडणारी वाहने विद्यापीठाच्या आवारातून इच्छितस्थळी जातील.
नागरीकांनी वरील मार्गाचा वापर करावा तसेच वाहतुक कर्मचारी तथा स्वयंसेवक यांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.