Newsworldmartahi Mumbai : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. या अत्यंत क्रूर हत्येमुळे गावकऱ्यांमध्ये आणि देशमुख कुटुंबीयांमध्ये दु:ख आणि संताप आहे. या प्रकरणी तपास करताना आरोपी वाल्मिक कराडवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मकोका दाखल केल्याने या प्रकरणाचा तपास अधिक तीव्रतेने होईल आणि गुन्हेगारांना कडक शिक्षेसाठी मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आहे. देशमुख कुटुंब आणि मस्साजोग गाव न्यायाच्या प्रतीक्षेत असून प्रशासनावर या प्रकरणी कारवाई करण्यासाठी प्रचंड दबाव आहे.
वाल्मिक कराडवर मकोकाचा गुन्हा दाखल झाल्याने परळीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन दिवस कडकडीत बंद केलाय. सर्वत्र वातावरण पेटलेलं असताना मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी खळबळजनक आरोप केला आहे.
वाल्मिक कराड सुटायला नको, बीडची केस अंडर ट्रायल चालवण्यात यावी. बीड मधील हत्या धनंजय मुंडे यांनी करायला लावली असा आम्हाला संशय आहे. खंडणीतून झालेल्या खून मध्ये धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आम्हाला संशय आहे.
दरम्यान, खंडणीतले आरोपी, खुनातील आरोपी यांनी कोणाला फोन केले, कोणाला भेटले हे सगळे चार्जशीट मध्ये यायला पाहिजे असे देखील जरांगे पाटील म्हणालेत. ना जातीचं देणे घेणे नाही, फक्त पैसे पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी खंडणी आणि खुनातील सगळ्या आरोपींवर मकोका आणि ३०२ कलम लावला असे म्हणत हे पाप धनंजय मुंडेंचं आहे, पाप झाकण्यासाठी धनंजय मुंडे ओबीसींना मध्ये घेतोय असा हल्लबोल जरांगे यांनी मुंडे यांच्यावर बीड प्रकरणावरून केला आहे.