Newsworldmarathi Pune : गेली काही वर्षे प्रतिक्षेत असणाऱ्या पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती येणार असून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पुढील प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत डीपीआर अंतिम करण्यात येणार असून भूसंपादनाची प्रक्रिया एमआयडीसीला सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे विमानतळाच्या कामाचे लवकरात ‘टेक ॲाफ’ होणार आहे. तसेच मार्च २०२९ पर्यंत हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सर्व विमानतळाच्या विमानसेवा आणि विकासकामांसदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरीक हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. विमानतळाच्या विकासकामांना आणखी वेग देण्यासंदर्भात आणि विमानसेवा आणखी सक्षम करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीस भारतीय विमानतळ प्राधिकरण, सैन्य दल, महाराष्ट्र विमानतळ महामंडळाचे, सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध प्राधिकरणांचे अधिकारी उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र असून या क्षेत्रातील वाढ विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनी अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार असून विमानतळाचा डिपीआर सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शिवाय मार्च २०२९ पर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.’
‘पुणे आणि परिसराचा विकास झपाट्याने होत असून विमान प्रवाशांची आणि हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे सध्याचे विमानतळ सुसज्ज आणि अत्याधुनिक सोईसुविधांसह सज्ज केलेले आहे. तरीही पुणे शहर आणि परिसराच्या भवितव्याचा विचार करता पुरंदर विमानतळ पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे’, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.
सहा महिन्यात भूसंपादन करणार….
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टी वाढवण्यासाठीचा OLS पूर्ण झाले असून भूसंपादन येत्या ६ महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या वाढवण्यात मदत होऊन पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बैठकीत चर्चा झालेले मुद्दे…
– नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम नियोजित वेळेत अर्थात मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करणे. मार्च २०२५ ला देशांतर्गत आणि एप्रिलला २०२५ आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याते नियोजन
– नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे रि-कार्पेटिंगचे काम गतीने करून दिलेल्या मुदतीत म्हणजेच ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करावे.
– अमरावती विमानतळ येथे नाईट लॅडिंगची सुविधा वेगाने पूर्ण करुन दक्षिण आशियातील सर्वात मोठा FTO जुलै २०२५ पर्यंत पूर्ण करणे.
– सोलापूर विमानसेवा लवकर सुरु करणे आणि कोल्हापूर विमानतळ येथे धावपट्टी विस्तारिकरण करण्यासाठी लवकरात लवकर भू-संपादन करणे. तसेच दोन्ही विमानतळांवर नाईट लँडिंग सुरु करण्याची प्रक्रिया सुरु करावी.
– जळगाव येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करण्याचा निर्णय
– गडचिरोलीचे येथे विमानतळ साकारण्यासाठी भूसंपादन सुरु करणे
– रत्नागिरी, गोंदिया, अकोला आणि संभाजीनगर विमानतळांच्या सुविधा आणि विमानसेवा संदर्भात सकारात्मक चर्चा
– पवना, गंगापूर, खिंडसी आदी धरणात Water Aerodrome साठीचे सर्वेक्षण तातडीने करावे.
– आंतरराष्ट्रीय बंदर असलेल्या वाढवण येथील प्रस्तावित विमानतळाबाबत लवकरत निर्णय घेण्यात येईल.
Newsworldmarathi Mumbai :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या काही नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेश केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन हालचाली घडत आहेत. ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवक—विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, आणि प्राची आल्हाट यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशाची ही घटना मुंबईतील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पार पडली.
या प्रवेश सोहळ्याला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते रविंद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुनील कांबळे, तसेच इतर प्रमुख नेते उपस्थित होते.
ही घटना शिवसेना उ.बा.ठा. पक्षासाठी मोठा धक्का मानली जात आहे, कारण या नगरसेवकांनी थेट भाजपा पक्षात प्रवेश करत, त्यांच्या स्थानिक स्तरावरील राजकीय भूमिकेवर महत्त्वाचा प्रभाव टाकला आहे. यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय समीकरणे बदलू शकतात.
Newsworldmarathi pune : पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे पाच माजी नगरसेवक—विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, आणि प्राची आल्हाट—आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
पुण्यातील शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील पाच माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण संबंधित प्रभागातील भाजप इच्छुक उमेदवारांना आता अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे.
भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये या प्रवेशामुळे अस्वस्थता असून, अनेक इच्छुकांनी मेहनत करून आधार तयार केला असतानाही बाहेरून आलेल्यांना पक्षात मोठ्या संधी मिळत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या घटनाक्रमाचा भाजपच्या गटबांधणीवर आणि उमेदवारी प्रक्रियेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
आज दुपारी एक वाजता भाजपच्या पक्षकार्यालयात हा पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आणि अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. हा विकास शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्षाला आणखी गती देण्याची शक्यता आहे.
Newsworldmarathi Pune : लोकशाहीचे बळकटीकरण, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी भारतीय संविधान आणि देशाच्या नियम-कायद्यांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता असणे आवश्यक आहे. ही जागरुकता निर्माण करण्यासह समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित पिडीत बांधवांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, न्यायप्रिय वकिल म्हणून भविष्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत मंत्रालयात आयोजित संवादभेटी दरम्यान केले.
पुणे येथील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयाच्या पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी, प्राचार्या सिद्धकला भावसार, सहयोगी प्राध्यापक भानुदास गर्जे आदींसह आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती सभागृहात झालेल्या संवादावेळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, विधी आदी अनेक मुद्यांवर विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विद्यार्थी हा जीवनभर विद्यार्थी राहिला पाहिजे. वयाच्या पन्नाशीनंतरही शिकत राहण्याची वृत्ती कायम राहिली पाहिजे. शिकत असताना त्यात्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींसोबत काम केले पाहिजे. त्यांच्याकडून व्यवसायातील बारकावे समजून घेतले पाहिजेत. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. आज विधी शाखेचे विद्यार्थी असलेले तुम्ही सर्वजण उद्या यशस्वी वकील बनाल, परंतु वकिल बनण्याआधी आजचे आदर्श विद्यार्थी, उद्याचे आदर्श नागरिक बना, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना केलं.
राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, क्रीडा, साहित्य अगदी वकिलीच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी स्वत:ला सातत्याने सिद्ध करत रहावे लागते. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रचंड अभ्यास, अथक परिश्रम आणि चिकाटी आवश्यक असते. त्याची तयारी ठेवा. देशाचं संविधान तसेच कायद्यांनी सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे, निर्भयपणे, निष्पक्षपणे, निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न करा, असे मार्गदर्शनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध विषयांवरच्या प्रश्नांना उपमुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच्या संवादातून राज्याचा लोकनेता, कुटुंबातील ज्येष्ठ मार्गदर्शक, एका दिलखुलास मित्राचे दर्शन घडले, अशी भावना संवादात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सागर खुरवड, महादेव पाटील, अनुज बसाळे, अमित काकडे, शंतनु दाते, हरिष मिनेकर आदी विद्यार्थी, प्रतिनिधींसोबत पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी या संवादात सहभाग घेतला.
Newsworldmarathi Pune : विविध सामाजिक उपक्रमातून सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असणारे भाजप युवा नेते ‘लहू बालवडकर’ यांच्या वाढदिवासानिमित्ताने बालेवाडीत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही उपस्थित राहून लहू बालवडकर यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी २४ ते २५ जानेवारी रोजी होणाऱ्या अटल सेवा महाआरोग्य शिबीराच्या लोगोचेही अनावरण ‘मुरलीधर मोहोळ’ यांच्या हस्ते करण्यात आले.
लहू बालवडकर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये राहून विविध सामाजिक तसेच राजकीय उपक्रम राबवत आले आहेत. मागच्या वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने लहू बालवडकर सोशल वेलफेअर वतीने ‘भव्य भजन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या भजन स्पर्धेला जवळपास १०० पेक्षा जास्त भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला होता. तसेच मोठ्या संख्येने पुणेकरांनी ही भव्य दिव्य स्पर्धा याची देही याची डोळा अनुभवली होती. मात्र यंदा त्यांनी ‘अटल सेवा महाआरोग्य शिबीर’ आयोजित केले आहे.
आज बालेवाडी येथे जनसंपर्क कार्यालय येथे केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट देत लहू बालवडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना मिल्क चॉकलेटही दिले. याचसोबत बालेवाडी येथे येत्या २४ व २५ जानेवारीला लहू बालवडकर सोशल वेलफेअर व सनराईस मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने अटल सेवा महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्या शिबीराच्या लोगोचेही अनावरण करण्यात आले.
दरम्यान, लहू बालवडकर सोशल वेलफेअर व सनराईस मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या अटल सेवा महाआरोग्य शिबीरामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड व मुंबईतील नामांकित तसेच धर्मदाय, शासकीय आणि खाजगी रूग्णालयाचा सहभाग असणार आहे. या शिबिरात शस्र्क्रिया न करता व कुठलेही इम्प्लांट न वापरता गुडगा प्रत्यारोपण, सांधेदूखी, खुबा प्रत्यारोपण, अशा वेदनादायक आजारांवरती नवीन आयुर्वेदिक उपचार प्रणालीने उपचार केले जाणार आहेत.
Newsworldmarathi pune : कोथरूड मधील टेकड्यांवर वनराईला आग लावून नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले. कोथरूड मधील म्हातोबा टेकडीवर शनिवारी आग लागून अनेक झाडे नष्ट झाली. याची गंभीर दखल घेत नामदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
पुणेकर आणि पुण्यातील टेकड्या यांचे नाते खूप जवळचे आहे. शहरातील टेकड्या फुफ्फुसे असल्याने टेकड्या संवर्धनासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील सातत्याने प्रयत्नशील असतात. हरित कोथरूडसाठी ६५ व्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवडीचा संकल्प करुन, महात्मा, म्हातोबा, पाषाण आदी भागातील टेकड्यांवर वृक्ष लागवड केली. त्यापैकी म्हातोबा टेकडीवर ६५०० औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्वाचे ठरणारे वृक्ष लावले असून, त्याच्या संवर्धनासाठी विशेष व्यवस्था देखील केली आहे. यामध्ये टेकडीवरील झाडांना पाण्याचे पाईप, टाक्या, खते, वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक बाबी वैयक्तिक व्यवस्थेतून करण्यात आल्या आहेत. तसेच, याच्या देखरेखीसाठी सात माणसांची नेमणूक केली आहे.
मात्र, काही टवाळखोर या पर्यावरण संवर्धनाच्या कामात खोडा घालण्याचे काम करत असून; म्हातोबा टेकडीवर शनिवारी तिसऱ्यांदा आगीची घटना घडल्याने येथील वनराईला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन कोथरूडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले.
नामदार पाटील म्हणाले की, टेकडी हा पुण्याचा श्वास आहे. टेकड्यांवर चांगले वातावरण असल्याने नियमित व्यायाम करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. मात्र, कोथरूड मधील टेकड्यांवर काही टवाळखोर वनसंपदेचं नुकसान करत आहेत. त्यामुळे वन विभागाने याची गंभीर दखल घेऊन; कठोर कारवाई करावी असे निर्देश दिले.
दरम्यान, या घटनेचं गांभीर्य ओळखून नामदार चंद्रकांतदादा पाटील सोमवारी सकाळी ७ वा. म्हातोबा टेकडीची पाहणी करणार आहेत. तसेच, अशा प्रकारच्या घटनांवर आळा घालण्यासाठी वन विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्यासोबत आढावा घेणार आहेत. तसेच, वृक्ष संवर्धनासाठी पर्यावरण प्रेमींशी संवाद साधणार आहेत.
Newsworldmarathi Pune : हजारो अनाथ लेकरांची माय झालेल्या सिंधुताई सपकाळ यांना ‘माई’ असे संबोधतात, त्यावर एकाने मला म्हटले होते की त्यांना आई म्हणायला हवे, पण मला वाटते एका मुलांची असते ती आई आणि हजारोंची असते ती ‘माई’, त्या अर्थाने ‘माई’ सिंधुताई सपकाळ म्हणजे ग्लोबल मदर होत्या असे मत मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेण्यासाठी व्यक्तिशः आणि संस्थात्मक स्वरूपात ‘पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो, बालगंधर्व रंगमंदिर येथे माईंच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून न्यायमूर्ती डिगे बोलत होते. यावेळी कृष्ण प्रकाश (महाराष्ट्र पोलीस प्रमुख, फोर्स वन, मुंबई), रवी नगरकर (व्यवस्थापकीय संचालक, कल्याणी टेक्नोफोर्ज लि.),ममता सिंधुताई सपकाळ, दीपक गायकवाड, विनय सपकाळ,सीमा घाडगे,माजी आमदार उल्हास पवार, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप,सागर ढोले पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी, अहिल्यानगर आणि जीवन आनंद संस्था, सिंधुदुर्ग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जीवन आनंद संस्थेचा पुरस्कार संदीप परब यांनी स्वीकारला. रुपये ५१,००० चा धनादेश, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पुढे बोलताना न्यायमूर्ती शिवकुमार डिगे म्हणाले, आजच्या पिढीकडे अपयश, दु:ख पचवायची ताकद कमी झालेली आहे. विशीत निराश्रित झालेली अबला स्त्री ते पद्मश्री हा प्रवास करणाऱ्या सिंधुताईंची अपयश पचवण्याची, निराश न होण्याची काय ताकद असेल हे आजच्या पिढीने समजून घेण्याची गरज आहे. वेदनेला कोणतीही भाषा नसते, यामुळे माईंचे कार्य भाषेच्या भिंती ओलांडून पसरले, त्यांनी जगभर प्रवास करत अनेकांच्या दु:खावर मायेची फुंकर घातली आहे.
चांगले काम करणाऱ्याला बळ दिले पाहिजे ही माईंची शिकवण आजच्या पुरस्काराच्या निमित्ताने अधोरेखित होते. आज पुरस्कार देणारी आणि ज्यांचा सन्मान होतोय त्याही सामाजिक संस्था आहेत. चांगले काम करणाऱ्या सामाजिक संस्था या समाजाच्या रक्तवाहिन्या असल्याचेही न्यायमूर्ती डिगे यांनी नमूद केले.
कृष्ण प्रकाश म्हणाले, सिंधुताई सपकाळ यांनी हजारो अनाथांचे आयुष्य घडविले, त्यांच्याकडे कोणताही राजपाट नव्हता मात्र एखादा चांगला राजा जशी आपल्या समाजाची काळजी करतो, सर्वस्व समाजाला अर्पण करतो तोच हेतु, ध्येय माईंच्या कामातून दिसते. एका हाताने घेऊन दुसऱ्या हातापर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी केले, एका दिव्याने दुसरं दिवा प्रज्वलित होतो तसे माईंचे काम दिव्यासारखे होते. त्यांची प्रेरणा घेऊन अनेकजण काम करतील असा विश्वास कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला.
रवी नगरकर म्हणाले, माईंचे कार्य मोठे आहे. त्या अनेकांच्या जगण्याचा आधार बनल्या. आज कल्याणी ग्रुपच्या वतीने अनेक सामाजिक संस्थांना आम्ही मदत करत आहोत. या संस्था काही प्रमाणात स्वावलंबी व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
सत्काराला उत्तर देताना डॉ. प्राजक्ता कुलकर्णी म्हणाल्या, स्नेहालयाच्या कामाची दखल घेतल्याबद्दल मी ऋणी आहे. माईंच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार म्हणजे स्नेहालय वर असलेल्या जबाबदारीची जाणीव नव्याने करून दिल्यासारखे आहे.
संदीप परब म्हणाले, यशोदामाई राष्ट्रीय पुरस्काराने संस्थेची जबाबदारी आणखी वाढली आहे. समाजातील अनाथांना माईने आश्रय दिला, त्यांना घडविले, आज आई – वडील, आजी – आजोबा यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, तसे करू नका असे आवाहन त्यांनी समाजाला केले.
प्रास्ताविक करताना ममता सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, “माईच्या प्रेरणादायी जीवनातून समाजसेवेची भावना जागृत व्हावी आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे न्यावा, या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. या पुरस्काराने त्यांना नवी ऊर्जा मिळेल आणि समाजासाठी अधिक समर्पक कार्य करण्यास प्रेरणा मिळेल. आमच्याकडे जे काही ते आम्ही या पुरस्काराच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करत आहोत.समाजाच्या तळागाळात जाऊन प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करणे ही माईंच्या कार्याला खरी श्रद्धांजली आहे.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रबोधनकार गणेश शिंदे आणि गायिका सन्मिता शिंदे यांच्या ‘मोगरा फुलला’ या सांगीतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विणया देसाई यांनी केले.
Newsworldmarathi Pune : सावकारी पद्धतीतून होणारा छळ आणि कर्जदारांवर होणारा अन्याय ही गंभीर समस्या आहे. या प्रकरणात रिक्षा चालकाने आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये व्यथा आणि सावकारांनी दिलेल्या त्रासाची कैफियत मांडली आहे.
Oplus_131072
राजू नारायण राजभर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा गणेश राजू राजभर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर पोलीसांनी पोलिसांनी हनुमंता ऊर्फ अविनाश गुंडे, महादेव फुले, राजीवकुमार ऊर्फ गुड्डु भैया आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू राजभर हे रिक्षा चालवितात. त्यांनी आरोपींकडून हातउसने पैसे घेतले होते. ते पैसे परत करुन देखील त्याचे शिल्लक असलेल्या व्याजाची रक्कम परत न केल्याच्या कारणावरून आरोपींनी घरात घुसुन तुला मारु, तुला कापुन टाकू, अशा वारंवार धमक्या देत होते. या धमक्यांमुळे ते सतत तणावात होते. याच तणावातून त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Oplus_131072
राजू राजबर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हीडीओ तयार केला. त्यामध्ये आपण का आत्महत्या करीत आहोत, याबाबत सांगितले आहे, व्हीडीओच्या शेवटी त्यांनी आत्महत्या करीत असल्याबाबत आपली पत्नी, मुलगा व मुलीची माफी मागितली आहे. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत मंजू मला माफ कर, मुलांनो घरात बनेल ते खा, आईला त्रास देऊ नका, ही केलेली विनवणी हृदय पिळवटून टाकणारी होती. माझ्या अंतिम संस्कार करण्यासाठी माझ्या पत्नीकडे पैसे नाहीत. हे मला माहित आहे. म्हणून, मला शवदाहिनीत जाळा. अशी आर्त विनंतीही त्यांनी केली आहे.
Newsworldmarathi Pune केंद्र सरकारने नुकतीच सुरु केलेली ‘जागो ग्राहक जागो’ ही ऑनलाईन सुविधा ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.
‘मुंबई ग्राहक पंचायती’च्या वतीने कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्राहक पंचायत पेठ’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना जावडेकर बोलत होते. ग्राहक पंचायत पेठ समितीच्या अध्यक्षा अनुराधा देशपांडे, विवेक केळकर, अंजली देशपांडे, सुप्रिया बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जावडेकर म्हणाले, “पाच वर्षांपूर्वी केंद्र सरकारने लागू केलेल्या ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांच्या हक्कांना प्रोत्साहन आणि संरक्षण मिळते. जागो ग्राहक जागो, जागृती अशा नुकत्याच सुरू झालेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांना तातडीने तक्रार नोंदवता येईल. त्यामुळे फसवणूक न होता सुरक्षित व्यवहार होऊ शकतील.”
ग्राहक पंचायत पेठ हा उपक्रम 46 वर्षांपासून सुरु आहे. छोट्या व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या मागील मुख्य उद्देश आहे. उत्पादने, त्यांचा दर्जा, किंमत आणि उत्पादक यांची चोख पडताळणी केल्यानंतरच या प्रदर्शनात सहभागी होता येते. आठ जानेवारीपर्यंत प्रदर्शन सुरु राहणार आहे.
Newsworldmarathi Pune : भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाला अधिक गति देण्याच्या उद्देशाने रविवार 5 जानेवारी रोजी राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. यानिमित्त एकाच दिवशी 25 लाखांहून अधिक सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य आहे अशी माहिती संघटन पर्व प्रभारी आ. रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. पक्षाचे राज्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदार, नेते पदाधिकारी या अभियानात सहभागी होणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
चव्हाण म्हणाले की, या विशेष सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर येथून करणार आहेत. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी, नेते, आमदार ही सर्व मंडळी रस्त्यावर उतरून प्रत्येक बूथ पर्यंत पोहोचून जास्तीतजास्त नागरिक भाजपाशी जोडला जाईल यासाठी प्रयत्न करणार आहेत. या अभियानाबाबत श्री. बावनकुळे यांनी केलेल्या सूचनेनुसार प्रत्येक बूथवरील कार्यकर्ता 250 पेक्षा अधिक सदस्य नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी नमूद केले.
डिसेंबर पासून सुरू झालेल्या सदस्य नोंदणी अभियानात प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 50 हजारांहून अधिक सदस्य नोंदणीचे लक्ष्य ही ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर लागलीच संघटन पर्वाची सुरुवात झाली. त्यानंतर भाजपाचे विविध मोर्चे तसेच प्रकोष्ठ यांनी नोंदणी अभियानासाठी कार्यशाळा ही घेतल्या होत्या. भाजपा प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानामध्ये राज्यभरातून दीड कोटी सदस्य नोंदणी करण्याची सूचना बावनकुळे यांनी दिली होती.
या अनुषंगाने अभियानाला अधिक गतिमान करून सक्रीय सहभागासाठी विशेष योजना आखल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्राला समर्पित भावनेने काम करणा-या भाजपा च्या या महासदस्य नोंदणी अभियानात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केले.