दक्षिणद्वारी भगवा ध्वज उभारणीस आयुक्त सकारात्मक; ‘राष्ट्रवादी’ गड किल्ले संवर्धन सेलचा प्रस्ताव

0
Newsworldmarathi Pune: शिवकालीन ऐतिहासिक पुणे शहराच्या दक्षिण द्वारी कात्रज घाटाच्या जुना कात्रज बोगदा परिसरात उत्तुंग भगवा ध्वज उभा करावा या ‘राष्ट्रवादी’ गडकिल्ले संवर्धन सेल च्या मागणीला पुणे महापालिकेचे आयुक्त सकारात्मकता दर्शवली आहे. राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांनी वसवलेलं तसेच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापराक्रमाने पावन झालेल्या पुणे शहराच्या दक्षिण द्वारी उत्तुंग ‘भगवा ध्वज’ उभारण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेल चे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांना दिले. नवनियुक्त आयुक्त म्हणून नवलकिशोर राम यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांचे स्वागत व सन्मान करण्याच्या निमित्ताने संवाद साधण्यात आला. राष्ट्रवादी गडकिल्ले संवर्धन सेल तर्फे शाल व छत्रपती संभाजी महाजांची मुर्ती देवून सन्मान करण्यात आला. शिवकालीन कात्रजच्या घाटाचे महत्व भावी पिढ्यांच्या स्मरणात सदोदित राहावे म्हणून कात्रज जुना बोगदा परिसरात ‘उत्तुंग भगवा ध्वज’ उभा करावा तसेच दक्षिण भारतातून शहरात येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत करणारी ‘स्वागत कमान’ उभारावी या आशयाचे निवेदन आयुक्तांना दिले. शेलार यांच्या संकल्पनेचे स्वागत करून आयुक्तांनी भगवा ध्वज उभारण्यास अनुकूलता दर्शवली आहे. त्याचवेळी महापालिकेसमोर असलेली असंख्य आव्हानं पेलताना लोकसहभाग वाढवा यासाठी क्षेत्रीय कार्यालयातील ‘मोहल्ला कमीटी’ अधीक सक्षम व्हावी आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून शेलार यांनी मोहल्ला कमीटीच्या बैठकित नागरिकांनी मांडलेले सर्व समस्या त्याच महिन्यात सोडवल्या जाव्यात याबाबतचेही निवेदन दिले. झपाट्याने वाढलेल्या पुणे शहरातील समस्या सोडवण्यासाठी विभागवार नियोजन करणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले. सेलचे पदाधिकारी मनोजकुमार भोसले,अविनाश जाधव,महेंद्र देवघरे, कुणाल शेलार हे उपस्थित होते.

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक: ‘ब वर्ग’ गटातून अजित पवारांचा दणदणीत विजय

0
Newsworldmarathi Baramati: बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत असून पहिला निकाल जाहीर झाला आहे. ‘ब वर्ग सभासद प्रतिनिधी’ गटातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. त्यांनी ९१ मतांची आघाडी घेत आपल्या विरोधकाचा मोठ्या फरकाने पराभव केला. एकूण १०२ मतांपैकी १०१ मते वैध ठरली, त्यामध्ये अजित पवारांना ९१ मते मिळाली तर विरोधी उमेदवाराला केवळ १० मते प्राप्त झाली. ही मते ‘ब वर्ग’मधील सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी दिली आहेत. या निकालामुळे अजित पवारांनी निवडणुकीच्या सुरुवातीलाच आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. माळेगाव साखर कारखान्याच्या सत्तेसाठी चार प्रमुख पॅनेल्स रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), अजित पवार यांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांचे पॅनेल, तसेच शेतकरी संघटना यांचा समावेश आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता, ती बारामतीतील सत्तासंघर्षाचे प्रतीक बनली आहे. अजित पवारांच्या या विजयामुळे त्यांच्या पॅनेलला उत्साह मिळाला असून आगामी निकालांवरही या यशाचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले असून पुढील मतमोजणीच्या टप्प्यांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजनांची गरज”; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची केंद्र व राज्य शासनाला मागणी

Newsworldmarathi Mumbai: मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) या खेळातील एका महिला खेळाडूने क्रीडा महासंघाच्या अध्यक्षावर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपानंतर निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस, रचनात्मक व परिणामकारक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी १८ जून २०२५ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात पीडित खेळाडूचा जबाब नोंदवण्याचे आदेश दिले असून, पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. न्यायालयाने संबंधित क्रीडा संस्थांच्या उदासीनतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांच्या भूमिका अत्यंत निष्क्रिय असल्याचे नमूद केले आहे. या संदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी मा. मुख्यमंत्री व मा. केंद्रीय क्रीडामंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “ना राष्ट्रीय क्रीडा महासंघांनी, ना भारतीय ऑलिंपिक संघटनेने पीडित महिला खेळाडूला कोणतीही मानसिक, कायदेशीर अथवा संस्थात्मक मदत दिली आहे.” अशा घटनांमुळे देशातील महिला खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, त्यांच्या सन्मान व सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या व यापूर्वीच्या मेरठ मुरादाबाद, दिल्ली, आसाम, हरियाणा, तामिळनाडू येथील महिला खेळाडूंवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत न्यायालयाने वेळोवेळी दखल घेऊन आदेश दिले आहेत. यावरून सदर विषयाचे गांभीर्य लक्षात येते. डॉ. गोऱ्हे यांनी या निवेदनाद्वारे काही ठळक मागण्या मांडल्या आहेत. सर्वप्रथम, महाराष्ट्र व देशभरातील सर्व क्रीडा महासंघांचे स्वतंत्र ICC लेखापरीक्षण तातडीने करावे. महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करून त्याचे केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे नियंत्रण करावे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित पदाधिकाऱ्यांना निलंबित करून, पीडितेच्या सुरक्षेची सर्व माहिती जाहीर करावी. तसेच, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या Safe Sport धोरणाच्या धर्तीवर भारतात संरक्षण निती लागू केली जावी. POSH (Workplace Sexual Harassment) कायद्यानुसार सर्व राज्यात विशेष प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम राबवले जावेत. खेळाडूंना तातडीने मदत मिळावी यासाठी २४x७ टोल-फ्री हेल्पलाइन कार्यान्वित करून कायदेशीर सल्ला व समुपदेशन सेवा उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय क्रीडा संचालन विधेयक २०२४ मध्ये महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेसंदर्भात स्वतंत्र आणि बंधनकारक तरतुदी समाविष्ट कराव्यात. तसेच, मा. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशांच्या आधारे संबंधित राज्यातील धोरणांचे अभ्यास करून त्यातील प्रभावी बाबी महाराष्ट्रात लागू कराव्यात. राज्यात स्वतंत्र क्रीडा संचालन विधेयक तयार करून अभ्यास समितीच्या मदतीने व्यापक धोरण निश्चित करावे, अशीही डॉ. गोऱ्हे यांची भूमिका आहे. “महिला खेळाडूंच्या प्रतिष्ठेचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करणे हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. कायद्यातील तरतुदी केवळ कागदापुरत्याच राहू नयेत, तर त्यांच्या अंमलबजावणीस कठोरतेने हाताळले जावे,” असे ठाम मत डॉ. गोऱ्हे यांनी मांडले.

शनिवारवाडा ते स्वारगेट ‘चौपदरी भुयारी मार्ग’ प्रकल्पाला नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद

0
Newsworldmarathi Pune: पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी प्रस्तावित शनिवारवाडा ते स्वारगेट ‘चौपदरी भुयारी मार्ग’ महत्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाच्या सहकार्याची आवश्यकता असल्याने, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली आहे. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. नितीन गडकरी हे पुणे दौऱ्यावर आले असता काकासाहेब गाडगीळ पुतळा, शनिवारवाडा मुख्य प्रवेशद्वार येथे भेट देत प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. रासने यांनी निवेदन देत प्रकल्प उभारणीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता हे शहरातील मध्यवर्ती आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे मार्ग असून, दररोज लाखो वाहनांची वर्दळ या मार्गावरून होत असते. परिणामी प्रचंड वाहतूक कोंडी होते. हे दोन्ही रस्ते दक्षिणोत्तर मार्गाचा महत्वाचा दुवा असून भविष्यात ‘लिंक कोरिडॉर’ म्हणून उपयोग होण्याची क्षमता बाळगतात. या पार्श्वभूमीवर ‘भुयारी चौपदरी मार्ग’ हा पर्यावरण रक्षण, ऐतिहासिक वारसा जपणूक आणि वाहतूक सुलभीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यास सुरुवात केली असून, निधीसाठी अर्थ विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले “शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता या शहराच्या मध्यवर्ती मार्गांवर कायम वाहतूक कोंडी जाणवत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सुमारे 2.5 किमी लांबीचा, चार पदरी भुयारी मार्ग प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पाचा डीपीआर अंतिम टप्प्यात असून पुढील पंधरा दिवसांत पूर्ण होईल. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण सहकार्य मिळत असून केंद्र शासनाच्या सहकार्याने देखील हा प्रकल्प प्रत्यक्षात यावा, यासाठी मा. नितीन गडकरी यांना निवेदन देत निधीची विनंती केली आहे. हा भुयारी मार्ग माझं स्वप्न असून तो पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.” मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जाज्वल्य इतिहासाचे प्रतीक असलेल्या शनिवार वाड्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या पातळीवर विशेष मदत मिळावी, अशी विनंतीही आमदार हेमंत रासने यांनी यावेळी केली.

माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या पुढाकाराने आरोग्य सेवकांना रेनकोट आणि नागरिकांना छत्री वाटप

0
Newsworldmarathi Pune: “समाजाच्या गरजा ओळखून योग्य त्या योजना राबवणे, ही माझी कायमची भूमिका आहे. कोथरुडमध्ये अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले जात असून, माजी नगरसेवक दीपक पोटे यांनी याच भूमिकेची पूर्तता केली आहे. त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले पाहिजे,” असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या माध्यमातून आरोग्य सेवकांना रेनकोट आणि प्रभागातील नागरिकांना छत्रीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबाबत दीपक पोटे म्हणाले, “माणुसकीची जाण आणि निस्वार्थ सेवा हेच आमचं ब्रीद आहे. समाजातील गरजूंना वेळोवेळी मदत करणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हाच खरा समाजसेवेचा मार्ग आहे. ही गरज ओळखून आम्ही नेहमीच विविध उपक्रम राबवत असतो. यंदा माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवक आणि नागरिकांसाठी रेनकोट व छत्री वाटप करण्यात आले. पावसात सेवा बजावणाऱ्या हातांना दिलासा देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.” या कार्यक्रमावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, प्रतीक देसरडा, माजी नगरसेवक जयंत भावे, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, अ‍ॅड. मिताली सावळेकर, प्रशांत हरसुळे, गिरीश खत्री, अमोल डांगे, दीपक पवार, अ‍ॅड. प्राची बगाटे, मंदार बलकवडे, अनुराधा एडके, आशिष काटे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व आरोग्य सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाटे पब्लिक स्कूल, तळजाई येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

0
Newsworldmarathi Pune : चाटे पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, तळजाई येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने रिमझिम पावसाच्या साक्षीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व वंदना सत्राने झाली. या प्रसंगी संस्थापक प्रा. फुलचंद चाटे, वैशाली चाटे, योग प्रशिक्षक वाल्मिक व प्रियोत्तमा मांडवडे, प्राचार्य नवनीत राजपाल, योग प्रशिक्षिका आदिती मांडवडे, सहजयोग पुणे संघाचे आयोजक विलास कडू पाटील, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या ज्योती सनस, मृदुला बोराले, सीमा देशमुख, तृप्ती टोके, संगीता शहापुरे, जयश्री, रेनुका आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षित योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार, ताडासन, वज्रासन, पद्मासन यांसारख्या विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा सत्रात सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान प्रा. फुलचंद चाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “योग हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. विद्यार्थ्यांनी दररोज योग सराव करून शारीरिक व मानसिक आरोग्य वृद्धिंगत करावे. मोबाईल आणि सोशल मिडियाच्या आहारी जाऊ नये, यासाठी योग हा प्रभावी मार्ग आहे.” शाळेत वर्षभर अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. योग सादरीकरणात सहभागी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका नवनीत राजपाल, प्रा. रणजीत जगताप, क्रिडा शिक्षक ओंकार खिलारे व राजेंद्र वाडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रेश्मा पठाण तर आभारप्रदर्शन लक्ष्मी बोरबंडे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे हादरलं! 18 वर्षीय तरुणाची नैराश्यातून आत्महत्या, हृदयद्रावक व्हिडीओत बहिणींसाठी व्यक्त केलं प्रेम

0
Newsworldmarathi pune: पिंपरी-चिंचवडमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. काळेवाडी येथील 18 वर्षीय संजयकुमार विनोदकुमार राजपूत या तरुणाने नैराश्य आणि आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी संजयकुमारने आपल्या आईला एक व्हिडीओ आणि ऑडिओ पाठवला, ज्यामध्ये त्याने आपल्या दोन बहिणींप्रती असलेलं प्रेम आणि त्यांच्या भवितव्याची काळजी व्यक्त केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. देहूरोड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. संजयकुमार विनोदकुमार राजपूत (वय 18) हा काळेवाडी येथे आपल्या आई-वडील आणि दोन बहिणींसह राहत होता. तो देहूरोड येथील विकासनगर परिसरात बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. 17 जून 2025 पासून तो बेपत्ता होता, त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी देहूरोड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तांत्रिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्याचा शोध घेतला असता, मावळ तालुक्यातील घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी त्याचा मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ विषाची बाटली सापडल्याने संजयकुमारने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. व्हिडीओतील हृदयस्पर्शी संदेश आत्महत्या करण्यापूर्वी संजयकुमारने आपल्या आईला पाठवलेल्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. व्हिडीओमध्ये तो म्हणतो, “जसे इतर लोक मरतात, तसा मीही मरेन. मला आता कोणाशी बोलायचं नाही, मला काही नको. फक्त माझ्या आई-वडिलांना सांगायचं आहे की, माझ्या बहिणींना कुणी त्रास देऊ नका. मला फक्त त्यांचीच चिंता आहे. त्यांचं पालनपोषण चांगलं व्हायला हवं.” ऑडिओमध्ये तो म्हणतो, “मम्मी, मला मरायचं आहे. मी विष प्यायलो आहे, मी मोबाइल फोडून टाकतोय. पुरावा राहणार नाही. मी लोकेशन पाठवलं आहे, येऊन माझा मृतदेह घेऊन जा.” या संदेशाने संजयकुमारच्या मनातील नैराश्य आणि कुटुंबाप्रती असलेली आपुलकी स्पष्ट होते. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. संजयकुमारच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासात नैराश्य आणि आर्थिक अडचणी हे आत्महत्येचे कारण असल्याचे नमूद केले आहे. मात्र, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील ८ हजार पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचे किट

0
Newsworldmarathi Pune: पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पुनीत बालन ग्रुप’कडून जीवनावश्यक वस्तूंचे आठ हजार कीट देण्यात आले आहेत. यामध्ये ६ हजार पुरुष तर २ हजार महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या किटचा समावेश आहे. या किटमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असल्याने वारीच्या बंदोबस्ताच्या कालावधीतील पोलीस बांधवाची गैरसोय टळणार आहे आणि परिणामी त्यांना चांगली सेवा देता येणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संताच्या पालखी समवेत लाखो वारकरी पंढरपुरमध्ये दर्शनासाठी येत असतात. यावर्षी येत्या ६ जुलैला आषाढी वारी सोहळा आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांसह दर्शनासाठी येणार्या महत्वाच्या आणि अति महत्वाच्या व्यक्तींसाठी सहा हजार पुरुष कर्मचारी आणि दोन हजार महिला कर्मचारी असे जवळपास आठ हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी असणार आहेत. आषाढी वारी सोहळ्याच्या आठ दिवस हे सर्व अधिकारी कर्मचारी पंढरपुरमध्ये मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे या सर्वांसाठी दैनंदिन वापराच्या जीवनावश्यक वस्तूंचे कीट बॅगेसह उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी पंढरपुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार बालन यांनी तत्काळ हे कीट उपलब्ध करून दिले आहेत. पंढरपूरचे पोलिस उपनिरीक्षक महादेव पिसाळ यांच्याकडे हे कीट सुपूर्त करण्यात आले. गतवर्षीही ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून हे किट देण्यात आले होते. किटमधील वस्तू कोलगेट पाऊच, पॅराशूट तेल बॉटल, ओडोमास, ग्लुकोज, डेटॉल साबण, शेंगदाणा चिक्की, मास्क, पाणी बॉटल आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड.
“उन, वारा, पाऊस यांची तमा न करता विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची सुरक्षा व्यवस्था राखण्याचं महत्त्वाचं आणि अत्यंत जोखमीचं काम हे पोलिस बांधव करत असतात. त्यामुळे त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांच्या मागणीनुसार दैनंदिन वस्तूंचे कीट देण्यात आले आहे. या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेचा खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, याचं समाधान आहे.”
– पुनीत बालन, युवा उद्योजक

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर ! शून्य टक्के व्याजदराने मिळणार 1 लाखांचे कर्ज

Newsworldmarathi Mumbai: राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेअंतर्गत कोट्यवधी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून, अनेकींनी लहान-मोठे उद्योगही सुरू केले आहेत. आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या मुंबईतील महिलांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई बँक आता शून्य टक्के व्याजदराने 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ही योजना अधिक गतिमान झाली आहे. यापूर्वी 9 टक्के व्याजदराने मिळणारे कर्ज आता शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली. राज्य सरकारच्या चार महामंडळांमार्फत (पर्यटन महामंडळ, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्तांसाठीचे महामंडळ आणि ओबीसी महामंडळ) 12 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा लाभार्थी महिलांना मिळणार आहे. यामुळे कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होईल. कशी मिळणार कर्ज सुविधा? एका महिलेला 1 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते, तर 5 ते 10 महिला एकत्र येऊन संयुक्त व्यवसाय सुरू करू शकतात. कर्जासाठी अर्ज केल्यानंतर व्यवसायाची पडताळणी केली जाईल. मुंबई बँकेकडे सध्या 1 लाख सभासद असून, 12 ते 13 लाख लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, असे दरेकर यांनी सांगितले. या योजनेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चारही महामंडळांच्या संचालकांसह झालेल्या बैठकीत शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठ्याचा शासन निर्णय घेतला आहे. महिलांना सक्षम करण्याचा संकल्प ही योजना मुंबईतील महिलांना उद्योग-व्यवसायात पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन देणारी आहे. पर्यटन महामंडळाची ‘आई’ योजना आणि इतर महामंडळांच्या माध्यमातून व्याज परताव्याचा लाभ मिळणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे बाजारात फिरतील आणि त्यांच्या उद्योगांना चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. मुंबई बँकेमार्फत या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहन प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

बीडमध्ये भीषण अपघात ! भरधाव कारच्या धडकेत युवकाचा मृत्यू, दोघे जखमी; रस्त्याच्या समस्येवर रास्ता रोको

Newsworldmarathi Beed: बीड जिल्ह्यातील केज-अंबाजोगाई रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगातील कारने पायी चालणाऱ्या एका युवकाला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील दोन जण जखमी झाले. अपघातानंतर कार रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना माहिती दिली. गेल्या काही दिवसांत अंबाजोगाई रोडवर अपघातांचे प्रमाण वाढले असून, यामागील कारणांचा शोध आणि उपाययोजना गरजेची बनली आहे. रस्त्याच्या समस्यांमुळे संताप बीड जिल्ह्यात रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, माजलगावच्या जायकोचीवाडी येथील ग्रामस्थांनी खामगाव-पंढरपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. गेल्या 35 वर्षांपासून रस्त्याअभावी गावकऱ्यांचे हाल होत असून, गर्भवती महिला, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. आझाद क्रांती सेनाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पुरूषोत्तमपुरी रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे आणि जायकोचीवाडी फाट्यावर थांबा देण्याच्या मागण्या करण्यात आल्या. अपघात रोखण्यासाठी उपाय हवेत केज-अंबाजोगाई रोडवरील वाढत्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या रस्त्यावरील खराब परिस्थिती आणि वाहनांच्या वेगावरील नियंत्रणाचा अभाव यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.