जागतिक योगदिनानिमित्त कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात योग शिबिर
Newsworldmarathi Pune: जागतिक योग दिनाचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्व विद्यालय यांच्या वतीने कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
शिबिरामध्ये लक्ष्मण कादबाने यांनी दैनंदिन जीवनातील योगाचे महत्व स्पष्ट करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थितांना योगाभ्यासाचे मार्गदर्शन केले. यावेळी ब्रह्मकुमारी आश्विनी दीदी यांनी मनःशांतीचे महत्व पटवून दिले. जीवराज भाई यांनी शिबिराची प्रस्तावना सादर करत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय संस्थेचा थोडक्यात परिचय करून दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि प्रशासन अधिकारी सुनील मोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम, जालिंदर कदम, अधीक्षक राजकुमार कोंडे, कनिष्ठ अभियंता अशोक पवार यांची उपस्थिती लाभली. अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले.
कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
जनवाडी जनता वसाहतीत मोफत छत्री वाटप उपक्रम, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते वितरण
Newsworldmarathi Pune: छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील जनवाडी जनता वसाहत येथे “मोफत छत्री वाटप उपक्रम” आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा. सतीश बहिरट (पाटील) यांनी केले होते. कार्यक्रमात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना आमदार शिरोळे म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाच्या कार्यसंस्कृतीत सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ही संकल्पना केवळ घोषवाक्य नाही, तर ती आमच्या प्रत्यक्ष कृतीतून दिसून येते. अशा उपक्रमांद्वारे आम्ही मतदारसंघात सेवा आणि विकासाचा ठोस ठसा उमटवत आहोत.”
ते पुढे म्हणाले की, “सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनात थेट उपयोगी ठरणारे उपक्रम हेच खरे जनतेचे प्रतिनिधित्व आणि विकासाचे खरे प्रतिबिंब आहे. हीच आमची कार्यपद्धती आणि आमचे उद्दिष्ट आहे.”
कार्यक्रमात अपर्णा कुऱ्हाडे, संतोष काळे, विकास डाबी, सुरेश शिंदे, सुजित गोटेकर, रमेश भंडारी, शशिकांत अंबेडे आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
लग्नाच्या आनंदावर काळाची छाया; ट्रक-कार अपघातात ९ जणांचा करुण अंत
Newsworldmarathi team: West Bengal Accident : पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील पुरूलिया-जमशेदपूर राष्ट्रीय महामार्ग-१८ वर शुक्रवारी पहाटे एक हृदयद्रावक रस्ते अपघात घडला. भरधाव ट्रकने एका कारला जोरदार धडक दिल्याने कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला.
ही कार लग्न समारंभ आटपून घरी परतणाऱ्या वऱ्हाडी मंडळींनी भरलेली होती. अपघात इतका भीषण होता की, कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे.
प्रत्येक महिलेने योगाभ्यास करणे गरजेचे : आमदार चंद्रकांतदादा पाटील
Newsworldmarathi Pune : महिलांचे जीवन अतिशय खडतर असते. त्यांना घरातील विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे अनेकदा त्यांचे तब्येतीकडे दुर्लक्ष होत असते. आनंदी जीवनासाठी प्रत्येक महिलेने योगाभ्यास करणे आवश्यक आहे असे मत यावेळी व्यक्त केले. मानसी उपक्रमामुळे कोथरुड मधील वस्ती भागातील मुलींना योगाभ्यासाची गोडी निर्माण झाली असून, आगामी काळात पुणे शहरात ही हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवू, अशी भावना आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड मतदारसंघातील वस्ती भागातील मुलींसाठी सुरु केलेल्या ‘मानसी’ उपक्रमातील मुलींचे एकत्रिकरण महालक्ष्मी लॉन्स येथे करण्यात आले होते. जवळपास एक हजार पेक्षा जास्त मुलींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन योग प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी माजी नगरसेविका मोनिका वहिनी मोहोळ, उद्योजिका स्मिता पाटील, भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, योग गुरू मुग्धा भागवत, माजी नगरसेविका छाया मारणे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले की, आजच्या आधुनिक युगात महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. स्त्रित्वाने मासिक पाळी, प्रसूती वेदना, अशा विविध आव्हानांवर मात करत, त्या कुटुंबातील विविध जबाबदाऱ्या पार पाडून, आपापल्या क्षेत्रात नावलौकिक कमावत आहेत. ह्या सर्वांमध्ये अनेकदा त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे यातून त्यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. अशा काळात योगाभ्यास हे त्यांच्यासाठी अतिशय आवश्यक आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, या कार्यक्रमाअंतर्गत मानसी उपक्रमातील १००० मुलींनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच, काही महिलांनीही पारंपरिक वेशभूषेत योगाची प्रात्यक्षिके सादर केली.
बारामतीत आज शरद पवार-अजित पवार एकाच मंचावर; सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारही उपस्थित!
Newsworldmarathi Baramati : बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे आयोजित दोनदिवसीय आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कार्यशाळेचा आज, 20 जून 2025 रोजी, समारोप होत आहे. या कार्यशाळेच्या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांच्यासह इतर मान्यवरही हजेरी लावणार आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांचे एकाच व्यासपीठावर येणे, राजकीय दृष्टिकोनातून चर्चेचा विषय ठरत आहे.
कार्यशाळेचा उद्देश आणि महत्त्व
विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे 19 आणि 20 जून 2025 रोजी आयोजित या कार्यशाळेचे नाव ‘AI-Driven Technological Solutions for Crop Stress Management and Phenotyping in the Indo-Pacific’ असे आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेती क्षेत्रातील ताण व्यवस्थापन आणि पीक फिनोटायपिंगसाठी उपयोग यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शेतीसाठी AI तंत्रज्ञानाच्या संधी आणि आव्हाने यावर सखोल चर्चा झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यास प्रोत्साहन मिळाले. या कार्यशाळेत ‘AI Career Pathways: Exploring Opportunities in Artificial Intelligence’ या विषयावरही एका सत्रात चर्चा झाली, ज्यामध्ये AI क्षेत्रातील करिअरच्या संधींवर प्रकाश टाकण्यात आला.
राजकीय संदर्भ आणि चर्चा
शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय मतभेद आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट यामुळे त्यांचे एकाच मंचावर येणे नेहमीच लक्ष वेधते. यापूर्वीही दोघांनी काही कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावली होती, जसे की जानेवारी आणि एप्रिलमधील AI-संबंधित शेती चर्चा. यावेळीही त्यांचे एकत्र येणे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे, विशेषतः राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये संभाव्य जवळीकतेच्या पार्श्वभूमीवर. तथापि, या कार्यक्रमात त्यांच्यात प्रत्यक्ष संवाद होतो की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, कारण यापूर्वीच्या काही भेटींमध्ये त्यांनी एकमेकांशी संवाद टाळला होता.
भाजपच्या गणेश बिडकर यांना महापालिकेची मोठी जबाबदारी
Newsworldmarathi Pune: भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार असतानाही अंतिम क्षणी संधीपासून वंचित राहिलेले माजी गटनेते गणेश बिडकर यांच्याकडे आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या रणनीतीची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार बिडकर यांच्याकडे ही जबाबदारी दिल्याचे सांगण्यात येत असून, त्यांनी तत्काळ कामाला सुरुवातही केली आहे.
महापालिकेतील माजी नगरसेवकांशी बिडकर सध्या चर्चा करत असून, प्रभाग रचना, निवडणूक तयारी आणि स्थानिक राजकीय समिकरणांचा अभ्यास सुरू आहे. पक्षाच्या रणनीतीसाठी स्थानिक पातळीवरील माहिती संकलित करून त्यानुसार पुढील दिशा ठरवण्याचे काम बिडकर करत आहेत.
भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी बिडकर यांचे नाव आघाडीवर होते. त्यांचा महापालिकेतील प्रदीर्घ अनुभव, स्थायी समिती अध्यक्ष आणि २०१७ मधील सभागृह नेते या नात्याने त्यांनी बजावलेली भूमिका लक्षात घेता, त्यांची निवड निश्चित मानली जात होती. मात्र, पक्षातील अंतर्गत राजकीय समीकरणे आणि तडजोडीमुळे त्यांना संधी नाकारण्यात आली. त्यानंतर माजी शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावरच पुन्हा जबाबदारी ठेवण्यात आली होती, ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बिडकर यांना विधानपरिषदेवर संधी मिळेल, अशीही शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्या ठिकाणी देखील त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे आता महापालिकेच्या निवडणुकीतच त्यांना निर्णायक भूमिका मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फाटफुटीनंतर हे दोन्ही पक्ष सध्या भाजपसोबत सत्तेत आहेत. पुण्यातही या तिन्ही पक्षांकडून महायुती म्हणून निवडणूक लढवली जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे बिडकर यांचा स्थानिक राजकारणातील अनुभव आणि संघटन कौशल्य महत्त्वाचे ठरणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा जून हप्ता कधी? 10 दिवस शिल्लक, लाखो महिलांना उत्सुकता!
Newsworldmarathi Mumbai: Ladki Bahin Yojana:महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्र्यांच्या माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाखो महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळत आहे. मात्र, जून 2025 चा हप्ता अद्याप जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता आणि प्रश्न निर्माण झाले आहेत. जून महिना संपण्यास आता फक्त 10 दिवस शिल्लक असल्याने, “जूनचा हप्ता कधी मिळणार?” असा सवाल महिलांमधून उपस्थित होत आहे.
जून हप्त्याची प्रतीक्षा
मे 2025 चा हप्ता जूनच्या सुरुवातीला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला होता. त्यानंतर आता जूनच्या हप्त्याची वाट पाहिली जात आहे. सूत्रांनुसार, पुढील दोन आठवड्यांत, म्हणजेच जून अखेरपर्यंत हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जून 2025 च्या 12व्या हप्त्याची रक्कम 1,500 रुपये असणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे, परंतु नेमकी तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
कोणत्या महिलांना मिळणार नाही हप्ता?
लाडकी बहीण योजनेसाठी काही कठोर निकष निश्चित करण्यात आले आहेत. ज्या महिलांचे अर्ज या निकषांना बसत नाहीत, त्यांचे अर्ज बाद करण्यात आले असून त्यांना हप्त्याचा लाभ मिळणार नाही. योजनेच्या पात्रतेसाठी खालील निकष महत्त्वाचे आहेत. लाभार्थी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
लाभार्थ्याच्या घरी चारचाकी वाहन नसावे.
महिला सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक नसावी. या निकषांनुसार पात्र न ठरणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले असून, त्यांना जूनचा किंवा पुढील हप्ते मिळणार नाहीत.
योजनेचा उद्देश आणि लाभ
लाडकी बहीण योजना ऑगस्ट 2024 मध्ये सुरू झाली असून, 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी दरमहा 1,500 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2.52 कोटी महिलांना लाभ मिळाला असून, मार्च 2025 पर्यंत 17,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींची प्रतीक्षा
जूनचा हप्ता लवकरच जमा होईल, अशी आशा लाभार्थी महिलांना आहे. सोशल मीडियावरही या योजनेच्या जून हप्त्याबाबत चर्चा सुरू आहे, आणि काही पोस्ट्सनुसार, काही महिलांचे अर्ज निकषांमुळे रद्द झाल्याने त्यांना हप्ता मिळणार नसल्याचे समोर आले आहे. यामुळे महिलांमध्ये जागरूकता आणि सतर्कता वाढली आहे.
लाडकी बहीण योजनेने महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक आधार दिला असला, तरी हप्त्याच्या तारखेबाबत स्पष्टता येणे बाकी आहे. पुढील काही दिवसांत सरकारकडून याबाबत अधिकृत माहिती येण्याची अपेक्षा आहे.
उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा”; उद्धव ठाकरेंचा नितेश राणेंवर ठाकरी हल्ला!
Newsworldmarathi Mumbai: Uddhav Thackeray mocks Nitesh Rane : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित भव्य कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवताना भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांची ठाकरी शैलीत खिल्ली उडवली. “उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, डोळे कोणासारखे माहीत नाही,” असा खोचक टोला लगावत उद्धव ठाकरे यांनी नितेश राणेंच्या ‘बाप’ वक्तव्याचा समाचार घेतला. “कोणता तरी एक बाप ठरवा पहिल्यांदा,” असे म्हणत त्यांनी नितेश राणेंना डिवचले, ज्यामुळे सभागृहात हशा पिकला.
“कम ऑन, किल मी! पण अॅम्ब्युलन्स घेऊन या”
उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना थेट आव्हान देताना म्हटले, “हिंमत असेल तर अंगावर या, पण येताना अॅम्ब्युलन्स घेऊन या. येताना सरळ याल, पण जाताना आडवे व्हाल!” यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही टीकास्त्र सोडले. “देशाला पंतप्रधानाची गरज आहे, फक्त भाजपला पंतप्रधान आहे. देशाला गृहमंत्र्याची गरज आहे, घरफोड्या अमित शहांची नाही. संरक्षणमंत्र्याची गरज आहे, गुंडांना अभय देणाऱ्या राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीसांची नाही,” असे घणाघाती टीका करत त्यांनी उपस्थित शिवसैनिकांचा उत्साह वाढवला.
महाराष्ट्रात हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात हिंदीची सक्ती कदापि होऊ देणार नाही. हिंमत असेल तर गुजरातमध्ये जा आणि तिथे हिंदीची सक्ती करून दाखवा!” त्यांनी ‘गद्दार मिंध्यां’वरही जोरदार टीका केली आणि शिवसेनेच्या 59 वर्षांच्या इतिहासाचा गौरव करताना म्हणाले, “आमचा नेता एकच, भगवा एकच, दैवत एकच आणि विचार एकच आहे.”
नितेश राणेंवर वैयक्तिक हल्ला
नितेश राणे यांच्या सततच्या वैयक्तिक टीकेवर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. “तुझी पार्श्वभूमी काय? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? आणि तू शिवसेनेवर बोलतोस? तुझा जीव काय, तू बोलतोस काय?” असे कठोर शब्द वापरत त्यांनी नितेश राणेंना सुनावले. यावेळी सभागृहात ‘नेपाळी, नेपाळी’ असे आवाज घुमले, ज्यावर उद्धव ठाकरे यांनी हसत हसत पुढील टीका केली.
हिंदू-मुस्लिम भांडणांवर टीका
भाजपवर हिंदू-मुस्लिम भांडणे लावण्याचा आरोप करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपचा एक बेडूक सतत ओरडत आहे, त्याला तेवढंच काम दिलं आहे.” त्यांनी धर्माच्या नावावर भांडणे लावण्याच्या राजकारणावरही तीव्र नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेचा दमदार संदेश
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना एकजुटीने लढण्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षण करण्याचे आवाहन केले. “59 वर्षांनंतरही शिवसेना बलशाली आहे. आमचा भगवा आणि विचार अढळ आहे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्याचे संकेत दिले आणि विरोधकांना पुन्हा एकदा सावध राहण्याचा इशारा दिला.
या कार्यक्रमाने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून, उद्धव ठाकरे यांच्या ठाकरी शैलीतील टीकेने विरोधकांना चांगलाच इशारा दिला आहे.
पुण्यात मुसळधार पाऊस ! खडकवासला धरण 75 टक्के भरलं, मुठा नदीत पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Newsworldmarathi Pune: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पडणाऱ्या जोरदार पावसाने खडकवासला धरण 75 टक्के भरलं आहे. यामुळे आज दुपारी 1 वाजता मुठा नदीत 2,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
पावसाचा जोर आणि धरणाची स्थिती
गुरुवारी सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत खडकवासला धरण परिसरात 40 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. शहरासह आसपासच्या परिसरातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. धरणात पाण्याची वाढती आवक पाहता, पूर नियंत्रण कक्षाने विसर्गाचा निर्णय घेतला. पुढील काही तासांत पावसाच्या जोरानुसार विसर्गाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
प्रशासनाची तयारी
पुणे महापालिका (PMC), जिल्हा प्रशासन, पोलिस, PMRDA आणि महावितरण यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीकाठच्या वाहनं हटवावीत, असं आवाहन PMC ने केलं आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सज्ज ठेवण्यात आलं आहे.
नागरिकांना आवाहन
नदीकाठच्या रहिवाशांनी खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं. संपर्कासाठी PMC आपत्ती निवारण कक्षाचे क्रमांक: 020-25501269, 020-25506800, 020-67801500 उपलब्ध आहेत.
माळेगाव कारखाना निवडणुकीवरून राजकारण तापलं; रात्री 11 वाजता PDCC बँक उघडी, अजित पवारांच्या पॅनलवर गंभीर आरोप
Newsworldmarathi Baramati: बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. रात्री 11 वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (PDCC) बँक उघडी असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, तिथे माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या सापडल्याचा दावा ‘सहकार बचाव पॅनल’ने केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारी बँकेत उपस्थित असल्याचा आरोप रंजन तावरे यांनी केला आहे. या प्रकरणाने बारामतीत आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या ‘श्री नीळकंठेश्वर पॅनल’विरुद्ध चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार बचाव पॅनल’ यांच्यात चुरशीची लढत आहे. बुधवारी (18 जून) रात्री 11 वाजता बारामतीच्या आमराई परिसरातील PDCC बँक उघडी असल्याची माहिती ‘सहकार बचाव पॅनल’च्या कार्यकर्त्यांना मिळाली. बँकेत पोहोचलेल्या कार्यकर्त्यांना तिथे माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या, सहकारी संस्था आणि शिक्षण संस्थांच्या याद्या सापडल्या. यावरून पैसे वाटपाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
रंजन तावरेंचे आरोप
‘सहकार बचाव पॅनल’चे नेते रंजन तावरे यांनी पत्रकार परिषदेत स्फोटक आरोप केले. “रात्री 11 वाजता अजित पवारांचे पीए सुनील मुसळे बँकेत काय करत होते? बँकेत मतदार, त्यांचे नातेवाईक आणि जबाबदारी स्वीकारणाऱ्यांच्या याद्या सापडल्या. इरिगेशनचे अधिकारी डुबल यांचं नावही यात आहे. त्यांनी पाणी वाटप संस्थांवर दबाव टाकला,” असा दावा तावरेंनी केला. त्यांनी अजित पवारांवर शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप लावला.
युगेंद्र पवारांचा संताप
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनीही या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “PDCC बँकेची वेळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत असते. रात्री 11 वाजता बँक उघडी का होती? माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या आणि सहकारी-शैक्षणिक संस्थांच्या याद्या तिथे कशा काय? निवडणुकीत पैशाचा वापर वाढला असून, सर्वसामान्य सभासदांना त्रास होतोय. हे राजकारण बदललं पाहिजे,” असं युगेंद्र पवार म्हणाले.
PDCC बँकेचं स्पष्टीकरण
PDCC बँकेचे असिस्टंट मॅनेजर जगदाळे यांनी आरोप फेटाळले. “बँक सायंकाळी 5:30 वाजता बंद झाली होती. फोन आल्याने मी पुन्हा बँकेत आलो. संगणकीय कामामुळे काही कर्मचारी उशिरा थांबले होते. पण मतदार याद्या कशा आल्या, हे मला माहीत नाही,” असं त्यांनी सांगितलं. मात्र, या स्पष्टीकरणाने संशय कमी झालेला नाही.
अजित पवारांचं आश्वासन आणि वाद
अजित पवारांनी निवडणूक प्रचारात “पॅनल टु पॅनल मतदान करा, मी 5 वर्षांत माळेगाव कारखान्याला 500 कोटी रुपये देईन,” असं आश्वासन दिलं आहे. यावर विरोधकांनी “राज्याची तिजोरी निवडणुकीसाठी उघडली का?” असा सवाल केला. चंद्रराव तावरेंनी “अजित पवारांचे खासगी कारखाने चालतात, मग सहकारी का नाही?” असा टोला लगावला. तसेच, कारखान्याच्या गोडाऊनमधील 60 हजार साखरेच्या पोत्यांचं नुकसान झाल्याचा आरोपही तावरेंनी केला आहे.
अशी आहे निवडणूक?
माळेगाव कारखान्याच्या 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत. अजित पवारांच्या ‘श्री नीळकंठेश्वर पॅनल’ला राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचं पाठबळ आहे, तर ‘सहकार बचाव पॅनल’ आणि ‘बळीराजा पॅनल’ला शरद पवारांच्या विचारसरणीचा आधार आहे. 19,750 सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
बारामतीत तणाव
रात्री बँकेत पोलीस दाखल झाले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईत ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. यापूर्वीही PDCC बँकेतून पैसे वाटपाच्या घटना समोर आल्या असून, रोहित पवारांनी 2024 मध्ये असाच आरोप केला होता.

