शिवभक्तांची लाट रायगडावर…! शिवराज्याभिषेकासाठी प्रशासन सज्ज
Newsworldmarathi Raigad: : किल्ले रायगडावर यंदाही ६ जून रोजी तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य पद्धतीने साजरा होणार आहे. या ऐतिहासिक दिवशी राज्यभरातून सुमारे दीड लाख शिवभक्त गडावर दाखल होणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर तयारीत व्यस्त असून, ५ हजार किलो तांदूळ, १ लाख पाण्याच्या बाटल्या, आणि १५ खाटांचे रुग्णालय अशा सुविधांची तयारी करण्यात आली आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा तारखेप्रमाणे ६ जून आणि तिथीनुसार ९ जून रोजी साजरा होणार आहे. ६ जून रोजी संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यात दीड लाखांहून अधिक शिवभक्तांच्या उपस्थितीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ९ जूनला होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून, त्या दिवशी ५० हजार शिवभक्त गडावर दाखल होणार आहेत.
प्रशासनाची तयारी ठोस
१५ खाटांचे रुग्णालय गडावर कार्यान्वित
५ बेडचा ICU विभाग पाचाड येथे
१५ तात्पुरते दवाखाने पायरी मार्गावर, गडावर आणखी ४ दवाखाने
५ हजार किलो तांदूळ आणि अन्न शिजवण्यासाठी आवश्यक साहित्य
१ लाख पाण्याच्या बाटल्या, तसेच ५० पाण्याच्या टाक्या (५०० लिटरच्या)
५ जलशुद्धीकरण यंत्र
१५० पोर्टेबल स्वच्छतागृहे गडावर आणि पाचाड येथे प्रत्येकी
१७ उद्घोषणा केंद्रे, २२ मंडप, ७ एलईडी स्क्रीन
गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था
प्रशासनाने १७०० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दल, आणि दंगल नियंत्रण पथक तैनात केले आहेत. शिवभक्तांची वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी १२ वाहनतळ, आणि १०० एसटी बसेस पाचाड ते पायरी मार्गापर्यंत चालवण्यात येणार आहेत.
गर्दी नियंत्रण प्रशासनासाठी मोठे आव्हान
गेल्या काही महिन्यांत देशात घडलेल्या गर्दीतील दुर्घटनांचा अनुभव लक्षात घेता, रायगडवरील लाखो शिवभक्तांची व्यवस्था ही प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरणार आहे. मात्र, रायगड प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून सुरक्षितता आणि सुविधा यांचा मेळ साधण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
Pune News : पुण्यात रात्री पब सुरू राहिल्यास थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई ; आयुक्तांचा इशारा
Newsworldmarathi Pune: पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पब्सवर आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे. यापुढे कोणताही पब ठरलेल्या वेळेनंतर सुरू आढळल्यास त्याची जबाबदारी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर टाकण्यात येणार आहे. अशा पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला आहे.
पोर्शे अपघात प्रकरणानंतर पुण्यातील नाइटलाइफ आणि पब संस्कृतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, यावर नियंत्रण आणण्यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत. त्यानंतरही अनेक पब ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरापर्यंत सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचत होत्या.
ही परिस्थिती पाहता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता थेट कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “पब नियमबाह्य सुरू राहिल्यास केवळ त्यांच्यावर नव्हे, तर त्या भागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकालाही जबाबदार धरले जाईल.”
आयुक्तांनी पोलिसांना सूचना देताना, “केवळ पब मालकांवर कारवाई न करता, संबंधित पोलीस अधिकाऱ्यालाही उत्तरदायी धरलं जाईल. कायदा आणि शिस्त पाळण्यासाठी कडक पावलं उचलली जातील,” असा इशारा दिला आहे.
या निर्णयामुळे पुण्यातील पोलीस विभागात हालचाल सुरू झाली असून, स्थानिक पोलीस निरीक्षक आता अधिक सतर्क झाले आहेत. तसेच पब चालकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे, कारण यापुढे कोणतीही दिरंगाई त्यांच्या व्यवसायावर आणि परवान्यांवर गंभीर परिणाम करू शकते.
पुण्यात कोरोनाचा गुपित स्फोट! सांडपाण्यात आढळले COVID व्हायरस, NCLचा गंभीर इशारा
Newsworldmarathi Pune: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका गडद होताना दिसत आहे. पुण्यातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये (Sewage Treatment Plants) कोरोनाचे विषाणू आढळल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (NCL) दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सर्व १० सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमधील नमुन्यांमध्ये COVID-19 विषाणूचे अंश आढळले आहेत. या घटनेने शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधोरेखित केला आहे.
एनसीएलचे मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. महेश एस. धर्ने यांनी सांगितले की, सांडपाण्यातील विषाणूंची पातळी कोरोना काळातील स्तराशी मिळतीजुळती आहे. याचा अर्थ असा की पुण्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका वाढत आहे. नागरिकांनी अलर्ट राहणे अत्यंत गरजेचे आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
कोविड ट्रॅकिंगसाठी ‘सांडपाणी निरीक्षण’ महत्त्वाचं माध्यम बनलं आहे. संक्रमित व्यक्तींच्या मलमूत्रातून SARS-CoV-2 चं जेनेटिक मटेरियल सांडपाण्यात मिसळतं आणि त्याच्या आधारे संपूर्ण समुदायातील संसर्गाचा अंदाज लावता येतो. विशेष म्हणजे, लक्षणं दिसण्यापूर्वीच संसर्ग पसरतो आहे की नाही हे समजते, ज्यामुळे वेळीच खबरदारी घेता येणं शक्य होतं.
पहिला सैंपल २२ एप्रिल रोजी घेण्यात आला होता, जो पॉझिटिव्ह निघाला. त्यानंतर ६ मे रोजी घेतलेल्या सर्व नमुन्यांमध्येही कोरोनाचे अंश आढळले. हे पाहता सध्या क्लिनिकल चाचण्या न करता देखील शहरातील कोरोना संक्रमणाचे ‘रेअल टाइम’ संकेत मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोग्य विभागासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरते कारण यातून लक्षण नसलेले आणि निदान न झालेले रुग्ण सुद्धा ओळखता येतात. त्यामुळे प्रशासनाने आणि नागरिकांनी सावधगिरीचा इशारा म्हणून ही माहिती गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
Maharashtra Weather : राज्यात पावसाचा ‘कमबॅक’! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत वादळी पावसाचा अलर्ट जारी
Newsworldmarathi Mumbai: महाराष्ट्रात काही दिवस पावसाचा जोर कमी झाला असला, तरी आता हवामान खात्याने पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या २-३ दिवसांत राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले भरून वाहत असून, धरणांतही जलसाठा वाढताना दिसतोय.
या जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट
पुणे, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबईसह कोकणातही वाऱ्याचा जोर
मुंबई आणि उपनगरांत पुढील २४ तासांत ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकणातही काही भागांत ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह वादळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात
या भागांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
विदर्भात मान्सूनचं आगमन कधी?
२८ मे रोजी गडचिरोलीत आलेला मान्सून आठवडाभर तिथेच अडकलेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १३-१४ जून दरम्यान यवतमाळ, अमरावती, अकोला या पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय होईल. १७-२० जूनदरम्यान पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. तोवर विदर्भात तापमान ३९-४० अंशांच्या घरात राहील, त्यामुळे उकाडा काहीसा कायम राहण्याची शक्यता आहे.
Jalindar Supekar : “जालिंदर सुपेकरांचा काळा कारभार उघड! बँकेच्या लॉकरमधील पैसे अन् सोनं हडपलं; 500 कोटींचा भ्रष्टाचार
Newsworldmarathi Pune: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले विशेष महानिरीक्षक (कारागृह) जालिंदर सुपेकर यांच्यावर आता आणखी गंभीर आरोपांची मालिका समोर येत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुण्यातील एका सावकाराच्या वकिलांनी सुपेकर यांच्यावर तब्बल 150 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
वकील निवृत्ती कराड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सुपेकरांनी अमरावती कारागृहात कैद असलेल्या नानासाहेब गायकवाड आणि त्यांच्या मुलगा गणेश गायकवाड यांच्याकडून जामिनाच्या मोबदल्यात तब्बल 550 कोटी रुपये मागितले होते. कराड यांनी या प्रकरणी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून त्यांनी या प्रकरणाचे अनेक धक्कादायक तपशील उघड केले आहेत.
गायकवाड यांचे बँक लॉकर, सोनं व मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम जप्त करताना जालिंदर सुपेकर आणि तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मिळून 100 ते 150 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हे जप्ती दरम्यान झाले असून, याची चौकशी व्हावी, अशी मागणी कराड यांनी केली आहे.
कराड यांनी असा दावाही केला की, अमरावतीला स्थानांतर केल्यानंतर सुपेकर यांनी दोघा कैद्यांना धमकावले व मारहाण केली. “तुम्ही मला पैसे दिले नाही, तर तुम्हाला जामीन मिळणार नाही, मीच तुम्हाला अडकवले आहे,” असे म्हणत सुपेकर यांनी दबाव टाकल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर, सुपेकरांनी कारागृहातील अधिकाऱ्यांना या कैद्यांना छळण्याचे आदेश दिले होते. जे अधिकारी त्यात सहभागी झाले नाहीत, त्यांना निलंबित करण्यात आले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर कारागृहातच एका कैद्याने नानासाहेब गायकवाड यांच्या गळ्यावर पत्र्याने वार केल्याची घटना घडली असून, यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही प्रकरणे उघड झाल्याने महाराष्ट्रातील तुरुंग प्रशासन आणि पोलीस विभागातील कार्यप्रणालीवर अनेक प्रश्नचिन्हं उभी राहिली आहेत. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? आणि सुपेकर व संबंधितांवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Bengaluru Stampede : RCB चा ऐतिहासिक विजय काळवंडला! बंगळुरूमध्ये चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू, RCBची मोठी प्रतिक्रिया…
Newsworldmarathi Banglur : आयपीएल २०२५ चे जेतेपद पटकावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या विजयी मिरवणुकीत एक भीषण दुर्घटना घडली. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर निर्माण झालेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी झाली, ज्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे RCBच्या ऐतिहासिक विजयाला मोठे गालबोट लागले आहे.
घटना कशी घडली?
४ जून रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास RCB च्या विजयोत्सवासाठी हजारो चाहते चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमले होते. मिरवणुकीसाठी नियोजित ‘ओपन बस रॅली’ रद्द करण्यात आली, परंतु चाहत्यांचा ओघ थांबला नाही. गेट नंबर ३ जवळ अफवांचा गोंधळ, अकार्यक्षम व्यवस्था आणि गर्दीच्या नियंत्रणाचा अभाव यामुळे संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली. या भीषण घटनेत एका लहान मुलासह ११ जणांचा मृत्यू झाला असून जखमींवर बोवरिंग व व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
RCB संघाची भावनिक प्रतिक्रिया
या दुर्घटनेनंतर RCB संघाने अधिकृत निवेदन जारी करत शोक व्यक्त केला. त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, “बंगळुरूमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे आम्ही हादरलो आहोत. लोकांच्या सुरक्षिततेला आमच्याकडून नेहमीच प्राधान्य देण्यात येते. मृतांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही मनःपूर्वक शोकसंवेदना व्यक्त करतो. परिस्थिती समजताच आम्ही आमचे संपूर्ण वेळापत्रक बदलले आणि प्रशासनाच्या सल्ल्याचे पालन केले.”
१८ वर्षांनंतरचा विजय… आणि नियोजनातील त्रुटी
RCB ने १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलचे जेतेपद पटकावले. यामुळे संपूर्ण कर्नाटकात उत्सवाचे वातावरण होते. RCB आणि राज्य सरकारने बेंगळुरूमध्ये विजयी मिरवणुकीचे भव्य आयोजन केले होते. मात्र, योजनांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अपेक्षित खबरदारी घेतली गेली नव्हती, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.
शेतीसाठी मॉलही येणार! प्रत्येक जिल्ह्यात ‘कृषी मॉल’ उभारणार; कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा
Newsworldmarathi Mumbai: राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘कृषी मॉल’ उभारण्यात येणार आहेत, अशी मोठी घोषणा कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. हे मॉल सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उभारले जाणार आहेत.
दक्षिण सोलापूरच्या धर्तीवर ‘कृषी मॉल’ – शेतकऱ्यांसाठी नवा बाजारपेठ पर्याय
कृषिमंत्री म्हणाले की, “सोलापूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या कृषी भवन व बाजार मॉलच्या धर्तीवर राज्यातील इतर जिल्ह्यांतही कृषी मॉल उभारले जातील. येथे शेतकरी त्यांचा माल विकू शकतील आणि शेतीसाठी लागणारे साहित्य, बियाणे, खते, औषधे आदी खरेदीही करू शकतील.”
या मॉलमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचणार, तसेच त्यांना नवीन बाजारपेठ मिळणार, आणि ग्राहकांनाही थेट शेतमाल माफक दरात उपलब्ध होणार आहे.
‘एक गाव, एक पीक’ संकल्पनेवर विचार
कोकाटे यांनी यावेळी स्पष्ट केले की, ‘एक गाव – एक पीक’ ही संकल्पना विकसित करण्यासाठीही विचार सुरू आहे, जेणेकरून विविध भागांतील कृषी उत्पादनांचे प्रमाण, गुणवत्ता आणि ब्रँडिंग सुधारू शकेल.
सांगलीच्या अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयासाठी तात्काळ निधी वितरीत करा – मंत्री कोकाटे
या बैठकीत कृषिमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, पेठ येथील कामांबाबतही आदेश दिले. “या महाविद्यालयाचे काम तात्काळ सुरू करा. निधी वितरणात कोणतीही दिरंगाई होऊ देऊ नका,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
“अजित पवार चोरांचा सरदार, उघडं नागडं केल्याशिवाय शांत बसणार नाही!” लक्ष्मण हाकेंचा संतप्त घणाघात
Newsworldmarathi Mumbai : Laxman Hake slams Ajit Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत लक्ष्मण हाके यांनी त्यांना “चोरांचा आणि कारखानदारांचा सरदार” ठरवले. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
हाकेंचा घणाघात : “अजित पवार म्हणजे लुटारूंचे सरदार!”
लक्ष्मण हाके म्हणाले की, “अजित पवार हे चोरांचे, कारखानदारांचे आणि दरोडेखोरांचे सरदार आहेत. मी त्यांना उघडनागडं केल्याशिवाय शांत बसणार नाही.” त्यांनी भाजपवरही टीका केली आणि प्रश्न उपस्थित केला की, “भाजपने आधी अजित पवारांना, आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना का सोबत घेत आहे त्यांना बाहेरच ठेवायला हवं.” असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
माझ्याकडे गाडीसाठी चालक असताना अनेकांनी त्याला मदत केली, माझ्याकडे पैसे नसताना सुद्धा. मी काही पवार कुटुंबासारखा व्यापारी नाही, माझा कुठं कारखाना नाही किंवा रोहित पवार सारखी बारामती ऍग्रो नाही. अजितदादा पवार यांच्याबदल मंत्रिमंडळात नाराजी आहे. माझं भाजपला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक विचारणं आहे. लढायला आम्ही आणि तूप रोटी खायला पवार फॅमिली. हा काय न्याय आहे? त्यांना बाहेर थांबू द्या, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटले.
मिटकरींचा पलटवार : “हाके म्हणजे बारा छिद्राचा पाना!”
अमोल मिटकरी यांनी हाकेंवर जोरदार टीका करत म्हटलं की, “हाके हा बारा छिद्राचा पाना आहे. त्याला ओबीसी नेतेपद मनोज जरांगे यांच्यावर टीका करून मिळालं आहे.” तसेच त्यांनी प्रश्न विचारला की, “हाकेच्या गाडीचा खर्च, फॉर्च्युनर घेण्याचे पैसे कुठून आले? राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्यपद कुठून मिळाले?” त्यावर ते म्हणाले, “हाकेचा मालक दुसराच आहे, त्याने टाकलेल्या तुकड्यामुळेच तो पवार कुटुंबावर भुंकतोय.”
संतप्त राजकारणात ओबीसी प्रश्न गमावतोय का?
राज्याच्या राजकारणात ओबीसी समाजाचे नेतृत्व, प्रतिनिधित्व आणि त्याचे राजकीय भांडवल या पार्श्वभूमीवर हाके-मिटकरी वाद अधिकच तापला आहे. हाके यांनी मिटकरींच्या गावात जाण्याची धमकी दिली असून वाद विकोपाला जात असल्याची चिन्हं आहेत.
लाडक्या बहिणींना दिलासा…! मे महिन्याचा हप्ता आजपासून खात्यात जमा होणार; आदिती तटकरे यांची माहिती
Newsworldmarathi Mumbai: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन’ योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता अजूनही खात्यावर जमा न झाल्याने राज्यातील महिलांमध्ये नाराजी दिसून येत होती. मात्र, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात मोठी घोषणा करत महिलांना दिलासा दिला आहे.
त्यांनी स्पष्ट केलं की, ४ जूनपासून मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असून, ५ जूनपासून रक्कम थेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये जमा होईल.
निवडणूकपूर्व गती, निवडणूकनंतरची प्रतीक्षा
योजनेच्या सुरुवातीपासून दरमहा १५०० रुपये मिळणाऱ्या महिला लाभार्थींना एप्रिल महिन्याचा हप्ता ७ मे रोजी मिळाला होता. मात्र त्यानंतर मे महिन्याची रक्कम मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे अनेक महिलांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. आता सरकारने स्पष्ट वेळापत्रक जाहीर करत ही अनिश्चितता दूर केली आहे.
आदिती तटकरे यांचा विश्वासदायक संदेश
योजनेविषयी माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या की, “महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना यापुढेही दमदारपणे सुरू राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे.” त्यांनी हे आशयाचे ट्वीटही सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
योजनेचा थोडक्यात आढावा
योजना सुरूवात: मार्च २०२३
दरमहा रक्कम: 1500
एकूण मिळालेली रक्कम: ₹16,500 (११ हप्ते)
एप्रिल हप्ता जमा: ७ मे
मे हप्ता जमा: ५ जूनपासून
काहीवेळा दोन महिन्यांचे हप्ते एकत्र जमा करण्यात आले आहेत. योजनेच्या सुसंगततेसाठी आधार लिंक खातं असणे अनिवार्य आहे.
राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत तात्पुरता विलंब झाला असला, तरी सरकारचा पाठिंबा कायम आहे, आणि हप्ता नियमितपणे मिळत राहील, असा विश्वास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
खासदारकीच्या वर्षपूर्तीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पुणेकरांशी भावनिक संवाद, म्हणाले, माझ्या पुणेकर सुहृदांनो…
Newsworldmarathi Pune : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या खासदारकीच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले. याबाबत त्यांनी पुणेकरांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझ्या पुणेकर सुहृदांनो,
आपणा सर्वांना सस्नेह नमस्कार ! खासदारकीचे प्रथम वर्ष आज पूर्ण करीत असताना माझ्या मनात भावनांची गर्दी आहे. दिलेले तुमचे प्रत्येक मत माझ्यावरील विश्वासाची आणि प्रेमाची पावती होती, अशी माझी विनम्र भावना आहे. या क्षणी आपल्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भावनांना मोकळी वाट करून देतो आहे.
पुणेकरांचे प्रेम आणि विश्वास गेली पंचवीस वर्षे मी सातत्याने अनुभवतो आहे. तुमच्या आशीर्वादांच्या बळावरच नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्षपद, महापौरपद आणि आता खासदार हा माझा प्रवास निर्वेध झाला. तुमच्या पाठबळाशिवाय एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला हे सारे लाभणे अशक्य होते, याची नम्र जाणीव माझ्या काळजात सदैव आहे.
मी स्वतःला भाग्यशाली समजतो, की मी अशा विशाल संघ परिवारात आहे, जेथे राष्ट्रभक्तीचा संस्कार रोज केला जातो आणि हा यज्ञ गेली १०० वर्षे अखंड सुरू आहे. त्यातून कोट्यवधींच्या जीवनाला दिशा लाभली. कोट्यवधींच्या मनात समर्पणाचा संस्कार रुजला. मी अशा पक्षात आहे, जेथे कार्यकर्त्याला संधी मिळते, कार्यकर्ता घडविला जातो.
संघ स्वयंसेवक ते केंद्रीय मंत्री हा माझा प्रवास संघसंस्कार आणि भारतीय जनता पार्टीतील शिदोरीवर घडला आहे, याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. मागे वळून पाहताना माझ्या डोळ्यांसमोर तीस वर्षांचा पट उभा राहतो. सामान्य बूथ कार्यकर्त्यापासून माझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली. बूथप्रमुख, वॉर्ड अध्यक्ष, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, पुणे शहर संघटन सरचिटणीस, प्रदेश सरचिटणीस अशा असंख्य जबाबदाऱ्या येत गेल्या आणि मी त्या निभावत गेलो. राजकीय क्षेत्रातील वाटचाल अनेक चढ-उतार घेऊन चालावी लागते. अनेकदा निराशा येते. अशा वेळी याच पक्षातील नेतृत्वाने पाठीवर प्रेमाचा हात फिरविला. मनामध्ये पुन्हा नवा आशावाद पेरला. त्यातूनच आज मी येथपर्यंत पोचलो आहे, हा माझा ठाम विश्वास आहे.
माझ्या आयुष्यात मला पक्षात नेत्यांच्या रूपात पालकच लाभले. त्यांनी माझे बोट धरून राजकीय बाराखडी माझ्याकडून गिरवून घेतली. माझ्यातील नेतृत्वगुण विकसित होतील, यादृष्टीने सतत वाव दिला. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी माझ्यातील कार्यकर्त्याचा नेता बनण्याच्या प्रक्रियेला आकार दिला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय नितीनजी गडकरी, स्वर्गीय गिरीशजी बापट, अनिलराव शिरोळे, रावसाहेब पाटील दानवे, चंद्रकांत(दादा) पाटील, चंद्रशेखर बावनकुळे या व अशा अनेक नेत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला. मार्ग अधिकाधिक सुकर करीत नेला. त्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आदरणीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमितभाई शहा यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळण्याइतपत मजल मारू शकलो. आदरणीय मोदीजी आणि अमित शहाजी यांच्यासोबत काम करतानाही आंतरिक जिव्हाळा आणि कार्यकर्ता परिपूर्ण होण्यासाठीचा त्यांचा दृष्टिकोन मी सतत अनुभवतो आहे.
खासदारकीचे वर्ष पूर्ण होत असताना माझ्यावर जिवापाड प्रेम करणारे माझे सर्व सहकारी, पक्षातील मित्र, माझ्यासाठी निरपेक्ष भावनेने काम करणारे सर्व सवंगडी यांचा उल्लेख करावाच लागेल. त्यांच्याशिवाय मी अपूर्ण आहे. राजकीय जीवनात सर्वाधिक ताण येतो तो कुटुंबातील सदस्यांवर. गेल्या वर्षभरात मी त्यांच्या वाट्याला काही तासच आलो असेन, परंतु त्यांनी मला समजून घेतले. माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद, माझी पत्नी मोनिका, कन्या, बंधू, कुटुंबातील अन्य सदस्य यांची भक्कम साथ यांमुळेच मी पूर्णपणे झोकून देत काम करू शकलो. या सर्वांविषयी मी कृतज्ञ आहे.
मी महापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष असताना तुम्हा सर्व पुणेकरांचा मला भरघोस पाठिंबा लाभला. तोच अनुभव मी या वर्षभरातही घेतो आहे. याआधी जशी तुम्हाला सोबत घेत काम करण्याची माझी भूमिका होती, त्यात आजही काहीही बदल झालेला नाही. तुमची सोबत आणि साथ हेच माझे भांडवल आहे. देशपातळीवर मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडत असतानाही तुमचे मजबूत पाठबळ माझ्यात अधिक आत्मविश्वास भरते आहे.
पुणेकरांच्या प्रत्येक मताचे मोल मी जाणतो. आपण दिलेले मत सार्थ करण्यासाठी माझा निरंतर प्रयत्न राहील, हा विश्वास या निमित्ताने देतो.
समाजव्यापी परमेशाचे, कोटी कोटी रूपे घडते दर्शन, याचा अनुभव मी गेले वर्षभर देशभर फिरत असताना घेतो आहे. या देशाची महती आणि सामर्थ्याची अनुभूती घेतो आहे. देशासाठी आणि पुण्यासाठी काम करण्याचा माझा निश्चय अधिकाधिक दृढ होतो आहे. असेही ते म्हणाले…

