प्रेमराज भाऊ गदादे पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
Newsworldmarathi Pune: पर्वती पायथा परिसरातील शिवाजी गदादे पाटील यांचे सुपुत्र प्रेमराज गदादे पाटील यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रेमराज यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली भावना व्यक्त केली. कार्यक्रमस्थळी हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली आणि प्रेमराज यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
प्रेमराज आणि प्रिया गदादे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवकांच्या मार्गदर्शन शिबिरांसारख्या उपक्रमांतून समाजसेवेचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या समाजकार्याच्या बळावर आपण येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज असून, जनतेच्या विश्वासाने पुढे जाण्याचा निर्धार असल्याचे प्रेमराज यांनी स्पष्ट केले.
वाढदिवसाच्या निमित्ताने झालेले हे सभासदांचे आणि समर्थकांचे संमेलन एकप्रकारे त्यांच्या राजकीय भवितव्याची नांदी ठरले असून, या सोहळ्याने परिसरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे.
जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट
Newsworldmarathi Mumbai : भारत आणि जपान नैसर्गिक मित्र असून आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्याही दोन्ही देशांचं वेगळं नातं आहे. भारताच्या औद्योगिक प्रगतीत, पायाभूत सुविधांच्या निर्मितीत जपानची भूमिका महत्वाची राहिली आहे. भारतात जपाननं मोठी औद्योगिक गुंतवणुक केली असून महाराष्ट्रात तीनशेहून अधिक तर, पुणे आणि परिसरात पन्नास कंपन्या कार्यरत आहेत. राज्याच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीत, रोजगारनिर्मितीत मोलांचं योगदान देणाऱ्या या कंपन्यांच्या समस्यांचे निराकरण करुन त्यांच्यासाठी उद्योगपुरक वातावरण निर्माण करणं शासनाची जबाबदारी आहे. यापुढील काळात उद्योग, आर्थिक क्षेत्रातील सहकार्यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत यागी कोजी यांच्या भेटीदरम्यान आज झालेल्या चर्चेवेळी केलं.
जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी जपानी राज्यात जपानी गुंतवणूक वाढवण्यासह, उद्योगक्षेत्रासमोरील अडचणी दूर करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. उद्योग, आर्थिक क्षेत्रांबरोबरंच दोन्ही सामाजिक,सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यावरही चर्चेत भर देण्यात आला. राज्याच्या नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.
मुंबई, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी कार्यरत जपानी कंपन्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना सोडविण्यास राज्य शासन प्राधान्य देईल. चांगले रस्ते, पुरेशी वीज, आवश्यक पाणी, सुरक्षित वातावरण आदी पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनाची आहे, ती पार पाडण्यात येईल. पुण्याच्या औद्योगिक परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करणयात येईल. सणसवाडी ते पिंपळे जगताप या रस्त्यासाठी ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तिथे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून पावसाळ्यानंतर या रस्त्याचे काम सुरू होईल. जिथे तातडीने रस्तादुरुस्ती आवश्यक आहे तेथे काँक्रीटच्या रस्त्याचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले.
पुण्यातील जपानी कंपन्यांना पायाभूत सुविधांबरोबरच रस्ते, वीज, पाणी दळणवळणासंदर्भातील प्रश्न तातडीने सोडवण्यात येतील. जपानी कंपन्यांच्या प्रश्नांसंदर्भात जपानी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोवत पुण्यात बैठक आयोजित करण्यात येईल. धोरणात्मक आणि करासंदर्भातील प्रश्नही सोडवले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जपानच्या मुंबईतील महावाणिज्यदूतांना दिली. यावेळी मियावाकी उद्याने, सामाजिक उत्तरदायित्व निधी, जायका, एस.टी.पी., पूर नियंत्रण अशा विविध प्रश्नांवर उभयतांमध्ये चर्चा झाली. पुढील काळात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे वातावरण अधिक चांगले होईल आणि भारत-जपान मैत्री आणखी दृढ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी व्यक्त केला.
Sinhagad Fort : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी…! सिंहगड किल्ला ५ जूनपासून पुन्हा खुला; पर्यटकांसाठी सज्ज
Newsworldmarathi Pune: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! सिंहगड किल्ला ५ जून २०२५ पासून पर्यटकांसाठी पुन्हा खुला होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार, किल्ल्यावर चालवण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे २९ मेपासून किल्ला बंद करण्यात आला होता. या मोहिमेअंतर्गत, वन विभाग, महसूल विभाग, पुरातत्त्व विभाग, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त कारवाईत १४१ अनधिकृत स्टॉल्स आणि काही आरसीसी बांधकामे हटवण्यात आली आहेत .
अतिक्रमण हटवण्यासाठी किल्ल्याच्या दुर्गम भौगोलिक स्थितीमुळे यंत्रसामग्रीचा वापर शक्य नसल्याने सर्व बांधकामे हाताने पाडण्यात आली . या कारवाईमुळे किल्ल्याचा ऐतिहासिक आणि पर्यावरणीय वारसा जपण्यास मदत होणार आहे.
५ जूनपासून किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार असला तरी, पर्यटकांनी नवीन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. १ जूनपासून किल्ल्यावर प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. विशेषतः, पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांसाठी डिपॉझिट प्रणाली लागू करण्यात आली आहे. पर्यटकांनी प्लास्टिक बाटल्या घेऊन आल्यास त्यावर डिपॉझिट भरावे लागेल आणि बाटल्या परत केल्यावर डिपॉझिट परत दिले जाईल.
सिंहगड किल्ला हा पुणेकरांसाठी एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ असून, त्याच्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे अनेक पर्यटक येथे भेट देतात. किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे, तसेच ट्रेकिंगसाठीही मार्ग आहेत. ट्रेकिंग मार्ग सुमारे २.७ किमी लांब असून, यामध्ये सुमारे ६०० मीटर उंची वाढ होते. पर्यटकांनी किल्ल्यावर भेट देताना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Jalindar Supekar : सुरेश धसांच्या ३०० कोटींच्या आरोपांनी खळबळ; सुपेकर-कराड कनेक्शन समोर?
Newsworldmarathi Mumbai: : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुपेकर यांनी तुरुंगातील आरोपींकडून ३०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा केला आहे. या आरोपांमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सुपेकर-कराड कनेक्शन
अंजली दमानिया यांनी दावा केला आहे की, सुपेकर यांचा बीड येथील वाल्मिक कराडशी व्यावसायिक संबंध आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असून, त्याच्यावर खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल आहे. दमानिया यांनी यासंदर्भातील कागदपत्रे सादर केली आहेत.
चौकशीत काय समोर येणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गृह विभागाकडे असलेल्या ६०० प्रकरणांपैकी ३०० प्रकरणांचा अहवाल तयार झाला असून, उर्वरित प्रकरणांचा तपास सुरू आहे. अंजली दमानिया यांनी सांगितले की, “या चौकशीतून अनेक बाबी समोर येतील. तुरुंगातील भ्रष्टाचार आणि पैशाच्या मागणीची प्रकरणे उघडकीस येणे आवश्यक आहे.” यामुळे सुपेकर आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांवरील कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.
जालिंदर सुपेकर यांच्याकडून प्रत्येक जेलमध्ये पैशांची मागणी केली जाते. सुरेश धस यांनी सुद्धा आता सुपेकर यांनी 300 कोटींची मागणी होती असा आरोप केला आहे. यामुळे यावर आता अनेक खुलासे होतील. गन लायसन्स प्रकरणातही सुपेकर यांनी पैशाची मागणी केली होती.
पुण्याचे तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरही आरोप
जालिंदर सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता या दोघांनी शस्त्र परवान्यांचे वाटप करण्यात प्रचंड प्रमाणात पैसे खाले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही याची चौकशी लावली आहे. 600 प्रकरणे अशी आहेत ज्यात पैसे खाल्ले गेले आहेत. यापैकी 300 प्रकरणाचा अहवाल गृह विभागासमोर आला आहे. त्याची माहिती घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. अनेक प्रकरणे बाकी आहेत. यातून आता अनेक खुलासे होतील, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
अंबरनाथमध्ये खळबळ…! राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून महिलेचा विनयभंग
Newsworldmarathi Mumbai: शहरातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून एका महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इम्रान खान असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अंबरनाथ नगरपालिकेच्या बाहेर घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथमध्ये राहणारी एक महिला तिच्या कामानिमित्त नगरपालिकेत गेली होती. त्यावेळी तिथे इम्रान खान याने त्याच्या कामानिमित्त आला होता. त्यावेळी त्याने एका महिलेचा विनयभंग केला. तसेच चलती है क्या? कितना लेगी? यासारख्या शब्दांचा वापर यावेळी केला आहे. एवढेच नाय तर त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला,नको तिथे हात लावला. असे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी इम्रान खान यांच्याकडून याबाबत अध्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी मनसेची पूर्वतयारी जोरात; शहर पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
Newsworldmarathi Pune : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२५ ची तयारी सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुणे शहरासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पक्षाच्या पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून निवडणुकीसंदर्भातील प्राथमिक आढावा घेण्यात आल्याची माहिती मनसे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली.
पुणे शहरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेला भक्कम पर्याय म्हणून उभं करायचं असून, त्यासाठी संघटनात्मक पातळीवर तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. बैठकीत शहरातील प्रभागनिहाय परिस्थिती, स्थानिक समस्या, मनसेच्या सध्याच्या जनाधाराचा आढावा तसेच प्रचार आणि जनसंपर्क यंत्रणेबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत शहरातील प्रत्येक विभागात पक्षाची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी योजना आखण्यात आल्या. स्थानिक कार्यकर्त्यांशी अधिक समन्वय साधणे, प्रभागनिहाय बैठकांचे आयोजन करणे आणि मनसेची धोरणं व कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
मनसेने यापूर्वीही पुण्यात आपली दमदार उपस्थिती दाखवली असून, येत्या निवडणुकीत शहरातील अधिक जागांवर प्रभावी लढत देण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ही बैठक पक्षासाठी रणनीतीदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, येत्या काही आठवड्यांत अजून काही महत्त्वाच्या बैठका घेण्यात येणार असल्याची माहितीही पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
Pune Crime: माझ्या लग्नाला का आला नाही म्हणत मारहाण, जीवे मारण्याची धमकी, 5 अटकेत
Newsworldmarathi Pune : माझ्या लग्नाला का आला नाही? म्हणत पिस्तूल दाखवत 6 ते सात जणांकडून कुटुंबाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे. पुण्याच्या सासवड पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी केतकी धनंजय झेंडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, 24 मे रोजी महाराजा लॉन्स सासवड हडपसर येथे फिर्यादीच्या चुलत भावाचा साखरपुडा होता. या कार्यक्रमाला नवरदेवाला जाण्यासाठी फिर्यादीची मर्सीडीज गाडी नियोजित करण्यात आली होती. फिर्यादीसह भाऊ सुनील कोलते, धर्मराज कोलते, मलिनी कोलते, सारीका यादव, निलेश यादवसह पती योगेश यादव असे सर्व नातेवाईक हजर होते.
हा कार्यक्रम सुरु असतानाच याठिकाणी चुलत भाऊ संकेत यादव विनय यादव, दिलिप यादव सुनिता यादव शुभांगी दौंडकर अक्षता यादव भुजंग यादव महेश यादव यांच्यासह इतर आरोपी पोहोचले. यापैकी एकाने फिर्यादीकडे 7/05/2025 रोजी माझ्या लग्नाला आला नाहीत मग आज या साखरपुड्याला कसे आलात? असे म्हणत अंगावर धावून आले. यापैकी अक्षता यादव, सुनिता यादव, शुभागी दौंडकर यांनी दोन्ही भावांना बेदम मारहाण केली.
Mumbai Crime News : लग्नमंडपाला कुत्रा बांधल्याच्या वादातून नवरदेवाला मारहाण
Newsworldmarathi Mumbai: ठाणे जिल्ह्यातील शीळ गावातील भोईर कंपाउंड येथे एका लग्नमंडपाला कुत्रा बांधल्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन नवरदेवाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे नोंदवले आहेत.
नवरदेवाची तक्रार
नवरदेव भावेश लोलगे (२७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३१ मे रोजी त्यांच्या आजीच्या घरासमोर लग्नमंडप उभारण्यात आला होता. विशाल म्हात्रे यांनी त्यांच्या कुत्र्याला मंडपाच्या लाकडाला बांधले, ज्यामुळे कुत्र्याने मंडप फाडला. या घटनेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावेश यांना विशालच्या पत्नी दर्शना यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर विशाल यांनी लाकडी दांडक्याने भावेश यांच्या डोक्यावर मारले. विशालचा भाऊ अविनाश आणि त्यांची पत्नी धनश्री यांनीही भावेश यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि धमकी दिली.
म्हात्रे कुटुंबाची तक्रार
दर्शना म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भावेश लोलगे यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्या घरी येऊन शिवीगाळ केली. त्यांनी फायबर काठीने दर्शना आणि तिच्या भाची अक्षरा रणजित फुलोरे हिला मारहाण केली. विशाल यांनी हस्तक्षेप केल्यावर भावेश यांनी त्यांनाही मारहाण केली. भावेश यांचे भाऊ रवी लोलगे यांनी धनश्री म्हात्रे आणि अक्षरा फुलोरे यांना मारहाण केली, तर ललिता पाटील आणि कविता यांनी शिवीगाळ केली.
या प्रकरणात शीळ डायघर पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे 11 वर्षानंतर गोपीनाथगडावर एकत्र
Newsworldmarathi sambhajinagar :भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयातील लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ११व्या स्मृतिदिनानिमित्त परळी येथील गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमाने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले.
या स्मृतिदिन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे, मुंडे कुटुंबातील दोन महत्वाचे चेहरे – पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे – तब्बल ११ वर्षांनंतर एका मंचावर एकत्र दिसले. दोघांनीही कार्यक्रमात हजेरी लावल्याने हा क्षण अत्यंत भावनिक ठरला.
कार्यक्रमादरम्यान पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी दिवंगत वडिलांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. दोघांनीही परस्परांविषयी आदरयुक्त भाव व्यक्त करत उपस्थित कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.
या भावनिक वातावरणाचा शिरकाव अधिक गडद झाला जेव्हा कार्यक्रमाच्या शेवटी दोघेही एकाच ताटात जेवत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. हा क्षण उपस्थित कार्यकर्त्यांसाठी केवळ आश्चर्यकारक नव्हता, तर तो आनंद आणि आशेचा किरणही ठरला.
राजकीय मतभेदांमुळे अनेक वर्षे एकमेकांपासून दूर राहिलेल्या या दोघा भावंडांनी एकत्र आलेल्या या प्रसंगाने कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा एकत्र येण्याची आशा निर्माण केली आहे.
गोपीनाथगडावरील हा कार्यक्रम केवळ श्रद्धांजलीपर कार्यक्रम न राहता, कुटुंबीयांतील दूर गेलेल्या संबंधांमध्ये सौहार्द निर्माण करणारा महत्त्वपूर्ण क्षण ठरला.
खळबळजनक…! गुंगीचे औषध पाजून तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार
Newsworldmarathi Mumbai: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंब्रा भागात राहणाऱ्या एका तरुणाने २२ वर्षीय तरुणीला महापे एमआयडीसीतील एका लॉजवर आणून तिला पाण्यातून गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. फरदीन खान (वय-२४) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा परिसरात राहणारा फरदीन व २२ वर्षीय पीडित तरुणी यांची लग्न जुळवणाऱ्या साईटवरून ओळख झाली. दरम्यान, त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर फरदीन याने त्याच्या मोबाईलमध्ये असलेले या तरुणीचे अश्लील फोटो दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी तिला दिली व २८ मे २०२५ रोजी महापे येथील साची लॉजिंगमध्ये आणले. तत्पूर्वी त्याने तिला पाण्यातून गुंगीचे औषध पाजले.
त्यामुळे ही तरुणी लॉजच्या खोलीत चक्कर येऊन बेशुद्ध होऊन पडली. त्यावर फरदीन याने या बेशुद्धावस्थेत पडलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. काही वेळाने पीडित तरुणीला जाग आल्यानंतर फरदीन याने तिच्या शरीराला स्पर्श करून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याला विरोध करत त्याच्याविरोधात तक्रार करण्याची धमकी दिली.
त्यावर फरदीन याने यात तुलाच त्रास होईल, अशी तिला धमकी दिली. या प्रकारानंतर ही तरुणी घरी गेली व अंघोळ करत असताना फरदीन याने ती बेशुद्धावस्थेत असताना, तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे तिच्या लक्षात आले. त्यावर तिने स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेऊन फरदीनविरोधात तक्रार दाखल केली. रबाळे पोलिसांनी फरदीन खान याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

