मोठी बातमी…! हगवणे प्रकरणात माजी मंत्र्यांच्या मुलासह पाच जणांना अटक
Newsworldmarathi Pimpri : पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी आरोपी राजेंद्र हगवणे व सुशील हगवणे यांनी सात दिवस पोलिसांना गुंगारा दिला. त्यांना अटक केल्यानंतर आरोपी हगवणे यांना मदत करणारे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. दरम्यान, अधिक तपासात त्यांना मदत केल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी सोमवारी कर्नाटकच्या माजी ऊर्जामंत्र्यांच्या मुलासह पाच जणांना अटक केली आहे.
प्रीतम वीरकुमार पाटील (वय-४७, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या माजी मंत्र्यांच्या मुलाचे नाव आहे. यासह मोहन ऊर्फ बंडू उत्तम भेगडे, बंडू लक्ष्मण फाटक, अमोल विजय जाधव, राहुल दशरथ जाधव यांनादेखील अटक करण्यात आली आहे. प्रीतम याचे वडील वीरकुमार पाटील यांनी काँग्रेसमधून सलग २८ वर्षे आमदार होते. त्यांनी ऊर्जामंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला होता.
पोलिसांच्या तपासानुसार, या आरोपींनी राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील विविध ठिकाणी लपवले, त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था केली आणि आर्थिक मदत पुरवली. विशेषतः, कर्नाटकातील एका हेरिटेज रिसॉर्टमध्ये राजेंद्र हगवणे यांच्यासाठी करण्यात आलेले बुकिंग प्रीतम पाटील यांच्या नावावर असल्याचे उघड झाले आहे.
पोस्टमॉर्टेम अहवालानुसार, वैष्णवी हगवणेच्या शरीरावर ३० जखमा आढळल्या असून त्यातील १५ ताज्या होत्या. या प्रकरणात वैष्णवीच्या पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना आधीच अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही आरोपींच्या अटकेसाठी तपास सुरू ठेवला आहे. विशेषतः, निलेश चव्हाण या आरोपीविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
बीडमध्ये भीषण अपघात…! गाडी डिव्हायडरवर चढली, जीव वाचवायला उतरताच ट्रकने सहा जणांना चिरडलं
Newsworldmarathi Beed: बीडमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पूल येथे अंगावर शहारे आणणारा अपघात झाला आहे. गाडी डिव्हायडरवर चढली, अन जीव वाचवत सगळे खाली उतरताच पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने चिरडून जागीच सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बीडमधील गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावर मध्यरात्री घडली आहे. या अपघातातील सहा जणांच्या मृत्यूने गेवराई गावावर शोककळा पसरली आहे.
बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तसेच एका गंभीर जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका एसयूव्ही वाहनाचा डिव्हायडरला धडकून किरकोळ अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले. म्हणजे असे म्हणता येईल, काळ आला होता,पण वेळ आली नव्हती. मात्र, त्यानंतर दुसऱ्यांदा पाठीमागून वेगाने ट्रक आली, तिने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या व्यक्तीला जोरदार धडक दिली. आणि संबंधित ट्रक चालकाने तिथून पळ काढला.
दरम्यान, धडक इतकी जोरदार होती कि, त्यामध्ये एकाच वेळी सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावेळी सहाजण दूरवर फेकले गेले. सहा जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले होते. अपघात झाल्यानंतर संबंधित ट्रक चालकाने तिथून पळ काढला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पहिल्यांदा झालेल्या अपघातामधून वाचले पण त्यानंतर मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातलाच. या अपघातामध्ये सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
राज्यातील केंद्रीय कार्यालयांत मराठी भाषा अनिवार्यच !
Newsworldmarathi Mumbai: महाराष्ट्र शासनाने एक नवीन परिपत्रक जारी करून राज्यातील सर्व केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य केला आहे. या निर्णयामुळे बँका, रेल्वे, विमा कंपन्या, टपाल, दूरध्वनी, गॅस, पेट्रोलियम, कर विभाग, मेट्रो, मोनो रेल आणि विमान प्रवास यांसारख्या सेवा पुरवणाऱ्या केंद्र शासनाच्या कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक झाला आहे.
अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे
या परिपत्रकानुसार, जिल्हाधिकाऱ्यांना केंद्राच्या कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर होत आहे की नाही, याची पडताळणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी संबंधित कार्यालयांकडून स्वयंघोषणापत्र घेतले पाहिजे आणि ते कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.
त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी
केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार, इंग्रजी, हिंदीसोबत संबंधित राज्याची प्रादेशिक भाषा वापरणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात मराठी ही राज्यभाषा असल्याने, केंद्राच्या सर्व कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
तक्रारींसाठी व्यवस्था
जर कोणत्याही कार्यालयात मराठी भाषेचा वापर होत नसेल, तर नागरिक संबंधित कार्यालयाच्या प्रमुखाकडे तक्रार करू शकतात. जर त्यावर कारवाई झाली नाही, तर राज्य विधिमंडळाच्या मराठी भाषा समितीकडे अपील करता येईल.
स्थानिक प्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली बैठक
धरणे आणि तालुका स्तरावर समन्वय अधिकारी नेमून, पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली बैठकांचे आयोजन करण्यात येईल. या बैठकींमध्ये केंद्र शासनाच्या कार्यालयातील प्रमुखांना आमंत्रित करून मराठी भाषेच्या वापराबाबत जागरूकता निर्माण केली जाईल.
हा निर्णय राज्यातील नागरिकांना त्यांच्या मातृभाषेत सरकारी सेवा मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे
मोठी बातमी : वैष्णवी हगवणे हिच्या अंगावर मारहाणीचे 29 पैकी 6 व्रण ताजे
Newsworldmarathi Pimpri: सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी तिचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे आणि नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.
या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या मृत्यूच्या दिवशीच तिला कुटुंबीयांकडून मारहाण झाली होती, अशी बाब पोस्टमॉर्टेम अहवालातून स्पष्ट झाली आहे. या आधारावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी शशांक, लता आणि करिश्मा हगवणे यांची 7 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती.
मारहाणीचे 29 पैकी 6 व्रण ताजे
वैष्णवी हगवणेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येच्या दिवसापर्यंत हगवणे कुटुंबियांकडून तिचा छळ करण्यात आला आहे. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीला हगवणे कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आली आहे. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे एकूण 29 व्रण आहेत, त्यातील ५ ते ६ व्रण ताजे असल्याचे उघड झाले आहे. आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीचा हगवणे कुटुंबियांकडून छळ झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे.
पोलीस कोठडीत वाढ
तसेच वैष्णवी हगवणेच्या अंगावर असलेले व्रण म्हणजेच तिला ज्या हत्याराने मारहाण केली त्या हत्यारांचा अद्याप तपास लागलेला नाही. ते हत्यार नेमके ठेवले कुठे आहेत? याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. यासाठीही पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. यावर न्यायालयाने पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा या तिघांना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांची पोलीस कोठडी सुद्धा 28 तारखेपर्यंत आहे.
मार्च 2026 पूर्वी संपूर्ण देश नक्षलमुक्त करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडच्या शंखनाद सभेतून ग्वाही
Newsworldmarathi Nanded : ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईतून भारताने आपली क्षमता आणि ताकद जगासमोर सिद्ध केली असून भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा मोदी सरकारने केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर जगाला दिला आहे. आता देशातील नक्षलवाद्यांचे अड्डेही उद्ध्वस्त करण्यात येत असून 31 मार्च 2026 या तारखेपूर्वी या देशाच्या भूमिवरून नक्षलवादाचा नायनाट झालेला असेल, या संकल्पाचा पुनरुच्चार आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी नांदेड येथील प्रचंड शंखनाद सभेत बोलताना केला.
गेल्या 22 एप्रिलला पहलगाममध्ये पाक प्रशिक्षित अतिरेक्यांनी आपल्या निष्पाप पर्यटकांची भ्याड हत्या केली, तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना धूळ चारण्याचा इशारा दिला होता.
10 वर्षांपूर्वीची काँग्रेसची सत्ता संपली आहे, आता मोदी सरकार आहे, याचा पाकिस्तानला विसार पडला. पहलगाम हल्ल्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूर कारवाईत पाकिस्तानात घुसून शेकडो पाकिस्तानी अतिरेक्यांना ठार करून केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला एक संदेश दिला गेला आहे. भारताच्या जनतेवर, सीमेवर हल्ला झाला तर ‘गोली का जवाब गोले से दिया जायेगा’, हा संदेश देऊन 7 मे रोजी 22 मिनिटांत अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्याचे काम भारतीय सेनेने केले.
8 मे रोजी पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले केले, पण आपल्या सक्षम सुरक्षा व्यवस्थेने एकही क्षेपणास्त्र किंवा ड्रोन भारताच्या भूमीवर घुसू न देता हवेतच त्यांची वासलात लावली. 9 तारखेला पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीम आणि हवाई तळांवर हल्ले करून आमच्या सेनेने त्यांची पूर्णपणे वाताहत केली, आणि आमच्या माताभगिनींच्या कपाळावरचे ‘सिंदूर’ स्वस्त नाही, याची जाणीव जगाला करून दिली. हा नवा भारत असून विकसित आणि बलवान भारताकडे कोणाचीही वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमतही होणार नाही, हे मोदी सरकारने सिद्ध करून दाखविले. रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, व्यापार आणि दहशतवादही एकत्र चालणार नाही, हे मोदी यांनी बजावले आहे.
यापुढे अशी आगळीक केलीच तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही मोदी यांनी दिला आहे. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी सर्वपक्षीय नेते जगाच्या वेगवेगळ्या देशांत जात असताना, उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या एका नेत्याने गळे काढण्यास सुरुवात केली, पण जर बाळासाहेब असते, तर ऑपरेशन सिंदूर च्या यशस्वी कारवाईबद्दल त्यांनी मोदीजींना मिठी मारली असती, अशा शब्दांत श्री. शाह यांनी ठाकरे यांच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांचा नामोल्लेखही न करता टीका केली. या सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळात त्यांच्या पक्षाचेही प्रतिनिधी आहेत, पण उद्धव सेना त्याची वरात म्हणून संभावना करते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आपल्या भाषणात शाह यांनी फडणवीस सरकारने मराठवाड्यात सुरू केलेल्या पाणी योजनांचा संपूर्ण तपशील मांडला. ठाकरे सरकारने त्यामध्ये अडथळे आणले, पण आता पुन्हा देवेंद्र फडणवीस सरकारने या सर्व प्रकल्पांना गती दिली असून मराठवाड्याच्या प्रत्येक घरात, शेतात पाणी पोहोचेल अशी व्यवस्था केली आहे, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची जुनी मागणी असतानाही शरद पवार यांच्यासारख्या दीर्घकाळ केंद्रीय मंत्री राहिलेल्या नेत्याने काहीच केले नाही, ते काम मोदीजींनी केले, असे ते म्हणाले. येत्या काही वर्षांत शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि सावरकरांची ही महाराष्ट्र भूमी विकसित भारताच्या निर्मितीत अग्रेसर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री व खा. अशोक चव्हाण, आदी नेत्यांचीही या विशाल सभेत भाषणे झाली. ऑपरेशन सिंदूर कारवाईतून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सेनादलाने केलेल्या कारवाईतून भारताने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, तर या सभेच्या माध्यमातून संपूर्ण भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी व पराक्रमी भारतीय सेनादलांचे अभिनंदन करण्यासाठी सरकारसोबत उभा आहे, अशी ग्वाही प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.
सावरकरांची खोली राहणार दर्शनासाठी खुली
Newsworldmarathi Pune: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील खोली त्यांच्या जयंती निमित्त येत्या बुधवारी (28 मे) सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांना दर्शनासाठी खुली राहणार आहे.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहात 1902 ते 1905 या कालावधीत विद्यार्थी असताना सावरकरांनी वास्तव्य केले होते. ते वसतिगृह क्रमांक 1 मधील खोली क्रमांक 17 मध्ये राहत असत. ही खोली त्यांच्या क्रांतिकारी विचारांची आणि उपक्रमांची साक्षीदार आहे.
या खोलीत सावरकरांचा अर्धपुतळा, डी.लिट. पदवीचे दोन गणवेश, त्यांच्या वापरातील वस्तू आणि दुर्मीळ छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत. या खोलीत सावरकरांनी अनेक महत्त्वाच्या क्रांतिकारी उपक्रमांची योजना केली. त्यात विदेशी वस्त्रांची होळी, स्वदेशी चळवळीची सुरुवात आणि ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारी संघटनेची स्थापना यांचा समावेश आहे. या खोलीतूनच त्यांनी ‘सिंहगडाचा पोवाडा’, ‘बाजीप्रभू देशपांडे’ यांसारखी काव्ये रचली.
1905 साली विदेशी वस्त्रांची होळी केल्याच्या घटनेनंतर, तत्कालीन प्राचार्य रँग्लर परांजपे यांनी सावरकरांना वसतिगृहातून काढून टाकले आणि दंड आकारला. या घटनेनंतर लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ वृत्तपत्रात ‘हे आमचे गुरु नव्हे’ या शीर्षकाखाली लेख लिहून निषेध व्यक्त केला.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीने या खोलीचे जतन करून ठेवले आहे. सावरकरांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी ही खोली नागरिकांसाठी दर्शनासाठी खुली केली जाते. ही खोली सावरकरांच्या क्रांतिकारी प्रवासाची साक्ष देणारी असून, आजही ती प्रेरणास्थान म्हणून ओळखली जाते.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात 16 वा पदवीप्रदान समारंभ उत्साहात
Newsworldmarathi Pimpri: डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयु), पिंपरी, पुणे येथे 16 वा पदवीप्रदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ. पी. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
या समारंभाला महेश मुरलीधर भागवत, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), तेलंगणा; डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयु) पिंपरी, पुणे चे कुलपती मा. डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती मा. डॉ. भाग्यश्री पी. पाटील, कुलगुरू मा. डॉ. एन. जे. पवार, डॉ. डी. वाय. पाटील ज्ञान प्रसाद विद्यापीठ, पिंपरी, पुणे चे प्र-कुलपती मा. डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयु) पिंपरी, पुणे च्या प्र-कुलगुरू मा. डॉ. स्मिता जाधव, आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे चे विश्वस्त व खजिनदार मा. डॉ. यशराज पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या तेलंगणा राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) महेश मुरलीधर भागवत यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (ऑनोरिस कौसा) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना चारित्र्य, धैर्य, विनय, बांधिलकी आणि श्रद्धा या पाच मूलभूत मूल्यांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.
प्र-कुलपती डॉ. (सौ.) भाग्यश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले, “शिक्षण म्हणजे केवळ पदवी नव्हे, तर परिवर्तनाची प्रक्रिया आहे. आम्ही विद्यापीठात विद्यार्थ्यांचे केवळ ज्ञानच नव्हे तर संस्कार, कौशल्य आणि स्वप्न घडवतो.”
या समारंभात 12244 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 73 पीएच.डी., 10884 पदव्युत्तर, 1276 पदवी आणि 11 पदविका धारकांचा समावेश आहे. परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या 31 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने झाली. कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानंतर कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी विद्यापीठाचा प्रगती अहवाल सादर केला. समारंभात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील यशोगाथांचा आढावा घेण्यात आला.
मुंडे समर्थक माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे निधन
Newsworldmarathi latur : भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं अपघाती निधन झालं आहे. तुळजापूर ते औसा महामार्गावर देशमुख यांच्या कारचा अपघात झाला. लातूरमध्ये झालेल्या अपघातात देशमुख यांचा मृत्यू झाला. आर. टी. देशमुख माजलगावचे माजी आमदार होते. भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे ते खंदे समर्थक होते. पंकजा यांच्या दसरा मेळाव्याला ते कायम उपस्थित असायचे. मुंडे समर्थक नेते म्हणून त्यांची ओळख होती.
राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून गंभीर अपघातांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा गाडी अपघात झाला असून, या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना लातूर-तुळजापूर मार्गावरील बेलकुंड उड्डाणपुलावर घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील बेलकुंड उड्डाणपूल ओलांडत असताना देशमुख यांची कार स्लिप झाली. यावेळी गाडीचा तोल सुटल्यामुळे ती थेट सुरक्षा कठडा तोडून रस्त्याच्या बाहेर चार वेळा पलटी झाली. या भीषण अपघातात माजी आमदार आर. टी. देशमुख गंभीर जखमी झाले, त्यांना तत्काळ उपचारासाठी लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात मात्र यात त्यांचा मृत्यू झाला.
51 वर्षात एवढा पाऊस मी बघितला नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून इंदापूरमध्ये पूर पाहणी…
Newsworldmarathi Pune : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. बारामती, दौंड, जुन्नर, खेड, शिरूर, भोर, मुळशी, आंबेगाव, इंदापूर, पुरंदर, हवेली तालुक्यांत चांगलीच दैना केली आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असल्याने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. असं असताना आता नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर हे आज भल्या पहाटे पुणे, इंदापूर, बारामती दौऱ्यावर आहेत.
यावेळी अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझी आई 87 वर्षाची आहे . आईचं लग्न झालं त्याला 51 वर्ष झाली . तेव्हापासून एवढा पाऊस आईनेही पाहिला नाही. बारामती दौंड इंदापूर ची वार्षिक सरासरी 14 इंच आहे. 13 इंच पाऊस एका दिवसात पडला. काही ठिकाणी सात सात इंच पाऊस पडला, असं अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले अजित पवार?
पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यांमध्ये अवकाळी मुसळधार पावसाने मोठा कहर केला असून, अवघ्या एका दिवसात तब्बल १३ इंच पाऊस पडल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या भागांची वार्षिक सरासरी पावसाची मर्यादा १४ इंच आहे, त्यामुळे एका दिवसात इतका पाऊस पडणं हे अतिशय धक्कादायक असल्याचं त्यांनी सांगितलं.
नीरा डावा कालवा आणि आणखी एका कालव्याला भगदाड पडल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरलं असून, सोनगाव, ढेकळवाडी, इंदापूर परिसरात घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी सात सात इंच पाऊस झाल्याचेही नोंदले गेले आहे. शेतकऱ्यांची पिके, जनावरांचा चारा आणि नागरिकांची घरं या सर्वांचे मोठे नुकसान झाल्याचे पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले, “माझी आई ८७ वर्षांची आहे, तिला सुद्धा एवढा पाऊस कधीच आठवत नाही. पावसामुळे अनेक घरांना भेगा पडल्या आहेत, कालवे फुटल्यामुळे गावांत पाणी घुसलं आहे. सध्या वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. जिथे धोका नाही, तिथे वीजपुरवठा लवकरच सुरू केला जाईल.”
पुणे-सोलापूर महामार्गावर खड्ड्यांचा कहर; दहा गाड्यांचे टायर फुटले, मदतीअभावी वाहनचालक हैराण
Newsworldmarathi Pune: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस परिसरात खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. शनिवारी (दि. २४ मे) सायंकाळच्या सुमारास साई बेकरीजवळ खड्ड्यांमध्ये अडकून एकामागून एक नऊ ते दहा चारचाकी वाहनांचे टायर फुटले. त्यामुळे वाहनचालकांना अडचणीत सापडावे लागले. विशेष म्हणजे, महामार्ग प्रशासनाकडून कोणतीही तत्काळ मदत मिळाली नसल्याचा आरोप अपघातग्रस्तांनी केला आहे.
पाटस गावाजवळील उड्डाणपूल संपल्यानंतरच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, या ठिकाणी वाहनांचा वेग अधिक असल्याने गाड्यांना धक्का बसून टायर फुटण्याच्या घटना घडल्या. काही गाड्यांमध्ये महिला व लहान मुले असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला.
अपघातग्रस्त वाहनचालक गणेश आव्हाड यांनी सांगितले की, “रस्त्यावर अचानक मोठा खड्डा आला आणि आमच्या गाडीचे दोन्ही टायर फुटले. गाडीत कुटुंबासह प्रवास करत होतो. अपघात थोडक्यात टळला. आम्ही पाटस टोल नाक्यावर मदतीसाठी कॉल केला, पण कोणतीही मदत मिळाली नाही.”
घटनेनंतर टोल नाक्यावरील पेट्रोलिंग व्हॅनने घटनास्थळी येऊन खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यापूर्वीच अनेक वाहनांचे नुकसान झाल्याने संतप्त प्रवाशांनी टोल प्रशासनाच्या हलगर्जीपणावर रोष व्यक्त केला.
दरवर्षी मान्सूनपूर्व काळातच महामार्गावर खड्डे पडण्याचे प्रमाण वाढत असून, वाहनचालकांचे प्राण धोक्यात येत आहेत. या प्रकारांमुळे महामार्ग विकास प्राधिकरण व टोल व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाहनचालकांनी मागणी केली आहे की, रस्त्यांच्या देखभालीकडे गांभीर्याने लक्ष दिले जावे आणि टोल भरूनही वेळेवर मदत न मिळणे ही गंभीर बाब असून, संबंधित प्रशासनावर कारवाई व्हावी.

