30 वर्षा नंतर भरला पाचवीचा वर्ग,राष्ट्रगीत,हजेरी घेऊन भरला गणिताचा तास
Newsworldmarathi Pune : वाशी तालुक्यातील पारगाव येथील महात्मा फुले विद्यालयात इयत्ता पाचवी 1995 बॅचच्या वर्गातील मुला – मुलींनी स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जुन्या नव्या आठवणीला उजाळा देत कार्यक्रम संपन्न झाला. स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या प्रारंभी या मुलांनी गावातून चालत शाळेत गेले.शाळेत गेल्या नंतर राष्ट्रगीत गाऊन वर्ग भरवण्यात आला, त्यावेळचे वर्गशिक्षक तुकाराम कांबळे यांनी वर्गाची हजेरी घेऊन गणितातील बेरीज,वजाबाकी शिकवून आजच्या काळात ही समाजात वावरताना कोणत्या गोष्टीची गोळा बेरीज केली जावी व कोणत्या गोष्टीची वजाबाकी करावी म्हणजे आयुष्य सुखकारक होईल यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत आखाडे यांनी केले तर अनुमोदन राहुल डोके यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बडे सर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त थोरवे मॅडम,दत्तात्रय कोठावळे,धोंडीराम बटुळे,तुकाराम कांबळे,सुभाष मोटे,मधुकर इंगोले हे उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाच्या वेळी अभिजित डुंगरवाल,राहुल डोके, हनुमंत आखाडे,राजेंद्र डोके,अमोल गावडे,सुदर्शन नारटा,संजीवनी हावळे, संजीवनी कोकणे,बानू गायकवाड,संतोष शेंडगे,या सह इतरही माजी विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त करत शाळेच्या जुन्या नव्या आठवणीला यावेळी उजाळा दिला. कार्यक्रमाला सेवानिवृत्त गुरुजनांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमानंतर सर्वांनी सोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन,दरवर्षी एक दिवस एकत्र येण्याचा संकल्प केला.
Sanjay Raut : ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी कोणताही अडथळा नाही; संजय राऊतांचे सूचक विधान
Newsworldmarathi Mumbai: Sanjay Raut : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील संभाव्य एकजूट पुन्हा चर्चेत आली असून, यासंदर्भात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. नारायणगाव येथे पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी स्पष्ट केले की, ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील एकत्र येण्यास कोणताही अडथळा नाही.
राऊत म्हणाले, “या विषयावर चर्चा झाली तर ती फक्त राज ठाकरे यांच्याशीच होऊ शकते. परंतु, महाराष्ट्रातील मराठी समाजाच्या कल्याणासाठी आणि स्वाभिमानासाठी जर गट-तट विसरून सगळे एकत्र आले, तर हीच बाळासाहेब ठाकरे यांना खरी मानवंदना ठरेल.”
बाळासाहेब ठाकरे यांचे संपूर्ण जीवन मराठी माणसाच्या हक्कासाठी समर्पित होते, हे सांगताना राऊत यांनी असेही नमूद केले की, “मराठी समाजाच्या हितासाठी एखादे पाऊल मागे घ्यावे लागले तरी त्यात काही गैर नाही. आम्ही त्यासाठी सदैव तयार आहोत, आणि त्यात आम्हाला कमीपणा वाटत नाही.”
मुंबई हे मराठी माणसाचे हृदयस्थान असल्याचे सांगून राऊत यांनी मराठी समाजात एकजुटीचे आवाहन केले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून मराठी समाजासाठी ठोस पावले उचलण्याची ही वेळ असल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेही उद्धृत करत राऊत म्हणाले की, “ठाकरे बंधू जर मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येत असतील तर त्याचा भाजपला आनंदच होईल.” मुनगंटीवार हे नेहमीच शिवसेना-भाजप युतीसाठी आग्रही होते, हे देखील राऊत यांनी नमूद केले.
या विधानामुळे आगामी राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांना नवसंजीवनी मिळाल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर आता सर्वांचे लक्ष ठाकरे बंधूंनी पुढे काय भूमिका घेतात याकडे लागले आहे.
ममता फाउंडेशनच्या अनाथ युवक-युवती विवाह बंधनात अडकले
Newsworldmarathi Pune: जन्मताच एचआयव्ही सारखा गंभीर आजार,कुटुंबाने साथ सोडल्याने अनाथ उपेक्षितच जगणं पदरी आलं.मात्र ममता फाउंडेशन संस्थेने आधार दिला.सांभाळ केला,शिक्षण दिले आणि स्वतः च्या पायावर उभे राहिलेले तरुण तरुणी सुखी आनंदी आयुष्याची स्वप्न साकारण्यासाठी लग्नाच्या बेडीत अडकले.या सोहळ्याला अभिनेते,अभिनेत्री व समाजातील प्रतिष्ठात मंडळींनी उपस्थित राहत शुभ आशीर्वाद दिले.
एचआय व्ही बाधित अनाथ उपेक्षितांचा सांभाळ करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ममता फाउंडेशन संस्थेची स्थापना 200८ मध्ये डॉ.शिल्पा बुडूख व अमर बुडूख यांनी केली.सुरुवातीला भाड्याच्या जागेत सुरू असलेल्या संस्थेला माजी नगरसेवक प्रकाश कदम यांनी तीन गुंठे मोफत जागा दिली.संस्थेने स्वतःची इमारत उभारली.
या संस्थेतील युवती चिरंजीवी रुपाली व चि.महेश ,ममता परिवाराचा चिरंजीव आकाश व चिरंजीवी दिव्या यांचा शुभविवाह पारंपरिक पद्धतीने पार पडला.हळद, मेंहदी, बॉन्ड यांनी वालावरण प्रसन्न झाले होते.
माजी नगरसेवक प्रकाश कदम, अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, अभिनेता जगन्नाथ निवंगुणे,माजी सरपंच दीपक गुजर यांनी वधू वरांना शुभ आशीर्वाद दिले.यावेळी शरद सोनवणे,प्रमोद ढसाळ,पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, संगीता यादव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सोहळ्याचे सूत्रसंचलन अँड दिलीप जगताप यांनी केली.
ममता फाउंडेशन संस्थेत अंगा खांद्यावर खेळवळलेली माझी लेकरं आज विवाह बंधनात अडकली. कन्यादान व सोहळा आनंदाश्रूनी सोहळा पार पाडला.आज खऱ्या अर्थाने संस्था स्थापनेचे सार्थक झाले असे वाटते.उपेक्षित म्हणून बेवारस झालेल्या लेकरांची मी माय पूर्वीच झाले आज सून आणि जावई देखील आले.-डॉ.शिल्पा बुडूख.संचालिका ममता फाउंडेशन.
नागरिकांनी वाचला आमदारांसमोर समस्यांचा पाढा; लवकर समस्या सोडविण्याची मागणी
newsworldmarathi Pune: कात्रज-कोंढवा सुखसागरनगर, रस्ता, शिवशंभोनगर परिसरातील नागरी सुविधा आणि समस्यांबाबत विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी महापालिका, महसूल, पोलिस आणि महावितरणच्या अधिका-यांसमवेत बैठक घेतली. सुखसागरनगरमधील राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहात झालेल्या जनता संवाद बैठकीत नागरिकांनी विविध समस्यांचा पाढा वाचला. हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वायन या वेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
श्रीराम कुलकर्णी म्हणाले, सुखसागरनगर, शिवशंभोनगर, साईनगर आणि कात्रज कोंढवा रस्ता परिसरात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाऊस पडत असतानाही पाणीटंचाईची समस्या सुटलेली नाही. दिवसाआड कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. गुजरवाडी रस्ता, भारतनगर, खोपडेनगर परिसरात कायदा व सुव्यवस्था दृष्टीने पोलिस मदत केंद्र सुरू करण्याची मागणी या वेळी माजी सरपंच व्यंकोजी खोपडे यांनी केली. संतोष साखरे यांनी सुखसागर गल्ली नंबर आठमध्ये रस्त्यावर पाणी साठत असल्याची तक्रार मांडली.
रोहित कोकणे यांनी शिवशंभोनगर येथे विद्युत लाइन भूमिगत करण्याची मागणी केली. अमृता चव्हाण यांनी ओढ्यालगत सुरक्षा भिंतीचा प्रश्न मांडला. यासह नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डे, ड्रेनेज व्यवस्था, बीजपुरवठा खंडित होणे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुखसागरनगरमधील राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहाच्या ठिकाणी असलेल्या चौकीत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची पूर्णवेळ नियुक्ती करणे, पार्किंग व्यवस्था, वाहतूक कोंडी आदी समस्या मांडल्या.
कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने, नायब तहसीलदार स्वाती नरुटे, सहायक पोलिस निरीक्षक समीर शेंडे, महावितरणचे शाखा अभियंता जावेद खान, पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता दीपक रोमण, माजी नगरसेवक प्रकाश कदम, रंजना टिळेकर, वृषाली कामठे, मनीषा कदम, वीरसेन जगताप, राणी भोसले, तुषार कदम आदी उपस्थित होते.
पुणं हादरलं! दोन चिमुकल्यांसह महिलेचा निर्घृण खून; मृतदेहासोबत केलं भयानक कृत्य
Newsworldmarathi Pune: पुण्यात एक हदरवून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेला तिच्या दोन चिमुकल्यांसह निर्घृण पद्धतीने मारण्यात आलंय. एवढंच नाही तर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना खंडाळे (ता. शिरूर) गावच्या हद्दीमध्ये घडली आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब भीमराव येळे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळे येथील ग्रोवेल कंपनीचे कामगार कंपनीत आले असताना काही कामगारांना कंपनीच्या पाठीमागे लक्ष्मी मंदिराजवळ एका महिलेसह दोन लहान बालकांचे मृतदेह पावसामध्ये पडल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती पोलीस पाटील सीमा पंडित यांनी पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब येळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाची महिला, तसेच अंदाजे ३ ते ४ वर्षे व १ ते २ वर्षे वयाच्या एका मुलाचा मृतदेह आढळून आला.
या वेळी तिघांचे मृतदेह पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच घटनास्थळी अंगुली पथक व श्वानपथक आले होते. मात्र, या महिला व मुलांबाबत काहीही माहिती मिळाली नाही.
बारामती-दौंडमध्ये पावसाचा कहर! अजित पवार म्हणाले, वर्षातला निम्मा पाऊस एका दिवसात पडलाय
Newsworldmarathi Pune: राज्यात दाखल झालेल्या जोरदार मान्सूनने पश्चिम महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. बारामती, दौंड, माळशिरस, इंदापूर या भागात रविवारी आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. बारामतीत तर एका दिवसात तब्बल 7 इंच पावसाची नोंद झाली आहे. ही आकडेवारी वर्षभराच्या निम्म्या सरासरी पावसाइतकी असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामतीत नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी थेट पालखी महामार्गावर शिरलं. त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पिंपळी परिसरात कालवा फुटल्यामुळे अनेक घरे जलमय झाली असून, नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
अजित पवारांनी पहाटेच बारामती, काटेवाडी, कान्हेरी या भागांचा दौरा करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी भिजलेला कांदा दाखवत आपल्या व्यथा मांडल्या. अजित पवारांनी प्रशासनाला तातडीने मदतीचे निर्देश दिले.
दौंडमध्ये पूरसदृश परिस्थिती, महामार्ग जलमय
दौंडमध्ये पुणे-सोलापूर महामार्ग पाण्याखाली गेला असून, एक इनोव्हा कार वाहून गेल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
माळशिरसमध्ये 500 नागरिकांचे स्थलांतर
माळशिरस तालुक्यात नीरा नदीला पूर आल्याने नातेपुते ते बारामती रस्ता बंद करण्यात आला आहे. एनडीआरएफच्या पथकाने कुरभावी आणि संग्राम नगर येथून तब्बल 500 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत.
Pooja Khedkar : नावं बदलून १२ वेळा UPSC दिली? पूजा खेडकरचा खुलासा, म्हणाली, आईचं नाव कायदेशीररित्या जोडलं”
Newsworldmarathi Pune: वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर हिच्यावर तब्बल १२ वेळा यूपीएससी परीक्षा दिल्याचा, नाव व जातीच्या गैरवापराचा आरोप होत असताना तिने अखेर यावर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.
खास मुलाखतीत बोलताना पूजा खेडकर म्हणाली, “मी लहानपणापासून ‘पूजा खेडकर’ हेच नाव वापरलं आहे. २०१४ मध्ये मी कायदेशीररित्या गॅझेट नोटिफिकेशनद्वारे माझ्या नावात माझ्या आईचं नाव समाविष्ट केलं – ‘पूजा मनोरमा दिलीप खेडकर’. हे नाव मी अधिकृतपणे वापरलं असून, UPSCकडून त्यासाठी २०१७ मध्ये परवानगी देखील मिळाली होती.”
खेडकर पुढे म्हणाली, “शालेय कागदपत्रांमध्ये चुकीने ‘पूजा दिलीपराव खेडकर’ असं नाव नोंदवण्यात आलं होतं, त्यामुळे सुरुवातीच्या अर्जांमध्ये तेच नाव वापरावं लागलं. मात्र, नंतर मी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नाव बदललं आणि सर्व अर्जात प्रतिज्ञापत्रासह ते वापरलं.”
यूपीएससीचे नियम पाळून मीच प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा पुनरुच्चार करत खेडकर म्हणाली की, “नाव बदलून फसवणूक केल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मी केवळ माझ्या आईचं नाव जोडल्याचं सत्य स्पष्ट केलं आहे.” या प्रकरणावरून चर्चेत आलेल्या खेडकर यांनी आपली बाजू प्रथमच स्पष्ट करत, झालेल्या आरोपांना कायदेशीर उत्तर दिलं आहे.
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबाबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वन
Newsworldmarathi Pune: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाषाण येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
शिंदे म्हणाले, खगोलशास्त्रज्ञ, लेखक असलेले डॉ. नारळीकर हे खऱ्याअर्थाने देशाचा गौरव, भुषण होते, ते देशाची संपत्ती होते. त्यांच्या निधनाने विज्ञान विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यासारखी माणसे दुर्मिळ असतात, त्यांच्या कार्यातून नवीन पिढीला निरंतर ऊर्जा, प्रेरणा मिळाली पाहिजे, याकरिता त्यांच्या नावाला साजेचे कार्य राज्यशासनाच्यावतीने करण्यात येईल,
डॉ. जयंत नारळीकर यांना पद्मभूषण, पद्मविभुषण, महाराष्ट्र भुषण अशा विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. खगोलशास्त्राचे ज्ञान अतिशय सोप्या भाषेत पोहचविण्याचे काम त्यांनी केले, हिमालयाऐवढे कर्तृत्व असलेले व्यक्तिमत्व, उच्च विचारसरणी असतानादेखील साधा स्वभाव होता, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, डॉ. नारळीकर यांच्या मुली गीता नारळीकर आणि लिलावती नारळीकर, जावई अलोक श्रीवास्तव, हरी चक्रवर्ती उपस्थित होते.
संगीत ऐकल्यावर एक नवचैतन्य निर्माण होते; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची भावना
Newsworldmarathi Pune: संगीत म्हणजे आनंदाचा एक मेळा.कोणतेही संगीत ऐकल्यावर लगेच आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. एक नवचैतन्य निर्माण होते. गाण्याचा छंद जोपासून अनेक पुणेकरांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटविला आहे. पुणेकरांच्या गायनाच्या छंदाला गेली 23 वर्ष सोमेश्वर फाऊंडेशन मार्फत सनी निम्हण प्रेरणा देत आहेत. याबद्दल समाधान आहे, अशी भावना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली.
कार्यसम्राट आमदार स्व. विनायक निम्हण यांनी गायक कलाकारांना दिलेले मानाचे व्यासपीठ म्हणजे सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धा. या स्पर्धेची महाअंतिम फेरी आज बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे संपन्न झाली.यावेळी कृषिमंत्री कोकाटे बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे पुणे शहाराध्यक्ष धीरज घाटे, संयोजक सनी विनायक निम्हण आदि मान्यवर उपस्थित होते. पुणे आयडॉल स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व गायन कला जोपासणाऱ्या व्यक्तींचा ‘व्हाईस ऑफ चॉइस’ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो, यंदा डॉ. विनय थोरात, शिवानी पांढरे, निलेश निकम, अॅड. शितल कुलकर्णी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पुढे बोलताना कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, पुणे आयडॉलच्या माध्यमातून पुणे शहरातील नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची इच्छा दिवंगत नेते विनायकराव निम्हण यांची होती. त्यानुसार गेली अनेक वर्ष ही स्पर्धा सुरू आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, एखादा उपक्रम सुरु करणे सोपे असते. मात्र तो सातत्याने आणि तेव्हढ्याच दिमाखात सुरू ठेवणे कठीण आहे. परंतु स्वर्गीय आमदार विनायक निम्हण यांनी पुणे आयडॉल ही स्पर्धा सुरू केली अन् गेल्या 23 वर्षांपासून ही अशीच सुरू आहे. सनी निम्हण यांनी त्यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा दोन्ही घेतला आहे. या स्पर्धेत पुणे शहरात व्यतिरिक्त इतर शहर आणि राज्यातून देखील स्पर्धक आलेले आहेत. यातच या स्पर्धेचे यश आहे.
धीरज घाटे म्हणाले, सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे शहरात नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते. येथे गेली 23 वर्ष ही स्पर्धा सुरू आहे, हे कौतुकास्पद आहे.
प्रास्ताविक पर भाषणात सनी निम्हण म्हणाले, पुणे आयडॉल या स्पर्धेच्या अंतिम फेरीत 725 स्पर्धकांमधून 18 स्पर्धक निवडण्यात आले. त्यांची निवड करताना परीक्षकांचाच कस लागला आहे. पुणे आयडॉल ही केवळ स्पर्धा नसून आपले गायन कौशल्य सादर करण्याचे एक महत्वाचे व्यासपीठ बनले आहे.
पुणे आयडॉल स्पर्धेतील चारही गटाच्या प्रथम विजेत्यास 15 हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
अमित मुरकुटे, हेमंत कांबळे, अनिकेत कपोते, वनमाला कांबळे, संजय माजिरे, गणेश शेलार, संजय तरडे आदि कार्यकर्ते स्पर्धेच्या यशासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे परीक्षण ज्येष्ठ गायक राजेश दातार, गायक जितेंद्र भुरुक आणि मंजुश्री ओक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी आणि महेश गायकवाड यांनी तर उमेश वाघ यांनी आभार मानले.
पुणे आयडॉलचे विजेते
लिटिल चॅम्प
1. भार्गव जाधव
2. परी तेलंग
युवा आयडॉल
1 अभितांश श्रीवास्तव
2 नीव कनानी
जनरल आयडॉल
1 पियुष भोंडे
2 निखिल गर्गे
ओल्ड इज गोल्ड
1 सुनील यादव
2 मनोज मोरे
भारत माता की जय च्या जयघोषात रिपाइंची ‘भारत जिंदाबाद रॅली’
Newsworldmarathi Pune : पाहेलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून बदला घेतला. पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी, त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी, देश सैन्यासोबत असल्याचे दाखवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने शनिवारी ‘भारत जिंदाबाद रॅली’ चे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुनीता वाडेकर, संघमित्रा गायकवाड, मंगल रासगे व रिपब्लिकन पक्षांच्या महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ‘भारत जिंदाबाद रॅली’ ला सुरुवात झाली. भारत माता की जय.., पाकिस्तान मुर्दाबाद.., भारतीय सैन्याचा विजय असो.., अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांनी फक्त तिरंगी झेंडे हातात घेतलेले होते.
रिपाइंचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, असित गांगुर्डे, शैलेंद्र चव्हाण,अशोक कांबळे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, बसवराज गायकवाड, वसंत बनसोडे, भगवान गायकवाड, वीरेन साठे, सुनिता वाडेकर, हिमाली कांबळे, संघमित्रा गायकवाड, मंगल रासगे, सुन्नाबी शेख, संदीप धाडोरे, महादेव दंदी, लियाकत शेख, विनोद टोपे, शामशुद्दीन शेख, अविनाश कदम, कपिल जगताप, फिरोज खान, हबीब सैय्यद, भारत भोसले, चांदणी गायकवाड, सविता शेलार, शाम गायकवाड, निलेश गायकवाड, आकाश बहुले, के. जी. पवळे, हनुमंत गायकवाड, उद्धव चिलवंत, दादा वारभुवन, रमेश तेलवडे, अतुल भालेराव, शांतीनाथ चव्हाण, राजेश गाढे, वैभव पवार, स्वप्नील जाधव, रोहित कांबळे, अप्पा वाडेकर, रामभाऊ कर्वे, दीपक इसावे, गोविंद साठे, शशांक माने, सुशील मंडल, तानाजी तापकीरे, विशाल ओव्हाल, अरविंद शिंदे, आनंद लवटे, आनंद कांबळे, विशाल ओव्हाल, गौतम कदम, संजय बनसोडे, विक्की वालके, फक्कडराव शेळके, नंदा निकाळजे, कलावती भंडारे, निर्मला कांबळे, शोभा गायकवाड, आरती देटे, नंदा गायकवाड, अनिता कांबळे, सुनिता गायकवाड, शांता कांबळे, भारताबाई कराळे, सूरज जाधव, रवी अवसरमल, अक्षय अवसरमल, बाळासाहेब शेलार, रावसाहेब झेंडे, अंकिता भालेराव, शिवाजी गायकवाड, निलेश आल्हाट, अक्षय गायकवाड, बाळासाहेब खंकाल यांच्यासह रिपाइं चे पदाधिकारी कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.
भर पावसात निघालेल्या या ‘भारत जिंदाबाद रॅली’ मध्ये कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. बंड गार्डन पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड सर व रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यानंतर शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रगीताने ‘भारत जिंदाबाद रॅली’ चा समारोप झाला.

