‘महावृष्टी’चा इशारा… ! महाराष्ट्रात मान्सूनचा जोर, शेतकऱ्यांवर संकट
Newsworldmarathi Pune: यंदा महाराष्ट्रावर जोरदार पावसाची ‘महावृष्टी’ होणार असून, मान्सून आज (२८ मे) संपूर्ण राज्य व्यापणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या काळात राज्यात १०७ ते ११२ टक्के पाऊस पडणार आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
जिल्हावार पावसाचा अंदाज:
कोकण: 107%
मध्य महाराष्ट्र: 110%
मराठवाडा: 112%
विदर्भ: 109%
ही माहिती दिल्लीतील पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली. देशासाठी आधी दिलेला 105% पावसाचा अंदाज आता वाढवून 106% करण्यात आला आहे. हवामान विभागाने यंदा प्रथमच राज्यवार पावसाचे आकडे अधिक स्पष्टपणे सादर केले आहेत.
मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांवर घाला
राज्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ४०,९४९ हेक्टर क्षेत्रावरील पीकांचे नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये भात, मूग, उडीद, मका, कांदा, भाजीपाला, आंबा, संत्रा, पपई, केळी यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सर्वाधिक नुकसान झालेली जिल्हे (हेक्टरमध्ये):
अमरावती: १२,५६५
बुलडाणा: ६,६९९
जळगाव: ४,५३८
नाशिक: ३,५२३
अहिल्यानगर: १,४४१
इतर जिल्हे: अकोला, लातूर, पालघर, सोलापूर, पुणे, सातारा
कृषी विभागाच्या अहवालानुसार, हवामानाची ही स्थिती पुढेही कायम राहिल्यास नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात भर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शेतजमीन वाटपाचे नोंदणी शुल्क माफ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० मोठे निर्णय, वाचा संपूर्ण यादी
Newsworldmarathi Mumbai: शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात मंगळवारी दुपारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ८५ नुसार शेत जमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते. शेत जमिनीच्या वाटपपत्रास मुद्रांक शुल्काचा दर नाममात्र आहे. मात्र, नोंदणी शुल्काच्या बाबतीत सवलत नाही. मुद्रांक शुल्कापेक्षा नोंदणी शुल्क अधिक असल्याने अनेक शेतकरी दस्तांची नोंदणी करीत नाहीत. नोंदणी न केल्यामुळे भविष्यात शेत जमिनीवर वाद निर्माण झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अशा दस्तांना नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इतर कॅबिनेट निर्णय
१ ) इचलकरंजी, जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा करभरपाईपोटी पुढील ५ वर्षात अनुक्रमे ६५७ कोटी, ३९२ कोटी रुपये मिळणार.
२) महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील १९५ कर्मचाऱ्यांना सुमारे १२ कोटी रुपयांची ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर.
३) महाराष्ट्र अॅग्रिबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प संस्थेवर यापुढे राज्याचे पणन मंत्री पदसिद्ध अध्यक्ष राहतील. तसेच प्रकल्पाच्या संनियंत्रणासाठी असलेल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष मुख्य सचिवांऐवजी मुख्यमंत्री असतील.
४) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालिन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण करण्यास मान्यता.
५) राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक टंकलेखक यानुसार विधि व न्याय विभागात ५ हजार २३३ टंकलेखकांची एकाकी पदे निर्माण करण्यास मान्यता.
६) महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या १ हजार ३५१ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी.
७) नागपूरमधील पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांना देण्यात आलेल्या जमिनीच्या करारनाम्यातील अटी व शर्तीमध्ये बदल करण्यास मान्यता. यातून क्लबला उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाल्यास, पत्रकार सभासदांना सवलतीच्या दरात विविध सुविधा पुरविता येणार आहेत.
८) रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्ट संचलित एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र या गतिमंद प्रवर्गाच्या कार्यशाळेस ७५ अनिवासी विद्यार्थी संख्येस अनुदानतत्त्वावर घेण्यास मान्यता.
९) राज्यातील कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्या पदनामात अनुक्रमे ‘उप कृषी अधिकारी’ व’सहाय्यक कृषी अधिकारी’ असा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Panchkula crime news : कर्जाच्या विळख्यात अख्ख कुटुंब संपलं; ७ जणांची विषप्राशन करून आत्महत्या
Newsworldmarathi Hariyana: पंचकुला जिल्ह्यात मंगळवारी सकाळी एकाच कुटुंबातील ७ जणांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा हृदयद्रावक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अंदाजे १५ ते २० कोटी रुपयांचे कर्ज डोक्यावर असल्याने निराश होऊन मित्तल कुटुंबाने आयुष्य संपवण्याचा मार्ग निवडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटना सेक्टर २७ मध्ये घडली. घराबाहेर उभी असलेली देहरादून पासिंग कार ही मृत्यूचा साक्षीदार ठरली. या कारमध्ये ६ जण मृतावस्थेत, तर एकजण अतिशय नाजूक अवस्थेत आढळून आला. या सातव्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाटेतच त्यानेही अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, मित्तल कुटुंब पंचकुलामध्ये धीरेंद्र शास्त्री यांची कथा ऐकून परतत असताना ही घटना घडल्याची माहितीही समोर आली आहे.
घटनेपूर्वीचे भयाण चित्र
कारमधून दुर्गंधी येत असल्यामुळे एक स्थानिक युवक पुनीत राणाने दार उघडले असता, अंतर्गत उलटीचे निशाण, विषप्राशनाचे संकेत आणि मृतदेहांचे हालचाल नसलेले शरीर दृश्यामध्ये आलं. वाचलेली एकमेव व्यक्ती त्या क्षणी म्हणाली, “कर्जाने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, कोणी मदतीला आलं नाही… आता आम्ही संपलो!”
मृतांमध्ये कोण होते?
पोलीस उपायुक्त हिमाद्री कौशिक यांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये प्रवीण मित्तल (४१), त्यांची पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि आई-वडील यांचा समावेश आहे. मित्तल कुटुंब काही वर्षांपूर्वी देहरादूनमध्ये स्थायिक झालं होतं. मात्र अलीकडे पुन्हा पंचकुलात वास्तव्यास आले होते.
पोलिसांचा संशय: आत्महत्या की हत्या?
जरी प्राथमिकदृष्ट्या हे सामूहिक आत्महत्येचे प्रकरण वाटत असले तरी, पोलिसांनी हत्या करण्याचाही शक्यता वर्तवून सखोल तपास सुरू केला आहे. घटनास्थळी सापडलेले विषाचे नमुने, टॉवेल, आणि कारमधील पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.
“बाळासाहेब असते तर गृहमंत्री अमित शहांना गेट आऊट केले असते “; सामना अग्रलेखातून घणाघात
Newsworldmarathi Mumbai: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर शिवसेना फोडणाऱ्या गृहमंत्री अमित शहांवर “जीवनभर लक्षात राहील” अशा कठोर कारवाया झाल्या असत्या, अशी जोरदार टीका शिवसेनेच्या ‘सामना’ अग्रलेखातून करण्यात आली आहे.
‘सामना’ने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, ज्यांनी हिंदुत्ववादी आणि राष्ट्रभक्त शिवसेनेला खिळखिळं केलं – त्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना सत्ता व पैशांच्या जोरावर विकत घेणारे आता बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन लोकांच्या भावना भडकवत आहेत, ही महाराष्ट्रद्रोहाचीच लक्षणं आहेत.
अमित शहा यांच्यावर टीका करताना अग्रलेखात त्यांना देशाच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय आणि फुसके गृहमंत्री म्हणून हिणवण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळात देशातील सुरक्षा यंत्रणा ढासळली, कायदा-सुव्यवस्था ढेपाळली आणि देशात अराजकतेचं वातावरण निर्माण झालं, असा आरोप करण्यात आला.
विशेषतः पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, ज्यात 26 हिंदू महिलांच्या कपाळावरील सिंदूर पुसण्यात आलं, त्या घटनेवरून ‘सामना’ने सरकारला धारेवर धरलं आहे. या हल्ल्याचे सूत्रधार अजूनही मोकाट आहेत आणि त्यांच्याविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, यावरून गृहखात्याच्या निष्क्रियतेची पोलखोल करण्यात आली आहे.
‘सामना’ म्हणतो की, बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून अमित शहांचा राजीनामा मागितला असता. तेच शहा महाराष्ट्रात येऊन सांगतात, “बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींना गळामिठी दिली असती” हे विधान म्हणजे बाळासाहेबांचा घोर अपमान आहे, असा घणाघात अग्रलेखातून केला गेला आहे.
Padma Awards 2025 : शेतकरी ते कलाकार; महाराष्ट्रातील ६ मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित, वाचा सविस्तर…
Newsworldmarathi Delhi : नवी दिल्ली : विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणा-या 68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे.
राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते दुस-या व अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण व केंद्र शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या पुरस्कार समारंभात राज्यातील सहा मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष डॉ मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ (मरणोत्तर) तर अशोक सराफ, अच्युत पालव, अश्विनी भिडे-देशपांडे यांना कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी तसेच कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा व वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
डॉ. मनोहर जोशी यांना पद्मभूषण (मरणोत्तर) पुरस्कार प्रदान
राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी ‘पद्मभूषण’ (मरणोत्तर) पुरस्कारने गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र उन्मेश जोशी यांनी स्विकारला. डॉ. जोशी यांनी पाच दशकाच्या राजकीय कारकिर्दीत मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक, महापौर, आमदार, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या.
सन 1995 मध्ये ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2002 ते 2004 या कालखंडात त्यांनी लोकसभा अध्यक्षपद भूषवले. रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी जन्मलेल्या जोशी यांनी शिक्षण, शिस्त, आणि कार्यक्षम नेतृत्वाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
पाच मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान
अशोक सराफ
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनयातील सहजता, टायमिंग आणि विविध भावछटांचे सशक्त सादरीकरण या बाबींसाठी त्यांना हा सन्मान मिळाला. अशोक सराफ यांचे ‘अशी ही बनवाबनवी‘, ‘धुमधडाका‘, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी‘ आणि ‘पंढरीची वारी‘ यासारखे अनेक चित्रपट रसिकांच्या हृदयात कायमचे घर करून आहेत.
अच्युत पालव
देवनागरी लिपीच्या कलेला नवसंजीवनी देणारे प्रसिद्ध कॅलिग्राफर अच्युत पालव यांना कला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सर्जनशीलतेतून देवनागरी लिपीचे सौंदर्य आणि शिस्तबद्धता प्रभावीपणे समोर येते.
अश्विनी भिडे-देशपांडे
जयपुर-अतत्रौली घराण्याच्या ख्याल गायकी परंपरेतील आघाडीच्या गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालपणापासून संगीताची गोडी असलेल्या अश्विनी यांनी “गांधर्व महाविद्यालयातून “संगीत विशारद” पदवी प्राप्त केली.
सुभाष शर्मा
यवतमाळ जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी सुभाष शर्मा यांना कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. नैसर्गिक शेतीच्या विविध पद्धतींचा अवलंब करून त्यांनी हजारो शेतकऱ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन देत आहेत.
डॉ. विलास डांगरे
70 वर्षीय डॉ. विलास डांगरे यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यांनी गरजूंच्या आरोग्यसेवेत अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या नाडी परीक्षण कौशल्यामुळे ते एक सुप्रसिद्ध होमिओपॅथी चिकित्सक म्हणून ओळखले जातात.
यंदाच्या पद्म पुरस्कार वितरणाची प्रक्रिया दोन टप्प्यात झाली. पहिल्या टप्पयात 71 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले, यामध्ये मध्ये 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. आज उर्वरित 68 पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये 3 पद्मविभूषण, 09 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे यंदाच्या पुरस्कार यादीत एकूण 139 मान्यवरांची निवड करण्यात आली होती. त्यात 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
राजेंद्र हगवणेला थार देणाऱ्या चोंधे कुटुंबाची कुंडली बाहेर आली, पोरांना बायकांचा नाद, हुंड्यासाठी सूनेचा छळ
Newsworldmarathi Pune: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना ज्या थार गाडीमध्ये बसून ते फिरत होते, त्या गाडीच्या मालकाबाबतची माहिती समोर आली आहे. संकेत नरेश चोंधे हे या थार गाडीचे मालक असून, त्याचा भाऊ सुयश चोंधे याची क्रेटा गाडीही पोलीसांनी जप्त केली आहे.
या प्रकरणातील नवा तपशील अधिक धक्कादायक ठरतो, कारण चोंधे कुटुंबातील सुनेवर देखील पैशांसाठी आणि हुंड्यासाठी शारिरीक व मानसिक छळ केल्याचा आरोप समोर आला आहे. सुयश चोंधेने आपल्या पत्नीला वीस लाख रुपयांच्या हुंड्यासाठी छळले असून, या छळाला कंटाळून पीडित महिलेने आत्महत्येचा प्रयत्नही केल्याची माहिती आहे. याप्रकरणी तिने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
सुयशची पत्नी माध्यमांशी बोलताना म्हणाली की, “माझ्यावर मानसिक आणि शारिरीक अत्याचार केले गेले. पैशांसाठी दबाव टाकण्यात आला आणि एकटं पाडण्यात आलं. अखेर मी महिला आयोगाकडे धाव घेतली.”
दरम्यान, संकेत चोंधेची थार गाडी आणि सुयशची क्रेटा ही दोन्ही वाहने पोलिसांनी तपासासाठी जप्त केली आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अनेक नवीन धक्कादायक तपशील समोर येत असून, आता चोंधे कुटुंबावरही संशयाचे सावट घनघोर बनले आहे.
मगराज राठी यांना ‘बिझनेस आयकॉन’ पुरस्कार
Newsworldmarathi Pune: महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे कार्यकारी संचालक आणि सीईओ, तसेच फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे संचालक मगराज राठी यांना ‘बिझनेस आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ आयोजित व्यापारी दिन सन्मान समारंभात देण्यात आला. या वेळी संघाचे सचिन निवंगूने, नवनाथ सोमसे, दत्तात्रेय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
मगराज राठी हे गेल्या अनेक वर्षांपासून बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असून, महेश नागरी मल्टीस्टेटच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पतपुरवठा करण्याचे कार्य त्यांनी यशस्वीपणे केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वित्तीय सेवा मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
या पुरस्कार स्वीकारल्यानंतर राठी यांनी आपले मनोगत व्यक्त करत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे कार्य हे सर्वसामान्य व्यापाऱ्यांना बळ देणारे असून, ते अत्यंत प्रभावीपणे पार पडत असल्याचे सांगितले. तसेच, आगामी काळात राजस्थानी समाज संघ आणि महेश नागरी मल्टीस्टेट यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांना संघाचे असेच पाठबळ मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Rupali Chakankar : चाकणकरांच्या अडचणी वाढणार? कार्यकर्त्यांकडून धमक्या, महिला आयोग अन् मुख्यमंत्र्यांना पत्र
Newsworldmarathi Pune: Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर चौफेर टीका होत असतानाच, आता आता, संगिता भालेराव यांना फोन करून धमकी दिल्याप्रकरणी, भालेराव यांनी राज्य महिला आयोग, मुख्यमंत्री कार्यालय व पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवती सेल च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोनाली गाडे यांनी ही धमकी दिल्याचं संगिता भालेराव यांनी तक्रारीत म्हटलं आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापणार आहे.
सामाजिक कार्यकर्त्या संगिता भालेराव यांनी आरोप केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती सेलच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोनाली गाडे यांनी त्यांना फोन करून धमकी दिली. भालेराव यांनी फेसबुकवर महिला आयोगाच्या नेतृत्वावर टीका करणारी पोस्ट केल्यानंतर, गाडे यांनी त्यांना अनेक वेळा फोन करून धमकावले आणि शिवीगाळ केली, असा दावा भालेराव यांनी केला आहे. या प्रकरणाची ऑडिओ क्लिपही त्यांनी तक्रारीसोबत सादर केली आहे.
या प्रकरणामुळे रूपाली चाकणकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातही चाकणकर यांच्यावर निष्क्रियतेचे आरोप करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यपद्धतीवर आणि महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी चाकणकर यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे, तर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या सर्व घटनांमुळे चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पुणेकर अनुभवणार ‘नव्या भारताचा सामर्थ्यविष्कार’
Newsworldmarathi pune : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाची सर्व देशवासियांना माहिती व्हावी, यासाठी असीम फाऊंडेशन आणि युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या संयोजनातून ‘ऑपरेशन सिंदूर- नव्या भारताचा सामर्थ्यविष्कार’ हा कार्यक्रम कोथरूडमध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ले. जनरल राजेंद्र निंभोरकर (नि.) आणि ले. जनरल विनायक पाटणकर (नि.) यांची प्रकट मुलाखत होणार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने दिनांक ६ आणि ७ मे २०२५ रोजी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून आपल्या अचाट सामर्थ्याचे दर्शन संपूर्ण जगाला घडवत, दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्धवस्त केले. अन् दहशतवादाला मातीत मिळविण्याची भारताची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये प्रचंड आनंद व्यक्त करण्यात आला. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला ‘जशास तसे’ उत्तर मिळाले. तसेच, यामुळे भारतीय सैन्य दलाच्या अचाट आणि अचंबित करणाऱ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला झाले.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्विततेची माहिती सर्वांना व्हावी; यासाठी असीम फाऊंडेशन आणि युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या संयोजनातून ‘ऑपरेशन सिंदूर- नव्या भारताचा सामर्थ्यविष्कार’ हा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात ले. जनरल राजेंद्र निंभोरकर (नि.) आणि ले. जनरल विनायक पाटणकर यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार डॉ . उदय निरगुडकर संवाद साधणार आहेत. दिनांक ३० मे २०२५ रोजी सायं. ६.०० ते ८.३० वेळेत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा कार्यक्रमहोणार आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री माधुरी ताई मिसाळ हे देखील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Vaishnavi Hagawane death : ‘सुनाही घडवू शकतात इतिहास’; वैष्णवी हगवणेच्या दीराची पोस्ट चर्चेत; नेटकऱ्यांचा संताप
Newsworldmarathi Pune: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली असून, तिच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सुशील हगवणेची एक जुनी सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘लेकीला नाही तर सुनेला निवडून आणूया’ असे आवाहन केले होते.
सुशील हगवणेने २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही पोस्ट केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. सुशीलने त्यांच्यासाठी प्रचार करताना ‘सूना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य उभारू शकतात, सूना सुद्धा इतिहास घडवू शकतात’ असे लिहिले होते.
मात्र, वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिच्या सासरच्या मंडळींवर छळाचे आरोप झाले असून, सुशील हगवणेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नेटकऱ्यांनी सुशीलच्या जुन्या पोस्टवर संताप व्यक्त केला आहे. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
पोस्टमधील ‘सूनेला निवडून द्या’ या आवाहनाच्या विरोधात नेटकऱ्यांनी ‘तुमच्या घरातील सुनांना नीट सांभाळायचं आणि इज्जत द्यायचं कळत नाही, आणि इथे लोकांना ज्ञान शिकवतोस’ अशा कठोर शब्दांत टीका केली आहे. या प्रकरणामुळे हगवणे कुटुंबीयांवर समाजातून रोष व्यक्त होत असून, सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
ती पोस्ट चर्चेत?
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी सुशील हगवणे याने सुनेत्रा पवारांचा प्रचार केला होता. बारामतीत नणंद विरूध्द भावजय अशी लढत झाली होती. त्यावेळी त्यानं सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी इन्स्टाग्रामवरती पोस्ट केली होती.
‘यावेळी लेकीला नाही तर सुनेला निवडून आणुया….सूना घराबाहेर पडल्या तर स्वतःचं साम्राज्य पण उभारू शकतात, सूना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया…. एक मत सुनेसाठी,’ अशी पोस्ट सुशील हगवणे याने केली होती.

