परळीत पुन्हा गुंडाराज; तरुणाचे अपहरण व अमानुष मारहाण; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Newsworldmarathi Beed : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचे पडसाद ताजे असतानाच बीड जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील पेट्रोल पंपाजवळून एका तरुणाचे अपहरण करून त्याला लाठ्या आणि बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पीडित तरुणाचे नाव शिवराज हनुमान दिवटे असून, तो परळी तालुक्यातील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे पेट्रोल पंपाजवळून अपहरण करण्यात आले. त्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी त्याला निर्घृण मारहाण केली. लाठ्या आणि बेल्टने झालेल्या मारहाणीमुळे तो गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिस यंत्रणेवर विश्वास व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आरोपींनी शिवराज दिवटे यांना निर्दयपणे मारहाण करतानाचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकारामुळे बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीती आणि संताप पसरले आहेत.
विद्येच माहेरघर हादरलं…! दुकानासमोरून ५ वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण, ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न
Newsworldmarathi Pune: पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये साडेपाच वर्षांच्या चिमुकलीचे अपरहण करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना दौंड तालुक्यातील मळद गावच्या परिसरातील ऊसाच्या शेतात १६ मे २०२५ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. नवनाथ रिठे (वय-२७) असं नराधमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावामध्ये माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. साडेपाच वर्षांची मुलगी ही पुणे-सोलापूर महामार्गावरील किराणा दुकाना समोर उभी होती. त्यावेळी कुरकुंभ येथील भागवतवस्ती जवळ एका किराणा दुकानासमोरून आरोपीने पीडित चिमुकलीचे अपहरण केले.
अपरहणानंतर आरोपीने चिमुकलीला मळद गावातील उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्याने चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडून तिला जखमी केले.तसेच चिमुकलीच्या अंगावरील कपडे काढून मारहाण देखील केली.
दरम्यान, तेथील स्थानिकांनी मुलीच्या रडण्याचा तसेच किंचाळण्याचा आवाज ऐकला. त्यांनी तातडीने ऊसाच्या शेताकडे धाव घेतली. तेव्हा हा भयानक प्रकार उघडकीस आला. गावकऱ्यांनी आरोपीला पकडून चांगला चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन
Newsworldmarathi Pune: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘भारतीय वारकरी मंडळा’च्यावतीने सादर केलेल्या ‘वासंतिक उटी भजना’ने भाविकांना मंत्रमुग्ध केले.
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वर्षभर विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात. शुक्रवारी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून श्रींच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावला जातो. त्यानुसार भाविकांकडून श्रींच्या मूर्तीला चंदन, गुलाबजल, अत्तर, केशर, गंधा या मिश्रणाचा लेप लावण्यात आला आणि संपूर्ण मंदिर परिसर मोगऱ्यासह इतर फुलांनी सजवण्यात आले.
यावेळी ‘भारतीय वारकरी मंडळा’च्यावतीने भजनसेवा करण्यात आली. त्यांच्या सुश्राव्य भजनाच्या स्वरांनी आणि टाळ-मृदुंगाच्या निनादात संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Ramraje Nimbalkar : रामराजे निंबाळकर यांची पोलिसांकडून साडेचार तास चौकशी; राजकीय वर्तुळात खळबळ
Newsworldmarathi Kolhapur : Ramraje Nimbalkar : राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची वडूज पोलिसांनी तब्बल साडेचार तास चौकशी केली आहे. रामराजेंच्या निवासस्थानीच ही चौकशी केली असून त्यांनी चौकशीला सहकार्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काहींचा सहभाग असल्याचे तपासात आढळून आले आहे. यानंतर संबंधितांना नोटिसा बजावून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात रामराजे नाईक-निंबाळकर यांचाही ऑडिओ व्हायरल झाला होता.
शुक्रवारी (दि. १६) वडूज पोलिस फलटणमध्ये सकाळी रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या ‘लक्ष्मीविलास’ या निवासस्थानी दाखल झाले. या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन ते फौजफाट्यासह पोहोचले होते. मात्र, स्थानिक कार्यकर्त्यांनी चौकशीवेळी कोणताही अडथळा आणला नाही. उलट चौकशी सुरू असल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार ‘लक्ष्मीविलास’ निवासस्थान परिसराकडे कार्यकर्ते फिरकले नाहीत.
चौकशीसाठी पोलिस आत गेल्यानंतर बाहेरचे मुख्य गेट बंद केले होते. आत कोणालाही प्रवेश दिला गेला नाही. चौकशीवेळी रामराजेंसह त्यांचे वकीलही उपस्थित होते. या चौकशीला रामराजेंनी पूर्ण सहकार्य केले. या तपासप्रकरणी आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांची आवश्यकता भासल्यास पुन्हा चौकशी होऊ शकते, असेही सांगण्यात आले.
संबंधित महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी अटक केली होती. मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात याआधी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांची देखील या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. त्यांना देखील चौकशीसाठी नोटीस देण्यात आली होती.
रामराजे नाईक निंबाळकर यांना चौकशीला हजर राहण्यासाठी वडूज पोलिसांनी नोटीस दिली होती. मात्र, या नोटीशीनंतर देखील रामराजे हे पोलिस ठाण्यात हजर राहिले नव्हते. त्यामुळे रामराजे यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, ही घटना समोर येताच जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून, जयकुमार गोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील संघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे.
संजय राऊतांचा खळबळजनक गौप्यस्फोट : “ईडीच्या अटकेपूर्वी एकनाथ शिंदेंचा मला फोन आला होता..
Newsworldmarathi Mumbai : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी सांगितलं की, ईडीकडून अटक होण्याआधी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. शिंदे यांनी फोनवर विचारलं होतं, “मी वरती बोलू का? गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलू का?”
यावर राऊत यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं की, “नको, काही गरज नाही. तुम्ही वरती बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही.” हा संवाद स्वतः संजय राऊत यांनी आज माध्यमांपुढे उघड केला.
या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांचं “नरकातला स्वर्ग” हे नवीन पुस्तक आज प्रकाशित झालं. या पुस्तकातही त्यांनी अनेक खळबळजनक दावे केल्याचं समजतं.
संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, ईडी अटकेच्या काही काळ आधी शिंदे यांचा फोन येणं, आणि त्यात दिल्लीपर्यंत पोहोचून मदतीची ऑफर देणं, हा प्रकार अत्यंत गंभीर असून, त्यामुळे राजकीय दबाव आणि यंत्रणांच्या वापराबाबत नवे प्रश्न निर्माण होतात.
राऊत यांनी हेही स्पष्ट केलं की, अशा कोणत्याही दबावाला ते बळी पडणार नाहीत आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडत राहतील. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरूच; पुण्याच्या पंकज देशमुखांसह अनेकांना बढती; वाचा पूर्ण लिस्ट
Newsworldmarathi Pune : Police Pankaj Deshmukh Transferred : राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना बदलीपर बढती देण्यात आली असून उप महानिरीक्षक पदावर त्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासहित राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे अपर पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली असून त्यांच्यासहित अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांचा नावाचा समावेश आहे.
त्यानुसार, पुणे ग्रामीणच्या पंकज देशमुख यांना पुणे शहर अपर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. आयपीएस मोक्षदा पाटील यांना राज्य राखीव पोलीस बल गटाच्या समादेशक पदावरुन पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना मुंबईच्या अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
तर, शशिकुमार मीना हे मुंबईच्या उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर आयुक्त, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने हे मध्य प्रादेशिक विभागाचे अपर आयुक्त, तर शैलेश बलकवडे हे गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त असतील. तर लोहमार्ग पोलीस आयुक्तपद अवनत करून राकेश कलासागर यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
१४ वरिष्ठ उपायुक्तांना अपर आयुक्तपदी बढती व नियुक्ती
प्रसाद अक्कानवरू – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
पंकज देशमुख पुणे शहर
अमोघ गावकर – राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (प्रशासन-पुणे),
जी. श्रीधर – पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग (पुणे)
मोक्षदा पाटील राज्य राखीव पोलीस बल (मुंबई),
राकेश कलासागर – पोलीस आयुक्त लोहमार्ग (पद अवनत करून),
प्रियंका नारनवरे – वाहतूक (मुंबई)
अरविंद साळवे महाराष्ट्र पोलीस अकादमी (नाशिक)
सुरेश मेंगडे मुख्य दक्षता अधिकारी (सिडको)
धनंजय कुलकर्णी – विशेष शाखा (मुंबई)
विजय मगर – राज्य राखीव पोलीस बल, पुणे (पद अवनत करून)
राजेश बनसोडे – पुणे शहर
विक्रम देशमाने – मध्य प्रादेशिक विभाग (मुंबई)
राजेंद्र दाभाडे – नागपूर शहर
१४ उपायुक्तांना उपमहानिरीक्षकपदी बढती
अनिल पारसकर – संरक्षण व सुरक्षा (मुंबई),
शैलेश बलकवडे – गुन्हे शाखा (मुंबई)
एम. रामकुमार – महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे (संचालक)
शशिकुमार मीना – उत्तर प्रादेशिक विभाग (मुंबई)
प्रवीण पाटील नागपूर शहर
संजय पाटील – पुणे शहर
वसंत परदेशी नागपूर शहर
एस. डी. आव्हाड पिंपरी चिंचवड
एस. टी. राठोड- अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स
पी. पी. शेवाळे – दहशतवाद विरोधी पथक
ए. एच. चावरिया – पोलीस आयुक्त अमरावती शहर (पद अवनत करून)
विनिता साहू सशस्त्र पोलीस दल (मुंबई).
Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्र्यांचा पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांना दणका; थेट कारवाई करण्याचे दिले आदेश
Newsworldmarathi Nagapur : Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांना वेळेवर मदत व्हावी, त्यांना आर्थिक अडचणीतून मार्ग मिळावा या उदात्त दृष्टीकोनातून शासनाने पीककर्ज योजना सुरु केली. पात्र शेतकऱ्यांनी याचा अत्यंत मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. जे शेतकरी घेतलेल्या पीककर्जाची वेळेत परतफेड करु शकले नाहीत त्यांनी ओटीएस समझोता अंतर्गत कर्जाची रक्कम फेडली. ओटीएस अंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जफेड करुनही ज्या बँकांनी त्यांना पीककर्ज दिले नाही त्या बॅकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार डॉ. आशिष देशमुख, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिणा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, प्रभारी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, प्रभारी पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, माजी आमदार सुधीर पारवे, अग्रणी बँक व्यवस्थापक मोहित गेडाम व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांवर पीक कर्जाबाबत कुठलाही अन्याय होऊ नये यासाठी प्रत्येक तालुक्याला उपविभागीय दंडाधिकारी, अग्रणी बँक व्यवस्थापक यांनीही वेळोवेळी बँक व्यवस्थापकांना बोलावून रितसर आढावा घेतला पाहिजे. संबंधित बँका निर्देश देऊनही जर ऐकत नसतील तर त्यांच्याविरुध्द गुन्हे का दाखल करु नयेत, असा संतप्त सवाल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
स्वारगेट प्रकरणानंतर सरकारचा मोठा निर्णय; आता लालपरीसह सर्व बस ‘स्मार्ट’; चालकावर ‘एआय’ कॅमेराचे लक्ष
Newsworldmarathi Pune: भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबरच वक्तशीर बससेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एसटीच्या ‘स्मार्ट बसेस’ घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
मंत्री सरनाईक म्हणाले की, नवीन लालपरीसह येणाऱ्या सर्व बसेसमध्ये ए. आय. तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, जी.पी.एस. तंत्रज्ञान, एल.ई.डी. टीव्ही, वाय-फाय, चालक ब्रेथ अॅनालाइज यंत्रणा याबरोबरच चोरी- प्रतिबंध तंत्रज्ञानावर आधारित बस लॉक सिस्टीम असे आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीने लावण्यात येणार असून, या बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी असतील.
स्वारगेट बसस्थानकावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला यापुढे अत्यंत महत्त्व दिले जाणार असून, प्रवासात बसेसमध्ये प्रवाशांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून, चालकाच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवरदेखील या कॅमेराचा ‘तिसरा डोळा’ लक्ष ठेवून असणार आहे.
तसेच बसस्थानक व परिसरामध्ये ‘पार्किंग’ मध्ये उभ्या असलेल्या बसेसदेखील पूर्णतः बंद राहतील, अशी यंत्रणा बसमध्ये बसवण्यात येणार आहे, अशी माहिती
प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या माहितीसाठी एल.ई.डी. टीव्ही
नवीन बसेसमध्ये लावण्यात येणाऱ्या एल.ई.डी. टीव्हीच्या माध्यमातून जाहिराती बरोबर विविध महत्त्वाच्या घडामोडी तसेच पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे संदेश तातडीने प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासात देखील प्रवासी जगभरातील घडामोडींबाबत ‘अपडेट’ राहतील. तसेच बसच्या बाहेरील बाजूसदेखील जाहिरात प्रसिद्धीकरिता एल.ई.डी पॅनल लावण्यात येणार आहेत. यातून महामंडळाचा जाहिरात महसूल
वाढण्यास मदत होणार आहे.
फोम बेस आग प्रतिबंधक यंत्रणा
सध्या तापमानवाढीमुळे एसटी बसेसला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. या आगीला प्रतिबंध करण्यासाठी फोम बेस आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येणार असून, बसमध्ये ज्या ठिकाणी आग प्रज्वलित होईल, त्याचा शोध घेऊन त्या ठिकाणी संबंधित फोम वापरून आग तत्काळ विझवण्याची व्यवस्था या यंत्रणेत करण्यात आली आहे.
विनोदी कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांचे निधन
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांचे आज (ता.१६) सकाळी सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गिरी महाराजांच्या निधनाने महाराष्ट्रभरात शोककळा पसरली आहे, विशेषतः वारकरी संप्रदायातील अनुयायांमध्ये.
गिरी महाराज हे उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील रहिवासी होते. त्यांच्या कीर्तनशैलीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. ते एक अत्यंत प्रसिद्ध कीर्तनकार, समाजप्रबोधनकार आणि वारकरी संप्रदायाचे प्रचारक होते. त्यांच्या कीर्तनांमध्ये धार्मिक आणि अध्यात्मिक विषयांप्रमाणेच सामाजिक मुद्द्यांवरही प्रगल्भ विचार मांडले जात होते.
गिरी महाराजांनी आपल्या विनोदी आणि हलक्या-फुलक्या शैलीत केलेले कीर्तन सर्व वयोगटांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या कीर्तनांमध्ये एक अनोखी गोष्ट होती, ती म्हणजे त्यात विनोदाचा, सामाजिक संदेशाचा आणि अध्यात्मिक विचारांचा सुंदर मिलाफ. गिरी महाराजांच्या कीर्तनामुळे श्रोत्यांना हसत-हसत जीवनातील गंभीर गोष्टी विचारण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या भाषणांमध्ये सामाजिक असमानता, पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या समस्यांपासून ते सर्वसामान्य जनतेच्या समस्यांवर तोडगा कसा काढावा, यावर त्यांनी नेहमीच भाष्य केले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे गिरी महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने केवळ कीर्तन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे, तर सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेकांनी त्यांचे योगदान आणि विचार मोलाचे मानले आहेत.
नालेसफाईतील हलगर्जीपणावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांचा कडक इशारा!
Newsworldmarathi Pune: मागील काही वर्षात शहरात कमी वेळात अधिक पाऊस पडण्याचा नवीन ट्रेंड दिसून येत असून या पार्श्वभूमीवर पूरस्थिती टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाला निर्देश दिले असून कामे वेगाने आणि दर्जेदार करावीत, असे निर्देश महापालिका प्रशासनाला देत मान्सूनपूर्व कामासाठी नियुक्त केलेले ठेकेदार रिझल्ट देत नसतील, तर त्यांना काळ्या यादीत टाकावे. तसेच ठेकेदार किंवा अधिकारी जे जबाबदार असतील त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशीही सूचना केली असल्याची माहिती पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी केल्या जाणाऱ्या कामाचा आढावा महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतला. यावेळी आमदार भीमराव तापकीर, आमदार हेमंत रासने, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.
बैठकीबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘चेंबर साफसफाई, अतिक्रमण काढणे, नाले रुंदीकरण आदी कामाचा आढावा घेण्यात आला. पावसाने कुठे पाणी साठून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो त्या जागेवर उपाययोजना करण्याचे सूचना मनपाला दिल्या आहे. पुण्यात ८७५ किलोमीटरचे एकूण नाले आहे. त्याबाबत सफाई तपासणी मनपाकडून करण्यात येत आहे. पावसाळापूर्व कामात सुसूत्रता येण्यासाठी सर्व विभागाकडून एकत्रित काम केले जाईल. नालेसफाईचे यंदा २३ टेंडर मनपाने काढली असून पावसाळी कामाबाबत १५ टेंडर काढून कामे करण्यात येत आहे. जे ठेकेदार कामाची निविदा घेऊन प्रत्यक्ष काम करत नाही, अशा तक्रारी काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. यापुढे अशी गोष्ट कुठे दिसल्यास संबंधित ठेकेदारांना काळया यादीत टाकले जाईल. शिवाय ठेकेदार किंवा अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार आहे.
मोहोळ म्हणाले, पुण्यात आधी ११७ क्रॉनिक स्पॉट होते. त्यानंतर २२ गावे समाविष्ट झाल्यावर आता ही संख्या २०१ वर पोहोचली आहे. त्यापैकी ११७ स्पॉटचे काम पूर्ण झाले आहे. त्याजागी नालेसफाई झाली असून उर्वरित ८४ जागांवर काम सुरू आहे. ती कामे पावसाळापूर्व पूर्ण होतील. इतर जे ३९ स्पॉट कामे यंदा पूर्ण होऊ शकणार नाही, त्याठिकाणी तात्पुरते उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांचे हाल होऊ नये, याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी सूचना मनपाला दिल्या आहे.
‘सन २०१९ मध्ये आंबील ओढा येथे पूर येऊन मोठी आपत्ती आली होती. त्यानंतर उपाययोजना काम करून कात्रज ते दत्तवाडीदरम्यान नाले दुरुस्ती आणि रुंदीकरण करण्यात आल्याने परत काही अडचण आली नाही. पुण्यात नगरसेवक नसले तरी मनपात आमदार, खासदार लक्ष्य देत असून समन्वयाने काम करण्याचे ठरले आहे. पुण्यात मान्सूनपूर्व कामाचा वॉर्ड निहाय रिपोर्ट करून त्याचा एकत्रित अहवाल करण्याच्या सूचना दिल्या आहे. प्रत्येक जागी कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यास देखील सांगितली आहे.जे नेमून दिलेली कामे करत नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मनपाने अतिक्रमण बाबत कडक कारवाई करावी. आपत्ती व्यवस्थापन तयारी आढावा देखील घेतला गेला आहे. पुणे शहरासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडून जो निधी मंजूर होऊन आलेला आहे तो मनपाला मिळण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.
महायुती म्हणून निवडणुकीची तयारी…
आगामी मनपा निवडणूक ही महायुती म्हणून लढणार आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. महायुती म्हणून आम्ही लढणार असून त्यादृष्टीने निवडणुक तयारी सुरू केली आहे. गुणवत्तेच्या निकषावर उमेदवारीचे वाटप केले जाईल, असे देखील यावेळी मोहोळ यांनी सांगितले.

