चार दिवसांवर लग्न… आणि अचानक मृत्यू! लग्नघरी नेमकं काय घडलं?
Newsworldmarathi Ahmadnagar: ‘जो आवडतो देवाला तोच आवडे सर्वांना’, हे वाक्य सत्य ठरवत सुषमा श्रीमंत जाधव या बीएससी पदवीधर नववधूच्या आयुष्याला नियतीने करुण पूर्णविराम दिला. येत्या २० मे रोजी तिचा विवाह साजरा होणार होता. साखरपुडा नुकताच पार पडला होता आणि घरात लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात होती.
मात्र मंगळवारी (१४ मे) दुपारी १ वाजता घरातील साफसफाईदरम्यान सुषमा कुलरच्या पिनशी संपर्कात आली आणि तिला जोरदार विद्युत शॉक बसला. तिथेच तिचा मृत्यू झाला. घरातील आनंद एका क्षणात शोकात बदलला. गावात हंबरडा फुटला आणि सुषमाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
सुषमा ही हिप्पळगाव येथील जाधव कुटुंबातील ज्येष्ठ कन्या होती. वडील श्रीमंत आणि आई चंद्रकला यांनी कष्ट करून तिला शिकवले. सुषमाचे स्वप्न मोठ्या पदावर जाण्याचे होते. पण तिचे लग्न नात्यातीलच सुनील सूर्यवंशी (रा. येलदरा, ता. जळकोट) यांच्यासोबत निश्चित झाले होते.
दुर्दैवाने हळदीऐवजी तिच्या देहावर अंत्यसंस्काराचे फुले वाहण्यात आली. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता शोकमग्न वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांनी सांगितला महायुतीचा नवा फॉर्म्युला
Newsworldmarathi Pune : विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला केंद्र आणि राज्यशासन प्राधान्य देत असून गेल्या १० वर्षात नागरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. शहरी भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांना उत्तम सुविधा देण्यासाठी चांगल्या योजना राबविल्यास राज्य शासनातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांना सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
तसेच पुढे म्हणाले, आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. मात्र, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्र पक्षाला जास्त जागा सोडता येणार नाहीत. त्यामुळे शक्य तिथे महायुती करून अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्रित येऊ, असे स्पष्ट करीत देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.
राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या यशदा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी भेट दिली. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १२० दिवसांत घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात मला अडचण वाटत नाही. निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. आम्ही वेळेत निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू. सरकार आवश्यक ते सहकार्य करेल, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
महाराष्ट्र देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य
फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. विकासाची प्रक्रिया नागरिकरणाभोवती फिरते. शिक्षण, आरोग्य, रोजगार, मनोरंजन या चार गोष्टींसाठी नागरिक शहराकडे आकर्षित होतात. असे असताना विकासासोबत वाढत्या शहरीकरणाचा योग्यरितीने विचार न केल्याने शहर विकासाचे योग्य धोरण करण्यात आले नाही आणि त्यामुळे शहरातील समस्या निर्माण झाल्या. राज्यात ६ कोटी लोक ४५० शहरात राहतात. ही शहरे सुंदर करता आली तर ५० टक्के जनतेचे जीवनमान उंचावता येईल, असंही फडणवीस म्हणाले.
मी शब्दाचा पक्का, एखाद्याला खासदार करतो, तर कुणाला पाडायचं म्हटलं तर पाडतोच : अजित पवार
Newsworldmarathi Pune : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारासाठी इंदापूर तालुक्यातील अकोले गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली.
”मी शब्दाचा पक्का आहे, एखाद्याला सांगितलं की खासदार करतो तर करतोच. मी एखाद्याला सांगितलं की याचा काटा काढतो, तर त्याचा काटा काढतोच. एखाद्याला सांगितलं की याला पाडतो, तर त्याला पाडतोच…” असं अजित पवार यांनी म्हटले.
इंदापूर तालुक्यातील प्रलंबित पाण्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावणारच, मी शब्दाचा पक्का आहे. लोकसभेला, विधानसभेला कुणी कुठले काम केले हे न बघता 53 गावातील लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
छत्रपती सहकारी साखर कारखाना हा शरद पवार साहेबांनी तसेच घोलप,जाचक यांनी उत्तम चालवला. आम्ही राज्यातील अनेक कारखाने उभे केले. काही बिनविरोध देखील केलेले आहेत. छत्रपतीसाठी देखील बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं. इंदापूर तालुक्यातील कारखान्यांपेक्षा तुलनात्मक जादा दर छत्रपती कारखाना देतो, असंही यावेळी सांगितलं
मला तर अमित शहा नावाने ओळखतात
बारामतीत बोलताना म्हणाले, विरोधक सांगतात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी माझी ओळख आहे. मात्र, मला तर अमित शहा नावाने ओळखतात. तुम्हाला ओळखतात का? असा टोला अजित पवारांनी यावेळी लगावला.
पुढे म्हणाले, तुम्हाला स्वतःचे धंदे नीट करता येत नाहीत. बाप जाद्यांनी एवढं गडगंज करून ठेवलं होतं ते तुम्हाला सांभाळता येत नाही. आणि तुम्ही २२ हजार सभासदांचा संसार करायला निघालात, असा जोरदार प्रहार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर लगावला आहे.
Shirdi Crime : शिर्डीत गुजरातच्या व्यापाऱ्याचं सव्वातीन कोटींच्या सोन्याची चोरी; ड्रायव्हरनेच मारला डल्ला; नेमका काय घडलं?
Newsworldmarathi Shirdi : शिर्डीत सराफ व्यापाऱ्यांना सोने देण्यासाठी आलेल्या गुजरातमधील व्यापाऱ्याचे सव्वातीन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करून त्याचाच मोटारचालक पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारची (दि. १३) रात्री ते बुधवारीच्या (दि. १४) मध्यरात्रीपर्यंतच्या काळात ही घटना घडली आहे.
याप्रकरणी सुरेशकुमार भूरसिंह राजपुरोहित (रा. चोटन बारमेर, राजस्थान) याच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विजयसिह वरूनानी खिली (वय ३५, रा. अहवाल घुमटी, ता. आमिर गह, जि बनासकांटा, गुजरात) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयसिह वरूनानी खिली हे सराफ व्यापारी सोन्याचे दागिने येथील व्यापाऱ्यांना देण्यासाठी आपल्या अन्य सहका-यांसोबत मोटारीतून शिर्डीत आले होते. परिसरातील सराफ व्यापाऱ्यांना दागदागिन्यांचे वितरण करून, ते येथील आंबा गल्लीतील हॉटेल सुनीतामधील रूम नंबर २०१मध्ये मुकामी थांबले होते.
दरम्यान, त्यांच्या वाहनाचा चालक सुरेशकुमार भूरसिंह राजपुरोहित बॅगेत ठेवलेले साडेतीन किलो वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने व रोख चार लाख रुपये आणि काही चेक घेऊन पसार झाला. त्यात अंदाने तीन कोटी २६ लाखांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे विजयसिह यांनी शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी शिर्डी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. आरोपीला त्याला लक्करात लवकर जेरबंद करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दागिने लंपास करणारा आरोपी आपल्या वाहनावर चालक म्हणून पाच महिन्यांपासून कामाला होता, असे व्यापारी विजयसिंह यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता; सरकारला प्रभाग रचनेचे आदेश
Newsworldmarathi Mumbai: राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित महत्त्वाचे आदेश बुधवारी राज्य सरकारला दिले आहेत. आयोगाने स्पष्टपणे सांगितले आहे की, महापालिका, नगर परिषद, नगर पंचायतींसह जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी फेर प्रभाग रचना व गट-गणांची नवी रचना तातडीने सुरू करावी.
या निर्देशामुळे राज्यभरातील निवडणुकीच्या हालचालींना गती मिळाल्याचे दिसून येत असून, “निवडणुका कोणत्याही क्षणी लागणार?” असा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे.
आयोगाच्या आदेशानुसार, सरकारने सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नव्या प्रभाग रचनेसाठी तत्काळ प्रक्रिया हाती घ्यावी लागणार आहे. विशेषतः महापालिका, नगर परिषद व पंचायत राज संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता या प्रलंबित निवडणुकांची तयारी सुरू करण्यास आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत.
याआधी ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिला होता की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्यात याव्यात. या आदेशानंतर आयोगाने हालचाल वेगवान करत निवडणुकीसाठी लागणारी प्रशासकीय तयारी सुरू करण्यास सांगितले आहे.
राज्यभरातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या घडामोडीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. स्थानिक राजकारणात मोठे उलथापालथ होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ने दहशतवादाचा बीमोड; भारतीय लष्कराच्या शौर्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा सलाम
Newsworldmarathi Mumbai: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले आहे. या कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ऑगस्ट क्रांती मैदान येथे तिरंगा रॅली पार पडली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून जगाला भारताचे लष्करी सामर्थ्य दिसून आले आहे. पाकिस्तानला भारताच्या लष्करी सामर्थ्यापुढे गुडघे टेकावे लागले. भारताची संरक्षण तयारी आणि सुरक्षा यंत्रणा भक्कम असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचे प्रत्यूत्तर भारताने दिले आहे.
रॅलीच्या प्रांरभी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपस्थितांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले.
ऑगस्ट क्रांती मैदान येथून सुरू झालेली रॅली गिरगाव चौपाटी येथील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून समाप्त करण्यात आली. समारोपावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपस्थितांनी शहिद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण केले आणि टिळक स्मारकास अभिवादन केले.
या रॅलीमध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, यांच्यासह मुंबईतील आमदार, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
‘हिंदू मुली म्हणजे मुले जन्माला घालण्याचे मशीन’; गोपीचंद पडळकरांचे विधान चर्चेत
Newsworldmarathi Nashik : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाशिकच्या सिडको परिसरात झालेल्या सभेत वादग्रस्त विधान करत दावा केला की, “सध्या हिंदू मुली म्हणजे केवळ मुले जन्माला घालण्याचे मशीन बनल्या आहेत”. या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सभेदरम्यान पडळकर म्हणाले की, “मुस्लिम समाजात अनेक जाती असून ते आपसात लग्न करत नाहीत, मात्र आमच्या मुलींना फसवून धर्मांतर घडवून आणले जात आहे”. त्यांनी ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, आणि वक्फ बोर्ड यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, राज्यातील मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली. तसेच प्रत्येक गावात ‘धर्म दल’ स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
काश्मीर, लव्ह जिहाद, आणि ‘लँड जिहाद’चा उल्लेख
पडळकर पुढे म्हणाले की, “काश्मीरमध्ये अजूनही धर्म विचारून गोळ्या झाडल्या जात आहेत. लव्ह जिहाद, लँड जिहाद सुरू आहे आणि या सगळ्यावर आता गंभीर विचार होणे आवश्यक आहे.” त्यांनी असा आरोप केला की, “मोकळी जागा दिसली की मशिद बांधली जाते, रेल्वे आणि मिलिटरीपेक्षा वक्फ बोर्डाकडे अधिक जागा आहे”.
संभाजी महाराजांबाबत ‘जिहादी’ आरोप
सभेत पडळकरांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयीही वक्तव्य केले. त्यांनी काही लोकांनी महाराजांना ‘सेक्युलर’ दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आणि “जिहादी विचारसरणीच्या लोकांकडून संभाजी महाराजांना बदनाम केले जात आहे” असे ते म्हणाले. “बीड जिल्ह्यातील एका भागाला संभाजी महाराजांचे नाव लावून अपमान करण्यात आला आहे”, असेही त्यांनी नमूद केले.
पुणे, नागपूर, पनवेलमध्ये उभारणार अत्याधुनिक लॉजिस्टिक्स पार्क्स; राज्यात ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक
Newsworldmarathi Mumbai : महाराष्ट्र सरकार आणि एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स व होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स (ब्लॅकस्टोन ग्रुप) यांच्यामध्ये महाराष्ट्रातील 10 हून अधिक अत्याधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्कच्या विकासासंदर्भात मैलाचा दगड ठरणारा सामंजस्य करार करण्यात आला. उद्योग सचिव आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष आर. के. नारायणन यांनी या करारावर स्वाक्षरी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे हा सामंजस्य करार करण्यात आला
या कराराअंतर्गत नागपूर, भिवंडी, चाकण, सिन्नर आणि पनवेल या ठिकाणी 10 हून अधिक आधुनिक औद्योगिक व लॉजिस्टिक्स पार्क्स विकसित केले जाणार आहेत. यासाठी 794.2 एकर जागेवर 1.85 कोटी चौ. फूट बांधकाम होणार असून, एकूण ₹5,127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक होणार आहे. यामुळे 27,500+ थेट व अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होतील.
हे प्रकल्प पर्यावरणस्नेही, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरयुक्त व महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण 2024 शी सुसंगत असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भागीदारी औद्योगिक व लॉजिस्टिक्स क्षेत्रातील परिवर्तनाचे पाऊल असल्याचे सांगितले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रधान सचिव व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री विजय शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर गुन्हा दाखल करण्याची गुलाबो गँगची मागणी
Newsworldmarathi Pune : भाजपचे मध्य प्रदेशमधील मंत्री विजय शहा यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून गुलाबो गँगच्या महिलांनी संताप व्यक्त केला असून, संबंधित मंत्र्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
गुलाबो गँगच्या महिलांनी पोलिसांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंत्री विजय शहा यांनी एका कार्यक्रमात भारताच्या शूर कन्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी अपमानास्पद आणि घाणेरडी टिप्पणी केली. “ती अतिरेक्यांची बहीण आहे” असे उद्गार त्यांनी काढल्याचा आरोप आहे. कुरेशी यांच्या कुटुंबातील तीन पिढ्या भारतीय सेनेत सेवा बजावत असून, अलीकडील भारत-पाक संघर्षात कर्नल कुरेशी यांनी निर्णायक भूमिका बजावली होती.
महिलांच्या मते, हे वक्तव्य केवळ कर्नल कुरेशी नव्हे, तर संपूर्ण देशातील महिलांचा आणि भारतीय सेनेचा अपमान करणारे आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या निवेदनासोबत त्यांनी संबंधित भाषणाची व्हिडिओ क्लिप असलेली पेन ड्राइव्हही सादर केली आहे. “हे भाषण सर्वच टीव्ही चॅनेल्सवर दाखवले जात असून, आम्ही तपासासाठी स्वतंत्रपणे क्लिपही दिली आहे,” असे निवेदनात नमूद आहे.
“आपण आमचे मायबाप सरकार आहात, आम्हाला न्याय द्याल,” असा विश्वासही या महिलांनी व्यक्त केला आहे.
संगीता तिवारी, सोनिया ओवाळ, शोभा पणीकर, सुनिता नेमूर, मनीषा गायकवाड, सीमा महाडिक, सुवर्णा माने, रजिया शेख आणि बेबी राऊत यांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत.
पित्याच्या आत्महत्येनंतरही हार न मानता दहावीमध्ये बाजी मारणाऱ्या दुर्गा आणि नियतीची प्रेरणादायक यशोगाथा
Newsworldmarathi Nanded: निझामाच्या गुलामीतून मुक्त झाल्यानंतरही कायम मागासलेल्या मराठवाड्यातील शेतकरी आजही कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकले आहेत. पाण्याचा अभाव, अल्पभूधारकता आणि वाढती शेतीची खर्चिकता यामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागत आहे. अशाच एका पार्श्वभूमीत जन्मलेल्या आणि वडिलांच्या आत्महत्येमुळे बालपणीच पितृछत्र हरवलेल्या दुर्गा क्षीरसागर आणि नियती इंगोले या दोन मुलींनी दहावीच्या परीक्षेत यश मिळवत क्रूर नियतीवर विजय मिळवला आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दूरवरच्या वाडीत राहणाऱ्या या मुलींनी वडिलांच्या आत्महत्येनंतर बालवयातच जगण्याशी झुंज सुरू केली. वडील गेल्यानंतर शिक्षण सोडाच, पण दोन वेळचे अन्न मिळवणेही कठीण झाले. आई अशिक्षित आणि मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणारी. अशा खडतर परिस्थितीतही दुर्गा आणि नियती यांनी हार मानली नाही.
सुदैवाने, पुण्यातील *भोई प्रतिष्ठान* या संस्थेच्या *पुण्यजागर* प्रकल्पांतर्गत त्यांना आधार मिळाला. सुमारे नऊ वर्षांपूर्वी या दोघींना पुण्यात आणून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी प्रतिष्ठानने घेतली. दोघींनाही पुरंदर तालुक्यातील वीर येथील *अस्तित्व गुरुकुल* या निवासी शाळेत दाखल करण्यात आले.
आज या दोघींनी त्या संधीचे सोने केले आहे. दुर्गाने दहावीत ८६.४० टक्के तर नियतीने ७७ टक्के गुण मिळवत आपल्या संघर्षाचे यशात रूपांतर केले आहे. या यशाबद्दल त्यांनी भोई प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई यांचे आणि शेतात मोलमजुरी करून पोषण करणाऱ्या आपल्या मातांचे आभार मानले आहेत.
भोई प्रतिष्ठानने मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २५ विद्यार्थ्यांना पुण्यात आणून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. दुर्गा आणि नियती यांची यशोगाथा केवळ प्रेरणादायी नाही, तर समाजातील अशा अनेक दुर्लक्षित मुलांसाठी आशेचा किरणही ठरते.

