पहेलगाम हल्ल्यातील शहीदांना अभिवादन आणि लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी पुण्यात ‘तिरंगा यात्रा’

0
Newsworldmarathi Pune: जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भारतीय लष्कराच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी आज रविवार, 18 मे रोजी पुण्यात ‘तिरंगा यात्रा’चे आयोजन करण्यात आले. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज स्मारक येथून ज्ञानेश्वर पादुका चौकात समारोप सभा झाली. पावसाच्या सरींना न जुमानता, हातात तिरंगा घेऊन, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘दहशतवाद मुर्दाबाद’ अशा घोषणांनी पुणेकरांनी रस्ते गाजवले. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिकांनी कुटुंबासह उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मोहोळ म्हणाले, “आता दहशतवाद सहन केला जाणार नाही. शहीदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारताची भूमी आणि अस्मिता सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिक सज्ज आहे. ज्या प्रकारे पाकिस्तानवर हल्ला करून सडेतोड उत्तर दिले त्याच प्रकारे या पुढील काळात दहशतवाद संपवला जाईल.” घाटे म्हणाले की, “ही यात्रा केवळ एक विरोध नाही तर आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना श्रद्धांजली देण्याची सामूहिक भावना आहे. समाज म्हणून एकत्र येऊन आपले कर्तव्य बजावण्याचा हा प्रयत्न आहे.” या यात्रेत सहभागी होताना गनबोटे आणि जगदाळे कुटुंबांनी स्वतःच्या दुःखावर मात करत समाजासाठी एकत्र उभे राहण्याचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला. त्यांच्या देशभक्तीने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू उभे केले. एअर मार्शल बापट यांच्या प्रतिकात्मक संदेशात नमूद करण्यात आले की, “आत्मनिर्भर भारताच्या संरक्षण प्रणालीत ब्रह्मोस, आकाश आणि आकाश तीर क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे. देशाला हात लावणाऱ्यांना आता योग्य उत्तर मिळते.” या तिरंगा यात्रेत केंद्रीय हवाई वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे , राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी , समाज कल्याण राज्य मंत्री माधुरी मिसाळ ,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार सिद्धार्थ शिरोळे,भीमराव तापकीर ,हेमंत रासने , सुनील कांबळे , योगेश टिळेकर ,माजी आमदार जगदीश मुळीक, श्रीनाथ भिमाले,संदीप खर्डेकर, सरचिटणीस पुनीत जोशी ,राघवेंद्र मानकर , सुभाष जंगले, राहुल भंडारे ,प्रमोद कोंढरे, वर्षा तापकिर,गणेश कळमकर रवींद्र साळेगावकर यांच्या सह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

महाराष्ट्रात 19 ते 25 मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचा सल्ला

0
Newsworldmarathi Pune : राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच कडक उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रात 19 ते 25 मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकण आणि घाटमाथा परिसरात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 22 मे रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी आजपासून पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या दरम्यान विजेच्या कडकडाटासह पावसाचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या या अंदाजामुळे प्रशासनही सतर्क झाले असून, संभाव्य आपत्ती व्यवस्थापनासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

कोरोनाची पुन्हा एन्ट्री ? मुंबईत 2 कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू, नेमकं काय प्रकरण?

Newsworldmarathi Mumbai: Mumbai Corona News : मुंबईत कोरोना संसयित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या दोन्ही रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे नव्हे तर इतर गंभीर आजारामुळे झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. केईएम रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या १३ वर्षीय मुलीचा आणि ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत रुग्णांवर मूत्रपिंड व कर्करोगाचे उपचार सुरू होते. तिच्या मृत्यूचे कारण मृत्यू प्रमाणपत्रात ज्या आजारावर उपचार सुरू होते. त्याच आजाराने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. उपचारादरम्यान आम्ही सर्व तपासणी करतो त्यातच आम्ही कोविडची देखील तपासणी केली होती, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करताना कोविडचा प्रोटोकॉल पाळत त्यांना मृतदेह कोविड बॅगमधून देण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, १३ वर्षीय चिमुकली मूत्रपिंडाच्या आजाराने तर ५९ वर्षीय महिला कर्करोगाने त्रस्त असल्याने दाखल केले होते. दोघीच्याही मृत्यू त्यांच्या मूळ आजारांमुळे झालेले आहेत, असे केईएम रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले. घाबरण्याची गरज नाही : आरोग्य विभाग मुंबई महापालिका आणि आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. जेणेकरून सुरुवातीच्या टप्प्यातच संसर्ग थांबवता येईल. गरज पडल्यास कठोर कारवाई करण्याची तयारीही विभागाने केली आहे. सध्या घाबरण्याची गरज नाही असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांना ‘संसदरत्न पुरस्कार’

0
Newsworldmarathi Pune : चेन्नई येथील ‘प्राईम पॉईंट फौंडेशन’च्या वतीने दिला जाणारा ‘संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यंदा खासदार सुप्रिया सुळे यांना जाहीर करण्यात आला आहे. संसदेतील सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी तसेच मतदारसंघातील प्रश्नांसाठी स्थानिक प्रशासनापासून केंद्र सरकारपर्यंत सातत्याने प्रयत्नशील राहिल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे श्रीनिवासन यांनी दिली. खासदार सुळे यांची लोकसभेतील उपस्थिती ९९ टक्के, तर राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील एकत्रित उपस्थिती ८७ टक्के इतकी आहे. त्यांनी संसदेच्या ४७ चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला असून ११३ प्रश्न पटलावर मांडले आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत त्यांना याआधीही ‘संसद महारत्न’ पुरस्काराने दोन वेळा सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय, त्यांना ‘संसद विशिष्टरत्न’ आणि आठ वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाला आहे. १५वी, १६वी आणि १७वी लोकसभा कार्यकाळात त्यांनी अशीच उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार सुळे यांचा हा पुरस्कार संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांना समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले.
“राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सेवा करण्याची संधी दिली, मतदारांनी विश्वास टाकला, हाच विश्वास काम करण्याची ऊर्जा आहे. हा पुरस्कार मतदारांना समर्पित करताना आनंद होतो.”
– सुप्रिया सुळे, खासदार

ही पुण्यातील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज; जाणून घ्या सविस्तर माहिती

0
Newsworldmarathi pune: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर केला. यंदा निकाल मे महिन्याच्या सुरुवातीलाच जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना इच्छित कॉलेज निवडण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यातील लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याच्या तयारीत असून, पुणे हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. त्यामुळे पुण्यातील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज्सविषयी माहिती घेणे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. पुण्यातील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज्स : 1. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) – आधुनिक शिक्षण सुविधा, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग भागीदारी यावर भर देणारे हे कॉलेज पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ओळखले जाते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह चांगल्या नोकऱ्यांचे संधी येथे उपलब्ध आहेत. 2. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (AIT) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेले हे कॉलेज लष्करी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण देते. शिस्तबद्ध वातावरण आणि देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्धी मिळवलेले हे कॉलेज आहे. 3. भारती विद्यापीठ – एक अभिमत विद्यापीठ असलेले हे संस्थान विविध इंजिनिअरिंग अभ्यासक्रम, व्यावहारिक शिक्षण आणि उद्योगांशी जोडलेले अनुभव देण्यासाठी ओळखले जाते. 4. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT) – आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, उद्योग-केंद्रित अभ्यासक्रम आणि परदेशी विद्यार्थ्यांची उपस्थिती यामुळे हे कॉलेज अग्रगण्य मानले जाते. 5. सीओईपी (College of Engineering Pune) – 1854 मध्ये स्थापन झालेलं हे कॉलेज महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील तिसरे सर्वात जुनं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध असलेले हे महाविद्यालय संशोधन आणि गुणवत्ता शिक्षणावर भर देते. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार आणि गुणवत्तेनुसार योग्य कॉलेज निवडून आपले करिअर घडवण्याची संधी या प्रवेश प्रक्रियेमुळे उपलब्ध झाली आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू

0
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर झाला. लाखो विद्यार्थ्यांनी यानंतर सुटकेचा नि:श्वास टाकला. यंदा राज्याचा एकूण निकाल 94 टक्के लागला असून, अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे. दहावी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असून, त्यानंतर आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरू झाली आहे. येत्या सोमवारपासून, म्हणजेच 19 मे 2025 पासून इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अकरावी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन पोर्टलवर सध्या विविध महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. महाविद्यालयांनी आपापली माहिती पोर्टलवर अपलोड करण्यास सुरुवात केली असून, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी टप्प्याटप्प्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून, त्यानुसार विद्यार्थ्यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळणार असून, विशेषतः नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांनी अधिकृत पोर्टल आणि सूचना यावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोलापुरात कारखान्याला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू

Newsworldmarathi solapur : शहरातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्यात मध्यरात्री भीषण आग लागली. ही घटना शनिवार-सोमवारच्या मध्यरात्री सुमारे 3 वाजता घडली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. आगीच्या धुरामुळे आणि उष्णतेमुळे कारखान्यात अडकलेल्यांना बाहेर काढणे कठीण झाले होते. मात्र, जवानांनी जीव धोक्यात घालून तीन जणांना बाहेर काढले. दुर्दैवाने, या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. आगीमुळे कारखान्याचे मोठे नुकसान झाले असून, आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, प्रशासनाकडून तपास सुरू आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरूच आहेत. मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, प्रशासनाने घटनास्थळी तात्काळ मदत कार्य सुरू केलं आहे.

Kedarnath Helicopter Crash : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

Newsworldmarathi Team : Kedarnath Helicopter Crash : उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये एक हेलिकॉप्टर कोसळले आहे. आपत्कालीन लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. हेलिकॉप्टरचा मागचा भाग तुटून खाली पडला. हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुरक्षित असले तरी, हेलिकॉप्टर अपघाताची बातमी कळताच पोलिस आणि प्रशासनात घबराट पसरली आहे. गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, एम्स ऋषिकेशच्या हेली रुग्णवाहिका सेवेचे हेलिकॉप्टर केदारनाथमध्ये कोसळले आहे. हेलिकॉप्टरच्या मागील भागाचे नुकसान झाले. हेलिकॉप्टरमध्ये असलेले सर्व तीन प्रवासी, एक डॉक्टर, एक कॅप्टन आणि एक वैद्यकीय कर्मचारी सुरक्षित आहेत. अपघाताची चौकशी सुरू आहे, अपघातामागील कारणे लवकरच कळतील. तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर केदारनाथ हेलिपॅडवर उतरत असताना अचानक हेलिकॉप्टरची शेपटी तुटली. हेलिकॉप्टर खाली पडताना पाहून प्रवाशांमध्ये आरडाओरडा सुरू झाला. जवळपास उभ्या असलेल्या लोकांमध्ये घबराट पसरली, पण पायलटने हुशारी दाखवली आणि हेलिकॉप्टर उतरवले. त्याने प्रवाशांना खाली उतरवले आणि नंतर तो स्वतःही खाली उतरला. हे हेलिकॉप्टर एम्स ऋषिकेशच्या हेली रुग्णवाहिका सेवेचे होते. त्यात प्रवास करणारे तीन डॉक्टर एका रुग्णाला घेण्यासाठी केदारनाथ धामला जात होते. रुग्णाला केदारनाथ धाम येथून एम्स ऋषिकेश येथे हलवावे लागले. लँडिंगच्या अगदी आधी, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि पायलटने आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु लँडिंग करताना हा अपघात झाला.

मान्सूनचा वेगवान प्रवास; मालदीव, श्रीलंकेत दाखल, अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता

0
Newsworldmarathi Pune: यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा प्रचंड वेगाने प्रगती करीत असून, तो शनिवारी 17 मे रोजी मालदीव आणि श्रीलंकेत दाखल झाला. हवामान शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, येत्या 21 मे रोजी अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असून, त्यामुळे केरळ आणि कर्नाटकात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यंदा हवामानातील दाब प्रणाली वेळेवर अनुकूल झाल्यामुळे मान्सून फारसा अडखळत न थांबता जलदगतीने पुढे सरकत आहे. 13 मे रोजी मान्सून अंदमान बेटांवर पोहोचला. त्यानंतर 15 मे रोजी बंगालच्या उपसागरात आणि 17 मे रोजी श्रीलंकेत दाखल झाला आहे. या वेगाने होत असलेल्या प्रगतीमुळे केरळ आणि कर्नाटकात चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, त्या भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आगामी सात दिवसांत अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचा हवामान विभागाचा अंदाज असून, त्याचा परिणाम पुढील मान्सून प्रवासावरही होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर हवामान विभाग आणि आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहण्याचे संकेत दिले आहेत. मान्सूनच्या वेगवान गतीमुळे देशातील पर्जन्यमानावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

संदीप सिंग गिल्ल पुणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक

0
Newsworldmarathi Pune : पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षकपदी संदीप सिंग गिल्ल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले पंकज देशमुख यांची पदोन्नती होऊन त्यांची नियुक्ती पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी आता संदीप सिंग गिल्ल यांची बदली करण्यात आली आहे. संदीप सिंग गिल्ल सध्या पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असून, एक कार्यक्षम आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पुणे शहरात अलिकडे गाजलेल्या कोयता गॅंगविरोधातील मोहिमेत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी आक्रमक आणि प्रभावी भूमिका बजावली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला रोखणे, कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणे आणि नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास वृद्धिंगत करणे ही त्यांच्या पुढील कार्यकाळातील प्रमुख जबाबदाऱ्या असतील. जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी ते कोणती धोरणं राबवतात आणि यंत्रणा कशा पद्धतीने कार्यान्वित करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संदीप सिंग गिल्ल यांच्या नियुक्तीमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात नव्या उर्जेसह कामकाज होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याकडेही त्यांचा भर राहणार आहे.