Newsworldmarathi Beed : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचे पडसाद ताजे असतानाच बीड जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील पेट्रोल पंपाजवळून एका तरुणाचे अपहरण करून त्याला लाठ्या आणि बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पीडित तरुणाचे नाव शिवराज हनुमान दिवटे असून, तो परळी तालुक्यातील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे पेट्रोल पंपाजवळून अपहरण करण्यात आले. त्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी त्याला निर्घृण मारहाण केली. लाठ्या आणि बेल्टने झालेल्या मारहाणीमुळे तो गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिस यंत्रणेवर विश्वास व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आरोपींनी शिवराज दिवटे यांना निर्दयपणे मारहाण करतानाचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकारामुळे बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीती आणि संताप पसरले आहेत.


Recent Comments