भारतीय सैनिक अरुणाचल प्रदेश, पठाणकोट, गुवाहाटी व राजस्थानसह सीमावर्ती भागात करणार दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना
Newsworldmarathi Pune: सामान्य नागरिकांप्रमाणेच देशाच्या सिमेवर लढणारे सैनिक देखील गणेशाची भक्ती करतात. मात्र, भारतीय सैनिक सिमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये गणेशोत्सवात सहभागी होण्यास येता येतेच असे नाही. त्यामुळे यंदा भारतीय लष्करातील ३३, ६, १९, १, १०१ इन्फन्ट्री आणि ७१ इन्फन्ट्री युनिटच्या सैनिकांना अरुणाचल प्रदेश, पठाणकोट, गुवाहाटी व राजस्थानसह येथे गणेशोत्सवात श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्यास देण्यात आल्या.
सीमावर्ती भागात दगडूशेठ च्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा या बटालियनच्या सैनिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली होती. ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रीं ची हुबेहुब २ फुटी प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले. त्यानुसार नुकत्याच या मूर्ती विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. त्यामुळे मराठा बटालियनच्या प्रमुखांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणा-या मूर्तीची प्रतिष्ठापना सिमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये करण्याची इच्छा सैनिकांच्या वतीने व्यक्त केली. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे ट्रस्टकडे विनंती करणारे पत्र पाठविले होते. सलग १५ वर्षे हा उपक्रम सुरु असून बटालियनच्या संख्येत देखील वाढ होत आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, मराठा बटालियन दरवर्षी गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरी करते. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक गणेश मूर्तीची स्थापना अनेक वर्षांपासून देशाच्या विविध सीमावर्ती भागात केली जाते. यंदा ट्रस्टतर्फे लष्करातील मराठा बटालियनला देण्यात आल्या आहेत.
सन २०११ पासून मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे जवळचे संबंध आहेत. सिमेवरील भारतीय लष्करी ठाण्यामध्ये गणेशाची मूर्ती स्थापन केल्याने सैनिकांना वेगळी उर्जा मिळते. तसेच या ठिकाणी देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल, अशी भावना देखील सैनिकांनी व्यक्त केली आहे.
लाखो रुग्णांची नेत्रविकार सेवा घडावी : उपमुख्यमंत्री अजित पवार
Newsworldmarathi pune: डोळ्यांमुळे आपण सौंदर्य पाहतो. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात मोतिबिंदूसह डोळ्यांचे इतर आजार होत आहेत. आता उपचारांमध्येही ‘ए आय’ चा वापर होत आहे. डॉ. अनिल दुधभाते यांनी शून्यातून विश्व निर्माण करत नेत्राची काळजी घेण्यासाठी डोळ्यांच्या सर्वच आजारांवर एकाच छताखाली सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी दहा हजार फुटाचे सुसज्ज सेंटर उभारले आहे, त्यांच्याकडून सर्वसामान्यांची नेत्रसेवा घडावी, अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.
माणिकबाग, सिंहगड रस्ता परिसरात आरोग्यसेवेची नवी पर्वणी ठरू शकेल अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त डॉ. दूधभाते नेत्रालय व रेटीना सेंटरचे उद्घाटन अजितदादा पवार यांच्या हस्ते रविवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, राष्ट्रवादीचे माजी नेते काका चव्हाण, अनिल गोसावी, पीडिसीसी बँकेचे दिगंबर दुर्गाडे, विकास दांगट, प्रसन्न जगताप, प्रशांत जगताप, अशोक हरणावळ तसेच वैदयकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घरची प्रतिकूल परिस्थती असताना डॉ. दुधभाते जिद्दीने शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाल्याबाबत अजित पवार यांनी कौतुक व्यक्त करत पुढे ते म्हणाले, ” डॉ. दुधभाते गरिबीतून आल्याने ते गोर गरीब लोकांना सवलतीच्या दरांत सेवा देत आहेत. येथील प्रत्येक नेत्र वैद्यकीय साधनांच्या किमती एक ते पाच कोटींच्या दरम्यान व त्या अमेरिकन बनावटीच्या आहेत. डॉ. दुधभाते नेत्रालाय हे सर्वांना हक्काचे नेत्रालाय झाले आहे. त्याचबरोबर त्यांनी मोफत नेत्रतापसणी करून काम करून सामाजिक भानही जपत डॉक्टरच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम पाहिले आहे. येथे लाखो लोकांचे नेत्रविकार दूर करण्याचे काम हे नेत्रालय करेल, अशा शुभेच्छा दिल्या.
चेन हॉस्पिटल सुरू करणार : डॉ. दुधभाते
डॉ. दुधभाते म्हणाले, “सन 2011 मध्ये सिंहगड रास्ता परिसरात नेत्रालाय सुरू केले होते. त्यानंतर आता 14 वर्षात स्वतःच्या या भव्य नेत्रालयाच्या वास्तूचे उदघाटन आपल्या सर्वांच्या सहकार्याने करू शकलो. आम्ही येथे अत्याधुनिक सेवा देणार आहोत. खासकरून कांटूरा लॅसिक तंत्रज्ञान येथे आहे. गेली 4 वर्षे आम्ही 500 मोफत नेत्र तापसणीद्वारे 5 लाख लोकांची मोफत नेत्र तपासणी केली. येथेही गरिबाला परवडेल अशा सेवा देणार आहे. कमीत कमी 5 हजार रुपयांमध्ये येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया असून येत्या काळात दुधभाते नेत्रालयाच्या चेन हॉस्पिटल सुरू करण्याची मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते डॉ. दुधभाते यांचे आईवडील धोंडीबा व पार्वती दुधभाते यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. अनिल दूधभाते नेत्रालय व रेटिना सेंटर विषयी :
प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांनी तीन मजली अद्ययावत उपचार असलेल्या रुग्णालयाची उभारणी केली आहे. डोळ्यांच्या विविध आजारांचे निदान, तपासणी व उपचार एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचे हे केंद्र खास ठरणार आहे. पुणेकरांसह ग्रामीण भागातील रुग्णांनाही येथे उच्च दर्जाची नेत्रसेवा मिळणार आहे. सिंहगड रोड परिसरातील आरोग्यसेवेत भर घालणारे हे रुग्णालय पुणेकरांसाठी एक मोठे वरदान ठरणार आहे.
विठ्ठल नागनाथ काळे ठरला दोन राज्यांचा ‘उत्कृष्ट’ अभिनेता
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र राज्याचा ५८ वा चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला. या सोहळ्यात अभिनेता विठ्ठल नागनाथ काळे याला ‘बापल्योक’ या मराठी भाषेतील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद असे महाराष्ट्र शासनाचे एकूण तीन पुरस्कार मिळाले. तर पणजी येथे झालेल्या १० व्या गोवा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात विठ्ठल नागनाथ काळे याला ‘काजरो’ (द बिटर ट्री) या कोंकणी भाषेत असलेल्या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ज्युरी पुरस्कार मिळाला आहे.
महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळवणारा विठ्ठल काळे हा पहिलाच अभिनेता ठरला आहे. कोंकणी भाषा येत नसतानाही त्या भाषेचा अभ्यास करून त्याने ही भूमिका साकारली आहे. काजरो या कोंकणी चित्रपटाला ६७ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. विठ्ठलने बापल्योक, पुनःश्च हरिओम, लाईक आणि सब्स्क्राईब, घर बंदूक बिर्याणी, राक्षस, हॉटेल मुंबई या चित्रपटांमध्ये, तसेच मानवत मर्डर्स या वेबसीरीजमध्ये लक्षवेधी अभिनय केला आहे.
विठ्ठलने दोन्ही राज्य, निवड समिती, परीक्षक, दिग्दर्शक, सहकलाकार आणि निर्माते यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला. पुरस्कारांमुळे माझ्यावर जबाबदारी आणखीन वाढली आहे, अशाच उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
पुणे हे जागतिक बाजारपेठेचे केंद्र व्हावे : अरुण फिरोदिया यांचे मत
Newsworldmarathi Pune: “भारतात ज्ञानाची मोठी शक्ती आहे. अनेक परदेशी लोक इथे येऊन ज्ञान ग्रहण करतात व जगाला सेवा पुरवतात. भारतीयांनी आपल्या ज्ञानाची शक्ती ओळखून घेत प्रगतीचा मार्ग शोधला पाहिजे. जगाकडून शिकण्यासह जगाला शिकवण्याची जिद्द आपल्याकडे हवी. भारतीय ग्राहकांचे समाधान करणारे उत्पादन जगात यशस्वी ठरते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री अरुण फिरोदिया यांनी केले. पुणे सर्वार्थाने समृद्ध असून, पुण्याला जागतिक केंद्र बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय सल्लागार व इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्सच्या (आयएमए) संचालक मंडळाचे ग्लोबल चेअर सीएमए सुनील देशमुख लिखित ‘विदेशमुखी’ पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री अरुण फिरोदिया यांच्या हस्ते झाले. सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरच्या नवलमल फिरोदिया सभागृहात झालेल्या सोहळ्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, आयटी तज्ज्ञ व लेखक डॉ. दीपक शिकारपूर, प्रकाशक अमलताश बुक्सचे सुश्रुत कुलकर्णी, देशमुख यांच्या पत्नी माधुरी देशमुख आदी उपस्थित होते.
अरुण फिरोदिया म्हणाले, “लोकांकडून, ग्राहकांकडून शिकत गेल्याने माझ्या मनात अनेक नवनव्या कल्पना विकसित होत गेल्या. आपण जे काही करू त्यात यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास आपल्याकडे हवा. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी बाहेर पडा व शिकत राहा. विविध ठिकाणचे लोक, बाजारपेठ समजून घ्या. त्यासाठी देशाटन करत राहा. भारतात शिकून जगभरासाठी काम करा. जिद्द आणि उमेदीने संघर्षाशी दोन हात करून सुनील देशमुख यांनी आयुष्याला प्रेरणादायी यशोगाथा बनवली आहे. त्यांचा हा यशस्वी जीवनप्रवास तरुण पिढीसाठी आदर्शवत आहे. त्यामुळे अशा यशोगाथा व्यवस्थापनासह इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला हव्यात. बिकट वाटेला न घाबरता धैर्याने यशशिखरे संपादन करत राहावीत.”
डॉ. पराग काळकर म्हणाले, “यशस्वी माणसेच इतरांना प्रेरणा मार्ग दाखवतात. नांदेडच्या छोट्याशा गावातून सुरु झालेला सुनील देशमुख यांचा प्रवास जागतिक स्तरावर गेला. त्यांच्या या सातत्यपूर्ण यशामागे आपले परिश्रम, जिद्द असते. त्यांची ही यशोगाथा तरुणांसाठी ऊर्जादायी आहे. यशाच्या शिखरावर पोहचूनही आपल्या मातीशी, गावाशी आणि माणसांशी नाळ जोडून ठेवणारा हा माणूस आहे. तरुणांनी देशमुखांचा हा आदर्श घेऊन जीवनात यशाकडे वाटचाल करावी. छोट्या अपयशाने खचून न जाता झालेल्या चुकांचे अवलोकन करून पुन्हा नव्या ऊर्जेने प्रयत्न करावेत.”
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, “आयुष्य हे खूप सहज असते. आपण त्याला किचकट करतो. शिका, कमवा आणि परत करा या तीन मूल्यांवर आपले आयुष्य आधारलेले असते. दादा वासवानी यांनी दिलेल्या तत्वांवर वाटचाल केली, तर सदृढ समाजाची जडणघडण होईल. लेखनाला तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी. सध्याचा काळ डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे. युवा पिढी वाचण्यासाठी पुस्तकांबरोबर तंत्रज्ञानाचा उपयोग करते. अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी पॉडकास्ट, ऑडिओ बुक अशा विविध माध्यमांचा उपयोग केला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने विविध भाषांमध्ये हे पुस्तक जावे.”
सुनील देशमुख यांनी पुस्तकाचा प्रवास उलगडून सांगितला. जिद्दीने काम करत राहिलो. आयुष्यात अनेक संघर्षाचे क्षण आले, पण त्यात खचून न जाता धैर्याने उभा राहिलो. या प्रवासात अनेकांनी चांगली साथ दिली. त्यामुळे हा प्रवास अधिक सुखद होत गेला, असे देशमुख यांनी नमूद केले. प्रशांत शुक्ला, मानसी शहा यांनी सूत्रसंचालन केले. प्रचिती अंकाईकर यांनी आभार मानले.
पुढील वर्षीपासून काश्मीरमधील पाच जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूमधाम; युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम
Newsworldmarathi Pune: काश्मीर खोऱ्यात तब्बल ३४ वर्षांनंतर पुन्हा सार्वजनिक गणेशोत्सवास गेल्या दोन वर्षांपासून सुरुवात झाली आहे. सध्या तीन ठिकाणी हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात असून पुढील वर्षापासून काश्मीरमधील पाच जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाईल, असा विश्वास काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात व्यक्त केला.
काश्मीरमधील लाल चौकात २०२३ पासून दीड आणि पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर गतवर्षी तीन ठिकाणी हा उत्सव साजरा झाला. यावर्षी पुन्हा तीन ठिकाणी गणेशोत्सव साजरा होणार असून त्यासाठी पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मूर्ती विधीवत पूजा करून काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. केसरीवाडा गणपतीची मूर्ती लाल चौक गणपती मंडळांकडे तर अखिल मंडईच्या शारदा गजाननाची मूर्ती श्रीनगरमधील इंदिरानगर मंडळाकडे आणि साऊथ काश्मीरमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाची मूर्ती सुपूर्द करण्यात आली.
यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळांचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्यासह अखिल मंडई मंडळाचे सूरज थोरात, केसरी गणपतीचे अनिल सपकाळ, गुरुजी तालीम मंडळाचे पृथ्वीराज परदेशी, तुळशीबाग मंडळांचे विनायक कदम, जोगेश्वरी मंडळांचे प्रसाद कुलकर्णी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे अध्यक्ष संजीव जावळे यांच्यासह काश्मीरमधील मोहित भान, संदीप रैना, सनी रैना, अमित कुमार भट, संदीप कौल, शिशान चकू, उदय भट हे गणेश मंडळांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीनगरमधील लाल चौकातील गणपती यार मंडळाचे मोहित भान म्हणाले, ‘‘तीन वर्षांपूर्वी पुनीत बालन यांच्यासमवेत काश्मीरमध्ये पुन्हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यांनी त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि पहिल्याच वर्षी दीड आणि पाच दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला. गेल्या वर्षी तीन ठिकाणी आम्ही उत्सव साजरा केला. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो त्याचप्रमाणे काश्मीरमध्येही हा उत्सव साजरा व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी पुढील वर्षी पाच ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याचे आमचे नियोजन आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने काश्मीरी पंडित पुन्हा पूर्वीसारखे सुखा समाधानाने तिथे रहावेत अशीच आमची प्रार्थना आहे.’’
‘‘पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव १७५ देशात साजरा होतो, पण आपल्या काश्मीरमध्ये १९८९ नंतर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत नव्हता. ही कसर गेल्या दोन वर्षांपासून भरून काढण्याचा आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांना पुण्यातील मंडळांनी आणि काश्मिरमधील कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळंच गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आता भारताचा स्वर्ग असलेल्या काश्मिरमध्येही होणार याचं समाधान वाटतं. त्यासाठी सहकार्य करणारे पुण्यातील मंडळं आणि काश्मिरमधील कार्यकर्ते या सर्वांचे मनःपूर्वक आभार!’’– पुनीत बालन उत्सव प्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
माजी नगरसेविका अर्चना पाटील यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार
Newsworldmarathi Pune: माजी नगरसेविका आणि भाजप नेत्या अर्चना पाटील यांना लोकमत समूहाकडून “महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५” ने गौरविण्यात आले आहे. लंडन येथे लोकमत तर्फे आयोजित दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या विशेष क्षणी भावना व्यक्त करताना अर्चना पाटील म्हणाल्या, “लोकमत महाराष्ट्ररत्न २०२५ हा सन्मान माझ्या वैयक्तिक प्रवासाचा नाही, तर माझ्या प्रभागातील जनतेच्या प्रेमाचा आणि त्यांच्या माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचा गौरव आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाचा नाही, तर मोठ्या जबाबदारीचा क्षण आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, आजवरचा सामाजिक आणि राजकीय प्रवास संघर्षमय होता, परंतु या प्रवासात जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळेच त्या पुढे वाटचाल करू शकल्या. “संघर्षाच्या काळात माझ्या मतदारसंघातील नागरिकांनी दाखवलेले प्रेम आणि विश्वास हेच माझे बळ ठरले. त्यामुळे आज मी हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या डोळ्यांसमोर माझा प्रभाग, कार्यकर्ते, सहकारी आणि जनतेची चेहरे उभे राहतात,” असेही त्या म्हणाल्या.
अर्चना पाटील यांनी हा सन्मान केवळ स्वतःपुरता न मानता तो आपल्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना आणि प्रभागातील नागरिकांना समर्पित केला. “हा बहुमान त्यांच्या स्वप्नांचा, त्यांच्या कष्टांचा गौरव आहे. त्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि दिलेला पाठिंबा हेच माझ्या कामाची खरी प्रेरणा आहे,” असे त्यांनी नमूद केले.
हा पुरस्कार त्यांच्या कार्याच्या पाठीशी असलेल्या समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “महाराष्ट्र रत्न हा सन्मान मला आणखी प्रामाणिकपणे, आणखी उत्साहाने काम करण्याची प्रेरणा देतो. समाजातील प्रत्येक घटकासाठी अधिक चांगले करण्याची जबाबदारी आता माझ्यावर दुपटीने आली आहे,” असे त्यांनी सांगितले.
लंडनमधील या भव्य सोहळ्यात अर्चना पाटील यांचा झालेला गौरव केवळ त्यांचा नव्हे, तर त्यांच्या प्रभागातील जनतेच्या संघर्षशीलतेचा आणि समाजासाठीच्या योगदानाचाही मान असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले.
पुणे मनपा निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना जाहीर; ४० वार्डामध्ये चार सदस्य तर एक प्रभाग पाच सदस्यांचा
Newsworldmarathi Pune: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी प्रभाग रचना निश्चित करण्यात येत आहे. पुणे महापालिकेकडून प्रारुप आराखडा जाहीर करण्यात आलेला आहे. मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांनी याबाबतची माहिती दिली.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी पणे महानगर पालिकेच्या हद्दीत एकूण ४१ प्रभाग असणार आहेत. यात ४० प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय असेल. महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या २०११ चे जनगणनेनुसार ३४,८१,३५९ इतकी असून अनुसूचित जातीची लोकसंख्या ४,६८,६३३ इतकी आहे व अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४०,६८७ इतकी आहे. तसेच निवडून द्यावयाच्या महानगरपालिका सदस्यांच् संख्या १६५ आहे.
एकूण ४१ प्रभागांपैकी प्रभाग क्र. ३८ हा ५ सदस्यीय असून उर्वरित ४० प्रभाग ४ सदस्यीय आहेत. प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात नागरिकांच्या हरकती/सूचना दिनांक २२ ऑगस्ट २०२५ ते दि. ३ सप्टेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत व दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पुणे मनपा भवन स्वागत कक्ष, पुणे मनपाची सर्व क्षेत्रीय कार्यालये व निवडणूक कार्यालय, स्वा.वि.दा. सावरकर भवन या ठिकाणी लेखी स्वरुपात स्वीकारण्यात येतील, असं आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मिटवला विसर्जन मिरवणुकाचा वाद
Newsworldmarathi Pune: पुण्याच्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीचा निर्माण झालेला वाद केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मिटवला असून यंदाही परंपरेनुसार आणि दरवर्षीच्या क्रमाने मिरवणूक काढण्याचा निर्णय सर्व मंडळांकडून एकमताने घेण्यात आला आहे. मोहोळ यांनी यासंदर्भात मानाच्या मंडळांसह सर्व मंडळांची एकत्रित बैठक घेत यावर तोडगा काढला. या बैठकीनंतर मिरवणूक सकाळी साडेनऊ वाजता सुरू करून परंपरेनुसार मंडळाचे क्रम असतील हा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदाच्या वर्षी काही मंडळांनी नियोजित वेळेआधीच विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर मंडळांनी त्यावर विविध मते व्यक्त केली होती. त्यामुळे नवाच वाद निर्माण झाला होता. त्यावर खासदार मोहोळ आणि आमदार रासणे यांनी सर्व मंडळांची एकत्रित बैठक घेत या विषयावर तोडगा काढला आहे.
याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेची चर्चा जगभरात होत असते. देशभरातून हा उत्सव पहायला भाविक मोठ्या संख्येने येत असताना अशावेळी नवे विषय समोर येणे हे पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या हिताचे नव्हते. याबाबत सर्व मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत सामोपचाराने आणि एकमताने निर्णय घेण्यास यश आले आहे.
‘पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे हा एक परिवार असून प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. मात्र हा विषय चर्चेतून सोडवला जाऊ शकतो, यावर माझा विश्वास होता. म्हणूनच सर्वांना एकत्रित येत हा विषय मार्गी लावला आहे. मी हा निर्णय घेण्यासासाठी समजूतीची भूमिका घेणाऱ्या सर्व गणेशोत्सव मंडळांचे स्वागत आणि अभिनंदन करतो.
बैठकीत झालेले निर्णय…
– मिरवणूक परंपरेनुसार आणि दरवर्षीच्या क्रमाणेच होणार
– मिरवणुकीचा शुभारंभ साडेनऊला करण्यात येणार
– स्थिर वादन कोणतेही मंडळ करणार नाही
– मिरवणूक वेळेत संपविण्याची जबाबदारी सर्वच मंडळांवर
– दोन मंडळातील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न
शुक्रवारी किंवा शनिवारी होणार महापालिका प्रारूप प्रभाग रचना जाहीर
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी संध्याकाळी अथवा शनिवारी सकाळी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. नगर विकास विभागाकडून निवडणूक आयोगाला देण्यात येणाऱ्या प्रारूप प्रभाग रचनेची स्क्रुटीनी करण्याचे काम हे आज उशिरापर्यंत पूर्ण न झाल्याने काहीसा विलंब होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुणे शहराच्या प्रभाग रचनेचे प्रारूप महापालिकेने नगर विकास विभागाला पाठविले आहे .हे प्रारूप निवडणूक आयोगामार्फत 22 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असल्याचे निवडणूक कार्यक्रमात जाहीर करण्यात आले आहे . राज्यातील बहुतांश महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्या प्रारुप रचना प्रसिद्ध करून हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत. तर महानगरपालिका निवडणुकांसाठी 22 ऑगस्ट रोजी प्रभाग रचना जाहीर करून हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत.
मात्र सर्वच महापालिकांच्या प्रारूपांची स्कुटीनी करण्याचे काम एकाच वेळी करावे लागणार असल्याने काही महापालिकांचे स्क्रुटीनि रखडली आहे. आज रात्री उशिरापर्यंत पुणे महापालिकेची स्क्रुटीनी होऊ शकली नाही . उद्या दुपारपर्यंत हे काम होणे अपेक्षित आहे . दुपारपर्यंत स्क्रुटीनी झाल्यास संध्याकाळी उशिरा प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. परंतु यापेक्षाही अधिक वेळ लागल्यास शनिवारी सकाळी ही रचना प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ अधिकारी सूत्रांनी दिली.
चंद्रकांत पाटील आयोजित धान्य महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद
Newsworldmarathi Pune: समुत्कर्ष ग्राहकपेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित धान्य महोत्सवास कोथरुडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ऐन गणेशोत्सवापूर्वी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने हजारो कोथरुडकरांनी सणासुदीच्या काळात लागणाऱ्या धान्यांच्या खरेदीचा मनमुराद आनंद लुटला.
कोथरुड मधील नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध मिळावे यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून १५ ॲागस्ट २०२४ रोजी समत्कर्ष ग्राहक पेठ सुरु करण्यात आली. या ग्राहक पेठेमुळे नागरिकांना दर्जेदार धान्य सवलतीच्या दरात एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासोबतच महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली. गेल्या वर्षभरापासून जवळपास ११ हजार पेक्षा जास्त कोथरुडकर या सुविधेचा लाभ घेत आहेत.
यंदाच्या १६ ॲागस्ट रोजी या ग्राहक पेठेस एक वर्ष पूर्ण होत असल्याने, ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून १९ आणि २० ॲागस्ट रोजी कर्वे रोड येथील हर्षल हॅाल येथे दोन दिवसीय धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सणासुदीच्या काळात लागणारा गहू, तांदूळ, ज्वारी कडधान्य, डाळी सर्वसामान्य ग्राहकांसाठी १५ टक्के आणि समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या सभासदांना ३० टक्के सवलतीच्या दरात खरेदीची सुवर्णसंधी या महोत्सवातून उपलब्ध करुन देण्यात आली.
या महोत्सवास कोथरुडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत, धान्य खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. जवळपास २० हजार नागरिकांनी धान्य खरेदी केली. आगामी काळात ही कोथरुडकरांसाठी अशा पद्धतीचा धान्य महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी ना. पाटील यांनी यानिमित्ताने केली.