Newsworldmarathi Mumbai : नवी मुंबई महापालिकेतील उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या बेधडक कारवाईच्या शैलीमुळे त्यांना नव्या सरकारकडून मोठे प्रमोशन मिळाले आहे. बेकायदेशीर डान्सबारवर कठोर कारवाई करत, थेट इमारतींवर बुलडोझर फिरविण्याचे धाडसी पाऊल उचलणारे गेठे आता नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त झाले आहेत.
डॉ. गेठे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत चालणाऱ्या बेकायदेशीर डान्सबारवर कठोर कारवाई करून स्थानिक प्रशासनाची ताकद दाखवली. रातोरात डान्सबारच्या इमारती पाडून कायदा व सुव्यवस्थेचा संदेश दिला.
त्यांच्या कामगिरीची दखल घेत एकनाथ शिंदे सरकारने त्यांना अतिरिक्त आयुक्तपदावर बढती दिली आहे. यापूर्वी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे OSD (Officer on Special Duty) म्हणूनही कार्यरत होते, ज्यामुळे सरकारमधील त्यांचा दरारा वाढला आहे.
गेठेंच्या कठोर धोरणामुळे बेकायदेशीर व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नेमणुकीमुळे बेकायदेशीर डान्सबार आणि इतर अतिक्रमण करणाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा आहे.
फडणवीस सरकार अशा अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देत आहे, जे कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करत आहेत. बेकायदेशीर अतिक्रमण आणि व्यवसायांविरोधातील कारवाईला आणखी वेग मिळणार आहे.
पुण्यात पोर्श प्रकरण घडताच बेकायदा विशेषतः अमली पदार्थ, डान्सबार आणि रात्री-अपरात्री सुरू राहणाऱ्या हॉटेलवर कारवाईचा पवित्रा घेत, शिंदेंनी काळे धंदे बंद करण्याची ताकीद प्रशासनाला दिली. याचा फायदा उठवून डॉ. गेठेंनी नवी मुंबई महापालिकेतील बेकायदा डान्सबार पाडले. त्यावरून संतापलेल्या डान्सबार मालकांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंना भेटून, डॉ. गेठेंच्या वर्किंग स्टाइलवर बोट ठेवले. त्यानंतर आपल्या पध्दतीने कारवाई सुरू ठेवून डॉ. गेठेंनी बारमालकांना धडा शिकवला. हेच गेठे आता नवी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त झाले आहेत. डॉ. गेठेंच्या या प्रमोशनमुळे आता पुन्हा बारमालकांची नशा उतरणार, हे नक्की.