Newsworldmarathi Pune : राज्यात सध्या थंडीचा जोर वाढत चालला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि अंदमानच्या समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात तापमानात घट होत आहे.
धुळे येथे तापमान तब्बल 4.1 अंश सेल्सिअस इतके खाली गेले असून, यंदाच्या मोसमातील हे नीचांकी तापमान नोंदवले गेले आहे. जळगाव, नाशिक, आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्येही थंडीचा कडाका जाणवत आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही तापमानात घट झाली असून, पहाटेच्या सुमारास थंडीचा कडाका अधिक जाणवतो आहे. मुंबई आणि कोकण भागात तुलनेने थंडी सौम्य असली तरी तापमानाच्या पाऱ्यात काही अंशांची घट नोंदली जात आहे.
पुढील दोन दिवस राज्यात थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ भागात थंडी अधिक तीव्र होईल.
तापमानात मोठी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. फळबागा आणि रब्बी पिकांवर थंडीचा परिणाम होऊ नये यासाठी पाण्याचा आच्छादन तंत्राचा वापर करावा.
उत्तर महाराष्ट्रातील हा थंडीचा कडाका पुढील काही दिवस कायम राहणार असल्याने नागरिकांनी थंडीपासून योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.