Homeपुणेशासकीय सेवेतही विवेकी वृत्तीने साहित्यनिर्मिती शक्य : गायकवाड

शासकीय सेवेतही विवेकी वृत्तीने साहित्यनिर्मिती शक्य : गायकवाड

Newsworldmarathi Pune : प्रत्येक शासकीय कार्यालय हा अतरंगी जनसामान्यांच्या चित्रविचित्र अनुभवांचा खजिना असतो. संवेदनशील अधिकारी या अनुभवांतून विवेकी वृत्तीने साहित्यनिर्मिती करू शकतात. असे अनुभव लेखन वाचकांसह त्या लेखकाला मोठ्या आनंदाचा ठेवा देते, हा स्वानुभव आहे. त्यामुळे सरकारी सेवेतील बंधनांची सबब न सांगता अधिकारी कर्मचारी यांनी लेखन करावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी आज (दि. 21) येथे केले.

Advertisements

मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महानगरपालिका आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन 20 ते 22 डिसेंबर दरम्यान पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी गायकवाड बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या व्ोळी राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, निवडणूक आयोग अधिकारी किरण कुलकर्णी, सूर्यदत्त इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, वसंत म्हस्के, सचिन ईटकर, संवाद पुणेचे सुनील महाजन व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अजानवृक्षाला जलार्पण करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

गायकवाड म्हणाले, प्रशासकीय अधिकारी अनेकदा सरकारी सेवेची सबब सांगतात. पण शासकीय सेवेत असूनही उत्कृष्ट साहित्य निर्माण केल्याची कित्येक उदाहरणे आहेत. त्यांचे आदर्श ठेवून लेखन केले जावे. शासकीय कार्यालयात कुठलेही काम घेऊन येणारा माणूस अधिकाऱ्याला इरसाल अनुभवांचा खजिना देऊन जातो. आपण संवेदनशील मनाने ते अनुभव कच्चा माल म्हणून वापरावेत आणि लेखनाला गती द्यावी. मात्र लिहिताना शासकीय परिपत्रकांची बोजड, नीरस भाषा टाळावी. सोपे, सुगम आणि सुस्पष्ट लिहावे. सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवावी, हे सांगताना गायकवाड यांनी कथन केलेल्या अनुभवांनी सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले.

सकारात्मक बाजू पहावी : डॉ. नितीन करीर
डॉ. नितीन करीर म्हणाले, मी लेखक म्हणून नाही तर वाचक या भूमिकेतून संमेलनात सहभागी झालो आहे. अलीकडे बरेच लेखन ग्राहकाभिमुख होत आहे, असे माझे निरीक्षण आहे. वेदनेतून, दु:खातून निर्माण होणारे लेखन कमी होत आहे. शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता जपावी आणि न्यून शोधण्याऐवजी सकारात्मक बाजू पहावी. यातून अधिकाऱ्यांच्या हातून चांगले लेखन होण्याची शक्यता वाढेल. तसेच शासकीय अधिकाऱ्यांविषयीची जनमानसातील प्रतिमा बदलण्यास मदत होईल,.

भारत सासणे म्हणाले, ‌‘शासकीय नोकरी ही जीवनाकडे आणि जगाकडे पाहण्याची विशाल खिडकी आहे. अधिकाऱ्यासमोर येणारा प्रत्येक अर्ज, प्रत्येक फाईल एखादे दु:ख, वेदना असू शकते. अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता जपणे आवश्यक आहे‌’.

प्रत्येकाचे आयुष्य सात-बाराचा उतारा : विश्वास पाटील
विश्वास पाटील यांनी स्वतःच्या कार्यकालातील महसूल विभागातील अनेक किस्से सांगितले. महसूल विभाग हा लेखनासाठी उत्तम खुराक किंवा कडबा आहे, असे ते म्हणाले. प्रत्येकाचे आयुष्य हा जणू सात बाराचा उतारा आहे, याचा प्रत्यय शासकीय सेवेत असताना मिळाला. सध्याच्या काळात साहित्य, संस्कृती, भाषेला मोबाईल नावाचा शत्रू निर्माण झाला आहे. त्याचा योग्य तेवढाच वापर केला जावा आणि अधिकारी मंडळींनी व्ोळेत लेखणी हाती घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला.

लेखन समाजासाठी दिशादर्शक ठरेल : चंद्रकांत पुलकुंडवार
चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, शासकीय सेवेत असतानाही अनुभवांचे संकलन, कथन, लेखन या पद्धतीने दस्तऐवजीकरण हे आपल्याप्रती समाजाचे देणे आहे, ही भावना महत्त्वाची आहे. बहुतेक अधिकारी चरितार्थ या हेतूने सरकारी नोकरीकडे पाहतात. त्यातील सेवाभाव लुप्त झाला आहे. त्यामुळे सामाजिक अभिसरणाचे प्रतिबिंब अधिक उठावदार दिसते. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती केल्याची अनेक उदाहरणे आहेत, जे लेखन समाजाला दिशादर्शक, मार्गदर्शक ठरणारे आहे.

तरुणांचा सहभाग वाढावा : अविनाश धर्माधिकारी
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, शासन या नावाचे एक विश्वकुटुंब आहे, असाव्ो. शासकीय अधिकारी हे एखाद्या कुटंबप्रमुखासारखी जबाबदारी निभावणारे असावेत. शासकीय पदांवर कामासाठी निवड ही सेवेची संधी मानावी. आपल्या भारतीय व महाराष्ट्रातील जनतेमध्ये संतविचार आणि छत्रपती शिवरायांच्या कार्याची गुणसूत्रे वाहात आली आहेत. शासकीय सेवेत मानवी मनाचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडते. त्या दर्शनाची अभिव्यक्ती कथा, कादंबरी, कविता, ललित लेखन अशा विविध स्वरुपात घडू शकते. शासकीय अधिकाऱ्यांच्या या संमेलनात यापुढे तरुणाईचा सहभाग वाढावा आणि या क्षेत्रातील प्रतिभा बहरून यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आयुक्त राजेंद्र भोसले यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त केले. शासकीय अधिकाऱ्यांच्या अशा प्रकारच्या संमेलनाच्या निमित्ताने परस्पर देवाणघेवाण होईल आणि सोहार्दाचे वातावऱण निर्माण होईल. प्रशासनातील अधिकारीही लक्षवेधक साहित्यनिर्मिती करू शकतात, हे या संमेलनाच्या प्रतिसादावरून लक्षात येत आहे. पुणे मनपाने यासाठी पुढाकार घेतला. अधिकाऱ्यांनाही आत्मपरिक्षणाची संधी मिळेल, त्यांच्यातील सुप्त कलागुण समोर येतील आणि पुनर्मूल्यांकनाचा अवकाश प्राप्त होईल, असे ते म्हणाले.

निमंत्रक सुनील महाजन यांनी शासकीय अधिकाऱ्यांमधील सुप्त लेखनगुणांना अवकाश मिळावा तसेच व्यासपीठ मिळावे, म्हणून हे संमेलन आयोजित केल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली घुले-हरपळे, प्रांजल शिंदे-चोभे यांनी केले तर आभार राजीव नंदकर यांनी मानले.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments