Homeपुणेवरिष्ठांची सापत्न वागणूक लेखनातील अडथळे

वरिष्ठांची सापत्न वागणूक लेखनातील अडथळे

Newsworldmarathi Pune : शासनात कार्यरत असताना सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळणारी सापत्न भावाची वागणूक, असूया, तांत्रिक धोरणात्मक अडचणी, समाजाशी संवाद तुटणे, गैरसमज, तिरस्कार, आत्मगौरव अथवा आत्मवंचनेत येऊ शकणारे अडकलेपण, अशा आव्हानांना सामोरे जावे लागल्याची भावना शासकीय सेवेत राहून लिखाण करणाऱ्या सिद्ध हस्त लेखकांनी व्यक्त केली.

Advertisements

मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महानगरपालिका आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनातील ‌‘अधिकाऱ्यांसाठी साहित्य लेखनातील आव्हाने‌’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. माजी प्रशासकीय अधिकारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, माजी प्रशासकीय अधिकारी, पानिपतकार विश्वास पाटील, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त किरण कुलकर्णी मंचावर होते. सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रल्हाद कचरे यांनी संवाद साधला. बालगंधर्व रंगमंदिरात संमेलन सुरू आहे.

भारत सासणे म्हणाले, उत्तम साहित्यकृती निर्माण करण्याकरीता सतत वैविध्यपूर्ण वाचन होणे आवश्यक आहे. आजूबाजूला घडत असलेल्या घटना, माणसे, सामान्यांच्या आयुष्यातील वस्तुस्थिती रूपत्माकपद्धतीने मांडणे, वास्तववाद साहित्यकृतीतून दर्शविणे गरजेचे असते. समकालीन साम्यवादी लेखकांच्या रोषाला तसेच त्यांच्याकडून पसरविलेल्या मिथकला, कारस्थानांनाही अनेकदा सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत सर्व आघाड्यांवर लढत राहत संयम आणि अस्सलपणाची उपासना केल्यास उत्तम दर्जाची साहित्यकृती निर्माण होते.
विश्वास पाटील म्हणाले, आपल्याजवळ असलेल्या कलेविषयी श्रद्धा ठेवणे, माध्यमावर उत्तम पकड असणे, शब्दांची आराधना करणे, अनुभूती जाणीवपूर्वक समजून घेणे या गोष्टी साहित्यकृतीची निर्मिती करताना अत्यंत उपयोगी ठरतात. मनन-चिंतन करत अभ्यासपूर्ण लेखानातून जीवनातील अनेक अनुभव मांडताना ते आपल्यामध्ये रुजावे लागतात, त्यांचा मंद सुगंध सुटला की त्या अनुभूतींशी तन-मनाने एकरूप व्हावे लागते आणि त्यातूनच अजरामर कलाकृती निर्माण होते.

किरण कुलकर्णी म्हणाले, लेखन करणे आणि ते लोकांपर्यंत पोहोचविणे या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. आजच्या सामाजिक अवस्थेत अचूकतेपेक्षा वेगाला नको इतके महत्त्व दिले गेले आहे. यातूनच सुमारीकरणाची लाट अंगावर आली आहे. यातून वाचण्यासाठी सवंगतेच्या आहारी न जाता, खोटेपणाची भर न घालता आशयपूर्ण लेखन होणे आवश्यक आहे.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments